नवीन लेखन...

‘मूषक’पुराण!

तसे तर उंदीर म्हणजे गणपतीचे वाहन मानले गेले आहे. पण त्यांचा सुळसुळाट झाला कि ते भलतेच त्रासदायक ठरतात. कधी ते शेतकऱ्यांचा शेतीमाल कुरतडऊन टाकतात, तर कधी घरातील मौल्यवान वस्तूची नासधूस करतात. सरकारी कार्यालयातील उंदीर तर भलतेच भारी. पोलिसांनी धाड़ टाकून जप्त केलेला दारू, गांज्याचा साठा पिण्यापासून ते महत्वाच्या फाईली कुरतडन्यापर्यंतच्या करामती त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्या अनेक सुरस कथा आपण सर्वानी ऐकल्या असतील. मात्र या सर्व उंदरांवर मंत्रालयातील उंदीर वरचढ ठरले असून त्यांनी थेट सरकारचा ‘पारदर्शक’ चेहराच कुरतडविल्याचा आरोप सरकारमधीलच एका जेष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे बिळात राहणार ‘उंदीर’ आज थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. 
माजी महसूलमंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यांनी हे ‘मूषकपुराण’ समोर आणले. मंत्रालयात राबविण्यात आलेल्या उंदीर निर्मूलनाच्या महामोहिमेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. २०१६ मध्ये सामान्य प्रशासन विभागाने उंदीर मारण्याची ‘महामोहीम’ हाती घेतली होती. याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले. मोहिमेची सुरवात उंदरांच्या सर्वेक्षणाने झाली. मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर असल्याचा अहवाल सदर कंपनीने दिला आणि अवघ्या आठवडाभरत मोहीम फत्ते केल्याचे दाखविले, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांतून मंत्रालयात उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप आकडेवारीने सादर करत नाथाभाऊंनी आपल्या खास शैलीत सरकारची फिरकी घेतली. त्यांच्या कोपरखळ्यांनी घोटाळ्यासारख्या गंभीर विषयाच्या चर्चेवरही सभागृहात हशा पिकला. नाथाभाऊंच्या तुफान फटकेबाजीत सरकार घायाळ झाले, मात्र दुसऱ्याच दिवशी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत ताबडतोब खुलासा करत ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारले नाहीत, तर उंदीर मारण्यासाठी तेवढ्या संख्येने गोळ्या पुरविल्या असल्याचे स्पष्टीकरण दिले. तर अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी मूषक प्रकरणात चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याची मागणी साईचरणी करून पलटवार केला. अर्थात नाथाभाऊंचे आरोप आणि सरकारचे स्पष्टीकरण यात काही सत्य आहे कि विनाकारण उंदरांना वेठीस धरण्यात येत आहे, याचा उलगडा होण्यासाठी थोडा काळ जाऊ द्यावा लागेल. मात्र या मूषकप्रकारणाने निश्तिच सरकारमधील बेबनाव समोर आणला आहे.
नाथाभाऊ सध्या भाजपावर भलतेच नाराज आहे. पक्ष वाढीसाठी त्यांनी हाडाची काडे केली आणि सत्ता हाती येताच, लगेच त्यांना वनवासी व्हावे लागले, हे नाथाभाऊंचे शल्य आहे. आपल्यापेक्षा इतरांवर अधिक गंभीर आरोप आहेत. पण, त्यांना ‘क्‍लीन चिट’ मिळते आणि आपल्यावर मात्र टांगती तलवार आहे, यामुळे ते खूप अस्वस्थ आहेत. आपले पुनर्वसन होईल, पुन्हा मंत्रिपद मिळेल, म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले, परंतु अपेक्षापूर्ती अजूनही दृष्टीक्षेपात येत नसल्याने नाथाभाऊ संतप्त झाले आहेत. त्यामुळे मूषकपुराण राजकीय रोषातून घडल्याची श्यक्यता नाकारता येत नाही. अर्थात आरोप राजकीय असला म्हणून त्यातील गांभीर्याकडे दुर्लक्ष निश्तिच करता येणार नाही. सरकारमधील एक जेष्ठ नेता अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असेल तर त्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. उंदरांचा ससेमिरा टाळण्यासाठी लोक पिंजर्‍यापासून ते मांजर घरात आणण्यापर्यंत अनेक उपाय करीत असतात. प्रसंगी या उंदरांचा नायनाट करण्यासाठी विषाचा प्रयोगही केला जातो. मात्र उंदीर निर्मूलन काही होत नाही. या प्राश्वभूमीवर एकाद्या संस्थेने अवघ्या आठवडाभरात लाखो उंदीर मारण्याचे दिव्य केलं असेल तर नाथाभाऊ म्हणतात तसं त्या कंपनीचा खरंच सत्कार झाला पाहिजे. आणि असा काही प्रकार झाला नसेल तर नाथभाऊंनी मांडलेली आकडेवारी आली कुठून, याचाही खुलासा जाणून घेण्यास जनता इच्छुक आहे.
स्वच्छ  आणि पारदर्शक प्रशासनाचे ढोल राज्य सरकारकडून सातत्यानेचे वाजविले जातात. मात्र चिक्की, डिग्री, तूरडाळ, जमिनी खरेदी आदी प्रकारणांनी सरकारच्या या प्रतिमेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले. आता एकनाथ खडसे यांनी मूषक प्रकरण उकरून काडून सरकारला शालजोडीतून आहेर दिला आहे. निश्चितच या प्रकारामुळे सरकारची प्रतिमा धोक्यात येतेय. सरकारमधीलच एक जेष्ठ नेता सरकारवर अशे गंभीर आरोप करत असेल तर नुसते त्रोटक सप्ष्टीकरण देऊन हा प्रश्न सुटणार नाही तर त्याचा संबंध खुलासा सरकारला करावा लागणार आहे. नाथाभाऊ नाराज आहेत म्हणून ते आरोप करत आहेत, असा युक्तिवाद कुणी करत असेल तर  “पार्टी विथ डिफरंस”‘ यालाच म्हणतात का?असा प्रश्न जनता विचारल्याशिवाय राहणार नाही.

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 62 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..