नवीन लेखन...

नागराज

Image : Prakash Pitkar….

दरवर्षी श्रावण सुरु झाला की की आठवतात ते लहानपणीचे दिवस. श्रावणातले ते विविध सणांचे मंतरलेले दिवस. त्या रोज वाचल्या जाणाऱ्या कहाण्या. जिवतीची पूजा, मंगळागौरी आणि विशेष म्हणजे नागपंचमी. पूर्वीसारखे नागांना घेऊन बसणारे गारुडी आता जवळ जवळ दिसताच नाहीत. तरीही श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी हा दिवस हा आपल्या शेतीप्रधान संस्कृतीत आजही तेवढाच महत्वाचा …

खरं तर आपल्या संस्कृतीचं असं कुठलंच क्षेत्र नाही, जे नागाच्या धारणेनं व्यापलेलं नाही. परंपरेने याला पृथ्वीला मस्तकी धारण करणारा सर्वश्रेष्ठ शेष म्हटलेला आहे. समुद्रमंथनात तर वासुकी नागाची दोरी देव-दानवांनी धरली होती. वास्तुपूजनाच्या विविध विधीत ज्या दहा जणांना बळी अर्पण करण्याची प्रथा होती. त्यात एक बळी वासुकी नागासाठी आहे. परंपरेने नागाच्या कथांना रसरशीतपणे जपलेलं आहे. परंपरा सांगते की वारूळ हे भूमीच्या सर्जनेंद्रियाचं प्रतीक आहे. तर नाग हे पुरुषत्वाचं प्रतीक मानलं गेलंय. त्याची उपासना प्राधान्याने संतानदेव म्हणूनच केली जाते. अनेक जमातींमध्ये विवाहप्रसंगी वधूने आणि विवाहित स्त्रियांनी नागाची पूजा करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी तर स्त्रिया वारुळाची पूजा करून, त्या वारुळाची माती घरी आणतात. वारुळाची माती केवळ लौकिक परंपरेतच नव्हे तर वैदिक परंपरेतही अत्यंत पवित्र मानली गेल्येय.

राखणदार म्हणून तर त्याची भूमिका सर्वसामान्य मनामध्ये खोलवर रुजलेली आहे. राखणदार नागाच्या कितीतरी गोष्टी आजही आपल्याला ग्रामीण भागात ऐकायला मिळतात. अगदी जर आपण गावाला कधी गेलो तर रात्री अंगणातल्या गप्पात घरातले वयस्क लोक एकदा तरी आपल्या परसातल्या या राखणदाराची गोष्ट सांगतातच आणि आपल्या नातवांना त्याला नमस्कार करायला सांगतात. खरं तर नागराजाचा कुठेही विषय निघाला तरी अशी गोष्ट … थरारक अनुभवासकट सांगणारा तिथे एक तरी माणूस असतोच. शेतातल्या वारुळाची पूजा करण्याची पद्धत आजही अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने केली जाते. शेतातून हिंडणाऱ्या राखणदारासाठी नारळ फोडला जातो. आपल्या घरावरील त्याच्या कृपाछत्रासाठी … रक्षणासाठी त्याची मनोभावे प्रार्थना केली जाते.

केवळ भारतातच नव्हे तर चीन पासून आफ्रिका, अमेरिकेपर्यंत सगळ्या खंडांमध्ये प्राचीन काळापासून नागविषयी विलक्षण आदरमिश्रित श्रद्धा आहे. पाऊस आणि संपत्ती यांचा दाता म्हणून चीनमध्ये त्याची पूजा केली जाते. मेक्सिकोमधल्या काही प्राचीन आदिवासी जमातींमध्ये अशी समजूत रूढ होती की सूर्यसर्प आणि सूर्यासर्पिणी यांना जुळी मुलं झाली. मुलगा आणि मुलगी. हीच दोघं मानवजातीच्या प्रारंभाची माणसं. एशियामायनरमध्ये सापडलेल्या काही नाण्यांवर आदिसर्पामिथुन आहे. कंबोडियातल्या अंकोरवट मंदिराच्या विजयद्वाराचे रक्षक म्हणून दोन प्रचंड नागशिल्प आहेत. स्वीडनमध्येही सोळाव्या शतकात ग्रहदेवता म्हणून नागपूजा अस्तित्वात होती. अमेरिकेतल्या अरिझोना राज्यात दरवर्षी ऑगस्टमध्ये दोन दिवस सर्पोत्सव साजरा केला जातो. या उत्सवातलं सर्पनृत्य फार प्रसिद्ध आहे. यात चोवीस जण भाग घेतात. नाच सुरु असतांना ढोलाच्या तालावर यातला प्रत्येक जण मडक्यातून साप उचलून त्याला घेऊन नाचतात. उत्सव साजरा झाल्यावर या सगळ्या नागांना वाळवंटात सोडतात.

