नवीन लेखन...

लता थोरली

पहाटेची शरीर सुखावणारी गुलाबी थंडी. मी पांघरुणात स्वत:ला लपेटून घेऊन पडलेली. त्या सुरेल, सुमधुर आवाजानं मला जाग आणली होती, गोड आवाजातील मधुर सरगम थेट माझ्या कानात शिरली होती. डोळे किलकिले करून पाहिलं, रोजच्यासारखीच आजही ती मोठा तानपुरा पुढय़ात घेऊन गात होती. सडपातळ, काहीशी कृश, दुबळी शरीरयष्टी, तानपुरा वर जेवढा उंच दिसत होता तेवढय़ाच तिच्या दोन लांब वेण्या जमिनीवर रुळलेल्या होत्या. काही कळत नाही की थोरली केव्हा उठते नि गाऊन गाऊन माझी झोप कशी उडविते. नेहमीसारखीच आजही मी त्या भावमधुर आवाजाने मंत्रमुग्ध होऊन गेले आणि तो आवाज कानात साठविताच पुन्हा झोपी गेले. मी जेव्हा उठले तेव्हा सूर्य खूप वर आला होता. ती न्हाऊन शुचिर्भूत झाली होती नि पुन्हा बाबांच्या समोर बसून गात होती.

माई सांगत असे की, जेव्हा मी दोन-तीन महिन्यांची होते तेव्हा ही थोरली मला घेऊन खूप धावपळ करी. मी तिला खूप आवडे. माझे मोठे मोठे फुगलेले गाल आणि त्यावर पडणाऱ्या खळय़ा तिला खूप आवडत. माझ्या गालावरची खळी तिची कळी खुलवीत असे. एकदा अशीच ती मला घेऊन धावत असताना जी पडली ती पहिल्या माळय़ाच्या जिन्यावरून धडधडत सरळ जमिनीवर आली. तिच्या डोक्यावर मोठी खोक पडली. बापरे फारच भयानक! त्यानंतर कितीतरी दिवस ती अंथरुणावरच पडून होती. तिचे हे प्रेम माझ्या जन्मभर आठवणीत राहिलं आहे. कारण माझ्या डाव्या भुवईच्या टोकाला पडलेली खोक जरी चटकन बरी झाली असली तरी तिची खूण कायमच राहिली आहे.

तशी ती फार वाईट आहे. दुसऱ्यांना चिडवण्यात तिला खूप मजा वाटते. तिचे पातळ ओठ खूपच नाजूक आहेत आणि डोळय़ात तर साऱ्या दुनियेचा खटय़ाळपणा भरलेला आहे. तिच्या डोळय़ांच्या वर ज्या दोन भुवया आहेत ना त्या खूप मोठय़ा आहेत. डोकं लहानसं, नाक सरळ, चेहरा अंडय़ासारखा आणि डोक्यावर केस.. ओहो! मी एवढे लांबलचक नि घनदाट केस कधी पाहिलेच नाहीत. पण तिची त्वचा बघून माझ्या मनाला त्या वेळी खूप दु:ख झालं. माई सांगायची-ही वाचली हेच माझं नशीब. तिला अशा देवी आल्या होत्या तशा ईश्वरानं कुणालाही आणू नये. तीळ ठेवायला जागा उरली नव्हती आणि माई तेव्हा हेही म्हणायची की, देवी जाताना काही ना काही घेऊनच जातात. पण सुदैवाने हिचा गळा आणि डोळेही वाचले, पण चेहऱ्यावर देवीचे व्रण मात्र राहिले. रंग जो केवडय़ासारखा गोरा-पिवळसर तो गव्हाळी रंगात बदलला.

दिवस जात होते. आमचं शिक्षण होत होतं आणि त्याबरोबर गाणंही. गाणं ती शिकत होती. पुण्यात ‘खजांघी’ चित्रपट लागला होता, आणि त्या चित्रातील गाण्यांची स्पर्धाही ठेवली होती. माझ्या काकांनी (मावशीचे यजमान) कुणाला काही न विचारताच थोरलीचं नाव तिथं दिलं होतं. बाबा खूप गरम झाले, आणि म्हणाले, ‘‘हे बघ पहिला नंबर नाही आला तर घरात पाऊल ठेवू नकोस.’’ ती रडतच राहिली. तिचं हे रडणं पाहून मला खूप वाईट वाटलं. पण ईश्वरी कृपेने तिचा खरोखरीच पहिला नंबर आला.

