नवीन लेखन...

परदेशात साजरा होणारा मुलगा, मुलगी दिवस

मी एकदा माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. तिथे त्याची भाची (मी तिला चिमणी म्हणतो) आली होती. बऱ्याच दिवसांनी तिची माझी गाठभेट झाली होती म्हणून तिला खाऊ घेऊन गेलो होतो , पण स्वारींचा मूड काही ठीक नव्हता असं दिसत होतं. ती गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहिली होती. मी मित्राला विचारलं की काय झालंय तिला? तो म्हणाला ती हल्ली अशीच असते. खूप शांत बसते , माणसांमध्ये मिसळत नाही. मला कळायला वेळ नाही लागला की नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. मग मी एक युक्ती केली मी तिला आवडणारं टेडी बेअर दुकानातून घेऊन आलो आणि तिच्याशी काहीच न बोलता मित्राशी बोलू लागलो. थोड्यावेळाने ती आली आणि मला फक्त एवढंच म्हणाली , ” तू पण आता मम्मा डॅडासारखा वागायला लागलास. तू माझ्याशी काहीच नाही बोललास , फक्त मला आवडणार टेडी घेऊन आलास. ” आता कुठे सगळी गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली. मगाशी बोलताना मित्राने , ताईने घर बदलून मोठ्या टॉवर मध्ये घर घेतल्याचा उल्लेख आला. मग मी चिमणीला जवळ घेतलं आणि मग तिचा चिवचिवाट सुरू झाला.

तिच्या बोलण्यात ज्या गोष्टी आल्या त्यावरून मला हा लेख आजच लिहावासा वाटला. आज ११ ऑगस्ट ! परदेशात हा दिवस ‘राष्ट्रीय मुलगा व मुलगी दिन’ (National Son and Daughter Day) म्हणून साजरा केला जातो. ती मला म्हणाली , ” हल्ली मम्मा सारखी बिझी असते आणि ड्याडा सतत त्या लॅपटॉप किंवा मोबाईलवर बिझी असतो. मला किती काय काय सांगायचं असतं त्यांना पण ते ऐकण्यासाठी पण त्यांच्याकडे वेळ नसतो. मी रुसली की मग काहीतरी खेळणं किंवा चॉकलेट देऊन , मला पापा देऊन मला समजवून सांगतात की आता ते कामात आहेत तुला काय बोलायचंय ते आम्ही नंतर ऐकू हां ! मग मी माझ्या रूममध्ये आणि ते आपापल्या रूममध्ये बसून असतो. मग मी कधी कधी गेम्स खेळते किंवा कार्टून्स बघते. पहिल्यासारखं बाहेर जाऊन खेळू म्हटलं तर सगळ्यांचे दरवाजे बंद असतात आणि खाली ग्राउंड मध्ये पण कोणीच नसतं. मग मला खूप bore होतं. पण मी कोणाला सांगायचं हे सगळं ? ”

तिच्या बोलण्याने मी पुरता हादरलो. विचार करू लागलो की खरंच प्रगतीच्या वाटेवरून जात असताना किंवा आपलं भविष्य घडवीत असताना आपण किती गोष्टींना दुर्लक्षित करत असतो आणि ह्या दुर्लक्ष करण्याचा परिणाम एवढा भयंकर ? ज्या वयात मुक्तपणे , स्वछंदपणे बागडायचं असतं , खेळायचं असतं त्याच वयात घरात कोंडून घ्यायचं ? हे म्हणजे एखादं झाड विकत घेतलं आणि त्याला पाणी न घालता तू वाढ असं सांगणं होय. बरेचदा आपणच तक्रार करीत फिरत असतो , माझा मुलगा किंवा मुलगी हल्ली खूप हट्टी झालेत. खूप रागीट झालेत किंवा खूप एकटे एकटे रहातात , नातेवाईक किंवा इतरांसोबत मिसळतच नाहीत. ह्या सगळ्याच तक्रारींना आपणच जबाबदार असतो. आपण आपल्या व्यापात अडकलेलो असतो आणि इथे ही मुलं मित्र नाही म्हणून मोबाईलवर हिंसक प्रवृत्तीचे खेळ खेळत असतात. आपलं काम होतंय म्हणून आपण त्यांच्या ह्या दोषांकडे दुर्लक्ष करतो. ह्यातूनच ते चिडचिडे होतात आणि एककल्ली बनतात. म्हणून माझं एकच मत आहे की आपण प्रगती करतोय हे चांगलंच आहे पण आपण ज्यांच्यासाठी एवढी धावपळ करतो , सारखी कामं करतो आणि पैसे कमावतो त्यांच्याच मनात आपल्याबद्दल जर चुकीचे विचार रूढ झाले तर मग त्या प्रगतीचा काय फायदा? म्हणून वेळीच सावध व्हा. आपल्या प्रगतीसोबत , त्यांच्या मनाचाही विचार करा. मोठी माणसं जशी वागतात , तसेच लहान अनुकरण करतात. मग म्हातारपणे उगीच त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? आपण जे केलं तेच ते करीत असतात. मुलांना बिनधास्त खेळू द्या , बागडू द्या. त्यांच्यावर योग्य ते संस्कार करा म्हणजे पुढे आपल्या डोक्याचा व्याप कमी होईल.

आपण पाश्चात्य संस्कृतीचं खूप अनुकरण करतो. आज हा दिवस उद्या तो दिवस मग कधीतरी आजचा दिवसपण चांगला साजरा करू. इतर दिवसांप्रमाणे हा दिवससुद्धा तितकाच प्रसिद्ध करू. चला तर ह्या कामासाठी आजच्या दिवसासारखा योग्य मुहूर्त शोधून सापडणार नाही. आजपासून आपल्या धकाधकीच्या जीवनात आनंद आणण्यासाठी थोडासा वेळ लहानग्यांसाठी काढू. हवं तर तुम्ही एक वेळापत्रकच तयार करा आणि त्याचं तंतोतंत पालन करा. मान्य आहे थोडी कसरत करावी लागेल पण हीच कसरत तुमचं मुलांसोबतचं नातं सुदृढ बनवेल.

— आदित्य संभूस 

National Son and Daughter Day

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..