नवीन लेखन...

मुद्रित माध्यमांचा उदय आणि विकास

सहाय्यक प्राध्यापक वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मुद्रित माध्यमांचा इतिहास रंजक असला तरी तो मानवाच्या प्रगतीचा साक्षीदारही आहे. तंत्रज्ञानातील बदलाबरोबरच मुद्रित माध्यमांतील स्थित्यंतरे समजून घ्यायची असतील तर निश्चितपणे हा इतिहास नेमकेपणाने लक्षात घेणे आवश्यक आहे. मुद्रित माध्यमांच्या जन्माच्या आधीपासून संप्रेषण व्यवहार सुरू आहे. मानवाच्या जिज्ञासेतून पत्रकारितेचा उदय झाला. माहिती मिळविण्याचे कुतूहल आणि ती माहिती इतरांना सांगण्याची मानवाची स्वाभाविक वृत्ती यातून विविध स्वरूपाच्या माध्यमांचा जन्म झाला. मौखिक परंपरेबरोबरच वास, गंध, चव, स्पर्श अनेक अनेक व्यवहारातून माहिती मिळविली जाते. परंतु पत्रकारितेच्या विकासाला आणि विस्ताराला खरी गती मिळाली ती मुद्रित माध्यमांचा उदय झाल्यानंतरच. मुद्रणाच्या आधीपासून मौखिक, लिखित तसेच दृश्य रुपात पत्रकारिता अस्तित्वात होतीच. पण तिचा पट अधिक व्यापक होण्यासाठी मुद्रित माध्यमांची मदत झाली, असे म्हणता येते.

माध्यमांचा आणि समाजरचनेचा थेट संबंध असतो. माध्यम निर्मितीच्या मुळाशी अनेक सामाजिक, सांस्कृतिक प्रेरणा असतात. मुद्रित माध्यमांपुरता विचार करावयाचा झाल्यास, साक्षरता ही या माध्यमांची पूर्वअट आहे. जगभरात साक्षरतेचा प्रसार जसजसा होत गेला, तसतशी मुद्रित माध्यमांची प्रगती झालेली आहे. सध्या प्रचलित असलेले छापील स्वरूपातील माध्यम विकसित होण्याच्या खूप आधीपासून याविषयीचे प्रयत्न सुरू होते.

ख्रिस्तपूर्व १३१ मध्ये म्हणजे रोममध्ये ‘अॅक्टा ड्युरना’ (Acta Diurna) ही हस्तलिखिते प्रकाशित केली जात असत. अॅक्टा ड्युरना म्हणजे दैनंदिन घडामोडी. ज्युलियस सिझरच्या काळात रोमन साम्राज्यात सरकारच्यावतीने अधिकृत माहिती दिली जात होती. लॅटीन भाषेतील ही माहिती दगड किंवा धातूवर लिहिली जात असे आणि ती सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या लक्षात येईल, अशा पद्धतीने लावली जात होती. एवढेच नव्हे तर जन्म-मृत्यूची माहिती, विवाहाची माहितीसह अन्य सरकारी माहितीचा यामध्ये समावेश होता. सरकारी नोकरांकडून ही माहिती तयार केली जात होती. ही माहिती लोकांना पाहण्यासाठी तसेच वाचण्यासाठी उपलब्ध होती. त्यानंतरच्या काळात सरकारची माहिती असलेली वार्षिकी काढण्यात आली. यामध्ये वर्षभरात सरकारने घेतलेल्या निर्णयाची तसेच ज्युलियस सिझरच्या काळातील महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी असत. ही हस्तलिखिते सध्याच्या वर्तमानपत्राचे पूर्वज मानली जातात. ख्रिस्तपूर्व ५९ मध्ये ‘ॲक्टा सिनाट्युस’ (Acta Senatus) ही हस्तलिखिते प्रकाशित करण्यात येऊ लागली. यामध्ये ज्युलियस सिझरच्या सिनेटमधील चर्चेचे वृत्तांत असत.

सरकारी पातळीवरची चर्चा जाहीर होऊ लागल्याने काही राजकीय प्रतिनिधी आणि काही अधिकाऱ्यांना ते रूचले नाही. त्यामुळे त्यांनी या हस्तलिखितांना विरोध केला. परिणामी, नंतरच्या काळात ही हस्तलिखिते प्रकाशित होणे स्थगित करण्यात आले.

हस्तलिखितांमुळे लोकांपर्यंत माहिती पोहोचू लागली. परंतु अद्याप मुद्रणाचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे माहिती प्रसूत करण्यासाठी मर्यादा येत होत्या. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात स्पेनमध्ये १२८२ मध्ये पाण्याच्या सहाय्याने चालणारा कागदाचा कारखाना सुरू झाला. पेपर तयार करण्याची कला चीनमध्ये अवगत होती. तेथून ती युरोपमध्ये आली. कागदाच्या निर्मितीमुळे लिखित स्वरूपातील संज्ञापनाला गती मिळाली. रोमन साम्राज्यातील हस्तलिखिते शीळा किंवा धातूंवर हस्तलिखित स्वरूपात होती. कागदाच्या निर्मितीनंतर शीळा आणि धातू मागे पडले. व्यक्तिगत पातळीवरील लेखनाला कागदाच्या निर्मितीनंतर चालना मिळाली. नागरिकांना स्वतःची मते, कविता किंवा अन्य भूमिका व्यक्त करण्यासाठी याचा उपयोग होऊ लागला. कागदाच्या निर्मितीमुळे मुद्रणाच्या विकासाला मोठा हातभार लागला.

