(इ. स. पूर्व १५०० – इ.स. पूर्व ६००)
ज्या कालखंडात रामायण व महाभारत प्रथम लिहिल्या गेले त्या कालखंडातील विश्वकर्मा समाजाचा विचार या प्रकरणात केला आहे. हा कालखंड नक्कीच वैदिक काळाच्या नंतरचा पण बुध्दपूर्व आहे यात शंका नाही. कांही इतिहास तंज्ज्ञांनी इ.स. पूर्व १५०० नंतरचा काळ उत्तर वैदिक काळ मानला आहे. परंतु याच कालखंडात घडलेले रामायण आणि महाभारत नेमके कोणत्या वर्षात घडले या विषयी एक वाक्यता नाही. तसेच ही दोन्ही महाकाव्ये कधी लिहिल्या गेलीत या विषयी सुद्धा एकमत दिसत नाही. तरी या अध्यायात उपलब्ध ग्रांथिक पुराव्यावरुन इ. स. पूर्व १५०० ते इ. स. पूर्व ६०० या ९०० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडातील विश्वकर्मा समाजाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
रामायण, महाभारत सारखेच तोलक्कापियम हे तमीळ महाकाव्य सुद्धा याच कालखंडातले आहे. आर्य दक्षिणेत आले ते इ. स. पूर्व १० व्या शतकात. तोलक्कापीयम इ.स. पूर्व १००० चे दक्षिण भारताचे चित्र स्पष्ट करते. तोलकापियम या महाकाव्याचा भाष्यकार नच्चीनारकीनियर म्हणतो की, तोलक्कापियम हे काव्य वेद व्यासाच्या पूर्वी रचल्या गेले आणि वेदव्यसाचा काळ तो इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व १००० गृहीत धरतो.चम्हणजे रामायण, महाभारत ही महाकाव्ये आणि हरिवंश भागवतादी पुराणे या कालखंडातील विश्वकर्मा समाजाच्या स्थिती गतीची माहिती पुरविण्यास उपयोगी पडतील.
मत्स्यपुराणानुसार रामायणाचा नायक व अयोध्येचा राजा राम हा इक्ष्वाकु वंशाचा असून इक्ष्वाकु हा वैवस्वत मनुचा पुत्र होता आणि वैवस्वत मनुची उत्पत्ती विश्वकर्मा पुत्री ‘संज्ञा’ पासून झाली तेव्हा वैदिक काळापासून रामायण कालापर्यंत कितीतरी पिढया संपल्या व नव्यानव्या भूभागावर जेथे पूर्वी राज्ये नव्हती, तेथे राज्ये निर्माण झालीत. अयोध्या मिथिला ही राजधानीची नगरे तर पूर्वी पासूनच भरभराटीस आली होती. चौदा वर्षाच्या वनवासात राम जेव्हा दक्षिणेत आला, तेव्हा त्याला राज्यांची माहिती झाली. सुग्रीवाने विदर्भ, ऋषिक, महिष्क, कलींग, काशिका, आंध्र, पूंड्र चोल, पांड्य व केरळ ही तत्कालीन राज्याची माहिती दिली. किष्कींधेवर (आधुनिक हंपी) वालीचे राज्य असून दक्षिण गोदावरी खोऱ्यात रावणाचे अधिपत्य होते. त्याला जनस्थान नाव होते. आणि तेथे सर्वत्र राक्षस प्रस्तापित झाले होते. दक्षिणेतील कांही बराच मोठा भूभाग अरण्यमय होता. त्यातील दंडकारण्यात विरध, कबंध, दुंदुभि, खर, दूषण, त्रिशिरस हे राक्षस राहत होते, ते सर्व रावणाचे सहकारी होते. रावणाची लंका म्हणजे एक वैभवशाली साम्राज्य होते. म्हणून त्याला सोन्याची लंका म्हणत. पांड्याच्या राज्याला सुद्धा सुवर्णादी किंमती वस्तूंच्या विपुलतेमूळे कवतम म्हणून ओळखत. उत्तरेतील आर्यांच्या आक्रमणाआधीपासूनच दक्षिणेतील असूर आणि राक्षस तसेच वानर या मानव वंशीयांनी आपली राज्ये भरभराटीस आणली होती. आणि ती विद्या, कला, कारागीरीने समृद्ध होती.
महाभारत काळात तर एकाहून एक सरस राज्ये अस्तित्वात आली होती. त्यात दरद, कंबोज, काश्मिर, वाहीक, गंधार, केकय, मद्र, कुलुत, श्रीकंठ, त्रिगर्त, कीर, ब्रह्मवर्त, कुरु, पंचाल, मत्स्य, मरुभुमि, सिंधू, सौवीर, कच्छ, आनर्त, वलभी, खेटकमंडल, सुराष्ट्र, मालव (अवंती) शूरसेन, कोशल, विदेह (मिथिला), मगध, अंग, गौड, नेपाल, भोटदेश, कामरुप (प्राग्जोतिष), वंग, समतट, ताम्रलिप्ती, राढ, जेजाकभुक्ती, चेदि, दशार्ण, ओड्र, दक्षिण कोसल, कलिंग, विदर्भ, अपरान्त, कर्णाट, मुतिब, आंध्र, मुरल, वनवासी, चोल आणि पांड्य ही राज्ये होती. आणि त्यांच्या राजधान्या सुद्धा नावलौकिकास आल्या होत्या. तक्षशिला, इंद्रप्रस्थ, अहिछत्र, कान्यकुब्ज, मथुरा, द्वारका, प्रभासतीर्थ, भृगुकच्छ, अयोध्या, श्रावस्ती, प्रयाग, काशी ही कांही नगरे अनेक दृष्टीने महत्वपूर्ण होती. तत्कालीन राज्याच्या राजधान्या प्राकाराने वेष्टित असत यांना दुर्ग अशीही संज्ञा होती. आदर्श नगरे त्यांनाच म्हटली जात, जी सुदृढ प्राकार आणि खंदकांनी युक्त असत आणि त्यात हत्ती, घोडे, रथ मोठ्या प्रमाणात असून विद्वान लोक, धार्मिक लोक व शिल्पी लोक वास करीत असत. एवढेच नव्हे तर आचार्य, पुरोहित, स्थपति, दैवज्ञ, चिकित्सक, प्राज्ञ, मेधावी, दक्ष, शूर, बहुश्रुत, कुलिन व सत्वसंपन्न व्यक्ती अशा नगरांत असणे गरजेचे असे.
डॉ. चक्रपाणी चोप्पावार


Leave a Reply