नवीन लेखन...

पुण्यनगरी काशी – भाग २

दरभंगा, गंगामहाल, सिंदीया, नेपाळ या घाटांची भव्यता व शिल्पकला डोळयात भरणारी. पुढे अहिल्याबाई होळकर, नागपूरकर भोसले, वैद्य अशा अनेक घाटांची मालिकाच आहे. प्रत्येकामागे इतिहास आहे. विष्णु, पार्वती, विनायक व अनेक देवतांची मंदिरे यांनी घाट सजलेला आहे. काशीचे घाट आणि रंगीबेरंगी छञ्या यांचे अतूट नाते आहे. छञ्यांच्या खाली पुरोहित व न्हावी आपली कर्मे मन लावून उरकत असतात. काशीस जावे, नित्य वंदावे व अंत्यसमयी गंगाजल मुखात पडावे व अंति मोक्ष पावावे ही सर्वसाधारण हिंदु व्यक्तिची अंतिम इच्छा पुरी करणारे दोन प्रसिध्द घाट मनकर्णिका अथवा स्वर्गदारेश्वर आणि राजा हरिश्चंद्र घाट. 2500 वर्षे सतत जळणारे घाट अशी प्रसिध्दी असलेली ही जागा जगात दुसरी क्वचितच आढळेल. लाकडाच्या ओंडक्यासारखी पांढऱ्या कपडयात गुंडाळलेली प्रेते सायकल रिक्षा, टेंपो, टांगे यांच्या टपावर बांधलेली. अशी प्रेते विविध भागातून दहनाकरता येत असतात. मृतदेह आणणाऱ्या शववाहिन्या आहेत. त्यांची नावे पहा कशी तर अंतिम संस्कार स्वर्गवाहिनी, स्वर्ग एक्सप्रेस. अजून तरी रेल्वे स्पेशल नसावी. स्मशानात आल्यावर मृताच्या तोंडात गंगाजल टाकण्यासाठी सार्वजनिक नळावर जशी गर्दी व मारामारी असते तसाच प्रकार येथेसुध्दा असतो. मरणात खरोखर जग जगते हे काशीबाबत 100 टक्के खरे आहे. स्मशानाचा मुख्य डोंब खऱ्या अर्थाने येथील सम्राट आहे. दहनाच्या नावाखाली वर्षाला कोटयावधी रूपयांचा व्यवहार त्याच्या मर्जीनुसार घडत असतो.विद्युतदाहिनी व लाकडाचे ओंडके या दोन्ही प्रकारे दहन विधी चालू असतात. आमचा बोटीतील प्रवास चालू असताना चार चितांच्या भडाग्नीने आकाश उजळलेले होते. दिवसाकाठी काही वेळा हा आकडा 80 पर्यंतसुध्दा जातो. पुर्वी साथीच्या रोगांच्या वेळी कुंभमेळयासारखी गर्दी होत असे. अशा या स्वर्गप्राप्तीच्या अनोख्या मार्गाचे दर्शन घेत या अप्रतिम घाटाचा निरोप घेतला.

हिन्दु धर्मात 7 परमपवित्र क्षेत्रे मानलेली आहेत. काशी, हरिव्दार, मथुरा, अयोध्या, कांची, व्दारका, अवंतिका अथवा उज्जैन. सर्वात मानाचे स्थान काशी विश्वेश्वराचे. अगदी मत्स्यपुराण ,अग्निपुराणातही यासंबंधी उल्लेख आहे. विद्या आणि भक्ती यांचे काशी हे माहेरघर. मुसलमान आक्रमणे होईपर्यंत भरभराटीच्या उच्च स्थानावर पोहचलेले पुण्यक्षेत्र असा उल्लेख प्रसिध्द चिनी प्रवासी हुएनत्संग यानी केलेला आहे. इ.स.606 ते 648 मध्ये जेव्हां तो हर्षवर्धनाच्या काळात भारतात राहिला होता त्यावेळी त्याने वर्णन केलेले दाखले आजही उपलब्ध आहेत. पुढे 1194 साली महमद घोरीने स्वारी करून हे पवित्र मंदिर उध्वस्त केले. यानंतर 700 वर्षे अनेक मुसलमान स्वाऱ्यांमुळे या शहराची वाताहात होत गेली. हिन्दु पंडितांच्या सहिष्णुतेने संस्कृती कायम टिकली. कांहीं काळ शंकराची पिंड सुरक्षित रहावी म्हणून  उत्तर काशी गंगोत्री येथे ठेवलेली होती.

