नवीन लेखन...

कर चले हम फिदा….: मदन मोहन

युद्ध म्हटले की बंदुका, तोफा, मशिनगन्स, युद्धनौका,विमाने, बॉम्बस्,गडगडाट, परीसर दणाणून सोडणारे आवाज वगैरे वगैरे डोळ्या समोर येतात. या सर्व गदारोळात संगीत कसे असणार? फार फार तर मिलटरी बॅन्ड एवढाच काय तो संगीताशी संबंध असणारा भाग. बाकी सर्व मन आणि शरीराला भयकंपीत करणारेच असते. भारतीय सैन्यात असाच एक तरूण सामिल झाला होता. इराक मधल्या बगदाद शहरात रायबहादूर चुन्नीलाल नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जन्मलेल्या या तरूणाने बालपणाचा पाच वर्षांचा काळ बगदादमध्येच घालवला होता. १९३२ मध्ये रायबहादूर चुन्नीलाल मुंबईत आले व नंतर सिनेमा व्यवसायतील एक मोठे प्रस्थ बनले. बॉम्बे टॉकीज व फिल्मीस्तान या त्याकाळच्या नावाजलेल्या सिनेनिर्मितीच्या संस्थेत भागीदार झाले. तो तरूण सैन्यात दाखल झाला खरा पण त्या वातावरणात त्याचे मन रमेना. बंदुकीच्या गोळ्या वा मशिनगन्सचे आवाज त्यांच्या कानावर जेव्हा पडत तेव्हा त्याच्या मनात खोल कुठेतरी सतारीच्या तारा झंकारत….अलवार स्वरांचे सूर खुणावत…शेवटी १९४६ मध्ये त्या तरूणाने सैन्यातील नोकरीला बाय बाय केले आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काही तरी करावे म्हणून मुंबईला आला.

सुदैवाने येथे त्यानां ऑल इंडिया रेडिओत नोकरी मिळाली आणि येथूनच मदनमोहन कोहली या तरूणाचा संगीतकार मदनमोहन असा प्रवास सुरू झाला. ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांची गाठ पडली संगीतातील दोन महान दिग्गजांशी. पहिले शहनाई नवाज उस्ताद बिस्मिला खान व दुसरे उस्ताद फैय्याज खान यांच्याशी. त्याचवेळी संगीतकार रोशन देखील या रेडिओ स्टेशनवर कामाला होते. स्वत: मदन मोहन यांनी रूढर्थाने संगीताचे असे शिक्षण घेतले नव्हते मात्र या नोकरीच्या वास्तव्यात त्यांना या दोन दिग्गजाकडून संगीतातले मर्म आत्मसात केले. मदनमोहन यानां चित्रपटात संधी मिळाली ती मास्टर गुलाम हैदर या संगीतकारामुळे. मात्र संगीत दिग्दर्शनाची नाही तर गाणे गायनाची. ‘शाहीन’ नावाच्या चित्रपटात त्यांनी चक्क लताजी बरोबर ही दोन गाणी गायली. पूढे १९५० मध्ये मात्र संगीत दिग्दर्शनची पहिली संधी आंखे या चित्रपटाद्वारे मिळाली. मात्र पाच सहा वर्षे संघर्षातच गेली.

१९५६ मध्ये आला एव्हीएम या दक्षिणेतल्या प्रसिद्ध बॅनरचा किशोर व अशोक कुमार अभिनीत ‘भाई भाई’ हा चित्रपट. यातील जवळपास सर्वच ११ गाणी खूप गाजली आणि मदनमोहन यांना यशाची पहिली चव चाखता आली. “कदर जाने ना…” “ए दिल मुझे बता दे”….”थंडी थंडी हवा”…ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर सहज येतात. बेगम अख्तर हा मदनमोहन यांचा विक पॉईंट. त्यांच्या गझला आणि भारतीय वाद्ये त्यांच्या नसानसात भिनलेले होते. मुशायरात म्हटली जाणारी गझल व नज्म त्यांनी चित्रपटात आणली, तेथून ती प्रेक्षकाच्या घरात व हृदयात पोहचली. याचे श्रेय संगीतातील सर्वच दिग्गज संगीतकार खुल्या मनाने मदनमोहन यानां देतात ते योग्यच आहे.

