नवीन लेखन...

मन:स्पर्शी भटियार

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर साक्षरता कार्यक्रमाच्या संदर्भात, एक अतिशय सुंदर जाहिरात केली होती. जाहिरात, नेहमीप्रमाणे २,३ मिनिटांची होती परंतु, जाहिरातीचे सादरीकरण आणि त्याचे शीर्षकगीत फारच विलोभनीय होते. सकाळची वेळ, एक लहान वयाचा मुलगा आणि त्याचे आजोबा. असाच काहीसा खट्याळ चेहऱ्याचा परंतु आश्वासक नजरेचा. पहाटेच्या पार्श्वभूमीवर, धुकाळ सकाळी, अप्रतिम हिरवळीवरून, तो मुलगा धावत असतो आणि पाठोपाठ गाण्याचे सूर आणि शब्द ऐकायला येतात. “पूरब से सूर्य उगा” आणि ऐकताना आपलेच मन ताजेतवाने होते. त्या गाण्याचे सूर मात्र अतिशय सुरेख, मनात भरणारे होते आणि याचे श्रेय, संगीतकार अशोक पत्की यांचे. हेच सूर, आपल्याला “भटियार” रागाची ओळख करून देतात.
वास्तविक आपल्या भारतीय रागसंगीतात, सकाळच्या पार्श्वभूमीवर बरेच राग ऐकायला मिळतात तरी देखील भटियार ऐकताना, आपल्या मनात नेहमीच सात्विक भाव येतात, अर्थात हा सगळा संस्काराचा भाग आहे. प्रस्तुत गाण्यातील वातावरण निर्मिती आणि सूर मात्र, आपल्याला याच चित्राकडे घेऊन जातात, हे मात्र निश्चित. जाहिरातीसारख्या काही सेकंदात, सगळा आविष्कार दाखवण्याच्या माध्यमात, अशा प्रकारे, रागाची समर्थ ओळख करून देणे, हे निश्चित सहज जमण्यासारखे काम नाही.
आता रागाच्या तांत्रिक भागाबद्दल थोडे समजून घेऊया. रागाची “जाती” बघायला गेल्यास, “संपूर्ण/संपूर्ण” जातीचा राग आहे, म्हणजे या रागात कुठलाच स्वर वर्ज्य नाही. असे असून देखील, दोन्ही मध्यम(तीव्र + शुद्ध) तसेच कोमल निषाद वगळता सगळे स्वर शुद्ध   स्वरूपात लागतात. तरी देखील, या रागात, कोमल निषाद, हा स्वर घेतल्यावर परत षडज स्वराकडील प्रवास हा खास उल्लेखनीय असतो. तसेच, तीव्र मध्यमावरून शुद्ध पंचमावर स्थिरावणे, हे तर खास म्हणायला हवे. इथे कलाकाराला फार काळजी घ्यावी लागते. जरा स्वर कुठे घसरला तर तिथे लगेच भूप किंवा देशकार रागात शिरण्याचा संभव अधिक, म्हणजे पायवाट तशी निसरडी म्हणायला हवी.
आपल्या भारतीय संगीताची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यात हीच खरी गंमत आहे आणि त्या दृष्टीने आव्हान आहे. इथे अनेक राग, एकमेकांशी “नाते” सांगत असतात पण त्याचबरोबर स्वत:चे “रूप” वेगळे राखून असतात आणि हे वेगळेपण राखण्यातच, कलाकाराची खरी कसोटी असते.
आता आपण, या रागाचे शास्त्रीय सादरीकरण समजून घेऊ आणि त्यायोगे, स्वरांची ओळख पक्की करून घेऊ. या चीजेचे शब्द देखील, रागाच्या प्रकृतीशी संलग्न आहेत – “आयो प्रभात सब मिल गाओ”. ठाय लयीतील ही चीज, पंडित राजन/साजन मिश्रांनी किती समरसून गायली आहे. प्रत्येक सूर अतिशय स्पष्ट आणि मागील सुराशी नातेसंबंध राखून आहे, त्यामुळे इथे “मिंड” हा अलंकार फारच खुलून ऐकायला मिळतो.अणुरणात्मक स्वरांचे गुंजन असल्याने, आपण देखील ऐकताना कधी “ऐकतान” होतो, हे कळतच नाही. खर्जातील आलापी घेताना, मध्येच तीव्र मध्यमाचा प्रत्यय देऊन, स्वरावली खुलविणे, हे खास ऐकण्यासारखे आहे, तसेच “उपज” आणि “बोलतान” हे अलंकार बहारीचे लागतात. रागदारी संगीत ऐकताना, काही गोष्टी प्रामुख्याने समजून घ्याव्या लागतात, त्यात ही परिभाषा आवश्यक असते कारण, “उपज”,”बोलतान” या शब्दांना दुसरे तितकेच अर्थवाही शब्द नाहीत, त्यामुळे आनंद घेताना, या अलंकारांची ओळख असेल तर रागदारी संगीत ऐकण्याची खुमारी अधिक वाढते, हे निश्चित.
