नवीन लेखन...

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ६)

सत्याग्रहींची स्फूर्तिदायी गाथा

भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सत्याग्रहानं लोकांना प्रेरणा दिली. मायभुमीवरील प्रेमापोटी लोक त्यागाला सज्ज झाले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधिक तीव्र बनला. गावोगावचे लोंढेच्या लोंढे सत्याग्रहासाठी येत होते. त्यासाठी त्याना कोणाची सक्ती नव्हती, कोणाचा आग्रह नव्हता. मातृभाषेवरील प्रेम व मायभुमीची ओढ त्यांना खेचून आणीत होती. लोक स्वयंस्फूर्तीने लढ्यात भाग घेत होते,  त्यागाला सज्ज होत होते.

स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिलेले नेते लढ्याचं नेतृत्व करीत होते. परकीयांशी संघर्ष केलेले लोक न्यायासाठी आता स्वकीयांशी लढायला सज्ज झाले होते. त्याना कोणत्या पदाची अभिलषा नव्हती वा सत्तेचा हव्यास नव्हता. स्वकीयांच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या समाज बांधवांची मुक्तता नि भाषा, संस्कृतिचं रक्षण हाच त्यांचा ध्यास होता.

पारतंत्र्यातल्या नरक यातना लोकांना स्वातंत्र्यात भोगाव्या लागत होत्या, याचं त्यांना मोठ दु:ख होतं. भाई बागलांनी मातृभाषेवर कसं प्रेम करावं याचं उत्कृष्ट उदाहरण जनतेसमोर ठेवलं. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. एक नोव्हेंबर १९५८ रोजी त्यांना अटक झाल्यानंतर ४ नोव्हेंबरला न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. बागलांनी आरोप पत्रांची प्रत देण्याची मागणी केली. त्यांना प्रत देण्यात आली, परंतु ती होती कानडीत. त्यांनी कानडीतील आरोप पत्र स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला नि सरकारला खडसावून सांगितलं, ‘आमचा अट्टाहास आहे तो याचसाठी. आम्हाला कानडी येत नाही, आमचे विचार आमच्या मतृभाषेत मांडता येत नाहीत. लोकांना त्यांच्या भाषेत बोलता यावं, व्यवहार करता यावा, यासाठीच तर भाषावार प्रांतरचना झाली, मग आमच्यावरच हा अन्याय का ?’  आरोपपत्राची प्रत इंग्रजी किंवा मराठीत देण्याची त्यांची मागणी होती. परिणामी त्या दिवशी न्यायालयाला कामकाज बंद ठेवावे लागले.

लोक शिक्षेला घाबरत नव्हते. सत्यासाठी त्त्याग करायला ते सज्ज होते. भाई बागल, क्रांतिवीर नानासाहेब पाटील यांच्यासारखे नेते लोकांचा आदर्श बनले.  बेळगाव शहराचे आमदार बा. रं. सुंठकर व तालुक्याचे आमदार व्ही. एस. पाटीलही आंदोलनात आग्रेसर होते. स्थानिक लोकांना मार्गदर्शन करीत होते. व्ही. एस. पाटलांचं तर पोलिसी लाठिमारात डोकं फुटलं होतं.

याच काळात एका थोर क्रांतिकारकांनं सत्याग्रह करून सीमावासीयाना प्रेरणा दिली. ते होते क्रांतिसिंह नानासाहेब पाटील! कारवारात नानासाहेब व कारवारचे काशीनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच आंदोलन झालं. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन सीमावासीयांत नवचैतन्य निर्माण केलं.

सत्याग्राहात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. कोल्हापूरच्या आमदार विमलाबाई बागल, नानासाहेब पाटील यांच्या मातोश्री गोजराबाई पाटील, कन्या हंसाबाई पाटील व स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. महिला स्वयंस्फूर्तीने आंदोलनात भाग घेत होत्या, कारावास सहन करीत होत्या.

सत्याग्रहाचं लोन खानापूर, निपाणीतही जाऊन पोहोचलं. खानापूरच्या लोकांनी प्रत्येक घरातून एक सत्याग्रही पाठवून एक आदर्श घालून दिला. आमदार एल. बी. बिर्जे आंदोलनाचं नेतृत्व करीत होते. हुतात्मा कमळाबाई मोहितेपासून प्रेरणा घेऊन निपाणीत महिला सत्याग्रहीचे जथेच्या जथे बाहेर पडत होते. निपाणी शहरात सभा, मिरवणुकीवर बंदी होती. म्हणून शहराबाहेर महिला सत्याग्रहींना निरोप देण्यात येत होता. केवळ मराठाच नाही, तर भाषेच्या मुद्यावर जैन, ख्रिश्चन, मुस्लीम बांधवही आंदोलनात स्वयंप्रेरणेने सहभागी होत होते.

हिंडलगा कारागृह सत्याग्रहीनी खचाखच भरले. तिथे ना अन्नपाण्याची सोय ना औषधांची. सत्याग्रहींचे उपासमारीने हाल होऊ लागले. पुढे बळ्ळारी, मंगळूर, गुलबर्गा कारागृहात सत्याग्रहींना पाठविण्यात येऊ लागले. कांही सत्याग्रहीना तर रात्रीच्यावेळी जांबोटी, कणकुंबीच्या घनदाट अरण्यात सोडण्यात येत होते. घनदाट जंगल, ना रस्त्यांची सोय, ना अन्नपाण्याची. त्यातच रानटी श्वापदांची भिती. अशा अवस्थेत किर्र अंधारातून वाट काढत, जीव मुठीत धरून खानापूर किंवा बेळगावपर्यंत पायी यायचे. पण ते कधी थकले नाहीत, कधी दमले नाहीत वा आंदोलनापासून दूर गेले नाहीत. माय महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते संघर्ष करीत राहिले, लढत राहिले. त्यांचे हे अधुरे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आजच्या पीढीने उचलली पाहिजे. स्वाभिमान, अस्मिता जागृत ठेऊन लढ्याला सिध्द झाले पाहिजे.

(क्रमश:)

— मनोहर (बी. बी. देसाई)

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..