नवीन लेखन...

मनस्वी यमन

आपल्या भारतीय संगीतात, रागांच्या प्रकृतीनुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्याला “थाट” असे म्हणतात, जसे, “मारवा थाट”,”कल्याण थाट” इत्यादी. त्यानुसार, हा राग “कल्याण” थाटात येतो तसेच गमतीचा भाग म्हणजे. आपले उत्तर भारतीय संगीत आणि दक्षिण भारतीय संगीत, यात बरीच देवाणघेवाण चालू असते. दक्षिणात्य संगीतात, याच रागाशी मिळता जुळता असा “कल्याणी” नावाचा राग ऐकायला मिळतो. अर्थात, स्वर लावणे, आणि सादर करणे, यात बराच फरक पडतो.
राग संगीताची एक गंमत आहे, प्रत्येक रागाचे स्वर ठरलेले असतात पण, तेच स्वर, कसे घ्यायचे, याचा “अंदाज” प्रत्येक कलाकाराचा वेगळा असतो तसेच एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर कसे जायचे, याबाबत वेगवेगळे ठोकताळे असतात. म्हणूनच, प्रत्येक कलाकाराचे सादरीकरण, तोच राग असला तरी वेगळे होते. आपल्याकडे, जेवणात देखील हाच अनुभव असतो आणि त्यानुसार प्रत्येक गृहिणीची भाजी वेगळ्या चवीची होते!! मसाले तेच असतात पण प्रमाण वेगळे. म्हणूनच, रागाचे स्वर म्हणजे ओळख असते आणि ती कशी करून द्यायची, हे कलाकारावर अवलंबून.
आता स्वरावली बघायला गेल्यास, आरोही सप्तकात “पंचम” वर्जित तसेच “मध्यम” तीव्र, तर अवरोहात सगळे स्वर उपलब्ध असतात. “नि रे ग रे सा”, “नि रे ग म ग ” या स्वरावली, यमन रागाची “ठेवण” दर्शवतात.
हाच वेगवेगळा “अंदाज”, सगळ्या संगीतकारांना, यमन रागात गाणी बनविण्यासाठी प्रवृत्त करीत असणार. या रागात, सहज सापडणारे भाव म्हणजे, शृंगार, भक्ती, विरह, प्रणय इत्यादी अगदी मुबलक आढळतात आणि सुगम संगीताच्या दृष्टीने, ही पर्वणी ठरते. त्यातून सुगम संगीतात गाणे बनवायचे म्हणजे, तंतोतंत राग सादर करण्याची अजिबात गरज नसते, एखादी हरकत, एखाद्या स्वरावर स्थिरावण्याची पद्धत, यातून अनेक छटा निर्माण होतात.
कवियत्री इंदिरा संतांच्या “प्रवास” या कवितेतील या ओळींतून, यमन रागाच्या नवीन ओळखीची जाणीव होते.
“मोकळे मोकळे चालतांनाच, पुढचे वळण व्याकूळ करते
पहाडांतून सरकत सरकत, सांवळा मेघ आडवा येतो
क्षणभर वेढून भान येऊन, आला तसाच सरकून जातो.
मनांत अमृत टाकून जातो, पावलांत झुळझुळ गारवा भरतो.”
यमन राग असाच आहे. या रागातून कधीही पराकोटीची वेदना ऐकायला मिळत नाही. किंबहुना आपल्या रागदारी संगीतात, नेहमीच समर्पणाची भावना दृग्गोचर होते आणि त्या भावनेला यमन राग अप्रतिम कोंदण देतो.
किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक, पंडित भीमसेन जोशींची “शाम बजाये आज मुरलिया” ही चीज म्हणजे यमन रागाची व्यवच्छेदक ओळख म्हणता येईल. या बंदिशीच्या सुरवातीला, पंडितजींनी “म ध नि” ही स्वरावली घेतली आहे आणि ती केवळ अपूर्व आहे. गायनाच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, आवाजाचे लगाव, नावास साजेसा असा गरिमा ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. गरिमा म्हणजे ध्वनीचे लहान-मोठेपण. त्याचबरोबर आणखी एक बाब नोंदवायला हवी. केवळ असामान्य गरिमा हेच वैशिष्ट्य म्हणता येणार नसून, तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, ते आपल्या आवाजात दोन्ही रजिस्टर्सचा वापर फार परिणामकारक करतात. त्यामुळे खालच्या स्वरांवर भरीव आणि संपन्न तर वरच्या स्वरांवर चमकदार तसेच उच्च तारतेवर सहज पोहोचणारा आवाज.
