माझी माणसं – बंडू दादा

तो कोणाचा कोण होता माहित नाही पण माझा मात्र बंडूदादाच  होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते . तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल .  पण वय  कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही . मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि,  तो मोठा म्हणून अंतर ठेवले नाही . तो एक ‘ब्राह्मणाचे अनाथ पोर ‘ हि माहिती नन्तर मिळाली पण ती  गौण होती आणि गौणच राहिली . आमच्या घरातहि  त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही .

कपाळभर अस्ताव्यस्त केस , दाट काळ्याभोर भुवया , त्यातून त्याला पाहायची सवय होती . त्याचे डोळे तपकिरी रंगाचे ,कायम काहीतरी शोधात असणारे ! मला तो रंग खूप आवडायचा .
त्याला सिनेमाचे भयंकर वेड होते . चार दोन महिन्याला एखादा सिनेमा पहायला अण्णा (आमचे वडील ) त्याला पैसे द्यायचे !मला मात्र परवानगी नव्हती . मला आई अण्णा सोबत जावे लागायचे .  तो सिनेमा पाहून आला कि ‘ मी तुला स्टोरी सांगतो ‘ म्हणायचा . त्याची स्टोरी सांगणे म्हणजे एक सोहळाच असायचा ! तो कसाही सांगो ,पण त्या काळी माझ्या डोळ्या पुढे सिनेमा उभा राहायचा !
” बंडूदादा ,हिरो कोण होता रे ?”माझी उत्सुकता मला धीर धरू द्यायची नाही .
“हिरो ना ? महिपाल ! एकदम देखणा ! उंच ! गोरापान ! कुरळे केस ! तलवारकट मिशी ! खरं सांगतो सुरश्या , माझे केस कुरळे असते ना तर मी पण तसाच दिसलो असतो ! तुझे थोडे थोडे कुरळे केस आहेत ,तू पण मोठेपणी त्याच्या सारखाच दिसशील बघ ! ” मी मग उगाच अखडायचो !
“मग काय झालं ? हिरोन काय केलं ?”
”  हा ,तर हिरो घोड्यावर , खदडक , खदडक  ,खदडक,  खदडक . घोडा पळतोय ,पळतोय ,कमरेला तलवार लटकतीय –”
“घोड्याच्या ?”
“नाय रे हिरोच्या !”
“मग ?”
“मग ,एकदम घोडा स्टॉप ! घोडा गप्पकन थांबतो ! मागच्या दोन्ही पायावर खडा ,पुढचे दोन्ही पाय छाती जवळ  !”
“हिरोच्या ? ”
“नाय रे घोड्याच्या !”
“मग ?”मी मोठाले डोळे करून विचारायचो .
“हिरो घोड्यावरून खाली पडतो ! पण पट्कन उठून तलवार हातात घेऊन उभा रहातो तर काय ?”
“काय ?”
“तर समोर काळाढुस ,मोठाल्या मिशाचा आडदांड राक्षस ! हा हा हा करून हसत कमरेवर हात देऊन उभा असतो !”
“मग ?”
“तुला सांगतो सुरश्या, त्या अक्राळ विक्राळ राक्षसा पुढे आपला हिरो काडी पहिलवानच दिसतो !. पण हिरो तो हिरोच असतोना ?”
” पण पुढे काय ते सांग ना रे !”
” तर हिरो कमरेची तलवार हातात घेतो अन त्या राक्षसाला म्हणतो . भाड्या ये ! तुला चांगलाच इंगा दाखवतो !”
“तो राक्षसाला ‘भाड्या ‘ म्हणतो ?”
” अरे सिनेमात नाही दाखवलं पण मनात तर म्हणतच असेल ना !?”अशी त्याची स्टोरी प्रत्यक्ष सिनेमा पेक्षा ज्यास्त वेळ चालायची !
००००

