नवीन लेखन...

रोईंगचा सुवर्णाध्याय

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची भरघोस कमाई केल्यानंतर भारतीय खेळाडूंचे आशियाई स्पर्धेतील अपयश अधिकच उठून दिसत होते. त्यात सेनादलाच्या बजरंगलाल ताखर या जवानाने रोईंगच्या सिंगल्स स्कल प्रकारात सुवर्णपदक मिळवून देशाची प्रतिष्ठा राखली. राजस्थानमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या गावातून आलेल्या बजरंगलालने अपुर्‍या आणि दर्जाहीन सुविधांसह खडतर परिश्रम करून हे पदक मिळवले.

सोळाव्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांची कामगिरी अपेक्षेनुसार होत नसल्याने नाराज असलेल्या क्रीडा शौकिनांना नौकानयनातील (रोईंग) सुवर्णपदकाने खुश केले. भारतीय लष्करातील राजपुताना रायफल्सच्या बजरंगलाल ताखर या जवानाने हे सुवर्णपदक मिळवले. तो राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात लहानाचा मोठा झाला आणि तरी त्याने नौकनयनासार’या क्रीडाप्रकारात प्राविण्य मिळवून देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. खरे तर रोईंगमधील सिंगल स्कल प्रकारातील हे पदक त्याला चार वर्षांपूर्वी दोहा येथे भरलेल्या आशियाई स्पर्धांमध्येच मिळणार होते. पण, तिथे त्याला या पदकाने काही शतांश सेकंदाने हुलकावणी दिली. हे लक्षात ठेवून त्याने यावेळी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. 500 मीटर्स, 1000 मीटर्स आणि 1500 मीटर्स या टप्प्यांवर त्याने ही आघाडी टिकवून ठेवली. सुरुवातीला त्याला उझ्बेकिस्तानच्या व्लादिमीर चेर्नेंको याच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबरच इराकदा हैदर हमरशीद यानेही जोरदार लढत दिली. पण, बजरंगलालने सुरुवातीपासूनच काही सेकंदाची आघाडी घेऊन ती शेवटपर्यंत टिकवली. शेवटचे 500 मीटर अंतर शिल्लक असताना ताईपेईच्या मिग हुई वँग याने जोर लावला आणि तो बजरंगलालला मागे टाकतो की काय असे सर्वांना वाटू लागले. या 500 मीटर अंतरात प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला ताणली गेली. पण, बजरंगलाल या आव्ह नालाही यशस्वीपणे सामोरा गेला आणि त्याने सात मिनिटे 4.78 सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. दुसर्‍या आलेल्या मिग हुई वँगने सात मिनिटे 7.33 सेकंद अशी वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले तर इराकचे हैदर हम रशीदने सात मिनिटे 10.10 सेंकद अशी वेळ नोंदवून ब्रॉंझपदक मिळवले.

रोईंगच्या आशियाई स्पर्धांमध्ये दोनदा विजेता ठरलेल्या बजरंगलालच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष होते. विशेषत: या क्रीडा प्रकारात एकही चिनी खेळाडू सहभागी होणार नसल्याने बजरंगलालचे सुवर्णपदक निश्चित मानले जात होते. रोईंगच्या एकूण 14 स्पर्धा होत असून नियमानुसार त्यापैकी केवळ दहा प्रकारांमध्येच चीनला भाग घेता येणार होता. असे असले तरी सुवर्णपदक मिळवण्यासाठी त्याने अपार कष्ट घेतले. चार वर्षांपूर्वी दोहा येथे सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्यावर त्याच्या प्रशिक्षकांच्या चेहर्‍यावरील नाराजी त्याला अजूनही आठवते. यावेळी ती उणीव भरून काढायची असे ठरवूनच त्याने स्पर्धेत प्रारंभ केला. जोरदार सुरुवात करून 500 मीटर अंतराच्या पहिल्या टप्प्यातच आघाडी घेऊन ती शेवटपर्यंत टिकवायची असे त्याने मनोमन ठरवले होते. ही योजना त्याने प्रत्यक्षात उतरवली आणि विजेता ठरला. दोहा स्पर्धेनंतर लगेचच त्याने गुआंगझोऊ स्पर्धेची तयारी सुरू केली होती. या चार वर्षांमध्ये कशी तयारी करायची याची काटेकोर योजना आखून त्या दृष्टीने तयारी सुरू केली. हे सुवर्णपदक जिंकल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असे त्याने त्याच वेळी ठरवले होते. सुरुवातीला हैदराबादजवळील सिकंदराबाद येथील हुसेन सागरमध्ये त्याने सराव केला. परंतु, तेथील सुविधा चांगल्या दर्जाच्या नव्हत्या. परंतु, चांगल्या सुविधा मिळवायच्या असतील तर चांगली कामगिरी करून दाखवणे आवश्यक होते हे तो ओळखून होता. बजरंगलाल म्हणतो, ‘युरोपातील देशांच्या मानाने आपल्याकडील सुविधांच ा दर्जा फारच खालचा आहे. चांगल्या बोटी आणि जीम्सबरोबरच उत्तम दर्जाच्या तलावाचीही उणीव जाणवते.’ आता या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याने सरकारचे लक्ष या खेळाकडे जाऊन चांगल्या सुविधा मिळू शकते असे त्याला वाटते. शिवाय तरुणांमध्ये या खेळाची आवड निर्माण होऊन चांगले खेळाडू मिळू शकतील असेही त्याला वाटते.

