नवीन लेखन...

नातं..

रम्य पहाट उगवली होती. कॉलनीला आताशी जाग आलेली. काही घरात खुडबुड सुरू झालेली. बच्चे मंडळी उठली होती, शाळेत जाण्यासाठी. आया-बापड्यांची लगबग सुरू होती. घरातली आवरा-आवर सुरू होती. अशातच भला मोठा पांढरा लेंगा नसलेला, डोक्यावर लांबोळकी, मोरपंख खोवलेली टोपी घातलेला आणि हातात टाळ-चिपळ्या घेऊन वासुदेव अवतरला होता. टाळ-चिपळ्यांचा गजर करत तो प्रत्येक घरासमोर थांबत होता. घरातील गृहिणीही वाटीभर पिठ त्याच्या झोळीत टाकत होती. वासुदेवही वाड-वडीलांच नाव विचारून घेत होता, आणि त्यांच्या नावाचा घोष करत पुढच्या घराकडे जात होता. क्षणभरासाठी दारात आलेला हा वासुदेव आपल्या वाड-वडीलांत आणि आपल्यात असलेल्या नात्याला आणखी घट्ट करून जात होता. नातं हे असच असतं न दिसणारं पण घट्ट झालेलं, अनेक पिढ्यांपासुन चालत आलेलं, पुढेही चालत राहणारं.

नातं दोन अक्षरांच. पण त्याची व्याप्ती बघा किती मोठी आहे. नात्यांमध्ये विश्वासाचा धागा अतिशय महत्वाचा असतो. विश्वासाच्या बळावर हे नातं दृढ होत जात. नातं दृढतेचं असतं, नातं विश्वासाचं असतं, नातं आपुलकीचं असतं, नातं ओळखीचं असतं, नातं समजुन घेण्याचं असतं, नातं देण्याचं असतं तस ते घेण्याचही असतंच, नातं असुनही नसणारं असतं आणि नसुनही असणार असतं…. नाही का?

कळत-नकळत आपलं नातं जुळत जातं, कधी, कुठे, कुणाशी, कसे माहित नाही. पण ते जुळतं हे नक्की. अगदी हेच बघा ना आपण रोज वापरतो त्या रस्त्याचं आणि आपलंही नातं जुळतंच. आपलं आणि शाळेचं नातं अनोखं असतं. लहान असतांना खेळलेल्या मैदानाच आणि आपलं नातं आपण कधीच विसरत नाही. घराच्या अवती-भोवती असलेल्या फुलझाडांच आणि आपले भावबंध घट्ट जुळतात. अगदीच खिडकीत येणाऱ्या चिमणा-चिमणीचं आणि आपलंही नातं आनंद देणारं असतं. मग या नात्याला जागून आपणही चिमणा-चिमणीसाठी थोडेसे दाणे आणि पाणी खिडकीत ठेवू लागतो, बघा नातं दृढ होत गेलं की नाही. कॉलनीतून नेहमी वावरणारे भाजीवाले, सफाई करणारे, कचरा उचलणारे, भंगारवाले, लाईट बिल देणारे, सिलिंडर देणारे यांच्याशीही नातं जुळतचं. या नात्याला कोणतेही नाव नसते पण ते असते. जेव्हा यातील कुणीतरी एक त्याच्या वेळेवर आले नाही तर मनाला रुख-रुख लागून राहते. मग आपणच दोन तीन वेळा स्वत:शीच बोलतो देखील, आज भाजीबाली बाई आली नाही अजून, आज पेपरवाला का आला नाही. ही सारी नात्यांचीच किमया नाही का.
घरातून बाहेर पडणाऱ्या मुलाचं पहिलं नात जुळतं ते पाटीशी. आता मुलांच नात जुळतं वही आणि पेन्सिलशी..! मग शाळेतील शिक्षकांशी नातं जुळतं. मग मैत्र वाढत जातं. मैत्रीचं नात दृढ राहतं, अगदी शेवटपर्यंत टिकतं. वय वाढत जातं तसे नात्यांची व्याप्ती वाढत जाते. काहीवेळा नात्यांमध्ये हळवेपणा येतो, काहीवेळा कठोरपणाही येतो. काहीवेळा व्यवहार येतो, काहीवेळा आपुलकी येते, काहीवेळा जिव्हाळा येतो, काहीवेळा नात्यात रंगत येते, काहीवेळा नात्यातील रंग उडुनही जातात… असो..

एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो, गालातल्या गालात. जवळचे आप्त-नातेवाईक हे तर असतातच… पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात… टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात…. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे… वाढले पाहिजे…..हेच मागणे..!

— दिनेश दीक्षित, जळगाव.

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..