नवीन लेखन...

हृदयरोगाचा अर्वाचीन इतिहास

आधुनिक इतिहासात हृदय-विकार किंवा खरेतर हृदयाशी निगडीत रक्तवाहिन्यांशी सम्बन्धित आजार यावर प्रथम लक्ष वेधण्याचे निवेदनाचे श्रेय विल्यम हेबरडीन यांना जाते. लंडनमध्ये २१ जुलै १७६८ रोजी त्यांनी कॉलेज ऑफ फिजिशियन्स समोर एक निवेदन ठेवले. “सम अकाऊन्ट ऑफ ए डीसऑर्डर ऑफ दी ब्रेस्ट” म्हणजे ‘छातीतील विकाराची कहाणी’. यामध्ये त्यांनी अशा एका विकाराबद्दल कथन केले आहे जो तोपर्यंत अज्ञात होता. हेबरडीननी मांडलेल्या गोष्टी काही अंशी अपूर्ण वाटतात तरी देखील वैद्यकीय इतिहासकारांच्या मते हृदय-रोगाविषयी हेबरडीनने प्रथम कथन केले या विधानाला उपरोक्त निवेदनामुळे पुष्टी मिळते. हेबरडीन यांचा एक सहकारी व मदतनीस एडवर्ड जेन्नर याने एका शवविच्छेदनानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या एका रक्तवाहिनीमध्ये थ्रॉंम्बस आढळून आल्याचे व त्यामुळे त्या रुग्णाचा अंजायना पेक्टोरिसशी संबध प्रस्थापित केला. इतकेच नव्हे तर अंजायना पेक्टोरिस व हृदयाला होणारा अपुरा रक्तपुरवठा याविषयी देखील जेन्नरने हेबरडीन यांना एका पत्रात लिहिले होते.

१७८८ च्या  जुलै महिन्यात  रॉयल सोसायटीसमोर निवेदन करताना चार्ल्स पॅरी यांनी देखील अंजायना पेक्टोरिसचा संबंध हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याशी असतो असे म्हटले होते.

१८९६मध्ये रेने मारी (फ्रान्स) यांनी हृदय-रोगाचे अतिशय सुरेख विवेचन केले. त्याच वर्षी अमेरिकेत जॉर्ज डॉक यांनी एका रुग्णाच्या बाबतीत मायोकार्डीयल इन्फार्कक्षनचे निदान  केले होते. शवविच्छेदन केल्यावर ते निदान बरोबर ठरल्याचे आढळले.

अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये जॉन हंटर या विद्वान डॉक्टरांनी (फिजिशियन) पाश्चात्य वैद्यकात प्रथमच ‘छातीतील दुखणे’ ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘अंजायना पेक्टोरिस’ असे म्हटले जाते, या लक्षणाचे व आकस्मिक मृत्यू यांची सांगड घालणारे प्रभावी विवेचन केले असे मानले जाते. त्यांना स्वतःला या लक्षणाने ग्रासले होते व त्याबद्दल लिहिताना त्यांनी असे म्हटले आहे की “माझे आयुष्य एका राक्षसाच्या हातात असून तो मला छळत असतो.” सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या समिती समोर बोलत असताना ते अचानक कोसळले. जणूकाही नियतीने मृत्यू-पश्चात अशारीतीने त्यांचे संशोधन सिद्ध करून दिले.

आज हृदय-रोगाशी संबधीत ‘अंजायना’ हा शब्द प्रचलित झाला आहे. पण यावर डॉ विल्यम ऑस्लर (१८४९-१९१९) यांनी प्रथम काम केले. अथक संशोधन करून त्यांनी असे दाखवून दिले की अंजायना हा विकार नसून ते लक्षण आहे. त्यानंतर अमेरिकन हृदयरोगतज्ञ डॉ जेम्स बी. हेरिक यांनी अरुंद रक्तवाहिन्या व हृदय-रोग यांचे एकमेकांशी असलेले नाते प्रस्थापित करून दाखविले. त्यांनी असे सिद्ध केले की हळूहळू अरुंद होत जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमुळे अंजायनाचा त्रास उद्भवू शकतो. आकस्मिक मृत्यूच्या कारणांचा वैद्यकीयदृष्टीने शोध घेण्याचे प्रयत्न चालू होते. छातीत दुखणे, डावा हात दुखणे, श्वास कोंडल्यासारखे- गुदमरल्यासारखे वाटणे व  त्याच्याशी असलेला अंजायनाच्या  त्रासाचा संबंध व त्यातून ओढवू शकणारा आकस्मिक मृत्यू या सगळ्याचा कार्यकारणभाव वैद्यकीयदृष्टीने प्रस्थापित करण्यात वैद्यकीय संशोधकांना यश प्राप्त झाले. व ‘हार्ट-अॅटॅक’ चा जन्म झाला असे म्हणावे लागेल. सामान्यतः आपण जेव्हा  ‘हार्ट-अॅटॅक’ असे म्हणतो त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘मायोकार्डीअल इनफार्कक्षन’ असे म्हणतात. ‘हार्ट-अॅटॅक’ या शब्दाचे जनकत्व डॉ जेम्स बी. हेरिक यांच्याकडे जाते. त्यांनी ‘जामा’ या वैद्यकीय नियतकालिकात या विषयावर (अरुंद होणाऱ्या रक्तवाहिन्या व हृदय-रोग) एक विस्तृत लेखही लिहिला होता पण दुर्देवाने तेव्हा तो बराचसा उपेक्षित राहिला.

