नवीन लेखन...

राजस यमन

चालायला सुरवात करताना, साथीला ३ ४ झाडांची साथ असताना, हळूहळू, नजरेसमोर हिरव्या गर्द वृक्षांची दाटी होऊन, त्यातच आपले मन गुंतून जावे त्याप्रमाणे यमन रागाचे काहीसे वर्णन करता येईल. तसे बघितले तर, सगळ्याच रागांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात असलाच अनुभव येतो म्हणा. यमन राग हा बहुदा एकमेव राग असावा, ज्या रागाची सुरवात “सा” स्वराने न होता, “नि” स्वराने होते म्हणजे “नि” स्वर,या रागाचा “सा”!! आपल्या रागसंगीतात “सा” स्वराला अपरिमित महत्व आहे.

या दृष्टीने “नि” स्वराचे इथले महत्व समजून घेता येईल. यमन राग हा खरोखरच अफाट आहे, असे मी म्हटले म्हणजे किती? अजूनपर्यंत थांग लागलेला नाही. दरवर्षी या रागावर आधारित नवनवीन गाणी तयार होतात आणि या रागाचे नवीन रूप आपल्या कानावर येते. मला तर असेच वाटते, निदान भारतात तरी, अजूनपर्यंत एकही संगीतकार झाला नसेल, त्याने आयुष्यात कधी ना कधीतरी या रागावर आधारित गाणे बनविले नाही!! एकतर या रागात सगळे स्वर लागतात आणि “म” स्वराचा अपवाद करता, सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात. त्यामुळे या रागाचा विस्तार, कलाकार करेल तितका थोडा, अशी परिस्थिती आहे.  आत्तापर्यंत इतकी अगणित गाणी तयार झाली आहेत की, केवळ यमन रागातील गाणी, या विषयावर एखादे छोटेखानी पुस्तक तयार होईल!!

शास्त्रानुरूप, या रागाचा समय जरी संध्याकाळचा असला तरी या स्वरांची गोडी आणि विविधता इतकी आहे की, दिवस/रात्री कधीही हा राग सादर झाला तरी काहीही फरक पडत नाही.याच्या स्वरांची मोहिनी विलक्षण आहे. अगदी, ज्यांना स्वरज्ञान नसते (ते बहुतेकांना  नसते म्हणा) त्यांना देखील हा राग सर्वसाधारणपणे आवडून जातो.”ग” आणि “नि”  या रागाचे प्रमुख स्वर. असे असले तरी बरेच कलाकार, तीव्र “म” स्वरावर अधिक भर देतात. अर्थात, प्रत्येक रागात अशी वैशिष्ट्ये असतात. रागातील स्वरस्थाने ही, सुंदर रुपवतीच्या चेहऱ्यासारखी असतात!! चेहऱ्यावरील “नाक”, “कान”,”डोळे”,”ओठ” यांमुळे त्या चेहऱ्याला सौंदर्य प्राप्त होते पण तरीदेखील, प्रत्येक अवयव “सुटा’ बघितला तर ते सौंदर्य जाणवेलच असे नाही.
“त्या दाट लांब केसांचा, वाऱ्यावर उडतो साज;
दु:खात अंबरे झुलती, की अंग झाकते लाज….
तरि हळू हळू येते ही, संध्येची चाहूल देवा;
लांबली उदासीन क्षितिजे, पाण्यांत थांबल्या नावा….
कविवर्य ग्रेस यांच्या “उर्मिला” या कवितेतील या ओळी. एकाच वेळी शृंगाराची चाहूल तर दुसऱ्या वेळी “उदासीन क्षितिजे” या शब्दांतून आर्त जाणीव. यमन रागाच्या ज्या अनंत छटा आहेत, त्यातली ही काही शब्दरूपे.
“इटवाह” घराण्यातील सुप्रसिद्ध सतारीये उस्ताद शाहिद परवेझ यांनी वाजवलेला यमन राग केवळ अपूर्व असा आहे. देशी, परदेशी असंख्य दौरे करून, आपल्या वादनाची प्रचीती त्यांनी दिली आहे. थोडे खोलवर निरीक्षण केले तर उस्ताद विलायत खान आणि पंडित रविशंकर, या दोन्ही वादन पद्धतीचा संकर यांच्या वादनात ऐकायला मिळतो तरीही उस्ताद विलायत खान साहेबांची पद्धत अंगीकारलेली आढळते, विशेषत: वादनात जेंव्हा “गायकी” अंग मिसळले जाते तेंव्हा तर प्रभाव उठून दिसतो. असे असले तरी वादनाचा आविष्कार स्वतंत्र आहे.
