पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता वाढला

दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी जोरदार मोहिम न राबवल्यास अमेरिका आपले भूदल पाकिस्तानमध्ये आणेल हा अमेरिकेचा इशारा, काश्मिरमध्ये सार्वमत घेण्याची पाकिस्तानने युनोत केलेली मागणी आणि जनरल मुशर्रफ यांची नव्या पक्षाची घोषणा या घडामोडींमुळे पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता सुटण्याऐवजी वाढण्याचीच चिन्हे आहेत. अशा स्थितीत भारताने आपल्या भूमिकेवर ठाम रहाणे अधिक महत्त्वाचे आहे.

पाकिस्तान-अफगाणीस्तान सीमेलगतच्या टोळीवाल्यांच्या प्रदेशातील तालिबान आणि अल् कायदा दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी पाकिस्तानने जोरदार मोहिम न राबवल्यास अमेरिका त्या भागात आपले भूदल आणून हल्ले करेल असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला. अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इशार्‍याप्रमाणे हा देखील शाब्दीक इशारा आहे की अमेरिका त्याप्रमाणे कृती करणार आहे हे पाकिस्तान चाचपून पाहत आहे. हा इशारा अमेरिका कृतीत आणते किंवा कसे हे तपासून पाहण्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा यांची चाचपणी करणे आवश्यक आहे. अर्थात, ओबामादेखील दहशतवाद्यांची पुढची चाल पाहूनच याबाबतीत निर्णय घेतील.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

अमेरिकेवर हल्ला होईल
दहशतवाद्यांची पुढची चाल काय राहील, ते अमेरिकेवर हल्ला करतील काय, ओसामा बिन लादेनने दिलेल्या यासदंर्भातल्या धमक्या खर्‍या केल्या जातील काय असे काही प्रश्न आज अमेरिकेपुढे आहेत. काही महिन्यांपूर्वी अतिरेक्यांनी अशा हल्ल्याचा कट रचल्याचे पुरावेही सीआयए या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला मिळाले. हा कट फसला असला तरी ते नवा कट आखण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे हल्ला झाला तर मात्र अधिक वाट न पाहता दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी अमेरिकन भुदलाची मोहिम सुरू करण्यास ओबामा परवानगी देतील. अमेरिका खरोखरच अशी मोहिम करेल की ती केवळ शाब्दीक धमकी आहे हे दहशतवाद्यांन ाही चाचपून पहायचे आहे. त्यासाठी ते 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्याप्रमाणे आणखी एखादा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या हालचाली आणखी वाढवण्यासाठी त्यांना अस्थैर्य आणि तंग वातावरण हवेच आहे.अमेरिका पाकिस्तानला लष्करी मदत करत असली तरी दहशतवादविरोधी मोहिमेसाठी आपल्या प्रदेशात अमेरिकन भूदल येऊ देणे पाकिस्तान मान्य करतं काय, त्यातून पाक-अमेरिका संघर्ष होईल का, या रणधुमाळीत पाकिस्तान अमेरिकेपुढे झुकेल का असे काही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात. आपल्या सार्वभौमत्वावर हा हल्ला आहे असे न भासवता आपल्या संमतीनेच अमेरिकन भूदल पाकिस्तानी प्रदेशात आले आहे असे दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल. आपला आब राखण्यासाठी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांविरुध्द आम्ही संयुक्त मोहिम राबवणार आहोत, अशी भूमिका पाक सरकार घेण्याचा संभव आहे. पण वास्तवात पाकिस्तानमध्ये खरी सत्ता अमेरिकेची आहे. अमेरिकेपुढे पाकची ही नामुष्कीची माघार आहे असाच त्याचा अर्थ होईलं.

नाटोची रसद अडवली
पाकिस्तानलाही अमेरिकेच्या संभाव्य भूमिकेची जाणीव आहे. जगापुढे आपली नामुष्की दिसू द्यावयाची नाही हे धोरण असल्याने अलीकडेच पाकिस्तानने आपण प्रादेशिक सार्वभौमत्वावर हल्ला सहन करत नाही हे एका प्रसंगातून दर्शवले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेत नाटोचे सैनिक अमेरिकेच्या बाजूने संयुक्त दलाचा एक भाग म्हणून लढत आहेत. पाकिस्तानच्या एका सुरक्षा ठाण्यावर नाटोच्या हेलिकॉप्टर विमानांनी 30 सप्टेंबरला हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने त्याला प्रत्त्युतर म्हणून आपल्या सीमेवरून अफगाणिस्तानात होणारी ट्रकवाहतूक बंद केली. त्यामुळे नाटो सैनिकांना होणारी रसद थांबली. पेशावरच्या उत्तरेला असलेल्या सीमेवरच्या तोर्खाम या ठाण्यावरुन ही वा तूक होत असते.

