नवीन लेखन...

नवरा आमदार, मग मी रेशनच्या रांगेत कशी उभी राहू?

या हेमलताबाईचा नवरा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. पण हेमलता यांनी आमदाराची बायको म्हणून आपले वेगळेपण अखेरपर्यंत जाणवू दिले नाही.आजच्या जमान्यात कारखानीस आमदार व्हायच्य पात्रतेचेच नव्हते असे वाटून जाते .
आमदार पत्नी मी, मग मी रेशनच्या रांगेत कशी उभी राहू? नवरा आमदार आणि एस.टी. स्टॅंडवर बोरगावकडे जाणाऱ्या एस.टी.ची वाट मी कशी बघत थांबू आणि नवरा एक वेळा, दोन वेळा, नव्हे सलग चार वेळा आमदार; तरी मी म्हाडा कॉलनीत सिमेंट पत्र्याच्या छताखालच्या तीन खोल्यांच्या घरात कशी राहू? असला विचारही कधी मनात न आणता जीवन जगलेल्या श्रीमती हेमलता त्र्यंबक कारखानीस (वय ८४ ) या आपल्या मृत्यूसही अगदी सहजपणे सामोरे गेल्या. त्यांचा मृत्यू झाला आणि कोठे बातमी नाही, डिजिटल फलक नाही, अलीकडे कोल्हापुरात एखाद्याच्या मृत्यूचाही गाजावाजा करायची पद्धत रूढ झाली असताना अगदी साधं कसं जगायचं हेच दाखवून त्या निघून गेल्या.
श्रीमती हेमलता कारखानीस या दिवंगत आमदार त्र्यंबक सीताराम कारखानीस यांच्या पत्नी. १९५७ ला ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि नंतर सलग तीन वेळा कोल्हापूर शहर मतदारसंघातून ते निवडून आले. सलग चार वेळा निवडून आलेले सगळेच कर्तृत्ववान असतात असे नाही. पण कोल्हापूरचे हे आमदार कारखानीस म्हणजे विधानसभेत वाघ होते. ते विधानसभेत बोलायला उठले तर आय. सी. एस. अधिकारी गांगरलेले असायचे. कारखानीसांनी एखाद्या प्रश्नात लक्ष घालायचे ठरवले तर ते मुळापासून त्यात घुसायचे आणि सरकारकडून ठोस उत्तर किंवा ठोस आश्वासन घेऊनच भाषण थांबवायचे. “”थांब, तुला विधानसभेत बघून घेतो,” अशी अधिकाऱ्यांना धमकी घालायची पद्धत त्यावेळी नव्हती. “दूध का दूध आणि पानी का पानी’ ही परंपरा कोल्हापूरच्या या आमदाराने महाराष्ट्रात निर्माण केली होती.
अशा या कणखर आमदाराची बायको बाईसाहेब, माईसाहेब, वैनीसाहेब म्हणूनच ओळखायला हवी होती. त्यांनी कायम स्टार्चची साडी नेसायला हवी होती. ड्रायव्हर, नोकर, कार्यकर्त्यांवर डाफरून आपली भीती निर्माण करायला हवी होती. पण या बाईने आमदाराची बायको म्हणून नव्हे तर कारखानीस या एका ध्येयवादी माणसाची बायको म्हणून जीवन व्यतीत केले. १९५७ ला हे जोडपे कपिलतीर्थाजवळ निंबाळकरांच्या वाड्यातील एका खोलीत राहत होते. कोल्हापुरात एका छोट्या खोलीत राहणारे कारखानीस मुंबईत मात्र विधानसभा हादरवून सोडत होते.
