नवीन लेखन...

‘मदर इंडिया’ हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला चित्रपट

२५ ऑक्टोबर १९५७ रोजी मदर इंडिया चित्रपट प्रदर्शित झाला. निर्माता मेहबूब खानचं ते भव्यदिव्य स्वप्न होतं. १९४० साली त्याने निर्माण केलेल्या औरतची ही महत्त्वाकांक्षी पुनर्निर्मिती होती. औरत कृष्णधवल आणि जुन्या तंत्राने तयार केलेला सिनेमा होता. मदर इंडियाच्या कथेत औरतचेच घटक होते. परंतु ‘मदर इंडिया’ १७ वर्षांनंतरच्या परिपक्व अशा मेहबूब खानचा आविष्कार होता. त्याच्या गाठीशी त्यानंतरच्या कित्येक चित्रपटांचा अनुभव होता. मदर इंडिया त्याच्या शिरीचा मुकुट. औरत निर्माण केला तेव्हा त्याचं वय होतं ३३ वर्षे. चित्रपटसृष्टीत येऊन त्याला ९ वर्षे झाली होती. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याने कामाला सुरुवात केली होती. तो मूकपटाचा जमाना होता. सहायक दिग्दर्शकाची कामे करता करता त्याने स्वतंत्रपणे तीन चित्रपट दिग्दर्शित केले आणि १९४० साली ‘औरत’ची निर्मिती झाली.

१९४५ साली मेहबूब खानने स्वत:ची संस्था ‘मेहबूबखान प्रॉडक्शन’ स्थापन केली आणि १९४६ साली ‘अनमोल घडी’सारखा यशस्वी चित्रपट दिला. त्याची ही यशस्वी घोडदौड पुढे सुरूच राहिली. ‘अंदाज’, ‘आन’, ‘अमर’ अशा क्लासिक चित्रपटांच्या कमाईनंतर त्याने आपलं खरं स्वप्न पूर्ण केलं ते ‘मदर इंडिया’सारखा विशाल चित्रपट पडद्यावर आणून.

मदर इंडियाच्या निर्मिती आणि व्यावसायिक यशाचं सर्व श्रेय जात ते मेहबूब खानला. या यशाने पुढे कित्येक कलाकारांना नावलौकिक मिळवून दिला तसेच यश पूर्वीच्या ‘औरत’ला का नाही लाभले?’ ‘औरत’चे मूळ लेखन केले होते बाबूभाई मेहता व वजहत मिर्झा यांनी. सुरेंद्र, कन्हैयालाल, अरुणकुमार अहुजा, याकुब यांच्या भूमिका होत्या. अनिल विश्वा स यांचं संगीत त्या काळाशी अनुरूप असे होते. या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणेच मदर इंडियातही गाण्यांचे प्रसंग जवळ जवळ सारखेच होते, परंतु मदर इंडिया जसा काळजाला हात घालतो, हेलावून सोडतो, क्रोध निर्माण करतो, थरार उत्पन्न करतो तसे औरतमध्ये घडत नाही. पण, तरीही औरतला कुणी नाकारले नव्हते. त्या काळातील चित्रीकरणाची पद्धत, अभिनयाची ठेवण कालांतराने बालीश, नाटकी वाटत होती. कारण मूकपटांच्या छायेतून नवा सिनेमा हळूहळू बाहेर पडू पाहात होता. रांगता रांगता चालू पाहात होता. बोलण्याची प्रक्रिया सुधारली जात होती. ‘औरत’चा विषय मेहबूब खानला कालबाह्य वाटला नसावा. कारण स्वातंत्र्यानंतर व देशाची फाळणी होऊनही ग्रामीण भागातील शेतकरी व सावकार यांच्यातील वैर, जुलूमशाही काही कमी झाली नव्हती आणि तेव्हा स्त्रियांकडे पाहण्याचा ‘भोगी’ दृष्टिकोनही जसा होता तसाच होता. ६० वर्षांनंतरही त्यात बदल झाला असे म्हणता येणार नाही.

१९४० साली आलेल्या ‘औरत’नंतर १९५३ सालीही ‘औरत’ नामक चित्रपट निर्माण झाला होता. प्रेमनाथ, बीना राय यात नायक-नायिका होते. ‘सॅमसन आणि डिलायला’ या जगद्विख्यात कथेवर हा चित्रपट बेतला होता, तर १९६७ सालीही पद्मिनी, प्राण, फिरोज खान, राजेश खन्ना अभिनित प्रेमकथेचा त्रिकोण दर्शविणारा चित्रपट प्रदर्शित झाला होता; परंतु त्यांचा ‘मदर इंडिया’च्या कथेशी काही संबंध नव्हता. मेहबूब खानने १७ वर्षांनंतर घडविलेल्या चित्रपटाचे नाव ‘औरत’ न ठेवता ‘मदर इंडिया’ ठेवले. कारण १९२७ साली एक अमेरिकन लेखकाने याच नावाचे एक वादग्रस्त पुस्तक लिहून भारतीय स्त्री यांच्या पुराणातील विधानांचा आधार घेऊन, स्त्री प्रतिमेला बदनाम करण्याची उठाठेव केली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी, भारतीय स्त्री जशी सोशिक तशीच कशी धाडसी व कणखर असू शकते याचा प्रत्यय आणून देण्यासाठी त्याने आपल्या औरतच्या पुनरावृत्तीला ‘मदर इंडिया’ असे शीर्षक दिले.