वादन ऐकताना, सुरवातीची आलापी ऐकताना “गायकी अंग” ऐकायला मिळते. इथेच “नि रे ग म” ही सुरावट ऐकायला मिळते. पुढे ठाय लयीत गत सुरु होते आणि सगळा यमन राग आपल्या समोर उभा राहतो. तारेवर ठेवलेला “दाब” आणि त्यातून निर्माण केलेली “खेंच”, हे वादनाचे विलोभनीय रूप आहे.
हिंदी चित्रपटात असंख्य प्रणयगीते बांधली गेली आहेत. त्यातील खास संदर्भ घ्यायचा झाला तर ‘”हम दोनो” चित्रपटातील “अभी ना जाओ छोडकर” हे युगुलगीत यमन रागाची चेष्टेखोर प्रणयाची छटा दाखवणारे गाणे आहे. “अभी ना जाओ छोडकर”  ही ओळ जेंव्हा रफीच्या गळ्यातून निघते, त्या लडिवाळ सुरांतच यमन राग दडलेला आहे. अर्थात गाण्यात पुढे दोन्ही “मध्यम” ऐकायला मिळतात, तिथे चाल यमन रागापासून वेगळी होते पण हे “स्वातंत्र्य” प्रत्येक रचनाकार घेतच असतो. अखेर गाण्यात शब्दातील भावना महत्वाची.
“अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही.
अभी अभी तो आयी हो, बहार बन छाई हो;
हवा जरा महक तो ले, नजर जर बहक तो ले;
ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा;
मैं थोडी देर जी तो लू, नशे के घूंट पी तो लू;
अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना तो नहीं”.
साहिरने गाणे लिहिले देखील प्रणयाच्या मस्तीत!! अगदी अबोध, किंवा ज्याला Platonic म्हणतात, अशा पातळीवरील जरी प्रणय नसला तरी प्रेमातील संयत गोडवा आणि चालीतील अवगुंठीत सुश्राव्यता, या गुणांमुळे हे गाणे लोकप्रिय झाले. गाण्यातील हरकती देखील, शब्दांतील भाव कुठेही दुखावला जाणार नाही, या बेतानेच घेतलेल्या आहेत.”नशे के घूंट पी तो लू” ही ओळ म्हणताना, रफी किंचित “नाटकी” वाटतो पण ते देखील गाण्याच्या प्रकृतीत व्यवस्थित सामावले जाते. संध्याकाळची रमणीय वेळ, गाणे ऐकताना मात्र सुगंधित होऊन जाते.
केवळ हिंदीच नव्हे तर एकूणच भारतीय चित्रपटात, ज्या गाण्यांना खऱ्याअर्थी “पवित्र” असे म्हणता येईल अशी असामान्य रचना, “ममता” चित्रपटात, “छुपा लो युं दिल मे प्यार मेरा” या हन्यातून अनुभवायला मिळते. निखळ यमन राग!! मुळात संगीतकार रोशन यांच्या चाली या नेहमीच शांत स्वभावाच्या असतात, अगदी प्रणयी भाव व्यक्त करायचा झाला तरी त्यात, संगीतकाराची “संस्कृती” दिसून येते. इथे तर, विरहाची आस आणि तडफड आहे. यमन रागात किती असंख्य भावभावना मांडता येतात, यासाठीचे हे मनोरम उदाहरण.
“छुपा लो युं दिल मे प्यार मेरा
के जैसे मंदिर में लौ दिए की,
तुम अपने चरणो में रख लो मुझको
तुम्हारे चरणो का फुल हुं मैं,
मैं सर झूकाए खडी हुं प्रीतम
के जैसे मंदिर में लौ दिए की”.
