नवीन लेखन...

प्रवास

नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले. मायनं गडबडीत दोन चार भाकरी आन मिरचीचा ठेचा मलं बांधुन देलता.गावापसुन एष्टी थांबा तिनेक किलोमिटर लांब आसल्यानं मि साडेसातलच घराबाहीर पडलो.सगळा सस्ता सामसुम व्हता.मी आपलं एष्टी हुकु नाही मनुन झपाझप चालत एकदाचा फाट्यावर येऊन एष्टीची वाट पहात बसलो.फाट्यावर ना निवारा व्हता ना पाण्याची सोय व्हती.तिथं मह्या सारखे एक दोन प्रवासी आन दोनचार मोकाट कुत्रे सोडले तं काय बी नवतं.एष्टीचा नवचा टाईम व्हता.साडेनव झाले तरी आंजुक एष्टि आली नवती.म्या आपला तिन तिनदा घड्याळात टाईम पाहु लागलो.मलं हि एष्टी हिंगोलीलोकच व्हती.तिथुन आकरा वाजताची एष्टी पकडायची व्हती.मह्या मनाची तळमळ व्हवु लागली.आकराची एष्टी चुकली तं डबल तिनलोक दुसरी गाडी नवती.आश्यात औरंगाबादलं जायालं उशीर झाला आसता.मी ईचार करतच व्हतो तेव्हड्यात धुड्डा उडवत आन कर्रऽऽकचुन बिरेक लावत फाट्यावर एष्टी थांबली.एष्टीतुन एक दोनजणं उतरले.आम्हीबी एष्टीत चढलो.एष्टी खचाखच भरलेली व्हती. जागा नसल्यानं मंग एष्टीच्या रॉडलं धरून उभलबेट्या परवास करू लागलो.उभ्या उभ्याच बाजुच्या खिडकीतून बाहीर पहात पळणारे झाडं,डोंगर पाहु लागलो.कसतरी मंग म्या हिंगोलीलोक आलो.

हिंगोलीत आलो तं फलाटावर औरंगाबादलं जाणारी एष्टी लागलेलीच व्हती.म्या एष्टीत चढलो. चौकडं नजर टाकत जागा धुंडु लागलो.एक रिकामी सिट दिसली.जागा हेरून म्या विंडोसिटलं बसलो.थोड्यावेळातच एष्टी पळायलं लागली.संगं एक कथायचं पुस्तक आणलं व्हतं.मी ते पुस्तक काढुन वाचु लागलो.तेवढ्यातं तिकिटं…..तिकीटं…असा कंडक्टरचा आवाज आला.मी तिकीट घेयालं शंभराच्या दोन नोटा कंटक्टरलं देल्या.तव्हा एकशे साट रूपयेतिकीट व्हतं.कंडाक्टरणं तिकीट देलं आण ऊरलेली रक्कम तिकीटाच्या माघं लेहुन देली.म्या तिकीट घेतलं.पण मलं सारकं सारकं त्या पैशाच ध्यान येवु लागलं.सहा घंट्याचा प्रवास व्हता.“आपल्यालं पैशे वापस घेयाचं ध्यानच राह्यलं नायं तं.” मी मनातच मणालो.आत्ता पुस्तकातबी मव्ह मन लागयनं गेलतं.राहुन राहुन मलं पैश्याचीच आठवन येवु लागली.मी तिनदा तिनदा कंडाक्टरकडं पाहु लागलो.त्याच्यावरची मही नजरच हटवयनं गेलो.कंडाक्टरनं मांघ वळुन पाह्यलं की मी आंबट हासायचो.त्यालं पैशाचं ध्यान राहावं हा हेतु व्हता.आत्ता खिडकीबाहीरबी पाहु वाटयनं गेलतं.बरं रक्कम बी कमी नवती.त्याकाळी दिवसभर काम केलं तं पन्नास रूपये गड्यालं तं तिस रूपये बाईलं मजुरी मिळायची.मलं राहुन राहुन त्या पैशाची आठवन येऊ लागली.तेव्हड्यात एक दोनदा म्या कंडक्करलं ईचारलंबी चिल्लर आली का मुनं तं त्यानं उलट दटावुनच मनलं कि,“एवढी पैशाची काळजी हे तं चिल्हर आणायची नं.आत्ता उतरोस्तोर मलं पैशे मांघायचे नायं आण हिरवटासारख मह्याकडं पाह्याचबी नायं.”

