नवीन लेखन...

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् – मराठी अर्थासह – भाग २

अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते
श्रितरजनीरजनीरजनीरजनीरजनीकरवक्त्रवृते ।
सुनयनविभ्रमरभ्रमरभ्रमरभ्रमरभ्रमराधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ११ ॥

मराठी- परोपकारी,सुखद,प्रसन्न,आनंददायक मनाची, फुलासमान आकर्षक कांती असलेली, रात्री(च्या रंगा) ला दुय्यम बनवणारी, अंधा-या रात्रींमध्ये श्रेष्ठ अशा काळ्या रंगाची, चंद्रासमान तेजस्वी मुख असलेली, (जिच्या मुखाभोवती चंद्राचे किरण पसरलेले आहेत), (जी अंधारातील (दुःखातील) जनांसाठी चंद्रासारखी शीतल आहे), भुंग्यांच्या थव्यात असलेल्या विशेष भुंग्यांसमान सुंदर चंचल डोळे असलेली,जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

सुखद प्रसन्न दयाळु, सुरेख फुलासम गोंडस कांति असे
शशिवदना बहु श्यामल, शीत जना, किरणात झळाळ दिसे ।
तरल सुरेख सुनेत्र, थव्यात विमुक्त विशेष मिलिंद जसे
गिरितनये जय हो, महिषा वधिले, कचबंधन शोभतसे ॥ ११


सहितमहाहवमल्लमतल्लिकमल्लितरल्लकमल्लरते
विरचितवल्लिकपल्लिकमल्लिकझिल्लिकभिल्लिकवर्गवृते ।
शितकृतफुल्लसमुल्लसितारुणतल्लजपल्लवसल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १२ ॥

मराठी- मस्तवाल मल्लांबरोबरच्या महायुद्धात जिच्याबरोबर मोगर्‍यासारख्या नाजूक स्त्रिया सामील असतात, जिच्याबरोबरच्या भिल्ल वस्तीतल्या स्त्रिया मोगरीच्या वेली सारख्या नाजूक असून मधमाश्यांच्या थव्याप्रमाणे गजबज करतात (जिच्या भोवती मल्लिक, जिल्लक आणि भिल्लक जातीचे शिकारी असून, ज्यांच्या झोपड्यांभोवती वेली पसरलेल्या आहेत), पूर्ण फुललेल्या फुलांप्रमाणे आणि लाल कोवळ्या पानांच्या वेलींप्रमाणे जी सुंदर आहे, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

रणि रिपु धाकट संगत झुंजत स्त्रीदल नाजुक कुंद जसे
वनचर स्त्रीगट नाजुक वेढिति काटक कीटक झुंड जसे ।
सुमन मनोहर लाल लतेवर फुलले सुंदर रूप दिसे ॥
गिरितनये जय हो, महिषा वधिले कचबंधन शोभतसे ॥ १२


अविरलगण्डगलन्मदमेदुरमत्तमतङ्गजराजगते
त्रिभुवनभुषणभूतकलानिधिरूपपयोनिधिराजसुते ।
अयि सुदती जनलालसमानसमोहनमन्मथराजमते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १३ ॥

मराठी- ज्यांच्या गंडस्थलातून दाट मद सतत स्रवत आहे अशा श्रेष्ठ मस्त हत्तींप्रमाणे जिची चाल आहे, तिन्ही जगांना भूषणास्पद अशा चंद्राप्रमाणेच जी महा क्षीरसागराची कन्या आहे, सुंदर दात असणारी, जनमानसात लालसा उत्पन्न करणार्‍या मदनदेवाला जिने बंदिस्त केले आहे, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

मद नित दाट झरे गजराज अशी मदमस्त हि चाल खरी
शशिसम भूषण तीन जगांस नि जन्म पयोनिधिच्या उदरी ।
जन मन  लुब्ध अनंग करी, सुदती भुलवी गिरिशास बरी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ १३