आणि असाच एक काळाकुट्ट दिवस उजाडला. बाबा आम्हाला सोडून गेले! तिनं आम्हाला एका खोलीत बसवलं आणि दरवाजा बंद करून घेतला. ही तर एकदम मोठीच झाली ! माईचं रडणं चालूच. घरी येणारी-जाणारी मंडळी हळूहळू कमी होत आहेत. नव्हे त्याचं येणं-जाणं जवळजवळ बंदच झालं आणि नंतर तर ती कामही करू लागली. माईने सांगितले -‘आता आपल्याला पुणे सोडून कोल्हापूरला जायचं आहे..’

आणि एके सकाळी आम्ही सारे कोल्हापूरला पोहोचलो. ती काम करण्यासाठी स्टुडिओत जाई. फारच कमी पैशात काम करीत असे, पण आम्ही सगळे मजेत होतो. ती खूपच जास्त, गरजेपेक्षा अधिक मेहनत करायला लागली होती. एके दिवशी ती परीचं गाणं गात होती. सकाळी उठली तर अंगात १०२ ते १०३ डिग्रीपर्यंत ताप वाढला होता.

माई भयभीत झाली होती. म्हणायला लागली, ‘‘आमच्यासाठी तू एवढी सक्त मेहनत करायला नको होतीस. तुला एवढं मर मर काम करायला नको. आज तू शूटिंगला जाऊ नकोस.’’ पण तिनं ते मानलं नाही. म्हणाली, ‘‘आज शूटिंगला जायलाच हवं.’’ आणि ती गेली.

चांगले वाईट दिवस सगळय़ांनाच पाहायला मिळतात. सुखानंतर दु:ख नि दु:खानंतर सुख हे नियतीचं रहाटगाडगं चालूच असतं. आणि हे तिनं म्हटलं ते तरी कुणाला ? ज्यांच्या नाटक कंपनीत दोनशेहून अधिक लोक काम करीत होते आणि आम्हा लहान मुलांनासुद्धा मालकीण मालकीण म्हणून बोलवत असून त्या मुलांना केवळ दैवाचा खेळ उरफाटा म्हणून भिकारी म्हणून घेण्याची पाळी आली होती! पण जेव्हा आम्ही मुंबईला आलो, तेव्हा हीच आमची थोरली त्यांच्या घरी जाऊन तांदूळ पोहचवीत असे. एवढंच काय, पण त्यांचे दिवस वाईट आले तेव्हा तिनं आपल्या गाण्याच्या कार्यक्रमाद्वारे पैसा गोळा करून त्यांना दिला. फार मोठं मन आहे तिचं.

एके दिवशी मी तिच्याबरोबर मिनव्‍‌र्हा स्टुडिओत जात होते.प्रथम ट्रेननं जावं लागे व मग तेथून पायीही खूप चालावं लागे. शिवडीच्या बाजूला सोहराब मोदींचा तो स्टुडिओ होता. आम्ही अकरा-बारा वाजता वडाळा स्टेशनांत पोहोचलो. अन् ऊन एवढं कडाक्याचं पडलं होतं की, त्या वेळच्या डांबरी रस्त्यावरचं सारं डांबर पार वितळून गेलं होतं. थोरलीचा पाय नेमका असाच वितळलेल्या डांबरात पडला आणि तिच्या पायातील चप्पल एकदम सरकून तिचा पाय त्या गरम डांबरात पडला. आणि तिनं एक जोरदार किंचाळी मारली!

तिच्या पायाला चिकटलेले ते डांबर काढून टाकण्याचा मी माझ्यापरीने खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते तसेच पायाला चिकटून राहिलं. ती तशीच लंगडत लंगडत स्टुडिओत पोहोचली. तेथे कुणीतरी रॉकेल आणून दिलं तेव्हा कुठं त्या डांबरानं तिचा पाय सोडला. पण तरीही तिचा पाय त्या गरम वितळलेल्या डांबरानं चांगला भाजून निघाल्यामुळे सारखा जळजळत होता.

