नवीन लेखन...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला.

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, त्यानंतर देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवलेले यशवंतराव चव्हाण हे अग्रणी राष्ट्रीय नेते होते. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल.

पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द जशी बहरली, तशी त्यामध्ये अनेक वादळेही आली. परकीय आक्रमणाच्या वेळी देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात त्यानं मानाचा तुरा रोवला.

महाराष्ट्राचं हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हतं. तर यशवंतराव चव्हाण हे नेता होते, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता. यशवंतराव चव्हाण अभिजात साहित्यिक होते. मराठी भाषेचा एक नम्र व रसिक वाचक या नात्याने त्यांनी नेहमीच मराठी भाषेचा, साहित्याचा आणि साहित्यिकांचा आदर केला आहे. ललित, आत्मपरलेखन, चरित्रात्मक, व्यक्तिचित्रणपर आठवणी, प्रवासवर्णन, स्फुट, वैचारिक, समीक्षात्मक, पत्रात्मक, भाषणे इत्यादी स्वरूपातील लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या कृष्णाकाठ, ऋणानुबंध, युगांतर, भूमिका, शिवनेरीच्या नौबती, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, यशवंतराव चव्हाण शब्दांचे सामर्थ्य इत्यादी ग्रंथातून त्यांच्या ललित लेखन प्रकृतीचा आपल्याला परिचय होतो. यातून त्यांनी आपली दीर्घकालीन वाड्‌मयीन अशी साहित्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. ते जरी प्रथम राजकारणी असले तरी त्यांच्यामधील चिंतनशील, रसिक व सामाजिक विचारवंत हा मात्र साहित्याबरोबरच राहिला होता. त्यांच्या सर्वच साहित्य कलाकृती लक्षवेधक आहेत.

“कृष्णाकाठ’ हे त्यांच्या १९४६ पर्यंतच्या जीवनाचे खंडकाव्यच आहे. त्यातून त्यांच्या अभिरूची संपन्न व सुसंस्कृत अशा मनाचे दर्शन होते. ते राहत असलेला कृष्णाकाठ, भूमीविषयी प्रेम, अनेक छंदांची जोपासना, वैचारिक आंदोलने, विश्वास आणि मैत्रीचे स्नेहाचे नाते जिवाभावाने जपणारे मन, वैचारिक मतभेद, गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद इत्यादी विविध विचारसरणीतून त्यांच्या मानाचा प्रवास कसा झाला हे स्पष्ट होते. अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन कसे लाभले, संस्कारक्षम व संवेदनक्षम अशा व्यक्तित्त्वाची जडणघडण बालजीवनापासून ते प्रौढ जीवना-पर्यंत कशी झाली याचा पट “कृष्णाकाठ’ मध्ये अत्यंत सोप्या, सहजसुंदर भाषेत साकारला आहे.

यशवंतराव चव्हाण यांचे २५ नोव्हेंबर १९८४ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..