त्यांच्या दृतगती तानांत गरिमा कमी असतो पण तरीही त्या परिणामकारक वाटतात. त्याचे प्रमुख कारण हे निमुळते चमकदारपण असते. रागाची बढत नेहमी पायरी पायरीने करत जायची, असे करायचे म्हटल्यावर गायनातील “स्वर” या अंगावर अधिक भर देणे क्रमप्राप्तच होते. अर्थात या ओघात शब्दोच्चार महत्व गौण ठरते. परिणाम असा होतो, शब्द उच्चारण्याला लागणारा श्वास, ते स्वरांच्या भोवती रुंजी घालण्यासाठी वापरतात. त्यामुळे घुमारायुक्त अखंडता राखता येते.
मराठी भावगीतांत अढळ स्थान प्राप्त करणारे – “शुक्रतारा मंदवारा” हे गाणे यमन रागावर आधारित आहे. मंगेश पाडगावकरांची गेयताबद्ध कविता आणि त्याला चाल अर्पिणारे, संगीतकार श्रीनिवास खळे!! गाण्याच्या सुरवातीला सतारीचे जे सूर आणि त्याच्या पार्श्वभागी व्हायोलीन वाद्याचे स्वर, यातून आपल्या समोर यमन राग उभा राहतो. खळे साहेबांच्या सगळ्याच चाली जरा बारकाईने ऐकल्या तर काही वैशिष्ट्ये आपल्याला समजून घेता येतील. बहुतेक गाणी अतिशय संथ लयीत चालत असतात, तसेच शब्दानुगामी चाली असतात. गाण्यात लयीचे वेगवेगळे बंध अनुभवायला मिळतात. गाणी ऐकायला सोपी वाटतात परंतु लयीच्या अंगाने हरकती असल्याने, लायीफ्चे पक्के भान ठेवावे लागते अन्यथा गाताना भरकटले जाण्याची शक्यता अधिक. कविवर्य मंगेश पाडगावकर, खऱ्या अर्थी “भावकवी”आहेत आणि अशा कवितेतच त्यांची त्यांची खरी प्रतिभा आपल्याला दिसून येते.
“शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा,
तू अशी जवळी रहा.”
रचना म्हणून प्रस्तुत गीत हे अतिशय अवघड आहे.
“लाजऱ्या माझ्या फुला रे
गंध हा बिलगे जीवा,
अंतरीच्या स्पंदनाने अन थरारे ही हवा”.
इथे कवितेत “सलज्ज”प्रणयाचा अनोखा संस्कार आहे आणि ती भावना गाताना, ज्या संयत पद्धतीने मांडली आहे, ते खास ऐकण्यासारखे आहे. लय मुखड्यावरून बदलली आहे पण गाताना ती लय नेमकी सांभाळून, शब्दांतील आशय अधिक अंतर्मुख केला आहे. हे फार अवघड आहे पण खळे साहेबांच्या रचनांचे खास वैशिष्ट्य म्हणावयास हवे.
मराठी चित्रपट “कामापुरता मामा” मध्ये “जीवनात ही घडी अशीच राहू दे” हे गाणे यमन राग आनंदाने निथळत असतो, याची ग्वाही देणारे आहे. नुकताच प्रणयाचा स्वीकार  झालेला आहे आणि नव्या जीवनाची स्वप्ने नायिकेच्या मनात असतत. याचा पार्श्वभूमीवर हे गाणे आहे. संगीतकार यशवंत देवांची चाल आहे आणि गीत रचना देखील त्यांचीच आहे. रूढार्थाने यशवंत देव हे कवी नाहीत परंतु त्यांनी प्रसंगोत्पात रचना लिहिल्या आहेत. लिहिताना, आपण “कवी” नसून केवळ काही गाण्यांच्या बाबतीत रचना करीत आहोत,याचे भान नेहमी आढळते. परिणामी शब्दरचना सहज, सोपी आणि गेयता प्रमुख असते.