१९४८मध्ये हृदय-रोगावर संशोधन करण्यासाठी नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटने (सध्याची  नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूट) “फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी” ला सुरुवात केली. हृदय-रोगाविषयी जाणून घेण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाउल होते. १९४९ला इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीझेस मध्ये  आर्टरीओस्क्लेरॉसीस किंवा अथेरोसक्लेरॉसीसचा समावेश करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणजे हृदय-रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत एकदम वाढ झालेली पहावयास मिळाली.

बदलत्या जीवनशैलीमुळे यातील बरेचसे विकार डोके वर काढतात असे दिसून येते. वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकरण यामुळे आहाराच्या पद्धतीत बदल झाले, अंगमेहनतीची कामे बाजूस जाऊन बैठ्या जीवनशैलीचा शिरकाव झाला. त्यामुळे हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह यांसारखे रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागले हे खरेच आहे. असे विकार अयोग्य  आहार-पद्धतीशी (अधीक उष्मांक- कॅलरी- असलेल्या अन्नपदार्थांचे अतिरिक्त सेवन, अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान) व बैठ्या जीवनशैलीशी निगडीत आहेत ही वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झालेलीच बाब आहे. किती खावे आणि किती व काय प्यावे किंवा खरेतर काय काय खाऊ / पिऊ नये याचीच मोठी यादी हृदय-रोगाच्या संदर्भात सतत कानावर येत असते.

सध्या जवळ जवळ सर्वांना ज्याची माहिती झाली आहे ते म्हणजे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी व त्याचा हृदय-रोगाशी असलेला जवळचा संबंध! कोलेस्टेरॉलचे चांगला व वाईट असे दोन प्रकार असतात. वाईट कोलेस्टेरॉल हृदय-रोगाला निमंत्रण देते असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. १९५०मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया  विद्यापीठातील डॉ जॉन गॉफमन यांनी प्रथम यावर संशोधन केले. त्यांनी असे दाखवून दिले की ज्यांना अथेरोस्क्लेरॉसीस आहे अशा व्यक्तींच्या रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढलेली असते तर चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते.  डॉ जॉन गॉफमन कॅलिफोर्निया येथील बर्कले  विद्यापीठात जैवतंत्रज्ञानाचे प्रध्यापक होते. मेदाच्या रेणूंचे कोलेस्टेरॉलसहित रक्तामध्ये होणारे वहन यावर त्यांनी पथदर्शी संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांना या विषयाचे  (क्लिनिकल लिपीडॉलॉजी) जनक मानले जाते. (अमेरिकेत सध्या नव्याने करण्यात आलेल्या संशोधनानुसार ‘कोलेस्टेरॉल’ हा हृदयरोगाला निमंत्रण देणारा एकमेव खलनायक नाही तर ते एक कारण आहे.)

१९५०च्या दशकात आणखी एका अमेरिकन वैद्यकीय -संशोधक शास्त्रज्ञाने अॅन्सेल केज यांनी  आहारावर अधिक काम केले. संशोधनानिमित्ताने प्रवास करीत असताना त्यांना असे आढळून आले की काही काही भूमध्य सागरी प्रदेशातील लोकांच्यामध्ये हृदय-रोगाचे प्रमाण अत्यल्प आहे. अधिक संशोधन केल्यावर असे दिसून आले की त्यांच्या रोजच्या आहारातील पदार्थात मेदयुक्त पदार्थांचे प्रमाण खूप कमी आहे. त्यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की अधिक मेदयुक्त आहार व हृदय-रोगाचा निकटचा संबंध आहे. फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडीचे निष्कर्ष तसेच अॅन्सेल केज यांनी केलेले संशोधन व त्यांच्याशी निगडीत इतरही बऱ्याच गोष्टींचा एकत्रित परिणाम होवून हृदय-रोगाला दूर ठेवू शकेल असा कमी मेदयुक्त, कमी उष्मांक असलेला आहार घ्यावा हा विचार पुढे आला व रुजला.

— डॉ. हेमंत  पाठारे, डॉ अनुराधा मालशे 

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..