नवीन लेखन...

नातं जपताना

आज माणसांचं आयुर्मान वाढलं आहे. 80-85 वर्षापर्यंत माणसं जगू शकताहेत. पण त्यांचं हे जगणं वाटतं तितकं सहज सोपं राहिलेलं नाही. आज अनेक वृद्ध लोकांची मुलं  कामधंद्यानिमित्ताने परदेशात आहेत. काहींची दुसऱ्या शहरात आहेत तर काहींची त्याच  शहरात असूनही  त्यांच्या आलिशान घरात त्यांच्या आईवडिलांना जागा नाही.  त्यामुळे उतार वयात एकटं राहावं लागणं हे एकूणच वृद्धांचं  भागधेय बनत चाललं आहे.

एकतर वाढत्या  वयात तब्येतीच्या  इतक्या साऱ्या समस्या असतात.   मानसिक दृष्ट्याही या वयात माणूस कमजोर होत जातो.  त्यात हे एकट्याने राहणं. स्वतःला कितीही खंबीर भासवलं  तरी हे एकटेपण त्यांना आतून आणि बाहेरूनही पोखरत जातं. त्यातच ही माणसं निम्मी अर्धी खचून जातात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येकच समस्यांची  तीव्रता त्यांना अधिक वाटायला लागते. रोजचं जगणं हीच त्यांच्यासाठी खूपदा तारेवरची कसरत होऊन बसते. या काळात त्यांना गरज असते ती एका आश्वासक सोबतीची. आम्ही सोबत आहोत किंवा तू एकदा नाहीस हा दिलासा खूप वेळा त्यांना जगण्याचं बळ देत असतो.

त्यांची ही गरज लक्षात घेऊन आज अनेक शहरात वेगवगळ्या प्रकारची ‘ओल्ड एज केअर सेंटर’ उभी राहिली आहेत. काही सेंटर फाइव्हस्टार सोयींनी युक्त आहेत तर काही सर्व साधारण. आपल्या ऐपतीप्रमाणे. यातला पर्याय निवडता येऊ शकतो. किंवा आपलाच मित्रमैत्रिणींचा, समविचारी मंडळींचा  ग्रुप एकत्र राहू शकतो. एकमेकांच्या सोबतीने उर्वरित आयुष्य छान पद्धतीने व्यतीत करू शकतो. परंतु या सगळ्याचे काही प्लस मायनसेस आहेत हे देखील त्यावेळी प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवं. त्यासाठी तयार देखील राहायला हवं.

आज वृद्धांची वाढती संख्या आणि त्यांच्या वाढत्या समस्या पाहता, वृद्धत्व ही वैयक्तिक बाब न राहता त्याचे सामाजिक पातळीवर पडसाद उमटत आहेत त्यामुळे या समस्येचा सामाजिक पातळीवरून त्याबरोबरच शासकीय पातळीवरून विचार होणं गरजेचं आहे. त्यासाठी शासकीय दप्तरी वृद्धांची वॉर्ड निहाय नोंदणी असली पाहिजे. स्थनिक स्वराज्य संस्थामध्ये बालकल्याण आणि महिला विभाग असतो तसाच एक ‘ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग असला पाहिजे तिथे वृद्धांच्या सर्व समस्या सहानुभूतिपूर्वक आणि तत्परतेने हाताळल्या पाहिजेत. वृद्धांना आज पेन्शन दिली जाते पण ती फारच तुटपुंजी आहे. त्यात त्यांची महिनाभराची औषधं देखील येणार नाहीत. वृद्धांना मोफत एसटी प्रवास आहे. त्यासोबतच निराधार, कमी उत्पन्न गटातील वृद्धांसाठी स्वतंत्र आणि मोफत हॉस्पिटल्स हवीत. त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि जेवण या सुविधा मोफत पुरवल्या पाहिजेत.  वृद्धांसाठी  खास वसवलेल्या शासकीय वसाहती ही संकल्पना आपल्याकडे हळूहळू रुजते आहे. परंतु त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने ती संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे रुजवली पाहिजे. अधिक अधिक लोकांपर्यंत आणि अगदी खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे.

आपल्या भारताची लोकसंख्या इतकी अफाट आहे की या इतक्या लोकासाठी  शासन नेहमीच पुरं पडेल किंवा तिथपर्यंत पोहोचू शकेल किंवा वृद्ध तिथपर्यंत पोहोचू शकतील हे 100% संभवत नाही. त्यामुळे सामाजिक पातळीवरून देखील या समस्येचा जास्तीतजास्त विचार व्हायला हवा आहे.  त्यासाठी जास्तीतजास्त सेवाभावी स्वयंसेवी संस्थानी पुढे आलं पाहिजे. जे लोक रिटायर आहेत पण अजूनही धट्टेकट्टे आहेत,  अजूनही काम करू शकतात. त्यांनी देखील वृद्धाच्या मदतीसाठी कायम तत्पर असलं पाहिजे. हाउसिंग सोसायटीत राहणारे एकटे वृद्ध किंवा वृद्ध जोडपी यांचा देखील सोसायटीतील सदस्यांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य या नात्याने विचार केला पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे.