नागराजाकडे काही अतेंद्रिय शक्ती असल्याची माणसाची खोल समजूत आहे. सध्या तर्कशुद्ध ज्ञानाचा पारंपरिक श्रद्धांशी बऱ्यापैकी संघर्ष सुरु आहे. तरी देखील या डौलदार … विलक्षण गतीमान … सळसळते चैतन्य असलेल्या चिरतरुण नागराजाला बघितलं की माणसाची नजर एका वेगळ्याच आदरमिश्रित श्रद्धेने क्षणात झुकते … मला तर नक्की वाटतं की आपल्या सगळ्या डौलात फणा काढून उभा असलेला नागराज वाघापेक्षा अधिक भुरळ घालतो … मला तर सृष्टीतला तो सगळ्यात देखणा… रुबाबदार … सामर्थ्यवान वाटतो … मी खूप नशीबवान आहे … मी या नागराजाची अनेक दिव्य आणि सळसळती रुपं बघितली आहेत …नागनागिणीचा अद्वितीय असलेला मेळ देखील बघितलाय … अगदी साडेचार पाच फुटांचा …. अत्यंत सामर्थ्यवान .. ब्लॅक कोब्रासुद्धा .. दर वेळी नजर आदराने नत झालेली आहे.

(ऐका नागोबा देवा … तुमची कहाणी… सहज ४७ ४८ वर्ष उलटून गेलेली असली तरी दरवर्षी नागपंचमी आली की मन लहान होऊन जात … या दिवशी आई … पाटावर गंधाने नागोबाच्या आकृती काढून अत्यंत मनोभावे पूजा करायची … आम्हा मुलांना घेऊन बाहेर पडायची … गारुड़ी बहुसंख्येने या दिवशी आलेले असत …त्याच्याकडे मोठी पसरट टोपली असे …. असं कोणी आलं की तो टोपलीचं झाकण उघड़त असे … आणि एका क्षणात आतला वेटोळं घातलेला नागोबा फणा काढून आमच्याकडे बघत डोलायला लागे… त्याचा तो फणा बघून आमची प्रचंड घाबरगुंडी उड़त असे …. आपोआप मागे सरून आईला खेटून उभे राहत असू …. तरीही त्याचा तो फणा आणि सळसळतं रूप आमच्या बालमनाला भुरळ घालत असे ….. नजर हलवू नये, असंच त्यावेळीही वाटत असे …… आई त्याची दुरुन मनोभावे पूजा करत असे … दूधाची वाटी नेलेली असे …. त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी …. त्यादिवशी आई कसलीही भाजी म्हणा किंवा काहीही चिरायची नाही… काहीही भाजायची … तळायची नाही …. हा नियम तिने शेवट पर्यंत पाळला … इतकी तिची श्रद्धा अभंग होती ….. आणि हा नियम तिने आम्हालाही पाळायला लावला …. आज दिवस कल्पनेपालिकड़े बदलले आहेत …. आपण असं काही पाळू शकत नाही … किंबहुना हे सगळं आपण आता हास्यास्पद मानतों …. तरीही मला मात्र नागपंचमीच्या दिवशी हे सगळं आठवतं … अस्वस्थ व्हायला होतं… नीट विचार केला तर या सणांमागे किती खोल विचार होता …. नाग किंवा साप हे सृष्टीच्या चक्रातले अतिशय महत्वाचे घटक … त्यांना देवत्वाचा मान दिल्याने त्यांना चुकूनही आपल्याकडून इजा होऊ नये …. हा विचार त्यामागे होता … नागपंचमी आली की हे सर्व डोळ्यांसमोर येतं …. ऐका नागोबा देवा … तुमची कहाणी… आटपाट नगर होतं … तिथे एक शेतकरी राहात होता … त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं …… जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवों … ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण…. हे आईने वाचलेल्या कहाणीतले शब्द कानात गुंजायला लागतात …. काही क्षणांकरता का होइना मनावरची शहरी आणि मतलबी पुटं कुठल्या कुठे जातात … मन खरंच स्वछ आणि प्रसन्न होतं ….)

— प्रकाश पिटकर 
7506093064
9969036619

(हा लेख शेअर केलात तर खूप आनंद आहे … फक्त एक नम्र विनंती … लेखकाच्या नावासह शेअर करावा ….. )

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..