“जीवनात ही घडी अशीच राहू दे,
प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे.”
त्यांनीच एकेठिकाणी म्हटले आहे, “चाल ही शब्दातच दडलेली असते. संगीतकार फक्त ती चाल शोधून काढतो”. अर्थात देवांनी काही प्रसंगी चालीवर देखील शब्दरचना केल्या आहेत पण तरीही तो केवळ अपवाद मानावा. गाणे अतिशय द्रुत लयीत आहे, पण तरीही शब्दोच्चार (अर्थात लताबाईंचे) आणि त्याची सुरांबरोबर घातलेली सांगड विलक्षण सुंदर आहे. एक गंमत आहे. पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी जो वाद्यमेळ आहे, त्यातील व्हायोलीनचे सूर किंचित “पुरिया धनाश्री” रागाची छटा दाखवतात!! चाल यमन रागावर आणि त्यात पुरिया धनाश्री रागाची छटा!! काय बिघडले? गाण्याच्या चालीत तर कुठेही विक्षेप आलेला नाही. संगीतकार म्हणून यशवंत देवांची ही खुबी खरोखरच अप्रतिम आहे.
मराठी माणसाच्या भावजीवनात माडगुळकरांच्या गीत रामायणाचे स्थान अढळ आहे. आज इतकी वर्षे उलटून गेली तरी या गाण्यांची मोहिनी काही उतरलेली नाही. गेयबद्ध रचना कशी करावी याचा आदीनमुना माडगूळकरांनी पेश केला आहे. अर्थात, अशा कवितांना तितकीच तोलामोलाची सुरांची साथ सधीर फडक्यांनी दिली असल्याने, यातील सगळीच गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. “”दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा” हे गाणे तर चिरंजीवित्व लाभलेले गाणे. यमन रागाचे सूर या गाण्यात ओतप्रोत भरलेले आहेत. मुळात, गाण्याची शब्दरचना(च) इतकी अप्रतिम आहे की अशा कवितेला चाल देखील तितकीच सुमधुर लागणार. आयुष्याचा “अर्क” म्हणून गणले जावे, अशा ताकदीची शब्दरचना आहे.
“दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.”
 गाणे लांबीला बरेच मोठे आहेत आणि हे ध्यानात घेऊन, सुधीर फडक्यांनी चाल बांधताना आणि गायन करताना, त्यात निरनिराळे “खटके” घेतले आहेत, प्रसंगी चाल तार स्वरांत नेउन ठेवली आहे. अर्थात तिथे देखील संगीतकाराने, शब्दांचे औचित्य सांभाळून गायन केले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास,
“दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
 एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ”
अगदी सोप्या पद्धतीने आशय व्यक्त केला आहे पण, गायन जर का नीट ऐकले तर चालीतील फरक कळून घेता येतो. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, फडके गाताना, शब्दांबाबत फार विचक्षण दृष्टी ठेवतात. “दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा”, या ओळीतील “दोष” हा शब्द किती अचूक पद्धतीने उच्चारला आहे, हे अभ्यासण्यासारखे आहे. सूर आणि लयीचा सगळा बिकट बोजा सांभाळून, शब्दांबाबत सजग भान ठेवणे, हे सहज जमण्यासारखे नव्हे.
सुप्रसिद्ध कवी बा.भ.बोरकरांची “दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती.” ही कविता आजही, त्यांच्या लोकप्रियतेची निदर्शक अशी कविता आहे. आजही कवी बोरकर, बहुतांशी याच कवितेच्या संदर्भात ओळखले जातात. या कवितेचे गाण्यात रुपांतर केले आहे, संगीतकार वसंत प्रभू यांनी, “पोस्टातली मुलगी” या चित्रपटाच्या निमित्ताने. कविता अतिशय भावगर्भशील आहे जीवनाला यज्ञाची उपमा देण्याची कल्पकता आहे तसेच कवितेच्या शेवटी, “मध्यरात्री नभघुमटा खाली, शांतीशिरी तम चवऱ्या ढाळी; त्यक्त बहिष्कृत मी त्या काळी, एकांती डोळे भरती” सारख्या अजरामर ओळींनी करून, ही कविता सामान्य माणसाच्या भावजीवनाचा भाग बनून गेली.