‘मदर इंडिया’तील नर्गिसची भूमिका आजवरच्या हिंदी सिनेमातील कोणत्याही स्त्री भूमिकेपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे यात वादच नाही. त्या भूमिकेला स्त्री स्वभाव, संस्कृती, संस्काराच्या विविध छटा आहेत. अत्यंत अभ्यासू व कुशल अभिनेत्रीच हे आव्हान पेलू शकेल अशी ही राधाची भूमिका होती. राधा सून म्हणून घरी येते. तिचे सासूशी असणारे वर्तन, पत्नी म्हणून पती शामूशी असणारे कौटुंबिक संबंध, ताण तणावातील तिचे सोशिकपण, कोवळ्या मुलांचा सांभाळ करताना होणारी तारांबळ, मातृत्वाची ती रूपे, वैधव्य प्राप्त झाल्यानंतर सावकाराच्या आसुसलेल्या नजरेशी तिने केलेला संघर्ष आणि आपला एक पुत्र अन्यायाचा बदला घेण्यासाठी जेव्हा गैरमार्गाचा अवलंब करतो आहे असं वाटत असताना त्याला रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात गेलेला त्याचा बळी आणि तेही सहन करण्याचे दाखविलेले धारिष्ट्य; राधाची ही भूमिका चौफेर आव्हानातून पडद्यावर साकारताना नर्गिसचं अभिनयशील श्रेष्ठत्व सिद्ध होते. त्यासाठी तिने व राजकुमारने शेती व्यवसायासाठी घेतलेले कष्ट, शेतीच्या प्रत्येक कामाचा केलेला अभ्यास हे सर्व पाहताना ग्रामीण राधा त्या मातीतीलच वाटते, ती कुठेही उणी पडत नाही. भूमिका जगणं असं जे काही म्हणतात ते यात दिसून येते. नव्हे लहानसहान भूमिकाही मेहबूब खानच्या निवडीची व त्याने कलाकारांकडून करून घेतलेल्या कामाची कुवत दाखवून देतात. मग तो छोटा साजिद खान असो व त्याचे मोठे रूप सुनील दत्त असो. सुनील दत्तच्या भूमिकेसाठी आधी दिलीपकुमारची निवड करण्यात आली होती, परंतु आई-मुलाचे हे नाते प्रेक्षक स्वीकारतील का, या शंकेने ती निवड रद्द केली गेली होती.

सुनील दत्त तेव्हा नवखा होता. एक-दोनच चित्रपट तेव्हा त्याचे प्रदर्शित झाले होते. १९५५ साली ‘रेल्वे फ्लॅटफॉर्म’ त्याचा पहिला चित्रपट. तेव्हा तो २५ वर्षांचा होता. नियतीच्या मनात मात्र या दोघांना एकत्र आणण्याचा विचार असावा म्हणून मुक्रीने मेहबूब खानची आणि सुनील दत्तची भेट घडवून आणली व मेहबूबने त्याला बिरजूची आव्हानात्मक भूमिका दिली. नर्गिस तेव्हा नामांकित व लोकप्रिय अभिनेत्री होती. राज कपूरशी असणारे तिचे प्रेमसंबंध तणावपूर्ण निर्णयामुळे संपुष्टात आले होते. त्याचा आघात तिच्या मनावर झाला नसेल असं कसं म्हणता येईल; परंतु नर्गिसने मनाचा मोठेपणा दाखवून सुनील दत्तसारख्या नवख्या कलाकाराला तसे काहीच जाणवू दिले नाही. इतकंच नव्हे तर शेतात आग लागण्याच्या थरारक दृश्यात जेव्हा नर्गिस खरोखरीच ज्वाळांनी वेढली असताना सुनील दत्तने स्वत:च्या जिवाची बाजी लावून, जखमी झाला असतानाही तिचा जीव वाचविण्याचे जे धारिष्ट्य दाखविले होते त्याची परतफेड तिने त्याच्यावर प्रेम करून केली. अनेक महिने त्यामुळे चित्रीकरण थांबले होते. नर्गिसने दिवस-रात्र त्याची सेवा करून त्याला आपलेसे केले. नर्गिस त्याच्या प्रेमात पडली. ते लगेच लग्नाच्या बेडीत अडकणार होते; परंतु त्याचा परिणाम सिनेमाच्या प्रदर्शनावर झाला असता असं मेहबूब खानला वाटलं होतं म्हणून त्याने त्याला परावृत्त केले व काही महिन्यांनंतर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लग्न करावं, अशी सूचना केली.

‘मदर इंडियाच’ संगीत आणि पार्श्वहसंगीत उल्लेखनीय ठरावं असं आहे. नौशादजी व शकील बदायुनी ही जोडी संगीतसृष्टीतील खणखणीत नाणं. ‘गाडीवाले गाडी,’ ‘होली आयी रे,’ ‘नगरी नगरी द्वारे द्वारे,’ ‘पीके घर आज,’ ‘चुंदरीया कटती जाये रे,’ ‘मतवाला जिया डोले पिया,’ ‘घूँघट नही खोलूंगी’, ‘ओ मेरे लाल आओ’, ‘ना मैं भगवान हूँ, ‘दुनिया में हम आये तो,’ ‘दुख भरे दिन’ ग्रामीण बाज आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, लोकसंगीतातील तालातील विविधता यांचा अचूक संगम साधत रचलेली ही गाणी सिनेमाला उठाव देणारी होती आणि आहेत. मदर इंडिया अनेक दृष्टीने अभ्यासावा असा सिनेमा आहे. ऑक्सरसाठी निवड झालेला पहिला भारतीय चित्रपट अभिनेत्री म्हणून नर्गिसला आंतरराष्ट्रीय लौकिक देणारा, राष्ट्रीय सन्मान मिळवून देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट ज्याची जाण नव्या पिढीला नाही. मदर इंडियाची दखल भारतीय सरकारने घ्यायला हवी. निदान ‘मदर इंडिया’ नावाचा सन्मान केला गेला तर देशभक्ती तरी सिद्ध होईल.

रत्नाकर लि. पिळणकर.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..