आपल्याला सगळंच येत अशी समजूत असणारी एक जमात असते . आमचा बंडूदादा त्यातलाच ! एक दिवस टेबलवरील आलारामचे घड्याळ बंद पडले . रोज त्याला किल्ली द्यायचे काम बंडूदादाचेच . बहुदा किल्ली देताना त्या दिवशी जरा ज्यास्त जोर लागला असावा .
“बंडू ,ते घड्याळ समोरच्या घड्याळवाल्या कडे दे . थोडे ऑइलिंग केले कि चालू होईल . मी ऑफिस मधून येताना घेऊन येईन . “अण्णांनी ऑफिसला जाताना सांगितले .
” नको अण्णा, कशाला पैसे वाया घालवता ! मी पहातो उघडून ! जमेल मला !अन नाही जमलं तर देतो घड्याळवाल्या कडे ”
“बंडोबा तुम्ही नका उचापती करू !” अण्णांनी  बजावलं. तेव्हा ‘घड्याळ ‘ मोलाची वस्तू होती . पण अण्णाची पाठ वळली कि बंडूदादाची घड्याळ दुरुस्तीची तयारी सुरु झाली . सर्व प्रथम रेडिओ खालचे टेबल मोकळं करण्यात आलं . त्यावरील सगळा पसारा -म्हणजे रेडिओ , पानाचा डब्बा , कंदील , दौत -टाक , अण्णांच्या ऑफिसच्या फाईली घरभर पसरून ठेवण्यात आल्या  !. असल्या कामात मी त्याचा असिस्टंट असे !
” हा ,सुरश्या धर टेबल !”दोघांनी मिळून ते जड शीळ टेबल बैठकीच्या खोलीतील खिडकी खाली ठेवलं . कारण तेथे भक्क उजेड येतो ! मग त्यावर अण्णांचे पांढरे धोतर टाकले , कारण घड्याळाचा लहानसा स्क्रू सुद्धा दिसावा ! स्वयंपाक घरातून कडची ,चमचे (स्क्रू ड्रायवरला पारियाय !), पान कुटायचा बत्ता (हातोडी म्हणून )सर्व हत्यारे आली आणि त्या ‘बिमार ‘ घड्याळाचे ऑपरेशन सुरु झाले ! फ्रेम ,त्याखालची काच ,आणि काटे चटकन निघाली . पण आकड्याची चकती निघेना ! दोन्ही पायात घड्याळ धरून बंडूदादाने जोर लावून उचकली तशी भस्सकन एक मजबूत स्प्रिंग त्याच्या नाकासमोर नागासारखी डोलू लागली ! बंडूदादांनी अलगद ते घड्याळ पुन्हा टेबलवर ठेवले .
” सुरश्या या स्प्रिंगला काय म्हणतात माहितंय ?”
” काय ?”मी उत्सुकतेने  हे ‘ऑपरेशन ‘ टेबलवर दोन्ही हातात गोबरे गाल टेकून पहात होतो . त्याला असे काही करताना पाहून तेव्हा वाटायचे काय हुशारआहे बंडूदादा ! आपण पण थोडे मोठ  झालो कि असेच हुशार व्हायचे !
” याला ‘बालकमान ‘ म्हणतात !”
“म्हंजे ?”
“अरे मी रोज किल्ली देतो तेव्हा हि घट्ट गुंडाळली जाते . मग हळू हळू उलगडत जाते ,त्यावेळी याला लावलेली छोटी छोटी चाके फिरतात अन मग घड्याळाची काटे पण फिरतात !कळलं का ?”
“नाय !”
“जाऊ दे ! अजून तू लहान आहेस ! थोडा मोठा झालास कि मी तुला शिकवीन घड्याळ दुरुस्ती ! सोप्पी असती रे ! पण ती चाके कुठायत ?”
“बंडूदादा , ते बग  टेबल खाली कायत पडलाय !”
टेबल खाली घड्याळ्याच्या पोटातले बरेचसे अवयव पडले होते ! ते बसवायचा बंडूदादा जो जो  प्रयत्न करायचा तो तो अजून काहीतरी वेगळं व्हायचं !
” सुरश्या , जा बर चटकन एखादी पिशवी आण ! ”
आता कळतंय तेव्हा बंडूदादांनी ‘ऑपरेशन ‘ सोबत घड्याळाचे  ‘पोस्ट मॉर्टम ‘ पण उरकले होते ! घड्याळाच्या मृत्यूचे कारण मात्र समजले नव्हते !’ डेथ सर्टिफिकेट ‘ साठी घड्याळजी कडे , सर्व अवयव पिशवीत घालून बंडूदादा रवाना झाला ! सोबत मी पण होतो .