कमलदलामलकोमलकान्तिकलाकलितामलभाललते
सकलविलासकलानिलयक्रमकेलिचलत्कलहंसकुले ।
अलिकुलसङ्कुलकुंतलमण्डलमौलिमिलद्बकुलालिकुले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १४ ॥

मराठी- जिचे कपाळ स्वच्छ निष्कलंक कमळाच्या पाकळीप्रमाणे शुभ्र, तलम, कांतीमान आहे, जी सर्व चैतन्य व कलांच्या प्रकटीकरणाचे सदन आहे, जिच्या सोबत खेळकर व मंजुळ आवाज करणारा राजहंसांचा थवा आहे, भुंग्यांचे थवे जिच्या डोईवरील केशरचनेत माळलेल्या बकुळीच्या फुलांवर घोंघावत आहेत, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

टीप- येथे तिस-या चरणात ‘ कुंतलमण्डल ’ ऐवजी ‘ कुवलय मण्डल ’ असा पाठभेद आढळतो. तथापि तो वृत्तात बसत नाही.

कमल दलासम शुभ्र मुलायम तेज झळाळत भाळ असे
प्रकटन स्थान कलांस नि हंस थवा स्वर रंगुन खेळतसे ।
भ्रमरसमूह शिरी कचबंध  बकूल फुलावर  गुंजतसे
गिरितनये जय हो, महिषा वधिले कचबंधन शोभतसे ॥ १४


करमुरलीरववीजितकूजितलज्जितकोकिलमञ्जुमते
मिलितपुलिन्दमनोहरगुञ्जितरञ्जितशैलनिकुञ्जगते ।
निजगणभूतमहाशबरीगणसद्गुणसम्भृतकेलितले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १५ ॥

मराठी- जिच्या हातातील पाव्याच्या मधुर आवाजाच्या शिडकाव्याने कोकिळ लज्जित होतो, जी पुलिंद (जनजातीच्या) जनांबरोबर चित्ताकर्षक सूर गुणगुणते, (निसर्गसौंदर्याने नटलेल्या) रंगीत पर्वतावरील वाटिकांमधून हिंडते, आपल्या गुणी अनुयायी भिल्ल स्त्रियांबरोबर क्रीडा करते,जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

मधुर जिच्या स्वर  बासुरिचा झरता  पिक ऐकुन  लाजतसे
मधुस्वर   गुंजन  भिल्ल जनांसह कुंजवनी गिरि   हिंडतसे ।
अनुचर   शीलवती  शबरींसह   ती  गिरिकंदरि खेळतसे
गिरितनये जय हो, महिषा वधिले कचबंधन शोभतसे ॥ १५


कटितटपीतदुकूलविचित्रमयुखतिरस्कृतचन्द्ररुचे
प्रणतसुरासुरमौलिमणिस्फुरदंशुलसन्नख चन्द्ररुचे
जितकनकाचलमौलिमदोर्जितनिर्भरकुञ्जरकुम्भकुचे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १६ ॥

मराठी- जिच्या कमरेच्या पिवळ्या रंगाच्या रेशमी वस्त्राच्या तेजस्वी किरणांपुढे चंद्राची कौमुदीही निस्तेज पडते, जिच्या समोर माथा टेकणा-या देव आणि दानवांच्या मुकुटातील रत्नांच्या चमकदार किरणांनी जिच्या (पायांची) नखे चंद्रासारखी चमकतात, कनकगिरी जिंकल्यावर हत्तीने मस्तीत आपले मस्तक उचलल्याप्रमाणे जिचे घटांप्रमाणे स्तन दिसतात, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

शशि जणु तेजविहीन गमे जंव वस्त्रप्रभा तव फाकतसे
मुकुटमणी, झुकता सुर दैत्य, नखांस प्रभा जणु चंद्र दिसे ।
कनकगिरी विजयी गज भव्य शिरासम उन्नत वक्ष दिसे
गिरितनये जय हो, महिषा वधिले कचबंधन शोभतसे ॥ १६

टीप- येथे तिस‍-या चरणातील विजयी हत्तीचा उल्लेख कदाचित कर्नाटकातील ‘कनकगिरी’ मंदिराच्या संदर्भातील असू शकेल. काही अभ्यासकांनी ‘कनकगिरी’ चा अर्थ सुमेरू पर्वत असा घेतलेला दिसतो. त्यानुसार `भव्यतेत सुमेरू पर्वतालाही मागे टाकणारा’ असाही अर्थ घेता येईल.