मी तिच्याकडे पाहिलं तीन वाजून गेले होते. पण तिच्या चेहऱ्यावरून भूक लागल्याची साधी अस्पष्टशी कल्पना येत नव्हती. माझ्याच समोर घरी एक कप कॉफी ती प्याली होती. आणि ती अजूनपर्यंत तशीच माझ्यासमोर आहे. आणि एवढं सारे खाऊनही आता माझ्या पोटात भुकेने कावळे कोकलू लागले होते. पण तिला काही होतच नाही. कमाल आहे तिच्या सहनशीलतेची. ती शिकतच होती, गातच होती. आणि ते गाणे शिकवणारे तरी काय अजिब? ते काहीच विचारीत नव्हते की काही खाणार का? चहा वगैरे काही पिणार का? आणि कुणी विचारून तरी काय फायदा होणार होता म्हणा! तिनं चटकन सांगितलं असतं, ‘‘नको, नको आम्ही तर भरपूर न्याहारी करूनच घरून बाहेर पडलो आहोत.’’

०००

नंतर मी लग्न केलं आणि माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यानंतरची गोष्ट. माझ्या प्रसूतीचा समय अगदी नजीक येऊन ठेपला होता. ती खूपच काळजीत होती. मी इस्पितळात गेले. २९ जूनला माझं तिसरं बाळंतपण झालं. मला मुलगा झाला. तो पोटात असतानाच भरल्या ताटावरून मी रस्त्यावर आले होते. थोरली त्याला पाहायला इस्पितळात आली. नर्सनं मुलाला आणून तिला दाखवलं. काय योगायोग माहिती नाही. पण मुलानं डोळे उघडल्यावर तिच्याकडे सरळ बघतच राहिला. मुलाला तर काहीच माहीत नव्हतं, पण थोरली त्याच दिवशी त्याची आई बनली होती.

जेथे आम्ही राहात होतो त्या वाळकेश्वर भवनाला लिफ्ट नव्हती. त्यामुळं इस्पितळातून घरी आल्यावर मी तयार नसतानाही मला बाळ, त्याचे दोस्त यांनी खुर्चीवर बसवून वर नेलं. मी घरी आले. पाहिलं तर तिनं आपली झोपण्याची खोली माझ्यासाठी सजवून तयार ठेवली होती. एक पाळणापण आहे. आणि त्यावर एक अत्यंत आकर्षक जाळीही लावलेली आहे.

नाना चौकातील शंकरशेट मंदिराजवळील घरात आम्ही राहात असताना मी माझ्या घरच्या मंडळींना सोडलं होतं. नंतर हे लोक वाळकेश्वरला गेले. १९४७ ते १९५९ पर्यंतच्या बारा वर्षांत तिनं खूप काही पाहिलं.

मी जेव्हा या घरी आले तेव्हा ती मराठी बोलताना त्यात अनेकदा हिंदी शब्दांची भेसळ करीत असे. अधिक तर हिंदी शब्द असत. पण तिनं आपल्या मातृभाषेचा पूर्ण अभ्यास केला आहे. ती ज्ञानेश्वरी वाचते, सकाळी सूर्यमंत्र वाचते, देवघरात तासभर असते. जेव्हा ती देवघरातून बाहेर पडते तेव्हा तिचे डोळे लाल, सुजल्यागत वाटतात. मी सारं जाणते.

आता आम्ही पेडर रोडवरील ‘प्रभुकुंज’मध्ये राहायला आलो आहोत. तिचे दोन फ्लॅट आणि माझा एक-दोघांच्यामध्ये एक दरवाजा आहे. त्यामुळे आमचं सारं कुटुंब एक होतं. आनंद जसजसा वाढत होता तसतसा घरातील आनंद वृद्धिंगत होत होता. आनंद चार-पाच महिन्यांचा झाला तेव्हा ती त्याला घेऊन दायीसह कोल्हापूरला गेली. ती त्याला न्हाऊ घालीत असे. दुधाची बाटली घेऊन बसत असे.

कधी त्याची प्रकृती ठीक नसली तर माई, मीनाताई त्याला सोडतच नसत. थोरली तर त्याचं रडणंही ऐकून ओरडे, ‘‘का रडतो आहे तो? त्याला खायला द्या. मुलाला रोजच कशाला आंघोळ घालता? पहात नाही तो रडतो ते? त्याचे कपडे बदलू नका.’’ या साऱ्याचा अर्थ हाच की, त्याला रडवू नका. मी एकदम संतापून उठे, ‘‘तो रडेल म्हणून त्याला आंघोळ नाही घालायची? साफ, स्वच्छ नाही करायचं? तो जे मागेल ते त्यांना देत जायचं. वा, फार छान, त्याला अगदी गुळाचा गणपती, लाडुलं बाळ बनवून ठेव. रडल्याखेरीज का कोणी मोठं झालं आहे?’’

