नवीन लेखन...

मोहोर वृध्दाश्रम, अलिबाग

अलिबाग पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्लेखिंडीत मुख्य रस्त्यापासून थोडया लांब आणि निसर्गाच्या हिरव्या पंखांमध्ये ’मोहोर‘ नावाचा टुमदार वृध्दाश्रम विसावला आहे. या वृध्दाश्रमाच्या आजूबाजूची शांतता आणि दुरवर पसरलेली हिरवी झाडं मनाला खूप प्रसन्नता देवून जातात. या परिसरात आंबा आणि काजूंची कलम लावली गेली आहेत, तर आजूबाजूला अनेक फुलझाडांची आणि फळझाडांची दाटी आहे. वठलेल्या वृक्षाला जशी पालवी फुटते त्याचप्रकारे मोहोर मध्ये वय झालेल्या आजी-आजोबांच्या जीवनालासुध्दा अशीच पालवी फुटते, आणि त्यांना त्यांच हरवलेलं बालपण आणि दुरावलेले सवंगडी पुन्हा एकदा गवसतात. मोहोर ही या वुध्दांच्या दुसर्‍या बालपणाची सुरुवात आहे, जिथे त्यांना त्यांच्या वयाचे आणि साधारण समान विचार आणि सुख दुःखांच्या संकल्पना असणारे दोस्त मिळतात, त्यांच्याबरोबर सुखदुःखांची देवाण-घेवाण करीत असताना ते स्वतःची दुःख काही क्षणांपुरती का होईना पण विसरतात आयुष्यात आलेलं सुख मिळालेलं दुःख पूर्ण न झालेल्या अपेक्षा आणि स्वप्न तसेच अनेक आठवणींची गोळाबेरीज होते आणि हिरव्या वनराईच्या सानिध्यात तसेच इतर सहकार्‍यांच्या सहवासात त्यांच्या एकाकीपणाचे रंग इथे अलगद पुसले जातात. हा वृध्दाश्रम फार जुना असल्याने इथले काही सदस्य तर ६-७ वर्षे एकत्र राहलेले आहेत आणि साहजिकच त्यांच्यामधील मैत्रीची आणि जिव्हाळयाची मुळे ही फारच खोलवर रूजलेली आहेत. हा वृध्दाश्रम पुर्ण शाकाहारी असून इथे असलेल्या सदस्यांना ३ वेळेचा चहा, २ वेळेचा नाष्टा, आणि जेवण घरच्या घरीच बनवून दिलं जातं, आणि इथे बाहेरून कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ मागवले जात नाहीत, आजी-आजोबांच्या करमणुकीसाठी इथे टी.व्ही. आणि रेडिओची सोय केली गेलेली आहेण् आजी आजोबांची प्रकृती आरोग्यदायी व ठणठणीत राहावी यासाठी येथे स्वच्छतेचं पालन मग ती वैयक्तिक असो वा सार्वजनिक, सारख्याच काटेकोरपणे केलं जातं. कार्लेखिंडीमधील डॉ.म्हात्रे यांनी या सर्व सदस्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली असून दर शनिवारी-रविवारी या आश्रमास भेट देवून ते सर्वांच्या आरोग्याची तपासणी करतात. सकाळी सर्व सदस्यांची पुजा-अर्चा आटोपली की इथे गप्पांचे फड रंगतात, तर कधी कधी भजन, कथाकथन, बौध्दिक चर्चा, सामुहिक गायन, अनुभवकथन यांनी या चर्चेला वेगळाच रंग प्राप्त होतो. आपापसांमधील किस्से आणि विनोद रंगल्यावर या सदस्यांच्या खटयाळपणाला आणि मिश्कीलपणाला जणू उधाणच येतं. तरुणपणी कामाच्या आणि जबाबदार्‍यांच्या नादात राहून गेलेले छंद इथे आल्यावर मात्र पुन्हा नव्या दमाने जोपासले जातात. काही सदस्य     चित्रे काढण्यात आणि रंगवण्यात दंग होतात तर काही सदस्य हस्तकलेचा वापर करुन अनेक सुंदर गृहपयोगी वस्तू घरच्या घरीच बनवतात. संध्याकाळची प्रार्थना पूजा आणि आरती झाली की योगासनांचे आणि प्राणायामाचे विविध प्रकार या वृध्दांचे मन शांत आणि प्रसन्न ठेवतात. काही सदस्य तर इतके हौशी असतात की ते बागकामापासून ते स्वयंपाकापर्यंतए बाजारातून भाजी आणण्यापासून ते भाजी निवडण्यापर्यंत आणि चिरण्यापर्यंत प्रत्येक कामात सहभागी होतातण् या सर्व सदस्यांनी वृध्दाश्रमातील व्यवस्थापकीय संघाला खूप ओढ आणि माया लावली आहे हे खरेच! महिन्यातून किमान एकदा तरी या सर्व आजी-आजोबांची आसपासच्या निसर्गरम्य गावांमध्ये सहल निघते, मग गाण्यांच्या भेंडया, इतर बैठे खेळांच्या स्पर्धा, स्मरणशक्तीचे खेळ रंगतात आणि या सर्वांच्या मनाला ताजंतवानं करुन जातात. प्रत्येक सदस्याचा वाढदिवससुध्दा मोहोरमध्ये लक्षात ठेवून अतिशय थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी त्या सदस्याच्या आवडीची भाजी, किंवा आवडता गोड पदार्थ आश्रमामध्येच बनवण्यात येतो आणि त्यांच्या मुलाला किंवा मुलीला आग्रहाचं निमंत्रण दिलं जातं.

अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, विद्यालयांमधील मुले, राजकीय व्यक्तिमत्वं जसे की प्रभाकर पाटील, दत्ता पाटील, भाऊसाहेब नेने, दत्ता खानविलकर या आश्रमाला भेट देवून जातात, येथील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवतात, त्यांची सुख दुःखे, समस्या ऐकतात, त्यांच्याशी समरस होतात, आणि त्यांना जगायला नवी उमेद आणि आत्मविश्वास देऊन जातात.

या सदस्यांच्या बोलण्यातून कधीच त्यांच्या मुलांबद्दल नाराजी दिसून येत नाही, तर उलट वृध्दाश्रम ही हळूहळू काळाजी गरज बनली आहे हेच त्यांच्या बोलवण्यातून प्रतिबिंबीत होत राहातं.

— अनिकेत जोशी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..