१९५७ नंतर ते पंचगंगा तालमीजवळ परीट गल्लीत राहायला गेले. त्यानंतर तीन वेळा कोल्हापूरचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. मतासाठी “पाकीट’, “जेवण’, “दारू’, “दादागिरी’, “जात-पात’, “पै-पाहुणे’ असली कधी भानगड नाही. आमदार म्हणून मिळालेले मानधन प्रवास, पुस्तक खरेदी आणि गरजूंना मदत म्हणून वाटत राहिले. त्यामुळे घरात नेहमी रडारवर. पण हेमलता गडबडल्या नाहीत. आपला नवरा तेवढा एकनिष्ठ तर आपणही तसेच जगायचे हे त्यांनी ठरवले. त्या रेशनच्या रांगेत उभे राहायच्या. गहू आला काय? साखर आली काय? म्हणून दुकानदाराला विचारायला जायच्या. त्यावेळी दुकानदार त्यांच्यावर उगारायचा. त्या दुकानदाराला माहीत नसायचे, की ज्या आमदाराला महाराष्ट्र सरकार घाबरते, त्याची ही बायको आपल्या दुकानाच्या दारात गिऱ्हाईक म्हणून हातात पिशवी आणि रेशन कार्ड घेऊन उभी आहे.
कारखानीसांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे स्वतःचे घर नव्हते. १९९२ मध्ये म्हाडा कॉलनीत घर मिळावे म्हणून हेमलतांनी अर्ज केला. अर्ज मिळविण्यासाठी पहाटे तीन वाजता त्यांनी आपल्या मुलाला रांगेत उभे केले. सध्या त्या आपल्या मुलासमवेत म्हाडा कॉलनीतल्या (हॉकी स्टेडियमसमोर) अगदी साध्या घरात राहत होत्या.
नव्या पिढीतल्या त्यांच्या शेजाऱ्यांनाही माहीत नव्हते, की या बाईचा नवरा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. पण हेमलता यांनी आमदाराची बायको म्हणून आपले वेगळेपण अखेरपर्यंत जाणवू दिले नाही.हेमलतांनी हे पथ्य पाळले हे ठीक आहे. पण अशी व्रतस्थ बाई मरण पावली म्हटल्यावर स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी काय केले हे देखील महत्त्वाचे आहे. अलीकडे एखाद्याच्या मृत्यूचाही गाजावाजा कोल्हापुरात जोरात केला जातो. मरण पावलेल्या माणसाचे डिजिटल इतके लावतात, की तो मरण पावल्याचे दुःखच वाटत नाही आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर लावलेल्या डिजिटल फलकाबद्दल चीड आल्याशिवाय राहत नाही. हेमलता कारखानीसांचा मृत्यू झाल्यानंतर डिजिटल नकोच; पण चार वेळा आमदार असलेल्या कारखानीसांची बायको मरण पावली एवढे तरी आपल्याला कळायला हवे होते. पण फारसे कोणाला कळालेही नाही.
सध्या आमदार त्यांना मिळणाऱ्या ३० लाखाच्या गाड्या, चालकाला पगार सरकार देणार या बातम्या आता सवयीच्या झाल्या आहेत. खालील मजकूर वाचला की आजच्या जमान्यात कारखानीस आमदार व्हायच्य पात्रतेचेच नव्हते असे वाटून जाते.हल्ली एसएमएस, फेसबुक, व्हॉटस्‌ अपचा जमाना आहे. काही नाक्याला खुट्ट झाले तर शिरोली नाक्याला ते सेकंदात पोचते अशी परिस्थिती आहे. पण हेमलता कारखानीसांसारख्या ध्येयवादी बाईच्या मृत्यूला फेसबुक, व्हॉटस्‌ अपवर स्थान द्यायला कुठे कोणाला सवड आहे.
एक आदर्श व्यक्तीमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.
— संतोष द पाटील.

Avatar
About संतोष द पाटील 20 Articles
FREELANCE WRITER IN MARATHI,ENGLISH ,POET,SOCIAL ACTIVIST, SOCIAL WORKER.

2 Comments on नवरा आमदार, मग मी रेशनच्या रांगेत कशी उभी राहू?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..