नवीन लेखन...

“नुक्कड”चा बायस्कोपवाला.‌.

पूर्वी जत्रेमध्ये बायस्कोपवाले असायचे. दहा पैसे देऊन त्या तिकाटण्यावर ठेवलेल्या बाॅक्समधून चित्रं पहायला मिळायची. तशीच चित्रं नव्हे तर दूरदर्शन मालिका व चित्रपट दाखविणारे अनेकजण या सिनेसृष्टीत उदयास आले.

चौतीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवरील मालिका या तेरा किंवा सव्वीस भागांच्या असायच्या. त्यातील एका हिंदी मालिकेने तब्बल शंभर भाग सादर करुन रसिकांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केले. तिचे नाव होते ‘नुक्कड’…

सईद अख्तर मिर्झा व कुंदन शाह या जोडीने दिग्दर्शन केलेल्या ह्या मालिकेने अफाट लोकप्रियता मिळवली होती. त्यावेळी रंगीत टीव्ही नव्हते. कृष्णधवल टीव्हीवर लाखो रसिकांनी या ‘नुक्कड’चा आनंद लुटला.

मुंबईतील सामान्य वस्तीमधील एका चौकातील अड्यावर घडणाऱ्या मोजक्या प्रसंगावर आधारित असणारी ही मालिका पहाणाऱ्याला आपलीशी वाटत होती. त्याला कारण होतं, आपल्याला जीवनात कुठेही सहज भेटू शकणाऱ्या साध्या व्यक्तीरेखांच्या साधर्म्याचं!
दिलीप धवन अभिनित गुरू नावाचं एक पात्र होतं. त्याचं खरं नाव रघुनाथ. छोटी मोठी इलेक्ट्रीशियनची कामं करणारा गुरू हा सर्वांचा म्होरक्या होता. मित्रांमधील भांडणं सोडविण्यात याचा नेहमीच पुढाकार. याच वस्तीत राहणाऱ्या मारिया नावाच्या टीचरवर अव्यक्त प्रेम करणाऱ्या गुरूला कोणीही विसरणं शक्य नाही.

अवतार गिलने साकारलेला कादरभाई, हा नुक्कडवरचा चहावाला. सर्व नुक्कडवाल्यांचं भेटण्याचं हे हाॅटेल म्हणजे हक्काचं ठिकाण. हा इतका उदार की, कोणी गरीब आला तर त्याला चहा फुकट पाजणार. पवन मल्होत्रानं हरि नावाच्या सायकल दुकानदाराचं काम केलं होतं. सायकलचे पंक्चर काढताना याची एक नजर गुप्ता शेठच्या काॅलेजला जाणाऱ्या मधुवर,अन् गुप्ताची करडी नजर हरिवर.
समीर खक्करने ‘खोपडी’ नावाची व्यक्तीरेखा उभी करून अफाट लोकप्रियता मिळवली. केस्टो मुखर्जी नंतरचा ‘बेमिसाल दारुडा’ म्हणून खोपडीच आठवतो.

हैदरअलीने राजा नावाचा एक सुटाबुटातला भटक्या उभा केला. जो ‘जगात मीच सर्वात हुशार’ असं नेहमीच भासवत रहायचा.
संगीता नाईक या मराठी अभिनेत्रीने राधा नावाच्या मोलकरणीचे काम केले होते. जी हरिवर एकतर्फी प्रेम करीत असते. मात्र हरिचं प्रेम जडलंय ते मधुवर.

रमा विज हिने मारिया नावाची एका विधवा टीचरची भूमिका साकारली होती. ती येता जाता गुरूला पहात असते. तिला देखील गुरूबद्दल प्रेम वाटत असतं, मात्र ती कधीही ते व्यक्त करत नाही. अजय वढावकरने गणपत हवालदाराचे काम केले होते. नुक्कडवर काही समस्या उद्भवली तर गणपत हवालदार ती सामंजस्याने सोडवायचा.