” बंडोबा ! तुम्ही काय केलेत हे मला दिसतंय ! पण कसे केलेत हो ? इतकी वर्ष मी घड्याळाच्या अंनत अवस्था पाहिल्या पण अशी अवस्था रेल्वे खाली सापडलेल्या घड्याळाची पण होत नाही !” अश्या प्रकारचे प्रशास्तिपत्रक घड्याळजीनी दिले !आणि रात्री अण्णांनी श्राद्ध घातले ! पण दुसऱ्या दिवशीपासून अण्णांनी बंडूदादाला त्या घड्याळजी कडे घड्याळ दुरुस्तीची शिकवणी लावली . तेव्हा पासून तो शिस्तबद्धरित्या घड्याळे बिघडवू लागला ! मग त्या घडयाजीने दुकानच बंद करून टाकले ,आणि बूटपॉलिशचे दुकान चालू केल्याचे ऐकिवात आले !
०००००
मुले मोठी झाली तसा आईला दुपारचा वेळ मोकळा मिळू लागला .म्हणून अण्णांनी तिला एक शिलाई मशीन घेऊन दिली होती . पण आई पेक्षा बंडूदादाच ती  ज्यास्त चालवायचा . चड्डीच्या नाड्याच शिव , पिशवीच शिव असले काहीतरी त्याचे त्यावर उद्योग चालायचे . एकदा त्याने मला जुन्या चादरीच्या शर्ट शिवला होता ! मी तो घालून आईसमोर उभाराहीलो !
“आई बग्ग् ,मी कसा दिसतोय ? बंडूदादान शिवलाय !”
” सुऱ्या ,निव्वळ झोळीत माकड अडकवल्या सारखा दिसतोस !” ती खूप वेळ हसत होती .
आई दुपारी कल्याण केंद्रात ‘शिवण क्लास ‘ला जायची . तेथे पेपर कटिंगवर चड्डी , ब्लाउज , परकर असले प्रकार शिकवत . आई जमेल तसे डिझाईन उतरून आणि . आई डावखोरी होती . तिला कात्रीने कागद कातरणे  जमायचे नाही . बंडूदादा ते काम हौसेने करायचा . एकदा प्रत्यक्ष ब्लाउज शिवून पहाण्याचे  ठरले . हा कारभार आई ,मी आणि बंडूदादा गुपचिप करून अण्णांना आश्चर्यचकित करणार होतो ! सुरवातीस कागदावर कटिंग केले . ते मस्त जमले.  मग ब्लाउज पीस कापले तेही मस्त झाले . अर्थात कात्री बंडूदादाच्या हाती होती !पण  व्हायचा तो घोळ झालाच ! त्याचे काय झाले कि कटिंग करताना आम्ही पलंगावर बसलो होतो . त्यावर गादी होती ,गादीवर चादर होती ! ब्लाउजच्या कपड्या बरोबर चादर आणि गादीचा कपडा पण बंडूदादाच्या कात्रीतून सुटला नाही ! त्या दिवशी आम्हा सर्वाना अण्णा कडून ‘सरप्राईस ‘मिळाले ! लाखोली म्हणजे काय हे ज्ञान आम्हास मिळाले !
०००००००
आमच्या गावाबाहेर एक नदी होती . दर पावसाळ्यात तिला पूर यायचा . पाण्याला चिक्कार ओढ असायची . नदीला सुंदर लांबसडक घाट होता . घाटावर एक पिंपळाचे झाड होते . पावसाळ्यात मी अन बंडूदादा नदीवर पूर पहायला नेहमी जायचो . मुख्य उद्देश असायचा पिंपळाच्या पानाच्या पिपाण्या करून वाजवणे ! तसेच मोडफुटलेल्या चिंचोक्यांना बाभळीचा काटा टोचून भिंगोऱ्या करून फिरवणे . पिपाण्या अन भिंगोऱ्या बंडूदादाच करायचा मी फक्त वाजवायचो अन फिरवायचो ! बंडूदादाने एक नुकतेच उगवलेले आंब्याचे झाड उपटले आणि त्याच्या कोईवरले टरफल काढून टाकले . आतले गरे दगडावर तिरपे घासून त्याची पुंगी मला करून दिली . ती मी वाजवण्यात गुंग होतो . त्यावेळीस मी दहा बारा वर्षाचा असेंन आणि तो अठरा एकोणीसचा . काय झाले कोणास ठाऊक ,एकदम तो उठला .
“चल सुरश्या !”
” कुठं ?”
“तू चल तर खरं !”
आम्ही महादेवाच्या देवळात आलो . तेथे देवळाच्या गुरवांची अंजली होती . ती माझ्याच वर्गातली .
“सुरश्या , हि तुझी वैनी !कशी आहे ? “दुरूनच तिच्याकडे बोट दाखवत त्याने मला विचारले .
“वैनी ?”
” हा , मी हिच्याशीच लग्न करणार आहे ! ”
“खरं सांगू ?”
“सांग !”
” गोरी आहे ! पण तू हिच्याशी लग्न करू नकोस !”
” का ? ”
“ती नकटी आहे ! अन तीच गणित कच्च आहे ! ती  नापास होते  गणितात !”
” हू ,त्याला काय होत ! ”
“पण तू ना , त्या पेक्षा कॅलेंडर वरल्या बाईशी लग्न कर ! मला तशी वहिनी पाहिजे !”
तो फक्त हसला .
०००००