कंडाक्टरण मलं कोल्हुनच टाकलं व्हतं.पण मह्यामनाची मात्र सारकी तगमग व्हत व्हती. आंधीपण महे लय वेळी परवास करतांनी तिकीटावर लेहुन देलेले एक दोन रूपये ईसरले व्हते.एक दोन रूपायाच ठिक व्हतं पण ईथं चाळीस रूपयाचा प्रश्न व्हता.एष्टीच्या वेगानं मह्या मनात तगमग व्हवु लागली.एवढ्यात जिंतुर आलं आन बसस्टँडल एष्टी थांबली.एष्टीतुन आठ-दहा प्रवाशी उतरले आन तेव्हडेचं चढले.गाडी खचाखच भरली व्हती.फक्त मह्याबाजुचीच सिट रिकामी व्हती.मलय बरं वाटलं.तेव्हड्यात एष्टी घुरघुराय लागली.ड्रायवरनं एष्टी कलवली.

“कंडक्टर साहेब” असा मंजुळ आवाजं कानावर पडला.कंडाक्टरनबी बेल वाजवत तेव्हड्यात एष्टी थांबवली आन एष्टीचा दरूजा उघडला.त्या दरूज्यातुन एक सुंदर मुलगी आत आली.तिचं ते रूप पाहुन सगळ्या एष्टीतले पुरूष लोकं डोळे फाडून तिच्याकडं पाहु लागले तं मुली वं बाया तिच्या सौंदर्यावर जळु लागल्या.प्रत्येकालं ती आपल्याच सिटवर बसाव आस वाटु लागलं.पण कुठबी जागा रिकामी नसल्यानं ती मह्या बाजुच्या सिटवर येवुन बसली.मव्ह तं काळीज नाचायलच लागलं व्हतं.ती एखांद्या मोरणीसारखी डौलत डौलत माझ्यासिटकडं आली.आत्तापर्यंत मह्याजवळ कोणीच बसलं नवतं.अख्खया बसमध्ये फक्त तेव्हडीच एक सिट रिकामी व्हती.मी तं मंतरल्यासारखा टकलावुन तिच्याकडच पाहात व्हतो.
“एस्क्युज मी” तिच्या या शब्दानं मी भानावर आलो.तिलं एवढ्याजवळुन पहातानी तं मी श्याटच झालतो.तिचे ते मासुळीवाणी निळे निळे डोळे,गुलाबपाकळ्यांवाणी ओठ,कोकीळेसारखा मंजुळ आवाज तं मोत्यांसारखे शुभ्र दात.
“तुमच्या शेजारी कुणी बसलय का?” “नं…नं…नाही …..बसा की…!” मी कापरं भरल्यासारखं तिला मनालो.हे पाहुन एष्टीतले दोन चार जणं तरी जळालेच आसतीलं.तिनं एक सुंदरसं स्मित केलं आणी मह्या बाजुलं बसली.मी आपला कसानुसा अंग चोरूण बसलो व्हतो.तिचं ते गोरपाणं आरस्पानी सौंदर्य अन आपलं आसं हे कुळकुळीत ध्यानं.मलं मनात वाटलं आपला हात जरी हिलं लागला तं आपल्या रंगानं ती डागाळुन जाईल.मी आंजुकच वरमुन बसलो.