विशेषत:  तरुणांना या कार्यात जास्तीतजास्त सहभागी करून घेतलं पाहिजे.  त्यासाठी शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना वृद्धाश्रमांना भेटी देणं सक्तीचं केलं पाहिजे. म्हणजे हे वृध्द कुठल्या परिस्थितीत राहतात कुठल्या समस्यांना तोंड देतात हे त्यांना कळेल. त्याशिवाय लहानपणापासून हे सर्व पाहिल्यामुळे त्यांच्याबद्दलचा एक करुणाभव त्यांच्यात निर्माण होईल. त्यासोबतच यातून आपण सुद्धा जाणार आहोत याची जाणीव त्यांच्या मनात कायम राहील.

ज्या विद्यार्थ्यांना  समाजसेवेची आवड आहे. ते विद्यार्थी सेवाभावी तत्त्वावर वृद्धांना अनेक गोष्टीत मदत करू शकतात. काही विद्यार्थ्यांना पैशाची गरज असते. असे विद्यार्थी गरजू वृद्धांना सशुल्क मदत देखील करू शकतात. वृद्धांना  सेवा पुरवणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी अॅडमिशन घेताना ग्रेस मार्क्सची तरतूद केली तर! म्हणजे जास्तीस जास्त विद्यार्थी या कामात पुढे येतील. किंबहुना इस्रायल मध्ये जसे सैन्यात सेवा देणं जसं सक्तीचं आहे त्या धर्तीवर आपल्याकडे शाळा-कॉलेजात वृद्धांना सेवा देणं सक्तीचं केलं पाहिजे.

परदेशात काही ठिकाणी आपण आपल्या तरुणपणी वृद्धांना केलेली मदत सरकार दप्तरी  नोंद होते आणि त्यांच्या वृद्धापकाळात  त्याचा मोबदला त्यांना सेवेच्या रूपात दिला जातो ही संकल्पना आपल्याकडे देखील रुजण्याची गरज आहे.

थोडक्यात सांगायचं  तर संपूर्ण समाजात वृद्धांप्रती एक सेवाभावी आणि सहानुभूती पूर्ण दृष्टिकोन विकसित होण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाला ती आपली जबाबदारी वाटली पाहिजे. किंबहुना ती काळाची गरज आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही फेज आपल्या आयुष्यात कधी ना कधी येणार आहेच. ही गोष्ट ध्यानात घेऊन प्रत्येकाने त्यासाठी सज्ज देखील राहायला हवं. म्हणजे मग प्रतिकूल परिस्थितीत आम्ही मुलांना एवढं छान वाढवलं त्याचं फळ म्हणून आमच्या नशिबी हे एकट्याने किंवा वृद्धाश्रमात दिवस कंठणं आलंय असं म्हणत उठता बसता उसासे सोडावे लागणार नाहीत. वृद्धापकाळासाठी आणि  त्यात येणाऱ्या आजारपणासाठी  पैशाची तरतूद लोक करतानाच.  मी आजारीच पडणार नाही याची देखील तरतूद करायला हवी. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार, आराम, व्यसनांपासून दूर राहणं या सवयी  आधीपासून अंगवळणी पाडून घ्यायला हव्यात. त्याबरोबरच जास्तीतजास्त माणसात मिसळण्याची. विशेषतः शेजारपाजारच्या माणसात मिसळण्याची त्यांच्या अडीअडचणीला मदत करण्याची देखील सवय लावून घेतली पाहिजे. पेराल तसं उगवतं या न्यायाने हीच माणसं पुढे जाऊन तुमच्या उपयोगी पडणार असतात. स्वत:ला कशात न कशात कायम बिझी ठेवलं  पाहिजे  आयुष्यातले दुःखाचे क्षण आठवण्यापेक्षा आनंदाचे क्षण आठवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. थोडक्यात येईल त्या परिस्थितीचा स्वीकार करत स्ट्रेस न घेता नेहमी आनंदी राहता आलं पाहिजे. या गोष्टी तुम्हाला आजारपणापासून दूर ठेवतातच त्याच बरोबर त्या तुम्हाला जगण्याची एक नवीन ऊर्जा देऊन तरुण ठेवत असतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे म्हातारपणी कुणी आपली काठी व्हावं हा विचारच डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काठी मला लागणारच नाही आणि लागलीच तर मीच माझी काठी होईन. मी एकटा नाही. मी स्वत:च स्वत:ला छान सोबत करू शकतो. हे मनात बिंबवलं पाहिजे. पाडगावकरांनी खूप छान म्हटलंय

तरुण असलं की तरुण असतं म्हातारपण
रडत बसलो  की करुण असतं म्हातारपण
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण
घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण

खरोखरच आपण म्हातारपण कसं स्वीकारतो यावरही खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. याचा देखील प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि  त्याप्रमाणे आयुष्याला वळण लावलं पाहिजे. मग वयाच्या कुठल्याही वळणावर आपली पावलं कुठेही डगमगणार नाहीत. तर तो प्रवास सुंदर होऊन जाईल.

-संगीता अरबुने

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

1 Comment on नातं जपताना

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..