असा मी, तसा मी, असातसा मी, असा कसा मी?

आजची पोस्ट आहे “मी” वर ! अर्थात मी म्हणजे प्रत्येकाच्या मनात असलेला ‘मी’ ! पोस्ट मधला आणि फोटो मधला मी म्हणजे ‘मी’ असलो तरी…

मोबाईल हँडसेट बदलत असतांना आपण आवर्जून त्यात काढलेले सेल्फी आणि इतर pic save करत असतो. Mobile हरवला तर त्यात आपले फोटो गेले याच जास्त वाईट वाटतं. कधी कधी घर आवरत असतांना फोटोचा अल्बम सापडतो, आपण काम तसेच टाकून अल्बम पाहत बसतो. जुने फोटो पाहतांना प्रत्येकाच्या मनात दोन गोष्टी येतातच, पहिली – माझे फोटो चांगले निघतच नाहीत. दुसरी – त्या वेळी आपण किती “च्यु xx” होतो.

पहिल्या वाटण्यात एकतर आपण आपल्याला आवडत नसतो किंवा आपण आपल्या मनात असलेली आपली इमेज फोटो सोबत मॅच होत नसते. दुसऱ्या वाटण्याचा सरळ अर्थ निघतो की, आता मी हुशार आहे. काही वर्षांनी आजचा pic पाहून सुद्धा, तेंव्हा आपण किती “च्युxx” होतो ! हे वाटणार असतंच, तरी सुद्धा आज ‘शहाणे’ समजतच असतो !

तर, दरवेळी स्वतः चे फोटो पाहत असतो त्या वेळी, मी असा का होतो? याचं उत्तर मिळतंच असं नाही, पण त्या त्या वेळी घेतलेली ती ती भूमिका मात्र आपण परफेक्ट वठवत असतो.

अशी दरवेळी आपण आपली भूमिका बदलत असतो. त्या वेळी त्याचं समर्थन देखील करत असतो. आपण कधी रागावलेले असतो, कधी चिडलेले असतो, कधी कुणाच्या कानाखाली ठेऊन दिलेली (अर्थात, आपल्या पेक्षा कमजोर असणावरच) असते, एखाद्याच्या कामात खोडा घातलेला असतो, एखाद्याची फजिती केलेली असते, एखाद्या गरजवंताला आपली क्षमता असून सुद्दा मदत केलेली नसते. मी तेंव्हा ‘असा’ का वागलो? याचं आपल्याकडे समर्थ समर्थन असतंच असतं !

‘तसा मी’ खूप चांगला आहे पण एकदा का डोकं फिरलं की कुणाच्या बापाचं ऐकत नाही ! असं सुद्धा नेहमी बोलत असतो पण आपलं डोकं नेहमीच आपल्या पेक्षा लहान किंवा हाताखालच्या (कानाखालच्या सुद्धा) लोकांसमोरच ‘फिरत’ असतं, प्रत्यक्ष आपल्याच बापा समोर किंवा “बाप माणसा” समोर कधीच फिरत नसतं !

“मी” वर आपलं प्रचंड प्रेम असतं आणि ते असलंच पाहिजे! कधीकधी हे मी प्रेम मात्र घातक ठरतं, मी जेव्हा “मी” असतो नेमकं त्याच वेळी समोरच्याला “मी” कोण आहे? हे माहित नसतं, तो पाणउतारा करतो तेंव्हा माझ्यातला ‘मी’ कळवळून म्हणतो, मी काय असातसा वाटलो की काय ? हे फक्त दाब (दम) देण्यापूरतं विचारायचं असतं पण आपल्याला माहित असतं की तो आपल्याला ‘असातसा’च समजत असतो !

असा कसा मी ?
हाच खरा यक्षप्रश्न असतो !
कारण एकाच दिवशी, एकाच वेळी, मी…
चांगला असतो, वाईट असतो !
सज्जन असतो, लाळघोट्या असतो !
तुर्रुम असतो, हतबल असतो !
शहाणापणात, मूर्खपणा केलेला असतो !
शूर असतो पण मनातून घाबरलेला असतो !
कुत्र्यावर भूतदया असलेला, साप पाहून काठी घेतो !
मटण खातो पण शेळी ला काठीने मारणाराचा राग येत असतो!
प्रवासात गरोदर बाई दिसली तर तिला ‘कुणीतरी’ जागा द्यावी, असं वाटत असतं!
जातपात मानत नाही! असं FB वर ओरडून सांगत असतो, आपल्या जातीच्या लोकांच्या WA वर ग्रुपचा Admin असतो !

दर वेळी माझ्यातला “मी” वेगळा असतो, तो कधी दिसतो कधी दिसत नाही, इतकाच फरक असतो !
माझेच मला नाटकातले आणि या दोन महिन्यातले वेगवेगळे Looks पाहून सुचलेली ही पोस्ट….

तळ टीप :– “मी नेमका कसा आहे?” हे पाहण्यासाठी,
भक्क उजेडात डोळे फाडून “आरश्यात’ पाहण्या पेक्षा,
मिट्ट अंधारात डोळे मिटुन “आपल्यात” पाहिलं तर जास्त स्पष्ट दिसतं..!!!

— विनोद डावरे, परभणी…
04-07-2018

●● सहजच सुचलं – 74 ●●

विनोद डावरे
About विनोद डावरे 6 Articles
मुक्काम परभणी. विविध विषयांवर लेखन. सहजच सुचलेले विषय आणि त्यांची मांडणी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…