“म्याडम , कुठे जायचय तुम्हाला.कुठलं तिकीट देऊ.” अतिशय सभ्य अन मृदु आवाजात कंडक्टर तीलं मनला.आम्हालं तं एखांद्या राकेसावानी वरडत तिकीट ईचारलं व्हतं.पण तीलं बघुन त्यालबी पघळुन गेल्यावाणी झालतं.तिनं औरंगाबादच तिकीट मांघीतलं.आन शंभराच्या दोनं नोटा देल्या.कडाक्टरनं तिलं आंशी रूपये वापस देले.म्या मनातुन चिडलो
.“मायझं मलं चाळीस रूपये देयालं याच्याजवळ चिल्हर नवती आण तीलं दहा दहाच्या आठ नोटा देल्या” म्या पुटपुटलो पण त्यालं काय ऐकु गेलं नाही.तिलबी…! कंडाक्टर तिकीट काढुण त्याच्या सिटवर जाऊन बसला खरा पण आत्ता ते सारखं मांघ वळु वळु घुयर्‍यावाणी मह्याकडं पाहु लागला.आत्ता मी बी नजरनच त्यालं आत्ता उतरोस्तोर मह्याकडं पाह्याच नाही मनलो.त्याचा चेहरा पडला व् ता.त्याच्याजवळ एक फारूळ्या दाताची,चाळीस पंचेचाळीशीची जाडीभरडी बाई बसली व्हती.आत्ता त्यो लय वंगळं तोंड करून बसला व्हता.

एष्टीनं वेग धरला व्हता.मी आपला गुमानं तिच्या शेजारी बसलो व्हतो.म्या आपल्या बॅगतुन काढलेलं पुस्तक बळबळच वाचायचा परयत्न करू लागलो.

“अय्या, तुम्हालं रत्नाकर मतकरी आवडतो” ती म्हणाली.तसं मी बी तीलं मान हालवत हो मनलो.
“आय लव रत्नाकर मतकरी,मला ना त्यांच्या रहस्य कथा जाम आवडतात,मला किनई त्यांचा एक एक शबद आवडतो.”
नंतर रत्नाकर मतकरी आणी त्यांच्या कथा यावर आम्ही घंटाक्स बोललो.एकमेकांचे नावं बी ईचारले.
“ए तुझं नाव काय रे.” ती
“म….,म……मी…..सरावण्या……सॉरी सॉरी श्रावण” मी मनलो.
तसं ती खळखळुन हसली.तिलं हसतांनी पहातच रहावं असं वाटायच.
“श्रावण…..मातृ पितृ भक्त श्रावण……….तसचं श्रावण महिना……पावसाचा……श्रावणातील तो रूणु झुनु पाऊस,आकाशातील काळे काळे ढग…..अंगाला झोंबणारा गारवा……वॉव किती रोमॅंटिक नाव आहे ना.”
च्यायला मव्हबी नाव एवढं सुंदर हे.मलं आत्ताच तिच्याकडुनच शोध लागला व्हता.
“बाय द वे मी गार्गी…….गार्गी मिन्स मां दुर्गा …….गार्गी या नावाचा अर्थ एक बुद्धिमान आणि धाडसी स्त्री….बाय द वे मी औरंगाबादलाच प्रथम वर्षात एम.बी.बी.एस.करतेय.”
“ए तु काय करतोस रे….’ ती म्हणाली.
म्या लाजत वरमत मनलो की,“मी विद्यापिठात मास कम्युनिकेशनलं पह्यल्या वरषात परवेश घेतलायं. “
मही गावंढळ भाषा ऐकुण ती खळखळुन हसली.
“आय लव योर लॅंगवेज…..आपली मराठवाडी मराठी नं कशी लहेजेबाज आहे.ऐकतांना,बोलतांना ऐकतच रहावं वाटते.”
मलं ती काय मंतेय काय बी कळत नवतं.ती मात्र आपल्याच विश्वात रममाण व्हती.तिलं एवढ्या जवळुन हसतांनी,बोलतांनी मलं लय बरं वाटु लागलं.आत्ता तं ते कंडक्टर अन दुसरे दोहन चार पोरं मह्याकडं लयच रागान पाहु लागले.त्यातलं एकजण मनलबी की,“काय एकेकाच नशिब आसते नं कधी कधी फाटक्यायलबी लॉटरी लागुन जाते.”
हे ऐकुन मलं तं लय राग आलता.तिनं पण त्याकडं ध्यान देलं नाही.
तेव्हड्यात एष्टी चहापाण्यालं थांबली.मह्याजवळ बेताचेच पैसे व्हते.तिच्यापुढं ईज्जत जायलं नको मनुन मी बसुनच रह्याच ठरवलं.ती बसमधून उतरली की आपण जेवुन घेऊ आसा मी ईचार केला.तेव्हड्यात ती म्हणाली,“अरे श्रावण तु नाही येणार नाष्टा-पाण्याला.”
मी नाही म्हणुन तीला टाळायचा प्रयत्न केला.कदाचित तिलं मव्हा प्रॉब्लम कळला आसलं.
“तुझ्या आईने डब्बा दिला नाही का?”
“दिला की.मी पटकन बोलुन गेलो.”
“चल मग ,माझ्याही आईने डब्बा दिला आहे.आपण थोडा थोडा खाऊन घेऊ”.
नाईलाजानं मी डब्बा घेतला आण तिच्यामांघं चलायलं लागलो.आम्ही हाटेलाच्या एका कोपर्‍यात बसलो.मायनं बा च्या फाटक्या बनेरापसुन बनवलेल्या धुडक्यात मलं भाकरी बांधुन देलत्या.म्या ओशाळतच म्या भाकरी सोडल्या.तिनं एका मिलटॉनच्या हॉटपॉटमंधी डब्बा आनला व्हता.मलं तिच्यापुढं कसकान्नुच वाटु लागलं.मायन भाकरीवर ठेचा आण चीलीत भाजलेल्या वांग्याचं भरीत देलतं.म्या तीचा उघडलेला डब्बा पाह्यला.त्यात निवदासारख्या दोन पतल्या पतल्या चपात्या आन थोडी भाजी होती.म्या मनातच मनलो.मायझं म्या तं हे दोन घासातच खातो. “अहो वेटर भाऊ एक पाणी बॉटल आना.” वेटरनं पाण्याची बाटली आणुन टेबलावरं ठेवली.आण मह्याकडं ईचितरवाणी पाहुन गेला.