रोईंगचे राष्ट्रीय प्रशिक्षक इस्माईल बेग यांनी त्याला 2001 मध्ये या खेळाकडे वळवले. गेल्या वर्षी गुआंगझोऊ येथेच भारताच्या जुनिअर संघाने रोईंगमध्ये सुवर्णपदक जिकले होते. परंतु, गेली अनेक वर्षे देशाला या सुवर्णपदकाची प्रतीक्षा होती. ती बजरंगलालने पूर्ण केल्यामुळे इस्माईल बेग खुश आहेत. रोईंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील हे बजरंगलालचे सहावे सुवर्णपदक आहे. त्याने यापूर्वी सॅफ क्रीडास्पर्धांमध्ये तसेच दोन एशियन चॅम्पियनशीपमध्येही सुवर्णपदके मिळवली आहेत.

जयपूरपासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या मगनपुरा या त्याच्या गावी उत्साहाचे वातावरण आहे. त्याचे वडिल दुलाराम यांनी बजरंगलालची ही कामगिरी टीव्हीवर पाहिली. मध्येच गावातील वीज गेल्याने त्यांना ही स्पर्धा पूर्ण पाहता आली नाही. शेवटी जनरेटरचा वापर करून त्यांनी स्पर्धेचा आनंद लुटला. 2001 मध्ये लष्करात भरती होईपर्यंत बजरंगलालला या खेळाबद्दल फारशी माहिती नव्हती. त्याच्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने तिथे हा क्रीडाप्रकार रुजणे शक्यही नव्हते. एकदा या क्रीडाप्रकाराची ओळख झाल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अपार कष्ट घेताना हैदराबाद येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये 40 लोकांसमवेत त्याला रहावे लागले. अशा प्रकारच्या प्रशिक्षण सुविधा असूनही त्याने ही कामगिरी केली आह. आशियाई स्पर्धेत रोईंगमधील सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या ुवर्णपदका पाठोपाठ रोईंगमधील सांघिक प्रकारात भारतीय संघाने रौप्यपदक मिळवले तर महिलांच्या संघाने कांस्यपदक मिळवले. 28 वर्षांपूर्वी इस्माईल बेग या क्रीडाप्रकारात भाग घेत होते. त्यावेळी म्हणजे 1982 पासून त्यांना हे सुवर्णपदक हवे होते. 2006 मध्ये देशाला एक रौप्यपदक आणि काही कांस्यपदके मिळाली. पण, सुवर्णपदक मिळवण्याचे त्यांचे स्वप्न बजरंगलालने पूर्ण केले. या सुवर्णपदकानंतर तरी देशात रोईंगच्या खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध होतील आणि लालफितीच्या कारभारामुळे खेळाडूंना त्रास सहन करावा लागणार नाही अशी त्यांना आणि बजरंगलालला अपेक्षा आहे.

— महेश जोशी
(अद्वैत फीचर्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..