अमेरिकेच्या हल्ल्यांबाबत नाराजी
निर्मनुष्य ड्रोन विमानांच्या वाढत्या हल्ल्यांबद्दल पाकिस्तानने गंभीर चिंता व्यक्त केली. नाटो आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा सहाय्य दलाची विमाने आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत आहेत. असे न करता दहशतवादविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्या देशाच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा आदर केला गेला पाहिजे, असा कांगावा पाकिस्तान करत आहे. अमेरिकेच्या सीआयएचे प्रमुख लिआँ पनेट्टा यांनी भेट दिली तेव्हा पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी आणि पंतप्रधान गिलानी यांनी त्यांच्याजवळ ही चिंता व्यक्त केली. पनेट्टा पाकिस्तानच्या आय. एस. आय. या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद झुजा पाशा यांनाही भेटले. दहशतवाद्यांनी जगात अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट आखला. तो पाकिस्तानमध्ये आखण्यात आला असल्याचे समजल्यानंतर पनेट्टा यांनी ही भेट दिली. गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्याच्या बाबतीत पाकिस्तानशी सहकार्य वाढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली. नाटो विमानांना अफगाण हद्दीतच हालचाली करण्याची परवानगी देण्यात आली आहे हे पनेट्टा यांनी मान्य केले. पाकिस्तानी सुरक्षा ठाण्यावरील या हल्ल्याबद्दल झरदारी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी आपली प्रतिक्रिया अधिक तीव्र शब्दात व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आम्ही नाटो विमानांच्या हल्ल्यांची गंभीर दखल घेतली आहे. आमचे दोस्त हे आमचे मित्र की शत्रू त्याचा विचार करावा लागेल’ या हल्ल्यानंतर नाटो विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत एकाच आठवड्यात आणखी दोन हल्ले केले तर ड्रोन विमानांनी सप्टेंबर महिन्यात 20 हल्ले केले.

अमेरिकेने पाकिस्तानी हद्दीत एकाच महिन्यात केलेले हे आतापर्यंतचे सर्वात जास्त हल्ले होते. पाकिस्तानच्या चिंतेची दखल न घेता अमेरिकेने ऑक्टोबरमध्येही हल्ले सुरूच ठेवले. त्यामुळे पाकिस्तानी जनतेत अमेरिकाविरोधाची भावना वाढत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनीही अलीकडेच अफगाणिस्तानाकडे तेल घेऊन जाणार्‍या टँकर्सवर हल्ले केले. त्यात पाचजण ठार झाले.

मुशर्रफ यांचा नवा पक्ष
पाकिस्तानच्या दृष्टीने आणखी एक महत्वाची घटना म्हणजे तेथील माजी अध्यक्ष लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी आपण अखिल पाकिस्तान मुस्लिम लीग हा पक्ष स्थापन केल्याची घोषणा लंडनमध्ये 1 ऑक्टोबरला केली. आपण देशात परतणार असून 2013 च्या निवडणुका लढवू असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या स्थैर्यासाठी लष्कराची भूमिका महत्वाची आहे. लष्करप्रमुख म्हणून आपण सत्ता हाती घेतली होती. त्या वेळेसारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. असे त्यांनी सांगितले. आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या काळात काही चुका झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. पुन्हा अशा चुका होणार नाहीत. तसेच पाकिस्तानचे संस्थापक कायदे आझम जिना यांना अभिप्रेत असलेला पाकिस्तान उभारण्यासाठी आपला पक्ष प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिस्थिती सुधारण्यात पाकिस्तानचे सध्याच्या राजकीय नेत्यांना आलेले अपयश लक्षात घेता लोक आपल्याकडे पुन: नेतृत्व देतील, असे त्यांना वाटते. पण या बाबतीत सध्याचे लष्करप्रमुख जनरल कयानी यांच्याशीही त्यांना संघर्ष करावा लागेल. 2013 च्या निवडणुकीपूर्वीच पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी उठाव होऊन जनरल कयानी सत्ता हाती घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकंदरीत, पाकिस्तानमधल्या सत्तासंघर्षाला हा आणखी एक पैलू जोडला जाण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्वाची घटना म्हणजे पाकि स्तानने अलीकडेच काश्मिरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी केली. जनरल कयानी यांनी ही या मागणीस पाठींबा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी सर्व वादग्रस्त प्रश्न आपापसात वाटाघाटींद्वारे सोडवण्याचे आणि तिसर्‍या कोणाची मध्यस्थी न घेण्याचे सीमा करारात ठरले होते. त्याचे हे उल्लंघन आहे. पाकिस्तानच्या या बदललेल्या भूमिकेमुळे आता दोन्ही देशांच्या वाटाघाटींना काही अर्थ राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतानेही पाकिस्तानच्या कांगाव्यांना ठोस उत्तर दिले पाहिजे.

— वा. दा. रानडे
(अद्वैत फीचर्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..