1770 मध्ये इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकरांनी मंदिराची पुर्नस्थापना केली. या मंदिराची उंची 16 मीटर, गाभारा 7 चौ.मी. व मंडप 11 चौ.मी.आहे. कळस संपूर्ण सोन्याचा असून तो महाराज रणजीत सिंग यानी भेट दिलेला आहे.मंदिराकडे जाण्याचा रस्ता म्हणजे बोळांचे चक्रव्युह. त्यात दोन्ही बाजूंनी दाटीवाटीने असलेली पुजेच्या सामानाची, पेढयांची खानपानाची दुकाने, वाटेत आरामात बसलेले गाई ,बैल व सोबत बंदुकधारी पोलीसांचा ताफा, मेटल डिटेक्टर मधून तपासणी या सर्व दिव्यातून गाभाऱ्यापर्यंत पोहचलो तेव्हा कुठे हायसे वाटले. शिवलिंग नर्मदेच्या काळया दगडाचे व चोहोबाजूनी पांढरा शुभ्र मार्बल. नेहमी गंगाजल व बेल फुलांच्या राशीत बुडालेले. गाभारा चिकट पाण्यानी थबथबलेला. पैशाचे पाकीट जपायचे. माकडांपासून बचाव करायचा. अशा अडचणींवर मात करत विश्वेश्वराचे पुण्य दर्शन झाले.लागुनच औरंगजेबानी बांधलेली आलमगीर मशीद. खांब गुप्तकालीन नक्षीकाम असलेले, विरूध्द दिशेला तोंड केलेला नंदी, म्हणजे विश्वेश्वर तोडून मशीद बांधलेली हे धडधडीत सत्य हेच खरे पण सर्व पचवायचे. वादग्रस्त भाग म्हणून प्रवेश नाही.लागून एक बुजवलेली विहीर व त्यातील पाण्यात स्वयंभु शिवलींग आहे. पंडे भुंग्यांसारखे बाजूनी पिंगा घालत होते. दानधर्म केल्याशिवाय सुटका नव्हतीच. पंडेमंडळी तरीही अतृप्तच. जवळच एक हॉल व त्यात तळघर. तेथे प्रज्वलित केलेले शिवलिंग. चारही बाजूंनी ध्यान करण्यास उत्तम बैठकीची जागा. कल्लोळातील दर्शनानंतर खरच या जागी मन:शांत मिळाली.

जगप्रसिध्द बनारस हिंदू विद्यापीठ म्हणजेच बी.एच.यू्र .हे वाराणसीचे गौरवस्थान आहे. काशीवर राज्य विव्दानांचे याची पोच म्हणजे हे स्थान. शहरापासून 9किमी. अंतरावर  1300 एकर परिसरात पसरलेले छोटे शहरच आहे. विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळयाचा मुहुर्त 1905 सालच्या बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात पंडित मदन मोहन मालवीय यानी केला. आम जनतेकडून 4 आणे गोळा करत लाखो रूपये जमा झाले. अर्धगोलाकृती रचना असलेल्या या विद्यापीठात भारतीय तत्वज्ञान, संस्कृत, इंजिनीयरींग, वैद्यकीय व विज्ञानातील इतर विषय, संगीत अशा 10 ते 12 विभागात 16 ते 18 हजार विद्यार्थी अध्यापनास भारत व जगातून येत असतात. प्रत्येक विभागाची वास्तु प्रेक्षणीय. बाजूनी सुरेख उद्यान. निटस रस्ते. कालचे पाहिलेले वाराणसी आणि आजची ही वास्तु म्हणजे दोन भिन्न संस्कृती एक्रत्र जपलेले आदर्श उदाहरण आहे.

राधाकृष्णन, गुरवर्य रानडे, रँगलर परांजपे, जयंत नारळीकर असे मान्यवर येथील विद्यार्थी व अध्यापक होते. मुख्य गेट मधून प्रवेश केल्यावर आपण एका नव्या विश्वात प्रवेश करतो. मदन मोहन मालवीयांचा भव्य पुतळा, त्यासमोर काशीविश्वेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती म्हणजे नवे विश्वनाथ मंदिर. बिर्लांचे हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय आहे.

मंदिर अतिशय भव्य पांढऱ्या संगमरवरी व लाल दगडाचे असून 76 मीटर उंच व 38 मीटर रूंद असे एकूण बांधकाम आहे. बाजूनी मोकळया गॅलेऱ्या व चोहोबाजूनी उद्यान. मंदिराच्या आत शिवलिंग, लक्ष्मी नारायण, गणपती, रामसीता, श्रीकृष्ण अशा अनेक देवतांच्या सुबक सजवलेल्या मुर्ती आहेत. फुले, नारळ, गंगेचे पाणी या सर्व गोष्टींना पूर्णपणे मनाई त्यामुळे कमालीची स्वच्छता व अतिशय शांत वातावरण. एकूणच देवस्थान पाहून मनाला आनंद व आत्मशांती मिळते.