माझं हे सारं बोलणं ऐकून ती आपल्या दोन्ही कानात बोटं घाली आणि आपल्या खोलीत जाऊन खोलीचा दरवाजा धाडकन बंद करून घेई. हीच तिची राग व्यक्त करण्याची पद्धत आहे.

आपलं मत ती खूप विचार करून व्यक्त करते. मला सल्ला देताना अनेकदा विचारांची उजळणी होते. तिला माहीत आहे कदाचित मी मानणारही नाही. पण माझ्याबद्दल तिचा दृढ विश्वास आहे की, आशा जे काही करील त्याची आपल्याला अगोदर अवश्य कल्पना देईल, आशा कधी खोटं नाही बोलणार.

एके दिवशी एका माणसानं थोरलीला येऊन सांगितलं, ‘‘मी आशाला सन अ‍ॅण्ड सॅण्ड हॉटेलमधून बेहोश होऊन निघताना पाहिलं.’’ त्याचं हे बोलणं ऐकून ती जोरात हसली व म्हणाली, ‘‘तुम्ही जर मला येऊन सांगितलं असतं की, आशानं कुणाला मारलं, तर ते मी जरूर मानलं असतं. पण खरोखरच जर ती पीत असती तर तिनं मद्याची पहिली बाटली माझ्यासमोरच खोलली असती!’’

हा विश्वास मी तिच्या हृदयात निर्माण केला आहे.

हां, तर काय म्हणत होते.. माईवर तिचं प्रेम आहे. एकटीच माई काय, कुटुंबातील साऱ्यांवरच तिचं प्रेम आहे. आम्हाला तर तिचं उदंड प्रेम मिळालं आहे. पण आज माझ्या, मीनाताईच्या व बाळच्या मुलांवरही ती तितकेच प्रेम करते. गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्यात, त्यांना आर्थिक साहाय्य करण्यात तिला अपार सुख लाभतं, तशी ती जुनाट मतांची, खूपच कर्मठ विचारसरणीची आहे. जुनं ते सोनं समजणारी आहे.

मध्यंतरी तिला फोटोग्राफीचा, छायाचित्रकलेचा नाद लागला होता. आणि त्यातही तिनं गाण्याइतकंच प्रावीण्य संपादिलं आहे. लोकांची नक्कल करण्यात तर या थोरलीचा कुणी हात धरू शकणार नाही. ज्या व्यक्तीची ती नक्कल करीत असेल तिला जर तुम्ही अगोदर पाहिलेली असेल तर तुमचं हसून हसून नक्कीच पोट दुखेल, वाचनाचा तिला असाच खूप शौक आहे. खास करून काव्य, शेरशायरी, ऐतिहासिक ग्रंथ, कथा, लेख आदी विविध प्रकारच्या साहित्यात ती विशेष रस घेते. या वाचनामुळे तिला खूप आनंद मिळतो.

चौदा वर्षांची असतानाच ती उर्दू शिकली. तुम्ही तिच्याशी पंजाबीत बोला नाहीतर बंगालीत बोला. ती त्याच भाषेत तुमच्याशी बोलेल. तिला कितीतरी भाषा अवगत आहेत. पण त्याचं ती कधी प्रदर्शन नाही मांडणार. आणि कोणी तिच्यासमोर आपली बढाई मारायला सुरुवात केली तर ती फक्त हसेल आणि तिच्या खोलीत निघून जाईल.

प्रत्येक माणसात गुणांबरोबर दोषही असतातच. आमच्या थोरलीचा सर्वात मोठा दोष म्हणजे ती थोडी हलक्या कानाची आहे. थोडीफार संशयी वृत्तीची आहे.

कुणी तिची कसलीही वस्तू घेतली असली तर तिचा तिला कधीच विसर पडत नाही. साडी देईल आणि आपण ती दहा वर्षांनंतर नेसा ती जेव्हा ती बघेल तेव्हा हळूच म्हणेल ‘‘ही साडी मी कुठंतरी पाहिली आहे.’’