वास्तविक रागदारी गायनात युगुलगान हा प्रकार तसा विरळाच परंतु इथे या दोघां बंधूंनी, एका सुरातून, दुसरा सूर आणि पुढे ताना, अशी बढत फार सुरेख केलेली आहे. परंतु इथे “आयो प्रभात, सब मिलके गाओ, नाचो” या बंदिशीत त्यांनी अप्रतिम रंग भरले आहेत.
आता आपण, “सूरसंगम” चित्रपटातील याच मुखड्याचे गाणे ऐकुया. अर्थात, रचना याच, भटियार रागावर आहे आणि गंमत म्हणजे वरील चीज, ज्या दोन भावांनी गायली आहे, त्यांनी या रचनेचे गायन केले आहे. अर्थात, चित्रपट गीत म्हटल्यावर, रचनेत अधिक बांधीव, घाटदार बांधणी अनुस्यूत असते आणि इथे संगीतकार लक्ष्मीकांत/प्यारेलाल यांनी हाच मार्ग चोखाळला आहे. चित्रपट गीत म्हटल्यावर, ती रचना काही प्रमाणात लोकानुनयी असावीच लागते आणि तशी ही रचना आहे.
इथे आणखी एक मजा लिहावीशी वाटते. गाणे भटियार रागावर आहे, गाण्याचे सुरवातीचे बोल, रागाच्याच प्रसिद्ध बंदिशीचे आहेत परंतु पुढे गाण्याचा विस्तार मात्र स्वतंत्र आहे.मी वर लिहिलेल्या बंदिशीचे शब्द या गाण्याच्या सुरवातीला आहेत .
“आयो प्रभात सब मिल गाओ,
बजाओ नाचो हरी को मनाओ.”
केवळ हाताशी रागाचे सूर आहेत, तेंव्हा एखादे “लक्षणगीत” बनवावे, असा विचार न करता, त्या रचनेत, आपले काहीतरी “अस्तित्व” ठेवावे, या उद्देशाने, गाण्याची रचना केली आहे. गाण्याचा ठेका ऐकताना तर हा विशेष लगेच लक्षात येतो. “पंजाबी ठेका” आहे, जो रागाच्या चीजेत नाही. याचाच वेगळा अर्थ, गाण्याची सुरवातीची लय तशीच ठेऊन, गाणे जेंव्हा तालाच्या जवळ येते, तिथे गाण्याची चाल, किंचित बदलेली आहे आणि गाण्याचा चेहरा स्वतंत्र राखला आहे.
आता “Water” या चित्रपट असेच अप्रतिम गाणे आहे जे भटियार रागाची वेगळीच ओळख करून देते. ए.आर. रेहमान, हा कुठलीही चाल, काहीतरी वेगळेपण घेऊन येते, ज्या योगे गाण्यात, स्वत:चे contribution घालता येते. इथे देखील, गाण्यात, गायकीला पूर्ण प्राधान्य दिले आहे. पार्श्वभागी, वाद्यांचे किंचित जाणवणारे सूर आहेत, ज्या योगे प्रस्तुत प्रसंग  अधिक खोलवर मनात ठसेल.
“नैना नैना नीर बहाये
मुझ बिरहन का दिल साजन संग
झूम झूम के गाये”
पार्श्वभागी तालाचा वापर देखील इतका हळुवार आहे आणि जोडीला पियानोचे स्वर देखील इतके हळवे आहेत, की नीट लक्ष देऊन, ऐकल्यास, या वाद्यांचे अस्तित्व जाणवते. याचा परिणाम असा होतो, सगळे गाणे, गायिकेच्या, पर्यायाने साधना सरगमच्या गायकीवर तोलले जाते. एकतर भटियार रागाचे सूर पण, राग मूळ स्वरूपात सादर न करता, आधाराला ते सूर घेऊन, चालीची बढत करायची, असा सगळा प्रकार आहे. सकाळची वेळ आहे, हे ध्यानात घेऊन, वाद्यांचा स्वर तसाच हलका ठेवला आहे. ताल देखील केरवा आहे, हे केवळ लयीच्या अंगाने तपासल्यावर समजते. फारच सुरेख गाणे.  अर्थात तालाबाबत असे प्रयोग करायचे, याची पूर्वतयारी, त्याच्या आधीच्या पिढीतील, राहुल देव बर्मनने केली होती, हे सुज्ञांस सहज उमजून घेता येईल.
