नवीन लेखन...

साहित्य संमेलनासंदर्भात साहित्यिक संजय सोनवणी यांची भूमिका

 

मी सासवड येथे भरणार असलेल्या ८७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा आहे हे आपणास विदित असेलच. त्यामागील भूमिका आपणाप्रत पोहोचवावी या हेतुने हे पत्र आपणास लिहित आहे.

माझे आजवर ऐंशीपेक्षा अधिक ग्रंथ प्रसिद्ध झाले असून असून त्यात ऐतिहासिक, सामाजिक, थरार, विज्ञान, तत्वज्ञान व किशोर कादंब-यांचा व इतिहास, नीतिशास्त्र, विश्वनिर्मिती शास्त्र, समाजशास्त्र या विषयांवरील संशोधनात्मक ग्रंथांचाही समावेश आहे. त्याखेरीज माझे अनेक काव्यसंग्रह, नाटके प्रसिद्ध तर आहेतच पण शेती, शिक्षण, अर्थकारण अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील शेकडो लेख किर्लोस्कर, किस्त्रीम, लोकमत, पुढारी, पूण्यनगरी, कलमनामा ते लोकप्रभासारख्या प्रतिष्टित नियतकालिके व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत. माझ्या अनेक कादंब-या, नाटके व कवितासंग्रह इंग्रजीतही प्रसिद्ध असून त्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. थोडक्यात मी मानवी जीवनाला स्पर्श करणा-या सर्वच विषयांना आजवर कवेत घेण्याचा प्रयत्न करत आलो आहे. मी अभिव्यक्तीसाठी आधुनिकतेशी नाळ जोडत ब्लोगही नियमित लिहित असून गेल्या दोन वर्षांत तीन लाखांहून अधिक वाचकांनी तो वाचला आहे. मराठीतील हा सर्वाधिक लोकप्रिय ब्लोगपैकी हा एक ब्लोग मानला जातो. स्वत: लेखकाची भूमिका पार पाडतांना वेळोवेळी नवोदित लेखकांना पुढे आणण्यासाठी मी प्रकाशकाची भूमिकाही गेली २४ वर्ष पार पाडत आलो आहे.

या माझ्या आजवरच्या ३७ वर्षांच्या साहित्यिक-कवि व संशोधक म्हणुन केलेल्या प्रवासाच्या व २४ वर्षांच्या प्रकाशक म्हणून कार्यरत असल्याच्या पार्श्वभुमीवर येत्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणुन उभा आहे. या निवडणुकीमागील माझी भुमिका थोडक्यात खालीलप्रमाणे आहे…

१. जागतिकीकरणामुळे मराठी भाषकांचेही सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ वेगाने बदलत आहेत. मराठी साहित्य या दूरगामी बदलांना कवेत घेत त्याचे आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी सज्ज राहिले तरच सध्याची सांस्कृतीक गोंधळाची अवस्था दूर होईल. त्यासाठी प्रस्थापित व नवसाहित्यिकांना प्रेरित करणे व नवप्रतिभांचा शोध घेत त्यांना योग्य ते अवकाश उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच वाचक वाढवणे, नवशिक्षितांना मोठ्या प्रमाणात ग्रंथवाचनाकडे वळवणे आवश्यक आहे. बाल-किशोर-रहस्य-थरार आदि वाचकप्रिय प्रकार हाताळणा-या साहित्यिकांना व या साहित्यप्रकारांनाही जर प्रतिष्ठा मिळाली तर आपल्याकडे स्वतंत्र असे विपूल जनप्रिय साहित्य लिहिले जावू शकते. त्यामुळे वयाच्या सर्व टप्प्यांवर वाचनासक्ति वाढेल व वाचक पुढे अधिक आशयघन वाचनाकडे वळतील.

२. आज वाढत्या शिक्षणप्रसारामुळे सर्वच समाजघटकांत जागृतीचे वारे वाहू लागले आहे. त्याची दखल अखिल भारतीय साहित्य संमेलनांनी न घेतल्याने आज जवळपास सर्वच जातींची स्वतंत्र साहित्यसंमेलने भरत आहेत. यामुळे सामाजिक व सांस्कृतिक एकोप्याची भावना निर्माण न होता त्याची परिणति दुरावा वाढण्यात झाली आहे. शक्य तेवढ्या समाजांतील साहित्य-सांस्कृतिक उद्गारांची दखल घेणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणने आज आवश्यक बनले असून त्याखेरीज महाराष्ट्रातील सांस्कृतिक कलहाचे वातावरण बदलणार नाही. सर्वच मराठी भाषकांत साहित्यसौहार्दतेचे वातावरण बनवण्यासाठी मी लेखक व एक प्रकाशक म्हणुनही प्रयत्न करत आलो आहे व या संमेलनाच्या माध्यमातून ते अधिक व्यापक बनवता येतील.

३. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पण जनमताचा रेटाही ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आवश्यक आहे. मराठी भाषा ही पुरातन, स्वतंत्र आहे आणि ज्ञानभाषा बनण्याची पुरेपूर क्षमता तिच्या ठायी आहे हे सर्व ऐतिहासिक पुराव्यांवरून सिद्ध झालेले असून अभिजाततेची मान्यता मिळवण्यासाठी तमिळ-मल्याळम भाषकांप्रमाणेच मराठी जनांदोलनाचीही गरज आहे. या भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला तर भाषा संवर्धन, जपणूक होईल आणि जागतिक पातळीवर मराठीचे अध्ययन सुरू होईल. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे यासाठी जन-आंदोलन उभे करणे मला महत्वाचे वाटते. साहित्य संमेलन हे त्यासाठी सर्वात मोठे व्यासपीठ ठरेल याबाबत माझ्या मनात शंका नाही.

४. न्यायालयिन व प्रशासकीय कामकाज मराठीतून चालावे अशी आपली मागणी असते…परंतू प्रशासकीय मराठी ही अनाकलनीय व क्लिष्ट असल्याने ती इंग्रजीची मदत घेतल्याखेरीज समजत नाही हे आपले दुर्दैव आहे. सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीचा वापर वाढला व क्लीष्ट प्रतिशब्दांचा हव्यास धरण्याऐवजी सोपे शब्द वापरले तर खर्‍या अर्थाने मराठी प्रशासकीय राजभाषा म्हणुनही लोकप्रिय होईल. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

५. मी गेली अनेक वर्ष आंतरजालीय समाजमाध्यमांत कार्यरत असल्यामुळे सर्व समाजघटकांतील आजच्या तरुणाईच्या प्रखर पण विखुरलेल्या भावनांशी, आशा-आकांक्षा व स्वप्नांशी निकटपणे परिचित आहे. साहित्यसंस्कृतीच्या विकसनाचा मुलाधार म्हणजे तरुण वाचक आणि तोच मात्र आपले प्रतिबिंब कोठे सापडत नसल्याने अस्वस्थ व गोंधळलेला आहे. अनेक साहित्य संमेलने साहित्यबाह्य कारणांनीच गाजत असल्याने हा वर्ग संमेलनांपासून फटकून राहु लागला आहे. तरुणाईला साहित्य-संस्कृतीत व्यापक स्थान देण्याची व त्यांच्या संवेदनांना स्पर्श करत जवळीक साधण्याची आवश्यकता आहे. समाज-सांस्कृतिक प्रश्न जोवर व्यापकपणे सकारात्मक चर्चेत येत नाहीत तोवर हे चित्र बदलणार नाही. या बदलासाठी मी प्रयत्नरत आहे व राहणार आहे.

६. परराज्यांतून मराठी साहित्यिकांना आजवर अनेक पुरस्कार दिले जात आहेत. महाराष्ट्राकडुन मात्र अन्य भाषक साहित्यिकांना पुरस्कार दिला जात नाही अशी विंदांची खंत होती. ती दूर करण्यासाठी १९९७-९८ साली व्यक्तिगत पातळीवर मी स्वत: “संत ज्ञानेश्वर पुरस्कार” सुरू करण्याचे प्रयत्नही केले होते. विंदांनी माझ्या प्रयत्नांचे स्वागतही केले होते, पण अनेक कारणांनी मला ते स्वप्न पूर्ण करता आले नाही. पुढे शासनानेही संत ज्ञानेश्वरांच्याच नांवाने परभाषक साहित्यिकास पुरस्कार देण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात तेही घडले नाही. महाराष्ट्रातून अ.भा. साहित्य महामंडळ व शासनाने संयुक्तपणे संत ज्ञानेश्वर साहित्य पुरस्कार द्यावा यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे व ते कार्य मी नक्कीच पार पाडेल.

७. राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्याने डा. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाले नेमलेल्या समितीने अनेक शिफारशी केल्या असून तो अहवाल सरकारने स्वीकारला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने विशेष प्रयत्न झालेले नाहीत. या समितीच्या अनेक शिफारशी साहित्य-संस्कृतीला बळ पुरविणा-या असून सर्वसमावेशक आहेत. या सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी गतिमान होण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.

८. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी मनाचा खरा उद्गार बनायला हवे. ते साहित्य-संस्कृतीच्या मुलगामी चिंतनाचे, दिशादर्शक आणि जाणीवा प्रगल्भ करणारे आशयघन उद्गार बनावे ही माझी भावना आहे.

वरील आणि तदनुषंगिक साहित्य-संस्कृतीशी निगडित प्रश्न व्यापक चर्चेत घेण्यासाठी मी या निवडणुकीत सहभाग घेतला आहे. जवळपास बारा कोटी मराठी भाषकांचे आपण प्रतिनिधी म्हणून मतदान करणार आहात. आगामी साहित्य संमेलन मायमराठीचा उद्घोष अभिजाततेचा दर्जा मिळण्याइतपत उठविण्यासाठी आपण मला प्रथम पसंतीचे मत द्यावे ही विनम्र विनंती. सोबत माझा थोडक्यात परिचय व प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची यादी आपल्या माहितीसाठी जोडत आहे.

धन्यवाद,
आपला
संजय सोनवणी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..