नवीन लेखन...

प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पं. वामनराव सडोलीकर

पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला. पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या ‘गांधर्व महाविद्यालया’त मा.पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले. अल्पकाळ घरी कोल्हापूरला राहून पुन्हा, अल्लादिया खाँसाहेब शंकरराव सरनाईक यांना तालीम देताना त्यांचं गाणं ऐकता येईल; या मोहाने १९२५ ला ‘यशवंत नाटकमंडळी’त भाऊ नायक झाले. तो काळ त्यांना संगीतातली दृष्टी, ऐकलेली तालीम प्रत्यक्षात आणण्याचं धाडस आणि परिणामी प्रसिद्धी देणारा ठरला. पं. वामनराव सडोलीकर यांनी संगीत सम्राट अल्लादिया खाँसाहेबांच्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा फार लहान वयात ध्यास घेतला. त्यांना मनोमनी आराध्यदैवत मानलं. काही कारणांमुळे खाँसाहेबांनी ब्राह्मणाला शिकवणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे भाऊंनी त्यांचे सुपुत्र उस्ताद भूजीर्खाँ यांचा गंडा बांधला. कालांतरानं भूजीर्खाँ प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई सोडून कोल्हापूरला गेले. जाताना थोरल्या खाँसाहेबांकडे पं. वामनराव सडोलीकर यांना सुपूर्द करून म्हणाले, ‘अब्बाजी, वामनराव आपले आहेत. आता आपण त्यांना तालीम द्या.’ अल्लादियाखाँना भाऊंचा परिचय नव्यानं करून द्यायची जरुरी नव्हती.

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात भूजीर्खाँ सेवा करीत, तर भवानी मंडपात छत्रपतींच्या कुलस्वामिनीची अल्लादिया खाँ संगीत सेवा करीत. भाऊंचे वडील (दादा) दत्तोपंत माधव कुलकणीर् (सडोलीकर) स्वत: उत्तम सतार वाजवीत. ते रागदारीचे जाणकार होते. लहानग्या वामनला घेऊन ते संगीतसेवेच्या वेळी दोन्ही देवळात हजर असत. एवढंच नव्हे, तर छत्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तींच्या छत्र्या (स्मारकं) असत तिथे त्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात भूजीर्खाँ गात असत. याही ठिकाणी दादा भाऊंना घेऊन ऐकायला हजर असत. काळासावळा तरतरीत लहान मुलगा आणि त्याचे गोरेपान उंच वडील खाँसाहेबांना परिचित झाले होते. नाटककंपनीत असताना शंकरराव सरनाईकांची तालीम ऐकून तिचे पडसाद वामनच्या नाट्यपदातून उमटताना, त्याच्या तानांच्या लडीवर लडी ऐकून बेभान झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केलेला पाहून खाँसाहेबांना आपली तालीम ऐकून ऐकून हुबेहूब उचलणारा एकलव्य दिसला होता. काही वेळा खाँसाहेब भाऊंना रियाजाच्या आणि तानांच्या बाबतीत सूचना देत. केलेल्या रियाजावर टिप्पणी करत. पण त्या काळात गंडाबंधनाबद्दल विचार करणं भाऊंना शक्यच नव्हतं. कारण गंडाबंधनाची दक्षिणा होती रुपये दहा हजार! कलदार सुरती रुपये! आपल्या वडिलांवर असा भार टाकणं भाऊंच्या कल्पनेबाहेरचं होतं. आधीच गाणं शिकण्यासाठी घरापासून दूर राहिल्यामुळे आणि शिरस्त्याप्रमाणे शाळा न शिकल्याबद्दल आजूबाजूच्या लोकांनी आईवडिलांना टोमणे मारलेले होते. त्यामुळे खाँसाहेबांचं कंपनीतलं वास्तव्य ही भाऊंच्या दृष्टीनं मोठी पर्वणी होती.

खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं. पं. पलुस्कर यांच्या सहवासात मिळालेलं ‘रामनाम-धन’, ‘शिस्तीचे पाठ’, ‘रामायणावर भक्ती’ आणि ‘स्वरसाधनेचा मूलमंत्र’ हे देखील मा.पं. वामनराव सडोलीकर यांच्या आयुष्याला स्थिरता देणारं ठरलं. सुदैवानं दोन्ही गुरू एकाच मार्गाचे प्रवासी होते. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही प्रवाहांचं त्यांच्या आयुष्यात अचल अधिष्ठान होतं. त्यामुळे कुठेही वैचारिक द्वंद्वात सापडून दिशा भ्रष्ट होण्याचा धोका भाऊंच्या आयुष्यात आला नाही. गुरू सच्चरित्र, स्थितप्रज्ञ आणि सर्वार्थानं मोठा असणं हे फार मोठं भाग्य असतं. भाऊंना हे सद््भाग्य लाभलं आणि त्यांच्यामुळे आम्हालाही तो आशीर्वाद लाभला. मा.पं. वामनराव सडोलीकर यांनी नाट्यकलेची सेवा नायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक या रूपात केली. अनेक होतकरूंना ही कला शिकवली. आपल्या स्थानावरून न उठता केवळ भूमीसंवाद आणि त्यामागचा विचार समजावून देऊन ते कलाकारांकडून उत्कृष्ट काम करून घेत.

मैफलीत गायला बसले आणि आवाज लागला नाही अशी त्यांनी कधीच तक्रार केली नाही. खाँसाहेबांनी भूजीर्खाँ, मंजीखाँ आणि बडेजींना जे आपल्या गायकीचं मर्म समजावून दिलं ते भाऊंनाही दिलं. तालाचा विचार अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून करून सर्वसामान्य रागही कसे अभिनव रीतीनं सोडवायचे आणि मांडायचे, अवघड राग कसे उलगडायचे याची मर्मभेदक दृष्टी भाऊंना मिळाली आणि श्रोत्यांच्या अनुनयासाठी कोणताही समझौता न करता शुद्ध गायकीच भाऊंनी मैफलीतून सतत मांडली. त्या काळी साधं पांढरं धोतर, स्वच्छ, कडक इस्त्रीचा पांढरा झब्बा किंवा शर्ट-कोट, माथ्यावर टोपी (बुलबुले आणि कं. कोल्हापूर यांच्याकडून खास बनवलेली) हा त्यांचा वेष त्यांची ओळख बनला होता. आज जरासं नाव झालं की कलाकार ‘पंडित किंवा उस्ताद’ होतात. आता अधिक शिकायची आपल्याला गरज नाही, असं त्यांना वाटतं. पण भाऊंनी आपलं उत्तरायुष्यही शिकण्यात-शिकवण्यात व्यतीत केलं. त्यांच्या वैयक्तिक गरजा इतक्या माफक होत्या की त्या गरजांसाठी आपल्या मूल्यांशी तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. त्यांचा स्वभाव येणाऱ्या प्रसंगातून किंवा अनुभवातून सकारात्मक विचार जोडणारा होता. दु:खानं पिचून जाणं किंवा निराशेनं दैवाला दोष देणं त्यांनी कधी केलं नाही.

रागीट होते, पण त्यांचा राग समोरच्याचा मनोभंग करणारा, त्याच्या व्यक्तित्त्वाला जाळून टाकणारा नव्हता. पं. वामनराव सडोलीकर आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत. किशोरवयात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढच्या काळात त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले. त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रुती सडोलीकर-काटकर आणि मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ‘पं. वामनराव सडोलीकर फौंडेशन’ तर्फे वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. गानसम्राज्ञी श्रृती सडोलीकर आपले वडिल मा. वामनराव सडोलीकर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी कार्यक्रम करुन त्यांना श्रध्दांजली वाहतात. पं. वामनराव सडोलीकर राहात असलेल्या दादरच्या हिंदु कॉलनीतील चौथ्या रस्त्याला मुंबई महानगर पालिकेने पं. वामनराव सडोलीकर यांचे नाव दिले आहे. वामनराव सडोलीकर यांचे २५ मार्च १९९१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ श्रृती सडोलीकर

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..