आपल्या मराठी संस्कृतीत अभंगाचे महत्व अपरिमित आहे आणि असाच एखादा अभंग जर का, किशोरी आमोणकरांनी गायलेला असेल तर, केवळ रागाची नव्याने ओळख होत नसते पण, त्याच जोडीने अभंगाची लज्जत देखील नव्याने समजून घेता येते.
“बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,
करावा विठ्ठल जीवभावा”.
भजनाचा ताल अगदी सरळ, पारंपारिक आहे पण, त्याच कालस्तरावरील लयीत, स्वरस्तरावरील लय किती विलोभनीय आहे, हे ऐकण्यासारखे आहे. मुळात किशोरी आमोणकरांचा धारदार आवाज, त्यात अभंगाची गायकी अंगाची चाल, त्यामुळे हा अभंग ऐकणे, हा श्रवणीय आनंद आहे. अभंगातील प्रत्येक स्वर, त्याला जोडून केलेले शब्दांचे उच्चार आणि त्यातून निर्मिलेला स्वरिक वाक्यांश, सगळेच अप्रतिम आहे. भजनाच्या सुरवातीला घेतलेला “आकार”, रचना पुढे कशी वळणे घेणार, याचा अदमास घेता येतो. किंचित अनुनासिक स्वर पण, तरीही स्वरांची जात खणखणीत. ज्या हिशेबात, किशोरी आमोणकर रागदारी संगीताची बढत करतात, तसाच थोडा प्रकार या रचनेत आढळतो. हळूहळू, तानांची जातकुळी बदलत जाते पण तरीही स्वरीत वाक्यांश नेहमीच स्वत:च्या  ताब्यात ठेऊन, सगळी मांडणी अतिशय बांधीव होते. वास्तविक, भजन म्हणजे ईश्वराची आळवणी आणि याचे नेमके भान इथे ठेवलेले आहे. गाता गळा आहे, त्याला रियाजाची असामान्य जोड आहे म्हणून, गाताना तानांच्या भेंडोळ्या सोडून, रसिकांना चकित करून सोडायचे, असला पारंपारिक प्रकार इथे आढळत नाही. आवाज, तीनही सप्तकात फिरतो परंतु गायन एकूणच आशयाशी सुसंगत असे झाले आहे.
मराठी रंगभूमीवर “मत्स्यगंधा” नाटकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता आणि काहीशी मरगळलेली संगीत रंगभूमी पुन्हा नव्याने उभारी घेऊन ताजीतवानी झाली. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकींनी, त्या काळाचा विचार करता “आधुनिक” वाटतील अशा चालींची निर्मिती करून संगीत रंगभूमीला नवा “पेहराव” दिला. अनेक कलाकारांना संगीत रक़्नग्भुमिवर स्थिरावायची संधी मिळवून दिली. आजही या गाण्यांची लोकप्रियता अबाधित आहे. या नाटकात, आशालता वाबगावकर यांनी गायलेले “अर्थशुन्य भासे मज हा कलह जीवनाचा” हे गाणे “भटियार” रागाची ओळख करून देतात. भावगीताच्या अंगाने गेलेली चाल परंतु स्वरविस्ताराला भरपूर वाव देणारी चाल असल्याने, लोकांच्या पसंतीला हे गाणे लगेच उतरले.
“अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा.
धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा”.
गीताचे शब्द देखील सहज, अर्थवाही आहेत, त्यामुळे गीताचा अर्थ समजत नाही – अशी तक्रार पूर्वीच्या बहुतेक नाट्यगीतांच्या बाबतीत सार्थपणे केली जात असे – तो प्रकार या गाण्याच्या बाबतीत चुकूनही उद्भवला नाही आणि त्यामुळे गाण्याची लज्जत अधिक वाढली, तसे काटेकोरपणे ऐकायला घेतले तर, यात फक्त “भटियार” रागाचे सूर नसून इतर रागांचे सूर देखील ऐकायला मिळतात परंतु असे करून देखील गाण्याचा भावार्थ आणि सुरांची मजा कुठेही उणी पडत नाही. भारतीय रागदारी संगीत अधिक विस्तारित झाले.
— अनिल गोविलकर 

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..