नवीन लेखन...

माळ्याच्या मळ्यामंदी..

२१ जानेवारी २००३ या दिवशी ‘संस्कृती प्रकाशन’, दोन पुस्तकांच्या प्रकाशनानं सुरु झालं. कॅम्पातील नेहरु मेमोरियल हॉलमध्ये प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याचा मी साक्षीदार होतो, कारण समारंभाचे फोटो मीच काढत होतो. या शुभदिवशीच सुनील मांडवे उर्फ भाऊ ‘संस्कृती’ परिवारात सामील झाला.
भाऊचं मूळ गाव नागाचे कुमठे. त्याचं बालपण गेलं मुंबईत. वडील डाॅकयार्ड मध्ये कामाला होते. त्यामुळे भाऊचं बारावी पर्यंतचं शिक्षण मुंबईतच झालं. पुस्तकी शिक्षणाबरोबरच बाहेरच्या जगातील अनुभवाचे धडेही भाऊने इथेच घेतले.
वडिलांबरोबर गावी परतल्यानंतर भाऊने फोरव्हिलरचे लायसन्स काढले. वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्याबरोबर भाजीचा टेम्पो घेऊन बाजारात जाणे येणे सुरु केले. चार पैसे कमवायला लागल्यावर आई वडिलांनी भाऊंचे दोनाचे चार केले. लग्न झाल्यावर भाऊचा गृहस्थाश्रम सुरु झाला. मित्रमंडळी भरपूर असल्याने दिवसभर बाहेरच रमणारा भाऊ आता संध्याकाळीच घरी येऊ लागला.
माईंची भाऊंच्या वडिलांशी ओळख होतीच. त्यांना भेटून ‘भाऊला, पुण्याला माझ्याकडे पाठवता का?’ असे माईंनी विचारले. आपल्या मुलाला चालून आलेली चांगली संधी कोणत्या बापाला नकोशी वाटेल? त्यांनी आनंदाने माईंना होकार दिला.
भाऊ पुण्यात आला.. मुंबई, सातारा माहित होता पण पुणं भाऊला नवीन होतं. येरवड्याला माईंचं ‘संस्कृती मंगल केंद्र’ होतं. रहायला त्या सदाशिव पेठेतील टिळक स्मारक जवळ होत्या. त्यावेळी माईंकडे ट्रॅक्स गाडी होती. हळूहळू प्रकाशनाचा व्याप वाढू लागला. भाऊ व माईंनी काही प्रदर्शंनात पुस्तकांची विक्री केली.
दरम्यान अप्पा बळवंत चौकात नूमवि समोर असलेल्या एका रोडवरील पहिल्या मजल्यावर ‘संस्कृती प्रकाशन’ला जागा मिळाली. त्या जागेत फर्निचर करुन ‘संस्कृती’च्या इतिहासाचा श्रीगणेशा झाला.
काही वर्षांतच ऑफिसला लागून असलेली जागाही माईंनी घेतली व ‘संस्कृती’चे ग्रंथदालनात रुपांतर झाले. भाऊच्या सहकार्याने माईंनी प्रकाशनाला पुढे आणले. डीटीपी करण्यासाठी एका ऑपरेटरची नेमणूक केली. नवीन प्रिंटर्स, बाईंडरचा शोध घेतला. त्यावेळी मुखपृष्ठाच्या पाॅझिटीव्ह केल्या जात असत. पेपर प्रिंटींगसाठी गुलटेकडीला पाठवावा लागत असे. हळूहळू पुस्तकांची संख्या वाढू लागली.
नवीन लेखक ‘संस्कृती’च्या परिवारात सामील झाले. आर.आर. पाटील (आबा) यांच्या पुस्तकानं ‘संस्कृती’ला शिखरावर नेऊन ठेवलं. प्रसिद्धी आणि नाव दोन्ही मिळालं.
भाऊ ‘संस्कृती’साठी अहोरात्र झटत होता. आपल्या परिसरापासून दूर रहात होता. वर्षातून दिवाळीलाच आठ दिवसांची सुट्टी मिळायची. ‘संस्कृती’मधलं लक्ष्मीपूजन झालं की, दुसऱ्या दिवशी भाऊ आपल्या गावी जायचा. सुपुत्र संकल्पला आपला जन्मदाता भेटल्यावर काय करु नी काय नको असं होऊन जायचं. त्या आठ दिवसांत भाऊ आपल्या सवंगड्यांना भेटायचा. आई वडिलांबरोबर शेतात जायचा. कारभारीण त्याला त्याच्या आवडीचं खायला घालायची. भाऊ आठ दिवस पुणं विसरुन जात असे.
‘संस्कृती’त प्रगती होत गेली. भाऊसाठी नवीन काॅम्प्युटरची व्यवस्था केली. इंटरनेट घेतले. भाऊ वेळ मिळाला की, काॅम्प्युटरवर काम करीत बसे. गुगल सर्च करीत राही. त्यावेळी माईंना घरुन ऑफिसवर आणणे, घरी सोडणे, कामासाठी बाहेर जाणे सर्व कामे भाऊ करीत असे. त्याच्या मदतीसाठी राहुलला माईंनी ठेवले.