तसेच तिस-या चरणातील ‘कुञ्जरकुम्भकुचे’ ऐवजी ‘दुर्धरनिर्झरतुङ्गकुचे’ असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास अर्थ लावणे दुरापास्त होईल.


विजितसहस्रकरैकसहस्रकरैकसहस्रकरैकनुते
कृतसुरतारकसङ्गरतारकसङ्गरतारकसूनुसुते ।
सुरथसमाधिसमानसमाधिसमाधिसमाधिसुजातरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १७ ॥

मराठी- जिने आपल्या हजार हातांनी (दैत्यांच्या) हजार हातांवर विजय मिळवला, जिला (भक्तांचे) हजारो हात नमस्कार करतात, जिने तारकासुराबरोबरच्या युद्धात देवांना वाचवणारा पुत्र (कार्तिकेय) निर्माण केला आणि त्या पुत्राला प्रोत्साहित केले, राजा सुरथ व वैश्य समाधी यांच्या भक्ती व चिंतनाकडे जी एकच समभावाने पहाते, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

हरवित हात हजार तुझे असुरांस, प्रणाम हजार करीं
सुरगण रक्षक तारक नाशक प्रेरित पुत्र रणास करी ।
सुरथ-समाधि मनी तव चिंतन भक्ति तुला सम भावतसे
गिरितनये जय हो, महिषा वधिले कचबंधन शोभतसे ॥ १७

टीप- येथे पहिल्या चरणातील ‘सहस्रकरैक’चा संदर्भ देवीमाहात्म्यच्या दुस-या अध्यायातील कथेशी आहे. काही अभ्यासकांनी ‘सहस्रकर’ चा अर्थ सूर्य असा घेऊन पहिल्या चरणाचा अर्थ ‘देवीच्या तेजस्वितेने सहस्र किरणांच्या सूर्याचा पराभव झाल्याने तो आपल्या हजारो हातांनी देवीला नमन करतो’ असाही केला आहे.

तिस-या चरणात उल्लेखलेले महाराज सुरथ व वाणी समाधी हे महिषासुरमर्दिनीचे आद्य सर्वसामान्य मानवी भक्त होत. त्यांची व त्यांना मेधा ऋषींनी केलेल्या उपदेशाची कथा दुर्गा सप्तशती व देवी भागवत ग्रंथांमध्ये आहे. राजा सुरथ याची राजधानी कोठे असावी याबद्दल मतांतरे असून त्या अनेक स्थानांपैकी एक कोल्हापूरही आहे.


पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् ।
तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १८ ॥

मराठी- करुणेचे निधान असलेल्या हे शुभ देवी, जो दररोज तुझ्या चरणकमलांची भक्तिपूर्वक सेवा करतो, त्याला, हे कमळात निवास करणा-या कमले, कमळात (तुझ्या पायांशी) स्थान मिळणार नाही असे कसे होईल ? तुझी पावलेच अत्युच्च स्थान आहेत या धारणेने त्यांचे ध्यान करणा-या मला आणखी काय हवे? जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

पदकमला तव जो करुणामयि, भक्तिसवे नित पूजितसे
कमलनिवासिनि त्यास पदी तव स्थान कसे नच लाभतसे  ।
तव पद थोर बहू स्मरता जगती मग जीवन न्यून कसे
गिरितनये जय हो, महिषा वधिले कचबंधन शोभतसे ॥ १८