त्यानां क्रिकेटचेही अफाट वेड होते. आताचे ब्रेबॉन स्टेडियमच्या जागी पूर्वी एक मोकळे मैदान होते जिथे तासन तास मदनमोहन क्रिकेट खेळत असत. बेगम अख्तरचे सूर, सैन्यातील कठोर शिस्त आणि क्रिकेटचं वेड हे तिन्ही गुण त्याना संगीत देतानां खूप उपयोगी पडले. एस.डी.बर्मन व सी.रामचंद्र यांच्याकडे त्यांनी सुरूवातले सहाय्यक म्हणून काम केले पण त्यांच्या संगीतावर मात्र त्यांचा प्रभाव पडला नाही. अतिशय मोजक्या वाद्यमेळासह ते आपले गाणे तयार करत. सतार, तबला ढोलकी, सॅक्सोफोन यांचा अप्रतिम वापर त्याच्या संगीतात बघायला मिळतो. त्यामूळे गायकांच्या गाण्याचे आवाजाचे सर्व तपशील त्यांच्या गाण्यात आढळून येते. ‘अनपढ’ चित्रपटाचे ‘आप के नजरोमे समझा प्यार के काबील मुझे’ या एका गाण्याच्या मोबदल्यात संगीतकार नौशाद आपला गाण्याचा सर्व खजिना लुटायला तयार होते. ‘हकीकत’या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातील रफीचे ‘कर चले हम फिदा जानोतन साथीयों…..’ हे गाणे म्हणजे त्यांनी भारतीय सैन्याला दिलेली मानवंदनाच आहे. तर याच चित्रपटातील ‘हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा’…….हे गाणे म्हणजे भारतीय जवानांच्या हृदयाच्या छेडलेल्या ताराच आहेत. ‘नैनिहाल’ मधील ‘मेरी आवाज सुनो’ हे रफीचे गाणे पंडीत नेहरूनां अर्पण केलेले गाणे होते….उस्ताद रईस खान यांच्या सतारीचा वापर अनेक गाण्यात त्यांनी इतका अप्रतिम केला आहे की स्वत: लता दीदी ‘आज सोचा तो आंसू भर आये’ या गाण्यातील सतारीचे सूर ऐकून हळव्या झाल्या होत्या. ‘वो चूप रहे तो’(जहाँ आरा)….’रस्मे उल्फतमे’(दिल की राहे)…..’नैनो मे बदरा छाये’(मेरा साया)….या गाण्यातील सतारीचे सूर आजही अंग मोहरून टाकतात.

राजा मेंहदी अली खान, राजेन्द्र कृष्ण आणि कैफी आजमी या तिन गीतकारां सोबत त्यांचे खूप सुंदर असे टयुनिंग होते. यांच्या सोबत केलेली सर्वच गाणी खूप गाजली. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील काही चित्रपट वगळता सर्वच खूप ब्लॉक बस्टर असे नव्हते. मात्र त्या चित्रपटातील गाणी खूप गाजली. लोक चित्रपट विसरले पण गाणी नाही विसरले. जवळपास १०० चित्रपटानां संगीत दिलेल्या मदनमोहन यानां पुरसकार मात्र कमीच मिळाले. १९७० मधील आलेल्या “दस्तक” चित्रपटातील “बयाँ ना धरो या गाण्याने” मात्र त्यानां राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘आप की नजरो ने समझा’…(अनपढ) आणि ‘लग जा गले की’…(वह कौन थी?) या दोन गाण्यानां फिल्म फेअर नॉमिनेशन मिळाले पण पुरस्कार नाही मिळाला. अनेकदा अनेकानां नाही मिळत पुरस्कार पण त्यामुळे त्यांच्या स्थानाला काहीच धक्का पोहचत नाही. ….आजच्या काळातही जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी अत्यंत तन्मयतेने “लग जा गले की आज ये”….. गाऊ लागते तेव्हा तिला हेही माहित नसते की ज्या संगीत दिग्दर्शकाचे ती गाणे गात आहे त्याकाळात तिच्या वडीलांचाही जन्म झाला नसेल. काही संगीतकार, साहित्यीक वा विचारवंत हे कालातीत असतात. खरं तर ५१ वर्षे हे काही असं एक्झीट घेण्याचं वय नाही. मदनमोहन खूप लवकर हे जग सोडून गेले.. त्यांच्या मृत्यू नंतर अनेक गझला, नज्म, कविता, शायरी यानां अनाथ् झाल्या सारखं वाटलं असेल.

-दासू भगत (२५ जून २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..