“तुझ्या मम्मीने काय दिलं रे डब्ब्यात” ती मनली. “भाकर,वांग्याच भरीत आन ठेचा” मी म्हणलो.तसं तिचे डोळे लुकलुकत चमकले. “वॉव,ठेचा आणि भरीत……..! विथ जवार भाकरी.आय लव ईट…ये मला दे ना भाकरी,भरीत आणि ठेचा…..!” तिनं असं म्हणताचं मलं लाजल्यावाणी झालं.आमच्या गरीबाघरचं तेलमिठातलं भरीत,भाकरी आन ठेचा तीलं आवडलं का? मलं प्रश्न पडला.तेव्हड्यात मी काही म्हणायच्या आतच तिनं मह्या धुडक्यातली भाकर,ठेचा अन भरीत घेतलं होतं. “यु नो श्रावण,चुलीतल्या भाजलेल्या वांगयाच भरीत,खलबत्त्यातला ठेचा अन ज्वारीची भाकर याच्या चवीची सर जगातल्या कुठल्याही अन्नापेक्षा भारी लागते बघ.” ती बोलत व्हती.

“आमच्याही गावाकडे शेती आहे.आज्थी आजोबा गावाकडेच राहतात.त्यांना शहरात कोंडल्यासारख होते.बाबा नोकरीनिमीत्त शहरातच राहतात.सुट्ट्यांमध्ये आज्जी आजोबाकडे गावी जातो ना…..तेंव्हा मी हे सगळं खुप एंजॉय करते.चिंचा,बोरी,करवंद,आंबे…काय नी काय…..खुप धमाल करते मी तिथे….खुप मोकळं वाटतं मला तिथे.तेथुन परत येतांना जीव जड होतो.तेथुन माझा पाय निघत नाही..”

