नवीन लेखन...

कुतुब मिनार – भारताच्या इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार

भाजप नेते श्री माधव भांडारी यांच्या कुतुबमिनार या विषयावरील अभ्यासपूर्ण पुस्तकातील एक प्रकरण


तथाकथित मशीद म्हणून दाखवल्या जाणाऱ्या या इमारतीच्या बाजूला एक बांधकाम उभे आहे त्याला ‘सराई’ म्हटले जाते. ‘सराई’ हा हिंदी-उर्दू शब्द सोडला तर त्या इमारतीत ‘मुस्लीम’ म्हणण्यासारखे काहीच नाही. ‘सराई’ म्हणजे यात्रेकरू किंवा प्रवाशांसाठी बांधलेला निवारा – धर्मशाळा. आपण महाराष्ट्रात त्यांना ‘ओवऱ्या’ म्हणतो. अशा प्रकारच्या ‘ओवऱ्या’ आणि धर्मशाळा, सराया संपूर्ण भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातील देवळात, देवळांच्या आसपास आजही पहायला मिळतात. ‘कुव्वत उल इस्लाम’ असे नामकरण केलेल्या ह्या तथाकथित मशिदीच्या आवारातील या सराईचे बांधकाम शुद्ध भारतीय, हिंदू पद्धतीचे आहे हे एखाद्या सामान्य माणसाच्या देखील लक्षात येईल.

तिथून पुढे जाऊन आपण कुतुब मिनारपाशी आलो तर सुरुवातीलाच केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने लावलेला एक फलक आपले स्वागत करता. असा सरकारी फलकही मी फार कुठे पाहिलेला नाही. ‘कुतुब उद्दिन ऐबकने २७ हिंदू व जैन मंदिरे उध्वस्त करून; त्या सामुग्रीने व त्याच जागेवर हा मिनार व मशिदी बांधल्या’ असे या फलकावर अधिकृतपणे नोंदवले आहे. हा फलक पहिले पंतप्रधान पं. नेहरूंच्या काळात लावलेला आहे. त्यामुळे त्यावर ‘इतिहासाचे विकृतीकरण’ किंवा ‘इतिहासाचे भगवेकरण’ वगैरे शिक्का मारता येणार नाही. हिंदू व जैन मंदिरांचा विध्वंस करुन, त्याच सामानाचा वापर करुन त्याच जागेवर बांधल्या गेलेल्या किमान २५०० मशिदी तरी भारतात आहेत. पण भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक संचितावर घातल्या गेलेल्या दरोडयाची नोंद पं. नेहरूंच्या ‘सेक्यूलर’ सरकारने अधिकृत रितीने नोंदवून ठेवल्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे.

तो सारा परिसर फिरताना विध्वंसाच्या खुणा पावला पावलावर भेटत राहतात. मनोऱ्याच्या दोन्ही बाजूंना दोन इमारतींचे अवशेष आहेत. त्यांचाही उल्लेख ‘मशिदी’ म्हणून केलेला आहे. पण त्या दोन्ही इमारतींमध्ये मशिदीचे एकही लक्षण दिसत नाही. त्या दोन्ही इमारती म्हणजे एखाद्या मंदिरांचे सभामंडप असावेत हे कोणीही सांगेल. त्या साऱ्या प्रांगणात गणपती, महावीर जैन, शिव-पार्वती, यक्ष व अप्सरा, सवत्स धेनू, मंगल कलश, घंटा, गोमूख अशी असंख्य हिंदू चिन्हे पदोपदी सापडतात. अगदी एक पुष्करिणी सुध्दा आढळते. मनोऱ्याच्या भिंतींवर भरपूर कलाकुसर केलेली आहे. त्यात कुराणातले उतारे सुद्धा कोरलेले आहेत. त्या कोरीव कामाच्या आधारानेच हा मनोरा मुसलमान राज्यकर्त्यांनी बांधला असा दावा ‘स्वयंघोषित मान्यवर इतिहासकार’ करतात. पण त्या उताऱ्यांच्या जोडीला त्याच भिंतींवर कोरलेल्या वेलबुट्टी, साखळ्या, घंटा एवढेच नव्हे तर अनेक संस्कृत शब्दही बघायला मिळतात. ही सर्व कलाकुसर, त्यात वापरलेल्या प्रतिमा, चिन्हे ही खास हिंदू प्रतिमा आणि चिन्हे आहेत. विशेषतः ‘घंटेचे’ अस्तित्व हे अधिक बोलके आहे. कारण इस्लामी समजुतीनुसार ‘घंटा हे सैतानाचे वाद्य’ आहे. ते चिन्ह मुस्लीम बांधकामात येऊच शकत नाही. अलीकडच्या काळात मनोऱ्याच्या आणि मशिदीच्या भिंतींचे