शायर मजरुह यांची कविता देखील तितकीच असामान्य आहे. प्रेमाला मंदिरातील ज्योतीची उपमा देणे आणि त्या भावनेला पार उंची गाठून देणे, केवळ सक्षम शायर(च) करू शकतो. कवितेतील प्रत्येक ओळ ही इतकी अपरिहार्य आहे की तिथे दुसरा कुठलाच शब्द आपल्या अभिप्रेत करता येत नाही. गाणे हळूहळू टिपेच्या स्वरांना साद घालते आणि त्या उच्च स्वरांनी गाण्यातील आशय आपल्या मनात कायमचा उतरतो. उत्तम भावकविता कशी असू शकते, याचे सुंदर उदाहरण. सगळे गाणे यमन राग व्यापून उरला आहे पण तरीही अखेर रागाच्या बाराखडी पलीकडे आपल्याला नेउन ठेवणारे हे गाणे आहे. किंबहुना रागाची आकृती अधिक जिवंत आणि विस्तारित करणारी ही कलाकृती आहे.
मिर्झा गालिब यांची एक अतिशय प्रसिद्ध गझल,”हर एक बात पे कहेतो हो तुम की तू क्या है” लताबाईंच्या आवाजात ऐकणे, हा अनुभव केवळ अवर्णनीय आहे. संगीतकार फैय्याज शौकत यांनी यांनी या रचनेची तर्ज बांधली आहे. गाण्यातील पहिलाच आलाप इतका अवघड आहे की तो आलाप घेणे, हीच एक परीक्षा ठरते. खरतर शायरी म्हणून गालिब यांच्या काही रचना फार अवघड आहेत. एकतर तुम्हाला उर्दू भाषेचा गाढा अभ्यास लागतो अन्यथा शायरीचा गंध समजून घेणे अशक्य. याचा रचनेत एक “मतला” आहे.
“रही ना ताकत-ए-गुफ्तार और अगर हो भी,
तो किस उम्मीद पे कहिये के आरजू क्या है” .
आता या ओळींतील, ” ताकत-ए-गुफ्तार” याचा जर अर्थ(च) कळला नाही तर मग कवितेची मजा घेता येणे कठीण. “संवाद किंवा बोलण्याची ताकद” हे एकदा समजून घेतले म्हणजे सगळ्या शेराचा अर्थ ध्यानात येतो आणि गालिब किती “श्रीमंत” आहे, याची कल्पना येते.
“हर एक बात पे कहेतो हो तुम की तू क्या है,
तूम्ही कहो के ये अंदाज-ऐ-गुफ्तगू क्या है”.
यमन रागात भरपूर गझला सापडतात. या रागाची खासियत अशी आहे, इथल्या प्रत्येक हरकतीला, विस्ताराची जोड देता येते आणि मग तो विस्तार, आपापल्या मगदुराप्रमाणे विस्तारता येतो. एकतर रागात सगळे सूर लागतात आणि प्रत्येक सुराची स्वत:ची अशी “किंमत” आहे. त्यामुळे या रचनेसारखी रचना घेतली तर समेवर उतरताना, आधीच्या कुठल्यातरी रचनेशी साम्य सापडेलच याची खात्री देत येत नाही. परिणाम, रागाची व्याप्ती अपरिमित होते.
आताच वरती आपण, एका गझलेचा आस्वाद घेतला तर आता, असेच अप्रतिम गोडवा लाभलेले भजन बघुया. “”किनु संग खेलू होली” – मीराबाईचे भजन. काव्य वाचले तर लगेच राजस्थानी मातीचा गंध अनुभवायला मिळतो. गाण्याची चाल, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली आहे. खरेतर मंगेशकरांची चाल म्हटल्यावर, काही ठराविक वळणाच्या हरकती ऐकायला मिळणे क्रमप्राप्त(च) ठरते परंतु त्याबाबतीत ही रचना फार वेगळी आहे. शब्दातील आर्त भाव तसेच काहीशी रुखरुख, चालीत सुंदररीत्या उतरली आहे.
“किनु संग खेलू होली
पिया तज गये हैं अकेली”
रचनेच्या सुरवातीलाच सतारीचे टोकदार सूर ऐकायला येतात आणि त्या ध्वनिसोबत आपल्या कानात यमन राग रुंजी घालायला लागतो. काव्यात रुखरुख स्पष्ट वाचता येते पण ती देखील किती मार्दवतेने चालीत मांडली आहे. गायनात कुठेही शब्द ओढलेला नाही की शब्द्फोड केलेली नाही. चाल सलगपणे आपला मार्ग आक्रमित असते आणि आपल्या मनावर गारुड घालीत असते. लताबाईंची गायकी कसली अप्रतिमपणे खुलून आली आहे. भजनात एकाबाजूने आळवणी असते तर दुसऱ्या बाजूने मागणे असते. या दोन्ही मागण्या इथे केवळ काव्यातून(च) नव्हे तर संगीतातून व्यक्त होतात.