हे बोलतांना ती ईमोशनल झाली होती.बोलता बोलता तीनं तिचा डब्बा महयापुढं केला.ते आंजुकबी गरम व्हता.म्या त्यातली एक निवदायेवढी चपाती आन जराक्शी भाजी घेतली.म्या तिच्याकडं पाह्यलं तं ती अधाश्यासारकं भाकरी,भरीत अन ठेचा खात होती.जेवनं झाले की तीनं दोन फुल लस्सी मागवल्या.मव्हा हात आपसुकच खिशाकडं गेला.खिशात तोलुन मापुण मह्यण्याचा खर्च व्हता.वेटरनं लस्सी आणली.मह्याकाय नड्डयाखाली उतरत नवती.म्या बळबळच लस्सी पिली.वेटरनं बिलं आनलं.बिल आंशी रूपये व्हतं.म्या बिल पाह्यलं.महे तं डोळेच विस्फारले गेले.तेव्हड्यात तिनं मह्या हातातलं बिल घेतलं आन वेटरजवळ दिलं.वेटरन शिल्लक पैसे वापस आणले.तिनं त्यातले दहा रूपये टिप मनुन ठुले.मलं कमालच वाटली.ईथं पाच दहा रूपये खर्चायचे तं आम्ही दहादा ईचार करतो.तिनं तं एका झटक्यात नव्वद रूपये खर्च केलते.
“ओय नाटक कंपनी” मलं ईचारात पडलेलं पाहुन ती मनाली. “आजची पार्टी माझ्याकडुनं.तु मला ईतकं छान जेवन दिलं ना म्हणुनं.” मी कायबी बोललो नाही.आमच्या बाजुच्याच टेबलवर बसलेला कंडक्टर आमचं सगळं बोलन ध्यान देऊन ऐकत व्हता.म्या उयलेला डब्बा बांधुन उठलो.उठतांनी मव्ह त्याच्याकडं ध्यान गेलं.रागानं त्याचे बुबळं बाहीर येतात का काय आस मलं वाटलं.

येव्हड्यात ड्रायव्हरनं पुकारा केला.सगळेजनं आपापल्या सिटवर जाऊन बसले.आम्हीबी.जेवन खुपच मस्त झालतं.त्यात वर्‍हुन लस्सी…..!.त्यामुळं जरा सुस्ती येवु लागली.तीनं तिच्या पर्समधुनं वॉकमन आन हेडफोन काढले.हेडफोनची एक बाजु तिनं तिच्या कानात घातली तं एक बाजु मलं देली.तिनं किशोरकुमार लावला व्हता.‘आनेवाला पल ऽऽ….जानेवाला हैऽऽ…..हो सके तो उसमे जिंदगी बितालो….पल जो ये जानेवाला हैऽऽ‘ मी तं गाण्यात हरवुनच गेलतो.तेव्हड्यात तीनं तिची मानं मह्या खाद्यावर टाकली.ती पेंगली व्हती.मव्हा एक हात हातात धरून ती लहान लेकरासारकी झोपली व्हती.खिडकीच्या खिंडीतुन येणार्‍या हवेच्या झुळुकेमुळं तिच्या केसांच्या बटा हवेत उडतं व्हत्या.उडत उडत त्या मह्या चेहर्‍यावर येत व्हत्या.मलं तं लयच बरं वाटतं व्हतं.तिचे ते सुंदर केसं अनं त्याचा ते गंधं…म्या तं भानच हरवुन बसलो.म्या डोळं लावुन घेतले व्हते.मलं तं हे स्वप्न हे का वास्तव काहीच कळयनं गेलतं.थोड्यायेळानं मव्हाबी डोळा लागला.