तशी कविता सरळ, सोपी आहे आणि त्याच प्रकाराने, वसंत प्रभूंनी गाणे तयार करताना, चालीची निर्मिती केली आहे. कवितेतील काही ठराविक कडवी घेतली आहेत परंतु चित्रपटातील प्रसंग उठावदार करण्याच्या दृष्टीने सुयोग्य आहेत. सरळसोट यमन राग या गाण्यात दिसतो. चालीत कुठेही औचित्यभग होणार नाही आणि आशयाची अभिवृद्धी सतत होत राहील, याची काळजी घेतली आहे. अर्थात, आशा भोसले यांचे परिणामकारक गायन देखील तितकेच महत्वाचे आहे.
पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी “भोळी भाबडी” चित्रपटात यमन रागावर आधारित सुंदर अभंग गायलेला आहे – “टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग”. अभंग, माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला आहे आणि त्याला तितकीच समर्पक चाल, संगीतकार राम कदम यांची आहे. संगीतकाराने, या दोन दिग्गज गायकांची गायकी समोर ठेऊन, चालीची निर्मिती केली आहे. स्वरांवर ताबा ठेवण्याची वसंतरावांची शैली तर घुमारेदार, गोलाईयुक्त गायनाची भीमसेन जोशीची शैली, दोन्ही प्रकारच्या गायकीचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला ऐकायला मिळते. यमन सारखा सर्वसमावेशक राग हाताशी असल्याने, चालीत “गायकी” अंग अंतर्भूत होणे क्रमप्राप्त(च) आहे.
“टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग;
देवाजीच्या  दारी आज रंगला अभंग.”
भीमसेन जोशींचे अभंग गायनाशी कायमचे नाव निगडीत होण्यापूर्वीची ही रचना आहे परंतु गाणे ऐकताना पंडितजींच्या आवाक्याची आणि पुढील वाटचालीची कल्पना करता येते. तसे बघितले तर या गाण्यात वसंतरावांपेक्षा भीमसेनी गायनाचा प्रभाव अधिक आहे आणि त्यांना गायला बराच अवसर मिळालेला आहे. नवल असे वाटते, इतकी समृद्ध रचना काळाच्या ओघात मागे कशी पडली?
कविवर्य भा.रा.तांब्यांनी आयुष्यात असंख्य गीतसदृश रचना केल्या. किंबहुना, त्यांच्या कविता वाचताना, आपल्या मनात आपोआप लयबद्ध चालीचा आराखडा तयार होतो. कवितेच्या प्रत्येक ओळीत गेयता सामावली गेली आहे. मुळात त्याकाळच्या इंदोरच्या सरंजामी राजवटीचा गाढा परिणाम त्यांच्या कवितेवर पडलेला दिसतो.
“तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वाचन तुला;
आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला.”
या कवितेत देखील याच वृत्तीचा प्रभाव दिसतो. काही ठिकाणी संस्कृत प्रचुर शब्द वाचायला मिळतात परंतु त्यामुळे कविता अधिक “श्रीमंत” होते, ही बाब नाकारणे अवघड आहे. संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी, या कवितेतील “राजस” भाव ओळखून, नेमका यमन राग(च) निवडला. आपण मागील लेखात बघितले त्याप्रमाणे, यमन रागच समय, प्राचीन ग्रंथात “सांजसमय” दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर, या गाण्याच्या सुरवातीला संतूर वाद्यातून यमन रागाची धून छेडलेली आहे आणि पुढील रचनेची सूचना मिळते. चाल गायकी अंगाची आहे.
किंबहुना हृदयनाथ मंगेशकरांच्या बहुतेक रचना या गायकी थाटाच्याच असतात आणि त्यामुळे गायला अवघड होतात. लताबाईंनी चालीतील अश्रूत गोडवा ओळखून गायनाची शैली ठेवली आहे आणि त्यामुळे गाणे कमालीचे रमणीय होते. चालीचा तोंडावळा खरेतर रागदारी चीजेकडे वळतो पण तसे असून देखील रागातील “लालित्य” शोधून, संगीतकाराने चालीचे खरोखर सोने केले आहे.
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..