सिने अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या ‘मधुरंग’या पुस्तकानं व त्याच्या प्रकाशन सोहळ्यानं ‘संस्कृती’ला अमाप प्रसिद्धी दिली. संस्कृती ग्रंथदालनात भाऊंच्या मदतीसाठी मिनाज व परवीन या दोन मुली काम करु लागल्या. कधी माईंच्या मनात आलं तर त्या सर्वांना घेऊन एक दिवसाची सहल करायच्या. कधी सिंहगड, कधी माळशेज तर कधी पाचगणी. फिरुन आल्यावर सर्व जण फ्रेश व्हायचे.
माईंनी ऑफिसमधील सर्वांचे वाढदिवस आठवणीने साजरे केले. त्यातूनही भाऊचा वाढदिवस जल्लोषात साजरा होत असे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी भाऊ न चुकता माईंना गुरू मानून गुलाबाचे फूल देऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवत असे. माई देखील त्याला भरभरून आशीर्वाद देत असत.
माईंनी आपल्या प्रकाशनाची पुस्तकं गावोगावी पोहोचावी म्हणून एक मोठी व्हॅन खरेदी केली. तिला आतून बाहेरून सजवलं. ‘संस्कृती फिरते ग्रंथदालन’ म्हणून तिचं जंगी उद्घाटन केलं. काही वर्ष भाऊनं ती व्हॅन गावोगावी फिरवली. अनेक ठिकाणच्या प्रदर्शंनाच्या वेळी त्या व्हॅनचा भरपूर उपयोग झाला.
माईंनी ‘संस्कृती’चा दिवाळी अंक निर्मितीचा विचार केला. पहिला अंक बाहेरुन करुन घेतला. दुसऱ्या वर्षापासून भाऊने संपूर्ण अंकांची जबाबदारी घेतली. सलग बारा वर्षे ‘संस्कृती’ दिवाळी अंक नावाजतो आहे.
माईंच्या घरातील सर्वजण भाऊला मान देतात. साहेबांना तो ‘पप्पा’ म्हणतो. माईंच्या बंधूंना मामा म्हणतो. मुलांचे लाड करतो. माईंच्या वडिलांचा मित्र होऊन भाऊ त्यांच्याशी गप्पा मारीत असे. आईशी तर प्रेमाने ‘म्हातारेऽ’ म्हणून तिच्या कुशीत शिरत असे. मुलांच्या आजारपणात भाऊनं जागरणं केली. माई हाॅस्पिटलमध्ये असताना भाऊ रात्रंदिवस त्यांच्या पायाशी बसून राहिला.
वर्षं भराभर जात होती. शाळेत जाणारी माईंची मुलं मोठी झाली. त्यांची एकापाठोपाठ दोन वर्षांत लग्न झाली. दोन्ही लग्नात भाऊने स्वतःला वाहून घेतले.
धाकट्याचं लग्न पार पडल्यावर कोरोनाची चाहूल लागली. पेपरला बातम्या येऊ लागल्या. मार्च पासून तर लाॅकडाऊन सुरु झाले. ‘संस्कृती’ बंद ठेवण्यात आल्याने भाऊ गावी पोहोचला. सुरुवातीला एक दोन महिन्यांत कोरोना जाईल असं वाटलं होतं. आज आठ महिने झाले तरी कोरोना वाढतोच आहे.
भाऊला मात्र गेल्या सतरा वर्षातील सर्वात मोठ्या सुट्टीचा आनंद त्यामुळे घेता आला. त्याच्या दोन्ही मुलांना बापाचं प्रेम मिळालं. आई वडिलांना मुलांचं सुख मिळालं. पत्नीला कित्येक वर्षांनंतर वटसावित्रीची पूजा ‘सत्यवाना’च्या साक्षीनं करण्याचं भाग्य लाभलं. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडून राखी बांधून घेताना मधली सतरा वर्षे आनंदात लुप्त झाली होती.
संकल्पचे काॅलेज कोरोनामुळे बंद असल्यामुळे आता तो शेतीत रमलेला आहे. भाऊपेक्षा त्याची काळ्या आईशी अधिक जवळीक दिसून येते आहे. शेवगा, भेंडी, वाटाणा, बटाटा, इ. पिकं घेताना भाऊनं स्वतःच्या मिशांचीही मशागत केली आहे. आता भाऊचा लुक ‘वीरप्पन’सारखा आहे.
पुण्यात भेटल्यावर भाऊ नेहमी म्हणायचा. माझा पाय दुखतोय, पाठ दुखते आहे, दाताचं रुटकॅनाॅल करायचं आहे. गावी गेल्यावर हे सगळे त्रास बंद झाले आहेत.
‘साधी माणसं’ चित्रपटांतील जयश्री गडकरच्या दादाच्या जागी मला भाऊ दिसतो… साधासुधा, प्रेमळ भाऊ सध्या शेतारानात रमलेला ‘माळीच’ आहे…
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं…गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-१०-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..