नवीन लेखन...

प्लॅस्टिकबंदी

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख

सरकारने ठरवले, न्यायालयाने मान्य केले आणि महाराष्ट्रात ‘प्लॅस्टिकबंदी’ लागू झाली. प्लॅस्टिक हाच पर्यावरणाचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि या प्लॅस्टिकबंदीमुळे पर्यावरणाचा हास आणि मुक्या जनावरांचा त्रास थांबणार, असे घोषित केले गेले. समुद्रातल्या प्रदूषणाला या बंदीमुळे आळा बसेल अशी खात्री दिली गेली. प्लॅस्टिकला पर्यावरणाचा गुन्हेगार ठरवल्यावर, प्लॅस्टिक वापरत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्या वापराबद्दल कायद्याने चक्क गुन्हेगार ठरवले गेले आणि त्यांच्यावर अतिरेकी दंड लादण्यात आला. या निर्णयामागील अर्थकारण, समाजकारण किंवा राजकारण हा आमचा विषय नाही, पण या निर्णयामागचे विज्ञान नीट तपासून पाहायला हवे हे मात्र नक्की.

माणसाने जेमतेम काही दशकांपूर्वी खनिज तेलापासून प्लॅस्टिक बनवायची पद्धत शोधून काढली. स्वस्त, मजबूत, पण वजनाने हलके, न गंजणारे आणि कोणत्याही आकारात, कोणत्याही रंगात सहज बनवता येणारे हे प्लॅस्टिक मानवजातीला वरदान वाटले नसते, तरच नवल. हळूहळू प्लॅस्टिकने मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचे स्थान निर्माण केले. मानवनिर्मित असल्याने, जशी त्याची गरज वाढत गेली, तसा त्याचा पुरवठाही वाढवला गेला. किमतीने स्वस्त असल्याने ‘वापरा आणि फेका’ या तत्त्वाने त्याचा वापर व्हायला लागला… आणि इथेच घात झाला!

अनेक प्लॅस्टिकच्या गोष्टी त्यांचा वापर संपला की कचऱ्यात फेकल्या जातात. प्लॅस्टिकचे नैसर्गिक विघटन सहजतेने होत नसल्याने, या गोष्टी अनेक वर्षे पर्यावरणात तशाच पडून राहतात. उदाहरणार्थ, कचऱ्यात फेकलेल्या प्लॅस्टिकच्या कपाला पूर्णपणे नष्ट व्हायला जवळजवळ पन्नास वर्षे लागतात, तर बाळाचा डायपर आणि कपडे वाळत घालायला वापरली जाणारी प्लॅस्टिकची दोरी, यांचे नैसर्गिक विघटन व्हायला अनुक्रमे साडेचारशे वर्षे आणि साडेसहाशे वर्षे लागतात.

उपयोग संपला म्हणून फेकलेला आणि नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने साचलेला प्लॅस्टिकचा कचरा हा आजच्या घडीला अख्ख्या जगाचा चिंतेचा विषय आहे. हा कचरा नुसता आकाराने वाढत नाही, तर त्याच्या ज्वलनातून निघणारे वायू पर्यावरणावर अनिष्ट परिणाम करतात आणि अभावितपणे या कचऱ्याला बळी पडलेल्या सजीवांमध्ये काही कायमस्वरूपी दुष्परिणामही घडवून आणतात. हा कचरा कालांतराने वाहून समुद्रात जातो आणि त्यामुळे संपूर्ण सागरी जीवन धोक्यात येते. काही संशोधकांच्या मते, २०५० साली जगातील समुद्रांत माशांच्या वजनापेक्षा प्लॅस्टिकचे वजन जास्त असेल. अशा रितीने सोयीस्कर म्हणून मानवाने जवळ केलेले प्लॅस्टिक आज त्याच्या पर्यावरणाच्या आणि काही अंशी त्याच्या अस्तित्वाच्याच मुळावर आले आहे.

पर्यावरणाला धोका निर्माण न होता या प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल का, यावर जगभर संशोधन आणि प्रयोग चालू आहेत. ज्याचे पुनर्चक्रीकरण म्हणजे रिसायकलिंग करता येईल अशाच प्लॅस्टिकची निर्मिती आणि प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे योग्य असे व्यवस्थापन, हेच या प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर आहे.

प्लॅस्टिक या सर्वसाधारण नावाने ओळखल्या जाणाऱ्या पदार्थाचे खरे तर त्याच्या रासायनिक रचनेवर आधारित असे अनेक उपप्रकार आहेत. या प्रत्येक प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पुनर्चक्रीकरणाची प्रक्रियाही वेगवेगळी आहे. त्यासाठी प्लॅस्टिक कचऱ्याची वर्गवारी करून त्यांतील वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक वेगळे काढणे हे प्लॅस्टिकच्या पुनर्चक्रीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. याबाबत लोकशिक्षण करून त्याबरोबरच स्थानिक प्रशासनाने प्लॅस्टिकच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची कायमस्वरूपी शास्त्रीय व्यवस्था करणे आवश्यक आहे.

पुनर्चक्रीकरण होऊ न शकणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरणावर परिणाम न होऊ देता कशी लावता येईल, यावरही जगभर संशोधन सुरू आहे. काही शास्त्रज्ञ प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती करता येण्याची शक्यता चाचपून पाहताहेत, तर काहीजण त्यापासून रस्ते बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत.

प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे योग्य, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नागरिकांवर सरसकट प्लॅस्टिकबंदी लादणे म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच प्रकार आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून पुढे येणाऱ्या सर्व वस्तूंचे प्लॅस्टिकच्या तुलनेत पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, याचीही वैज्ञानिक चर्चा होणे आवश्यक आहे. आज शिस्तीचा बडगा उगारला पाहिजे तो प्लॅस्टिक उत्पादनाच्या आणि घनकचरा क्षेत्रात. नागरिकांवर नाही… व्यवस्थापनाच्या, प्लॅस्टिकच्या नव्हे, तर प्लॅस्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामाने ग्रासलेल्या नागरिकांना त्याबद्दल लोकशिक्षणाच्या माध्यमातून जागरूक करण्याऐवजी जुलमी कायद्याने अधिक बेजार केले जात नाही ना, याचा विचार सरकारने करायला हवा.

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..