काशी विश्वेशर दर्शनाइतकाच महत्त्वाचा कार्यभाग म्हणजे बनारसी सिल्क साडया खरेदीचा होता. दुकानात भारतीय बैठक. गाद्या व लोड जणू अगदी लग्नाच्या बैठकीचा थाट. शेकडोंनी साडया उघडल्या जात होत्या. ढीगचे ढीग रचले जात होते. त्यातून आवडलेल्या साडया बाजूला काढल्याबरोबर ताबडतोब पुरूष मंडळी दुकानााबाहेर पडली. दोन तासाचा सिनेमा संपला. तेथेच बाजी जिंकली होती.

बनारसी पान हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अंदाजे 5 ते 6 हजार व्यक्ती या व्यवहारात गुंतलेल्या आहेत.नुसत्या भारतभर नाही तर जगभर ही पाने पुरवली जातात. रात्री एका बनारसी पानाच्या ठेल्यासमोर आम्हा पाहुण्या पुरूष व बायकामंडळींना पानाचा तोबरा तोंडात भरताना पाहून पानवाला आमच्याकडे अशा छद्मी नजरेने पाहात होता पण आम्ही दुकानासमोर पिचकाऱ्या न टाकता लगोलग रामराम ठोकला.

भारत माता मंदिर हे काशीतले असे मंदिर की जेथे कोणतीही देवाची मुर्ती नसून सबंध भारताचा पाकीस्तान, श्रीलंकेसकट नदया, डोंगर समुद्रासकट भव्य नकाशा 30 मीटर बाय 18 मीटर पसरलेला आहे. भारतमाता हीच देवता त्यामुळे दुसरी कोणतीही मुर्ती नाही. याचे उद्घाटन महात्मा गांधींनी केले होते. दुर्गा मंदिर लाल दगडाचे नागरा पध्दतीने बांधलेले, आवारात मोठा तलाव. साखळीला बांधलेल्या घंटांवर अनेक माकडे मजेत झोके घेत होती. मंदिरावर उंचच उंच शिखरासारखे मनोरे व मध्यात उंच कळसाचा मनोरा म्हणजे अनेक देवातून एकच देव ही कल्पना आहे.

संकट विमोचन मंदिरात आम्ही शनिवारी संध्याकाळी पोहचलो तेव्हा भक्तगणांनी ते दाटीवाटीने भरलेले होते. मुर्ती सुरेख सजवलेली. काही भक्त हनुमान चालीसा गात होते. कांहीं ध्यानात बसलेले तर कांही ठिकाणी शाळा कॉलेजची मुले व मुली मंदिराचे चित्र काढण्यात मग्न होती. तुलसी मानस मंदिर हे एका बंगालच्या धनवान मारवाडयाने फार कल्पकतेने बांधलेले शुभ्र संगमरवरी दगडाचे भव्य मंदिर डोळे दिपवणारे आहे. शुभ्र पांढऱ्या भिंतीवर सुवाच्च अक्षरात तुलसी रामायणाचे श्लोक लिहीलेले. समोर तुलसीदासाची भव्य मुर्ती त्याच्या हातात बोरूसारखी लेखणी आणि समोर तुलसीरामायणाची प्रत. त्याची एकेक पाने वीजेच्या मदतीने उलगडण्याची व्यवस्था. राम लक्ष्मण सीता यांच्या दागिन्यांनी मढवलेल्या सुबक मुर्ती. लकलकणारी झुंबरे. वरचा मजला महाभारत व रामायण यातील विविध कथा हलणाऱ्या मुर्तीमधून दाखविलेल्या, सोबत नद्या व सरोवरात पंपानी फिरवलेले पाणी, शृंगार केलेल्या नर्तिका. एकूण सर्व कामच अफाट आहे. इतक्या घटना एका छत्राखाली पाहाताना आपण अचंबित तर होतोच पण शेवटी डोळे सुध्दा थकतात. भोवती सुरेख उद्यान आहे.वाराणसी म्हणजे मंदिरेच मंदिरे. शेवटी पाय मारवाडी भोजनालयाकडे वळले. सात्त्विक भोजन व त्यानंतर मशहूर बनारसी मिठाई. अशा रितीने स्वप्ननगरी काशीने मने जिंकली होती.

बुध्दम शरणम् गच्छामि

डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..