नवीन लेखन...

जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग एक

आता जगण्यासाठी सुद्धा नियम करावे लागतील का ?
हो.
कसे जगावे, यासाठी जे नियम चुकीच्या पद्धतीने प्रस्थापित होत आहेत, झालेलेच आहेत, त्यातील दोष काढून त्यांना पुनर्स्थापित करावे लागणार आहे. शास्त्र न सोडता, आणि परंपराचा आदर राखून हे नियम बनवता आले तर जगणे सोपे होईल.
“मला असे वाटते” या सदराखालीच हे नियम बनवावे लागणार आहेत. कारण या नियमांना कोणताही ठोस आधार नाही.
हे नियम स्पष्टपणे कुठेही वर्णन केलेले नाहीत, पण नियम असल्याशिवाय इथे पानही हलत नाही, कुठे आहे रेफरन्स दाखवा पाहू, असे विचारले तर उत्तर देणे, पुरावा दाखवणे कठीण होईल, हे आधीच नमूद करतो.
नियम असतात ते अंदाज बांधण्यासाठी असतात. तेच खरं असंही काही नसतं. आरोग्याचे नियम म्हणजे कायदा नव्हे, आणि कायद्याने सर्व मिळतेच असे तरी कुठे आहे ना ?

एवढ्या उंचीला एवढे वजन असावे, असलेच पाहिजे असे नाही, रक्तदाब एकशेवीस बाय ऐशी असावा. तो तेवढाच असावा असे नाही. नियम केला की, एकशेवीस चे एकशे एकवीस झाले की रक्तदाब वाढला की नाही ? से येस ऑर नो. उत्तर द्यावे लागेल. हो. पण तारतम्याने आपण ठरवतो, एकने वाढ म्हणजे लगेच एक गोळी वाढवावी, असे नसते ना ! शेवटी तारतम्य आणि होणारा त्रास, दिसणारी लक्षणे, आणि नियम यांची योग्य सांगड घालता येणे महत्त्वाचे!

पण नियम म्हणून काही हवेत की नकोत ? म्हणून काही नियमांची क्रमशः चर्चा करू.

नियम एक.
पहिलाच नियम असा करू की, कोणताही नियम पाळू नये.

प्रत्येकाचे शरीर वेगळे, प्रत्येकाचे हातापायांच्या बोटांचे ठसे वेगळे, केसांची संरचना वेगळी, प्रत्येकाच्या डोळ्याची ठेवण वेगळी, प्रत्येकाचा आत्मा वेगळा, प्रत्येकाचे मन वेगळे, प्रत्येकाच्या इंद्रियांची क्षमता वेगळी, प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाची भूक वेगळी, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी, प्रत्येकाचा कोठा वेगळा, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे, प्रत्येकाचे कामाचे स्वरूप वेगळे, प्रत्येकाची धारण करण्याची क्षमता वेगळी, प्रत्येकाची शक्ती वेगळी, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी……..

एवढी विविधता इथे नांदत असताना, प्रत्येकाला होणारा आजाराचे स्वरूप वेगळे, त्याला होणारे त्रास वेगळे, प्रत्यःकाला बरे वाटण्याची कारणे वेगळी, त्याचे पथ्यापथ्य वेगळे, त्याची औषधे वेगळी……… हे फक्त आयुर्वेद सांगतो.

एवढी विविधता आपल्या अवतीभवती दिसत असताना, प्रत्येकाने पाळायचे नियम एकच कसे असतील ? यासाठी पहिलाच नियम, आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताच नियम नक्की होऊ शकत नाही. अगदी एकाच प्रकृतीची, एकाच वेळी जन्माला आलेली, दोन जुळी माणसे किती भिन्न स्वभावाची असतात ? त्या दोघांमधे बाहेरून आतून थोडेफार साधर्म्य दिसेल पण तेवढ्यापुरतेच असते. कुंडलीशास्त्रानुसार देखील त्यांच्या अंशांश कुंडल्या बदलतात. असंच प्रत्येकाचे असते. त्यामुळे इथे प्रत्येकाचे नियम वेगळे.

हे नियम, थोडे तारतम्य वापरून, थोडा अनुभव वापरून, थोडा विवेक वापरून, थोडा ग्रंथांचा अभ्यास करून, थोडे व्यवहारज्ञान वापरून, थोडे थोरामोठ्यांनी सांगितलेले ऐकून, बदलायचे असतात.

जसे, दूध दही हा प्रमेहाचा हेतू म्हणजे मधुमेह होण्याच्या अनेक कारणातील एक कारण सांगितले आहे. याचा अर्थ लगेचच दूध दही कायमचे बंद करण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रकृतीला, आजच्या भाषेत काय “सुट” होते ते पहावे. अतिरेक नक्की टाळावा. चहामधे दूध चालेल, पण दुधाचाच चहा नसावा. गरज असेल तरच दूध घ्यावे. औषध म्हणून नको. अनुपान म्हणून दुध प्यावे, पण नियम म्हणून बोर्नव्हीटा खपवण्यासाठी दूध नको. म्हणजे बोर्नव्हीटा खाल्ला नाहीतर ताकद कशी येणार म्हणून दूध पाजवायचे, किंवा दुधामधे पूर्ण शक्ती असते, म्हणून दूध प्यायलाच हवे, पण दुधाचा वास चव आवडत नाही म्हणून त्यात काहीतरी टाॅनिकच्या नावाने विरघळून टाळूत ओतायचे, हा नियम नको.

इथे तारतम्य हवे, माझ्या मुलाला खरोखरच या सर्वाची गरज आहे का, हे एखाद्या जाणकार वैद्याला विचारून घ्यावे आणि नंतरच निर्णय घ्यावा. उगाचच कोणीतरी हिरो, खेळाडू, आपले खोटेनाटे सिक्रेट ओपन करत असतील तर भुलून जाऊ नये, इतकेच.

सांगायचा मुद्दा असा की, स्वतः ठरवून काहीही करू नये. सहजपणाने एखादी गोष्ट घडून जावी, नको त्या ठिकाणी असलेली बुद्धी संपवून टाकली तर हवी तिथे ती वापरता येत नाही.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..