जर्मनीमध्ये जोहान गुटेनबर्ग यांनी १४४० मध्ये मुद्रणकलेचा शोध लावला. यातून जनसंज्ञापनाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे यातून शक्य झाले. गुटेनबर्ग यांनी लाकडी ब्लॉक तयार केले. त्यानंतर यामध्ये सुधारणा करत त्यांनी शिसे आणि अन्य धातूचे ब्लॉक तयार केले. सुरुवातीला तेल आणि काजळीचा शाई म्हणून वापर करण्यात आला. गुटनेबर्ग यांच्या या प्रयत्नातून मुद्रणात मोठी क्रांती झाली. याचा सर्वात जास्त फायदा मुद्रित माध्यमांच्या विकासाला झाला. युरोपातील ही कला नंतरच्या काळात जगभरातील अनेक देशात पोहोचली. यातून अनेक ठिकाणी वृत्तपत्रासारख्या मुद्रित माध्यमाचा जन्म झाला. वृत्तपत्रांच्या निर्मितीआधी १५३० मध्ये मेक्सिकोमध्ये छापखाना सुरू झाला. या छापखान्यात १५४१ मध्ये बातम्यांचे संकलन असलेले एक पुस्तक छापण्यात आले. पुस्तक छपाईनंतर वृत्तपत्रांची निर्मिती झाली. जर्मनी, फ्रान्स आदी देशात छापखान्यांचा विकास होऊन त्याठिकाणी मुद्रण साहित्य प्रसिद्ध करण्यात आले.

वृत्तपत्रांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. त्यातून हॉलंडमध्ये १६२० मध्ये ‘द कोरंट’ हे इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित झाले. त्यानंतर ‘द ऑक्सफर्ड गॅझेट’ हे १६६५ मध्ये प्रकाशित झाले. पुढे याला ‘द लंडन गॅझेट’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. हे ब्रिटिश सरकारचे अधिकृत मुखपत्र होते. यानंतरच्या काळात १७०४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘बोस्टन न्यूज लेटर’ या वृत्तपत्राला ब्रिटिश सरकारचे अनुदान होते. ते साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित होत होते. सुरुवातीला त्याचे एकच पान होते. त्यावर दोन कॉलम असत. ते पानाच्या दोन्ही बाजूंनी छापले जात असे. १७३२ मध्ये त्याची पाने चार करण्यात आली. यानंतरच्या काळात जगभरातील अनेक देशांत विविध वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली. १७५४ मध्ये ‘पेनसिल्व्हानिया गॅझेट’ मध्ये अमेरिकेतील पहिले व्यंगचित्र प्रकाशित झाले. ‘जॉईन ऑर डाय’ या नावाच्या या व्यंगचित्राने पत्रकारितेच्या क्षेत्रात वेगळी पाऊलवाट निर्माण केली.

तंत्रातील सुधारणांबरोबरच बातमी मुद्रण मिळविण्याच्या आणि ती प्रसारित करण्याच्या तंत्रातही कमालीचे बदल होऊ लागले होते. १ मे १८४४ रोजी बाल्टीमोर ते वॉशिंग्टन दरम्यान टेलिग्राफच्या सहाय्याने पहिली बातमी पाठविण्यात आली. राष्ट्राध्यक्ष पदासाठी एका व्यक्तीचे नाव सुचविण्यात आले होती, ही ती टेलीग्राफच्या मदतीने पाठविलेली सबसे तेज बातमी होती. याच काळात तंत्रज्ञानाची गरज म्हणून बातमीच्या रचनेतील ‘उलट्या त्रिकोणा’चा जन्म झाला. टेलिग्राफद्वारे बातमी पाठविताना तांत्रिक अडथळा येऊन संदेशात खंड कधी पडेल, हे सांगता येत नव्हते. त्यामुळे बातमीदार टेलिग्राफच्या ऑपरेटरला बातमीतील सर्वात महत्त्वाचा भाग पहिल्यांदा सांगत असे. त्यानंतर त्यापेक्षा कमी महत्त्वाचा भाग सांगत असे. आणि सर्वात शेवटी कमी महत्त्वाचा भाग सांगत असे. यातून ‘उलट त्रिकोण’ जन्मला. बातम्या संकलनासाठीही पुढे अनेक नवे प्रयोग झाले. १८४६ मध्ये असोशिएटेड प्रेसची स्थापना झाली. तर १८५० मध्ये वृत्तपत्रात छायाचित्राचा वापर करण्यात आला. १८६१ पासून अनेक वृत्तपत्रांनी रविवारसाठी स्वतंत्र आवृत्त्या देणे सुरू केले. टेलिफोनचा शोध लागल्यानंतर मुद्रित माध्यमांत अनेक सकारात्मक बदल झाले.