पण तिचे गुण एवढे मोठे आहेत की त्यापुढं हे दोष असून नसल्यासारखेच आहेत.

ती फार कमी बोलते, ती भित्री आहे, माझं व तिचं अनेकदा भांडण होतं. लोकांना वाटतं, चला, झालं आपलं काम, दोघीही एकमेकींपासून झाल्या दूर. पण कोणी हे जाणत नाही की कात्रीची दोन्ही पाती वेगवेगळी जरूर होतात पण ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा जो त्यांच्यामध्ये सापडेल त्याचाच तुकडा पडतो. ती लहान होती तेव्हा इंग्रजी नियतकालिकातील चित्र काढून त्याचा संग्रह करणे हे तिचं अत्यंत आवडीचं काम होतं. तिनं अशी किती तरी चित्रं जमा करून ठेवली होती की, त्यांचा काही हिशोब नाही. आज ती लंडन, अमेरिका, कॅनडामध्ये स्वत: घेतलेल्या छायाचित्रांना आनंदजवळ बसून आल्बममध्ये नीट ठेवते आहे. अगदी कलात्मकरीत्या.

चित्रांच्या गोष्टीवरून एक आठवण झाली. थोरली जेव्हा सर्वप्रथम कार्यक्रमासाठी लंडनला गेली होती, तेव्हा तिला जो आदर-सत्कार, मानसन्मान मिळाला होता तसा तो क्वचितच कुणाला मिळाला असेल. रॉयल अल्बर्ट हॉलसारख्या ठिकाणी जगातील सर्वोत्तम कलाकारच आपले कार्यक्रम सादर करू शकतात. तेथे आमची ही थोरली पांढरीशुभ्र साडी पेहनून गेली, ना नाच, ना मिमिक्री की ना भव्य वाद्यवृंद. कसलाच झगमगाट नाही, काहीच भव्य दिव्य नाही. फक्त तिचा आवाज, आवाज आणि आवाज!

त्या हॉलमध्ये सतत तीन दिवस कार्यक्रम रंगत राहिले. सारेच्या सारे कार्यक्रम हाऊस फुल्ल! मग त्यानंतर कॅनडा (टोरॅण्टो) मध्ये जो कार्यक्रम झाला तो तर विक्रमच ठरला. बारा हजार लोकांची सोय असलेल्या तेथील मेपल लीफ गार्डनमध्ये आमच्या थोरलीपूर्वी फ्रँक सिनात्रासारख्या विश्वविख्यात कलाकाराच्या कार्यक्रमास फक्त सहा हजार लोक उपस्थित होते आणि थोरलीच्या कार्यक्रमाला बारा हजार लोकांनी सभागृह खचून भरले होते!

मला ती शापित अप्सराच वाटते, कुणाच्या तरी शापानं तिला पृथ्वीवर फेकून दिलं आहे, पण शाप देणारा नेमका तिची सुवर्णवाणी काढून घ्यायला विसरला असावा!

तिला आपल्या कामापेक्षा अधिक काहीच प्रिय नाही. जेव्हा ती घरात असते तेव्हा अगदी वेगळी असते आणि जेव्हा ती बाहेर कामावर असते तेव्हा तिच्यात दुसऱ्याच स्त्रीचे दर्शन घडू लागते. तेव्हा ती माझ्याशी बोलणार नाही तेथे ती आपल्या जनतेतील ‘इमेज’ ला जपत असते. आणि त्याच इमेजवर, प्रतिमेवर तिचं जीवनही आहे.

आज तिला गाणं आणि मुलांपेक्षा दुसरं काहीही अधिक प्रिय नाही.

आमच्यात फूट पाडण्याचा खूप प्रयत्न झाला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. होत नाही. कालच मी माईला सांगत होते. ‘माई पाच बोटांचा पंजा बनतो आणि जेव्हा ही बोटं बंद होतात तेव्हा मूठ बनते आणि त्या मुठीचा राग कसा होतो? तर माई, आम्ही तुझी पाच बोटं आहोत ना.’’

– आशा भोसले

बस्स, समझनेवालेको इशारा काफी है।

– शब्दांकन: वसंत भालेकर (‘रसरंग’, २५ नोव्हेंबर १९७८ वरून साभार)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..