कनकलसत्कलशीकजलैरनुषिञ्चति तेऽङ्गणरङ्गभुवम्
भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।
तव चरणं शरणं करवाणि मृडानि सदा मयि धेहि शिवम्
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १९ ॥

मराठी- जो तुझ्या प्रासादाच्या आवाराचे सुवर्णाच्या पात्रातील जळाने सिंचन करतो, त्याला  घटांप्रमाणे असणा-या शचीच्या स्तनांना आलिंगन देण्याच्या आनंदाचा अनुभव कां मिळणार नाही (म्हणजे तो इंद्रपदी का पोहोचणार नाही) ? मी तुझ्या पायी शरण आलो आहे. मजवर दया कर आणि माझे नित्य कल्याण कर. जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

तव सदनी कळशीतुन कांचन प्रांगण जो शिडकाव करी
जणु शचि शक्र कवेत तशी अनुभूति तया मग का न बरी ?
चरण तुझे धरिल्रे  करुणा  मज दाव सदा हित क्षेम करी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ १९


तव विमलेन्दुकलं वदनेन्दुमलं कलयन्नुकूलयते
किमु पुरुहूतपुरेन्दुमुखीसुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।
मम तु मतं शिवमानधने भवती कृपया किमुत क्रियते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २० ॥

मराठी- जो तुझ्या, सौम्य चंद्रासमान स्वर्गीय वदनाचे सतत ध्यान करतो, त्याला सुरलोकातील चंद्रानना कशा काय पाठमोरा धाडतील ? मला तर वाटते, शंकराचा मान हाच सर्वात महत्त्वाचा खजिना असणा-या हे (पार्वती) तुझ्या कृपेने तू काय करू शकत नाहीस ? जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.
शशिसम सौम्य मुखास तुझ्या अकलंकित जो नित ध्यान करी

शशिमुख देवपुरीललना धुडकावत काय तयास दुरी ? ।
धन हरनाम जिला खजिना, तव थोर कृपा नच काय करी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ २०


अयि मयि दीन दयालुतया कृपयैव तया भवितव्यमुमे
अयि जगतो जननीति जयाशु मयापि तथानुमितासि रमे ।
न यदुचितं न भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरु मे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २१ ॥

मराठी- हे उमे, गरीब दुबळ्यांवर दया करणा-या तू मजवर दया करच. हे रमे, तू जशी जगाची माता आहेस, तशीच माझीही माता आहेस. माझी ही प्रार्थना जर योग्य नसेल तर तू ती स्वीकार करू नकोस. तू माझे दुःख दूर कर. जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

कणव दया गरिबां, दुबळ्या मज दावच मी बहु दीन असे
सकल जगा जननी कपिले मज माय तशी बहु आस असे ।       (कपिला- पार्वती)
दुख मम दूर करी, विनती अनमान करी जर योग्य नसे
गिरितनये जय हो, महिषा वधिले कचबंधन शोभतसे ॥ २१

टीप- येथे दुस‍-या चरणात ‘ अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते ’ असा पाठभेद आढळतो. त्याचा अर्थ (असिर – बाण) किंवा (असि – खड्ग) असा घेऊन काही  अभ्यासकांनी ‘विश्वाच्या माते, तू जशी दयाळू आहेस तशीच बाणधारीही (खड्गधारीही) आहेस. (तू जसा दुःखी कष्टी जनांवर कृपेचा वर्षाव करतेस तसाच शत्रूंवर सुसंगत बाणांचाही वर्षाव करतेस) ’ असा काहीसा लावलेला दिसतो.

(समाप्त)

— धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 26 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

2 Comments on महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् – मराठी अर्थासह – भाग २

  1. आम्ही फक्त श्लोक म्हणत होतो पण आपल्या अनुवादातून शब्दांचे सौंदर्य अर्थपूर्ण छान कळले

  2. Excellent. I’m yet to go through the entire translation but whatever little I have read speaks volumes about your mastery on the language. I hope to start learning Sanskrit soon.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..