जगभरात मुद्रण तंत्रातील नवनव्या शोधामुळे वृत्तपत्रे स्थिरावली होती. भारतात मात्र इंग्रज आल्यानंतर त्यांनी वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्रांची सुरुवात उशिरा झाली असली तरी भारतात मुद्रणाची कला १५५६ पासून अस्तित्वात होती. पोर्तुगीज धर्मप्रसारकांनी गोव्यात भारतातील पहिले मुद्रणयंत्र आणले. या यंत्रावर धर्मग्रंथ आणि पत्रकं छापण्यात आली. ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी धर्माच्या प्रसारासाठी या कलेचा उपयोग करून घेतला. सोळाव्या शतकात भारतात हस्तलिखिताद्वारे माहितीचे दळणवळण होत होते. १६७४ मध्ये मुंबईत पहिले मुद्रणालय सुरू झाले. त्यानंतर मद्रास (१७११) आणि कलकत्ता (१७७९) येथे मुद्रणालये सुरू झाली. मुद्रण यंत्र भारतात आल्यानंतर किंवा मोठ्या शहरांत मुद्रणालये सुरू झाल्यानंतर लगेचच वृत्तपत्रांचा उदय होऊ शकला नाही. त्यासाठी १७८० हे साल उजाडावे लागले. ब्रिटिश लोक व्यापाराच्या निमित्ताने भारतात स्थिरावले. कलकत्ता आणि मद्रास येथे ब्रिटिशांनी कार्यालये स्थापली. यामध्ये अनेक इंग्रज लोक कार्यरत होते. इंग्रजांना आपल्या मायभूमीत वर्तमानपत्रांची सवय होती. भारतात आल्यानंतर इस्ट इंडिया कंपनीचा कर्मचारी जेम्स ऑगस्ट हिकी याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्याच्या प्रयत्नातून १७८० मध्ये ‘बेंगाल गॅझेट’ हे वर्तमानपत्र सुरू झाले. ‘हिकीज गॅझेट’ किंवा ‘कोलकाता जनरल अॅडव्हर्टायजर’ या नावानेही ते ओळखले जात होते. तत्पूर्वी ब्रिटिश संपादक विल्यम बोल्ट यांनी भारतात वृत्तपत्र सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. १७६६ मध्ये त्यांनी कलकत्ता येथे मुद्रणालय सुरू केले होते. तब्बल ५०० पानांचे पुस्तक प्रकाशित करून त्यांनी यादिशेने पाऊल टाकले होते. या पुस्तकात इंग्रज अधिकारी तसेच इस्ट इंडिया कंपनीच्या विरोधातील मजकुरामुळे त्यांना पुन्हा इंग्लंडला धाडण्यात आले. तथापि, जेम्स ऑगस्ट्स हिकी यालाच भारतात वृत्तपत्र सुरु करण्याचे श्रेय जाते. हिकी भारतीय नव्हता. भारतीयाने भारतीय भाषेत सुरू केलेले वर्तमानपत्र म्हणून गंगाधर भट्टाचार्य यांच्या ‘बेंगाल गॅझेट’ या वर्तमानपत्राचा उल्लेख करावा लागतो. हे वर्तमानपत्र बंगाली भाषेत प्रकाशित होत होते. त्यानंतर राजा राममोहन रॉय, सुरेंद्रनाथ बॅनर्जी अशी कितीतरी नावे घेता येतील.

बंगाली भाषेतील वृत्तपत्रानंतर भारतीय भाषेतील वर्तमानपत्रांची निर्मिती सुरू झाली. हिंदी, गुजराती, मराठी, तामिळ अशा अनेक भाषेत वर्तमानपत्रे प्रकाशित होऊ लागली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘द बॉम्बे दर्पण’ हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्यानंतर मराठीत अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिके प्रकाशित होऊ लागली.

प्रारंभीच्या काळातील सर्वच वर्तमानपत्रांनी आपापल्या परीने समाजाच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक वृत्तपत्रे सहभागी झाली.

कित्येक संपादकांनी तुरूंगवास भोगला. मराठीसह भारतातील भाषिक पत्रकारितेला अत्यंत मोठी परंपरा आहे. ही परंपरा दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत आहे.

पत्रकारितेत तंत्राबरोबरच गुणात्मक आणि संख्यात्मकही वाढ होत आहे. भारतातील वृत्तपत्र नोंदणी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, मार्च २०१८ पर्यंत देशात १ लाख १८ हजार २३९ वृत्तपत्रे आणि नियतकालिके प्रकाशित होतात. या सर्व वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा खप ४३ कोटी ६६ हजार ६२९ इतका आहे. यावरून भारतातील पत्रकारितेची व्याप्ती आणि पोहोच लक्षात येते. सर्वाधिक दिलासा देणारी बाब म्हणजे, आधी इलेक्ट्रॉनिक आणि आता वेब माध्यमांचे आव्हान असले तरी देशातील मुद्रित माध्यमे विकसित होत आहेत, ही अत्यंत समाधानाची आणि आश्वासक बाब आहे.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात डॉ. शिवाजी जाधव  यांनी  लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..