मलं सप्नं पडु लागलं.एक छानसा डोंगर व्हता.त्यावरून एक धबधबा कोसळतं व्हता.बाजुनचं एक नदी वाहत व्हती.नदिच्या काठावर एक सुंदर टुमदार घरं व्हतं.पक्षी तिथं कलरवं करत व्हते.तं फुलपाखरं या फुलावुन त्या फुलावरं उडतं व्हते.दारात एक कार उभी व्हती.सगळीकडं हिरवेगदाड झाडं,फुलायनं बहरलेले फुलझाडं आन हिरवळच हिरवळं.त्या हिरवळीवर खारूताई आणि ससे टुनु टुनु उड्या मारतं व्हते.म्या घरात आलो.घरात किशोरकुमारचे गाणे मधुर आवाजात वाजत व्हते.घरात गार्गी साडीवर चुलीजवळ बसली व्हती.चुलीत दोन बैगनं भाजायलं ठुले व्हते.बाजुलच खलबत्त्यात हिरव्या मिरच्यायचा ठेचा व्हता.गार्गी मस्तपैकी भाकरी थापत व्हती.भाकरी थापतांनी वार्‍याच्या झुळकेसंगं तिच्या केसांच्या बटा उडत व्हत्या.मलं तं ते उडणारे केसं पाहुन मह्याच चेहर्‍यावर मोरपखं फिरायल्यावाणी वाटु लागलं.सयपाक करतांनी तिच्या कपाळावर आलेले घामाचे थेंब मलं मोत्यावाणी दिसत व्हते.डाव्या हातानं मंधीच घाम पुसत ती भाकरी थापत व्हती.सयपाक झाल्यावर आवरून आम्ही जेवायलं बसलो.गार्गीनं प्रेमानं मह्या डोळ्यात पाह्यलं.आपल्या ताटातल्या भाकरीचा एक कुटका तिनं मोडला त्यात भरीत अन ठेचा भरला अन प्रेमानं मलं ते घास भरवायसाठी मह्यापुढं हातं केला.टेपरेकॉर्डवरच गाणं बदललं व्हतं. ‘जिंदगीके सफर में गुजर जाते है जो मुकामऽऽ… वो फिर नहीं आतेऽऽ……फिर नहीं आते….ऽऽ’ मी तिच्या हातचा घास खायलं तोंड उघडणारच एवढ्यात….“चला औरंगाबाद……औरंगाबाद…….!” मलं कंडाक्टरच्या या बोलण्यानं जाग आली.मी खडबडुन जागी झालो.गार्गीही..! आम्ही सामानाची आवराआवर केली.एष्टीचा हेव परवास कव्हा संपुच नाय आसं मलं वाटु लागलं.तीलबी अवघडं वाटु लागलं.म्या तिचं सामायनं उतरवायलं मदत केली.ति शहराच्या एका टोकालं तं म्या दुसऱ्या टोकालं.उतरल्यावर तिनं एक टॅक्सी बुक केली.मलं मनली तुव्हा मोबाईल नंबर दे मुन…मह्याजवळ मोबाईल नवता.मंग तिनं एका कागदावरं तिचा नंबर लेहुन देला.म्या ते कागद घट्टपणे मह्या हातात धरून ठुला.तिची टॅक्सी आलती.ती टॅक्सीत बसुन निंघुन गेली.म्या कितीतरी येळ तिच्याकडं पाहात राह्यलो.तेव्हड्यात गाडीच्या हॉर्ननं म्या भानावर आलो.पुढुन एक एष्टी मह्या अंगावर येता येता थांबली व्हती.
“अबे मरणाय क्या…..ईत्ता शौक है मरनेका तो किसी ट्रक के निच्चे जा ना…मेरी एष्टी के निच्चे कायकु आरा बे…..बोस**”

आसं बोलतं ड्रायवरनं मलं हासडुन शिवी देली.म्या कावराबावरा व्हवुन तिथुन बाजुलं झालो.अचानक मलं मह्या तिकिटाच्या उरलेल्या चाळीस रूपायाची आठवन आली.म्या पळतच ज्या गाडीत आलतो त्या फलाटाकड़ गेलो.तं ती गाडी कव्हाचीच निंघुन गेलती.म्या हताष झालतो.गार्गीबी निंघुन गेलती.गार्गीची आठवन येताच मलं तिन मोबाईल नंबर देल्याच आठवलं.म्या मह्या मुठीत ते कागद ठुला व्हता.मव्ह ध्यान हाताकडं गेलं तं मलं मही मुठ उघडी दिसली.मंघाशी जव्हा एष्टी मह्या अंगावर येता येता राह्यली व्हती तव्हा मही मुठ सुटली व्हती.म्या पळतच त्या जागी गेलो.येड्यासारका ईकडं तिकडं ती चिठ्ठी धुंडु लागलो.मलं काय ती गवसली नाही.आज लक्ष्मी मह्यावर नाराजच व्हती आसं मलं वाटलं.एक तं कंडाक्टरसंगटच महे चाळीस रूपयेबी गेलते अन जिलं मह्याघरची लक्ष्मी बनवायच सपन म्या पाह्यलं व्हतं तिचाबी नंबर मह्याकडुन गेलता.

म्या तिथं लयदा नंबर धुंडला.दररोज कालेज सुटलं की म्या तिथं जायचो अन ते कागद मिळते का ते पहायचो.अश्या खुप चकरा म्या तीथं मारल्या.आजयबी कव्हा तिथं गेलो की मही नजर तिथं जाते आन म्या त्यो कागद धुंडु लागतो.

-गोडाती बबनराव काळे,लातुर.
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..