श्रीचंद मिखिजा याने चौरसिया पानवाल्याची भूमिका केली होती. त्याचं पानाचं दुकान कादरभाईच्या हाॅटेलला लागूनच होतं.
कादरभाईच्या हाॅटेलमधला वेटर. पालिकेचा सफाई कामगार, दगडू जमादार. बंगाली बॅन्डवाला. किराणा दुकानदार गुप्तासेठ. चांदीच्या वस्तूंचा दुकानदार माणिकलाल शेठ. सुरेश भागवतचा घनशु भिकारी. सुरेश चटवालचा दुखिया. जावेद खानचा करीम सलूनवाला. अमृत पटेलचा पोटिया. अच्युत पोतदारचा गिरीधर शेठ. अंजन श्रीवास्तवचा मनोहर दामले. किशोर भटचा गुप्ताजी. अशा चाळीस व्यक्तीरेखांनी ‘नुक्कड’ अप्रतिम साकारली.

प्रत्येक भाग हा चोवीस मिनिटांचा असायचा. तेवढ्या अवधीत एखाद्या व्यक्तीरेखेवर, घटनेवर, सणासुदीवर, नैसर्गिक संकटावर, मानवी संबंधांवर कथानक असायचं. सर्वसामान्य व्यक्तीरेखांचा समावेश असल्यामुळे पाहणाऱ्यांना ही मालिका स्वतःच्या आजूबाजूला घडणारी वाटली. याचं सर्व श्रेय जातं दिग्दर्शकाला!

आज १९८७ नंतरच्या तेहतीस वर्षात जग खूप पुढे गेलेलं आहे. रघू उर्फ गुरूचं काम करणारा दिलीप धवन, खोपडीचं काम करणारा समीर खक्कर, गणपत हवालदारचं काम करणारा अजय वढावकर हे तिघेही आज या जगात राहिले नाहीत.

जुन्या ‘नया दौर’ बरोबरच इतर काही चित्रपटात सहभागी असणाऱ्या वडिलांची ही दोन मुलं. मोठा सईद व धाकटा अजीज मिर्झा. अजीज मिर्झा व कुंदन शाह यांनी एकत्र येऊन ‘सर्कस’ नावाची मालिका तयार केली. ज्यामधून शाहरुख खानने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांच्याच ‘राजू बन गया जंटलमन’ या यशस्वी चित्रपटानंतर शाहरुखने मागे कधीच वळून पाहिले नाही.

‘नुक्कड’चं दिग्दर्शन करणाऱ्या सईद यांनी ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’, ‘मोहन जोशी हाजिर हो’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा करतों आता हैं’, ‘सलीम लंगडे पर मत रो’, आणि ‘नसीम’ या चाकोरी बाहेरील चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केलं.

‘नुक्कड’ या एकाच सिरीयलने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. आयुष्यात माणूस जे काही कार्य करतो त्याची त्याला यथावकाश पावती ही मिळतेच. दि. १७ ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित केलेल्या आय सी ए फिल्म फेस्टिव्हलमध्ये लेखक-दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांना त्यांच्या सिनेकारकीर्दीतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

जेव्हा सईद मिर्झा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर जातील तेव्हा त्यांच्यामागे त्यांना यशस्वी करणाऱ्या अरविंद देसाई, मोहन जोशी, अल्बर्ट पिंटो, सलीम व ‘नुक्कड’मधील सर्व व्यक्तीरेखांची गॅन्ग अदृश्य स्वरुपात उभी असेल…

आम्हां रसिक प्रेक्षकांना ‘नुक्कड’ या कृष्णधवल सिरीयलमधून सर्वसामान्य माणसांचे रंगेबेरंगी जीवन दाखविणाऱ्या सईद मिर्झा या सर्वोत्तम दिग्दर्शकास सलाम!!!

– सुरेश नावडकर १३-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..