” अण्णा ,आम्ही दोघे अंजलीशी लग्न करणार आहोत !” मी निरागस पणे अण्णांना सांगितले . बंडूदादा मला म्हणाला होता ‘सुरश्या ,तूच विचार अण्णांना मला त्यांची भीती वाटते !’
“आम्ही ?”
” आम्ही म्हणजे बंडूदादा हो !”
” अन हि अंजली कोण ?”
” अहो ती माझ्या वर्गात आहे ! घाटावरच्या महादेवाच्या मंदिराच्या गुरवांची पोरगी !”
“आणि तिच्याशी लग्न कोण बंडोबा करणार ?”
” हो ,मी लग्नाला हजर राहणार आहे !तुम्ही पण यायचे असेल तर येऊ शकता !”मी तडफदार उत्तर दिले
त्याकाळी प्रेमविवाह म्हणजे ‘महापातक ‘ आणि ‘आंतरजातीय विवाह म्हणजे तर ‘ब्रह्महत्याच ‘!
” बंडोबा , चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि निघालात लग्न करायला ! बायकोला काय खाऊ घालणार ? कोठे ठेवणार ?आणि बिरादरीला काय सांगणार ? जातीतल्या पोरी काय मेल्यात , परजातीची करायला ?”आमचे अण्णांना रागावले कि खूप शांत पणे आणि आदरार्थी साम्भोधून बोलतात !
” अण्णा मला माहित आहे तुम्हाला नाही आवडणार !पण माझे अंजलीवर प्रेम आहे !” त्यादिवशी बंडूदादा अण्णाच्या डोळ्यात डोळे घालून बोलला !, पहिल्यांदा आणि शेवटचे ! अण्णांना काय वाटले कोणास ठाऊक .
” बंडोबा , दोघांची पोट भराय इतकं कमवायला लागा !मी बिरादरी विरुद्ध उभाराहून तुमचं लग्न लावून देईन !”
बंडूदादाच्या डोळ्यात त्यादिवशी मी पाणी पहिले !
बंडूदादाला धीर निघाला नाही . तो तडक अंजलीच्या घरी गेला आणि ‘मी अंजलीशी लग्न करणार ‘म्हणून सांगून टाकले ! सुंदर पोरीचा गरीब बाप ,आंतरजातीय मामला . पुढे काय वाढून ठेवलंय याचा त्याला अंदाज आला ! चार दिवसात अंजली आणि तिचा बाप गाव सोडून निघून गेले !
०००००
अंजली गेली आणि अवखळ बंडूदादा शांत झाला . तो फारसा बोलायचा नाही . उदास दिसायचा . यथावकाश त्याला बँकेत नौकरी लागली ! अण्णांना खूप आनंद झाला . त्यांनी पेढे वाटले .
“आता सून आणायला आम्ही मोकळे बर का ,बंडोबा !”अण्णा गमतीनं म्हणाले .

मी आणि बंडूदादा नदीच्या घाटावर बसलो होतो . समोर दुथड्या वहात्या नदी कडे बंडूदादा एक टक पहात होता .
“सुरश्या आता नौकरी लागलीय ! अंजली कुठे असेल कोणास ठाऊक ? तिचा शोध घ्यावा लागेल . !”
” बंडूदादा, एक सुचवु का ? नदी पलीकडे टाकवाडीत अंजलीचा मामा राहतो ! त्याच्या कडे तिच्या पत्ता असेल ! आपण उद्या जाऊन येऊ .”
“उद्या ! नको !”
तो काय करतोय हे कळायच्या आत झरझर घाट उतरून त्याने धो धो वाहत्या  नदीत उडी मारली !
“बंडूदादा sss ” मी ओरडलो . पण उशीर झाला होता !
घाटावर गाव गोळा झाले होते . बंडूदादा कधीच परतला नाही !
मी अण्णांना फक्त त्या दिवशी रडताना पहिले होते !

— सुरेश कुलकर्णी

—आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . Bye पुन्हा भेटूच About सुरेश कुलकर्णी 62 लेख
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…