१९७५ च्या सुमारास आलेल्या “आंधी” या चित्रपटात – “इस मोड से जाते है” हे गाणे यमन रागाची अनोखी ओळख करून देते. वास्तविक प्रणयी थाटाचे गाणे पण गाण्याची चाल सरळ, सोपी तो राहुल देव बर्मन कसला!! खरतर ही गुलजार यांची असमान्य भावकविता आहे. केवळ कविता म्हणून स्वतंत्र आस्वाद घेणे तितकेच आनंददायी आहे. गुलजार यांच्या बहुतेक कवितेंत, नेहमीचे शब्द नेहमी वेगळच आशय दर्शवतात आणि वाचताना वाचकाला चकित करून टाकतात. प्रसंगी उर्दू शब्दांची देखील पखरण केली जाते. शब्दांशी खेळण्याचे, या कवीचे कसब वाखाणण्यासारखे आहे.
“इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें;
पत्थर की हवेली को, शीशे के घरोन्दो में,
तिनके के नशेमन तक, इस मोड पे जाते है”.
या गाण्याची सुरवात देखील दीर्घ आलापीने होते. वरती आपण, “हर एक बात पे” मधील आलाप ऐकल्यास आणि आता या गाण्यातील आलाप ऐकल्यास, त्यात सत्कृत्दर्शनी काहीही साम्य ऐकायला मिळत नाही पण, जशी रचना पुढे सरकते, तशी लगेच दोन्ही गाण्यातील आलापीत साम्य आढळून येते. हे कसब संगीतकाराचे. गाण्याचा मुखडा “दिलखेचक” असेल तर त्या गाण्याची पुढील बांधणी मनोरम होण्यास मदत होते. अर्थात, अशा अफलातून रचनेत देखील संगीतकाराने, आपल्या हातखंडा तालाचा प्रयोग केला आहे. इथे “मोड” शब्दावर जी हरकत घेतली आहे, ती जितकी लताबाईंची तितकीच या संगीतकाराची, असे सहज म्हणता येईल. मात्रा मोजून बघितल्या तर केरवा ताल आपल्याला मिळतो पण त्याचे सादरीकरण ऐकले आणि त्याचा मागोवा घेतला तर संगीतकाराचे कौशल्य अनुभवायला मिळते.
काही वर्षांपूर्वी आलेल्या “रेफ्युजी” सिनेमात – “मेरे हमसफर, मेरे हमसफर;मेरे पास आ,  मेरे पास आ” हे गाणे ऐकायला मिळाले आणि परत एकदा या यमन रागाच्या दर्शनाने नव्याने दिड:मूढ व्हायला झाले. संगीतकार अन्नू मलिक यांची चाल असून, शायरी जावेद अख्तर यांची आहे. गायन प्रामुख्याने अलका याज्ञिक यांचे असून गाण्याच्या शेवटी सोनू निगमचा स्वर ऐकायला मिळतो. गाण्यात, एरव्ही फारसा ऐकायला मिळत नसलेला “रूपक” ताल ऐकायला मिळतो. गाणे अतिशय सुश्राव्य आहे आणि मनाची लगेच पकड घेणारे आहे.
“मेरे हमसफर, मेरे हमसफर,
मेरे पास आ,  मेरे पास आ,
हमे साथ चलना है उम्रभर,
मेरे पास आ,  मेरे पास आ”.
गाण्याची चाल जरी यमन रागावर असली त्याला राजस्थानी लोकसंगीताची फोडणी आहे. गाण्यातला रूपक ताल तर केवळ खास असा आहे.
अर्थात यमन रागावर मी इथे काही गाण्यांची ओळख करून दिली परंतु केवळ हिंदी गाण्यांचाच विचार केला तरी एक पुस्तक तयार करता येईल, इतका प्रचंड पसरलेला आहे. कधी कधी वाटते, या यमन रागाला कुठे “अंत” आहे का? अजूनतरी या रागाचा “किनारा” दृष्टीक्षेपात नाही आणि म्हणूनच राग आपल्याला सतत चकवा देत असतो, आपल्या आजूबाजूला आनंदाची पखरण करीत!!
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..