नवीन लेखन...

रेल्वेतलं मराठी….. आणि ऐशीतैशी !!!

मुंबईत वास्तव्याला असलेल्या माणसाने लोकल प्रवास केला नाही असं होऊच शकत नाही. जन्मापासूनच ठाणेकर असलेला मीही त्याला अपवाद कसा असेन?

अगदी १९७६ सालापासून मी “भारतीय रेल्वे”च्या मुंबई उपनगरीय सेवेने प्रवास करत आलोय. १९७६ ते १९८३ मध्ये अगदी दररोज… एका ठराविक गाडीने…. एका ठराविक डब्यातून… आणि ठराविक सहप्रवाशांसह. त्यावेळच्या गाड्या, ते सहप्रवासी हे सगळं बर्‍याचवेळा आठवतं.

भारतीय रेल्वेच्या एकूणच कारभाराबद्दल काही “मूलभूत” आणि “बाळबोध” प्रश्न मला नेहमीच पडतात. थोडे मजेदार आहेत आणि काही गंभीरही. तुम्हालाही ते प्रश्न कधी पडलेत का ते बघा…… 

पहिला प्रश्न…. आपण नेहमीच ऐकत असलेली उदघोषणा… म्हणजे मराठीत “अनाउन्समेंट”. “प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येणारी गाडी अंबरनाथला जाणारी धीमी लोकल आहे.” किंवा “प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर येणारी गाडी मुंबई सीएसटी ला जाणारी जलद लोकल आहे.” मला नेहमी पडणारा हा प्रश्न. फास्ट गाडीला मराठीत जलद गाडी म्हणतात आणि स्लो गाडीला धीमी गाडी. आता धीमी हा काय मराठी शब्द आहे का? प्लॅटफॉर्म, लोकल हे शब्दही बाहेरचेच पण ते खपून जातात. “धीमी” मात्र खटकतो हो! 

मराठीचे तमाम प्रोफेसर्स दररोज लोकलने प्रवास करत असतील…. त्यांना हा शब्द कधीच खटकला नाही? असो. विषयांतर नको!

मला पडणारा आणखी एक प्रश्न सांगतो. छत्रपती शिवाजी टर्मिनस! किती छान नाव आहे. कोणत्याही प्रकारचं आंदोलन न होताही नामांतर झालेलं हे एकमेव उदाहरण असावं. पण त्याचं आता “छशिट” असं नामकरण झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा असा विकृत शॉर्टफॉर्म झालेला मर्द मराठ्यांच्या संघटनांना कसा काय चालतो हा एक आणखी प्रश्न.

महाराजांच्या नशीबात तेच लोकमान्यांच्या. “लोटिट” म्हणजे काय ते माहित आहे का? कुर्ला याच्या नव्या रेल्वे टर्मिनसचं नाव आहे “लोकमान्य टिळक टर्मिनस”. त्याचंच झालं “लोटिट”. आता त्या स्टेशनावरुन ये-जा करणार्‍या बहुसंख्य गाड्या उत्तरेकडे जातात आणि तिकडूनच येतात आणि त्यांच्या प्रवाशांच्या सामानात बर्‍याचदा लोटी असते म्हणून का ते झालंय “लोटि टर्मिनस?” 

बरं ठिक आहे…. नावात काय आहे… पुढे चलूया…… 

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये हल्ली “खान-पान” सेवा असते. म्हणजेच ती “पॅन्ट्री कार”. पुण्याला जाणार्‍या गाड्यांमध्ये पूर्वी पोहे, बटाटा वडा, भजी वगैरे मराठमोळे पदार्थ हमखास मिळायचे. आताही कधीकधी मिळतात. मुंबई पुणे प्रवास केवळ तीन तासांचा. पण मुंबईहून कोलकत्याला जाणार्‍या तमाम गाड्या महाराष्ट्रातून किमान १० तासांचा प्रवास करतात मात्र त्यात असलेल्या या “खान-पान” सेवेमध्ये मराठी पदार्थ मिळणे दुरापास्त. बंगबाबूंसाठी माशांचे कालवण, रोशगुल्ले वगैरे मात्र हमखास मिळण्याची सोय. जे बंगालकडच्या गाड्यांचे तेच दक्षिणेकडे जाणार्‍या गाड्यांचे. इथे रोशगुल्ले तर तिथे इडली-वडा-मसालाडोसा. मराठी पदार्थ तिथूनही हद्दपार !!! 

आपल्यालाही असे काही प्रश्न पडत असतील तर जरुर कळवा…… मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न आपल्यालाच करायला पाहिजेत ना?

— निनाद अरविंद प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..