काही दगड सुटून पडले. त्यावेळेला त्यां दगडांच्या मागच्या अथवा आतल्या बाजूवर हिंदू देव देवतांच्या मूर्ती आढळून आल्या. अशा सापडलेल्या मूर्ती नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात नेऊन ठेवल्या आहेत असे सांगितले जाते.

पण त्या सगळ्या परिसरातील सर्वात थक्क करणारी वस्तू जर कोणती असेल तर ती म्हणजे तेथे उभा असलेला पुरातन ‘लोहस्तंभ’ ! ‘मेहरौली’ किंवा ‘दिल्लीचा लोह स्तंभ’ या नावाने ओळखला जाणारा हा स्तंभ किमान १७०० वर्ष जुना आहे यावर सर्व विद्वानांचे एकमत आहे. कारण त्या स्तम्भावरच तसे कोरलेले आहे. चंद्रगुप्त (पहिला, सन ३१९-३३५) किंवा चंद्रगुप्त (दुसरा, सन ३७५ ४१४) या दोघांपैकी कोणातरी एकाच्या कारकिर्दीत हा ‘विजयस्तंभ’ उभारला गेला हे त्या स्तंभावरील ब्राह्मी लिपीतील लेखावरून स्पष्ट होते. पण त्यापलीकडे त्या स्तंभाबद्दल कोणतीही नीट माहिती त्या ठिकाणी दिलेली नाही. २३ फूट ८ इंच (७.२१ मिटर) उंचीचा आणि सुमारे ६१०० किलो वजनाचा हा स्तंभ संपूर्ण ओतीव आणि एकजिनसी आहे. त्याला एकही सांधा नाही. तब्बल सतरा अठरा शतके ऊन-वारा-पाऊस खात, उघड्यावर उभा असलेला हा स्तंभ अद्याप यत्किंचितही गंजलेला नाही. आधुनिक धातूशास्त्रालाही याबद्दल आश्चर्य वाटते.

कोणती रासायनिक प्रक्रिया आणि तंत्रज्ञान वापरून हा स्तंभ घडवला गेला असावा याचा शोध घेण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू आहे. आता भारतीय धातूशास्त्र संस्थेने (Indian Metallurgical Institute) त्याचे संशोधन पूर्ण करून काही निष्कर्ष काढले आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या स्तंभाकरिता वापरलेले लोखंड अत्यंत शुध्द (९९.७ टक्के लोह) असून त्यात फॉस्फरस व कार्बन अल्प प्रमाणात मिसळले आहे. या स्तंभाच्या शिरोभागी सपाट बैठक असून त्यावर पूर्वी एखादी मूर्ती – बहुधा गरुडाची – बसवलेली असावी असा तज्ञांचा अंदाज आहे. त्या स्तंभावर आणखीही बरेच मजकूर कोरलेले आहेत. पण ते वेगवेगळ्या काळातले असून स्तंभाची निर्मिती किंवा इतिहास याबद्दलची अधिक माहिती मिळवायला त्या मजकुराचा काही उपयोग होत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या स्तंभाबद्दल पाश्चात्यांना व एकूणच आधुनिक जगाला प्रचंड जिज्ञासा आहे. एकोणिसाव्या शतकातील ब्रिटीश इतिहास संशोधकांनी हा स्तंभ ब्राँझचा ठरवला होता. कारण ज्या काळात भारतामध्ये हा स्तंभ ‘घडवला’ गेला होता त्या काळात आजचा यूरोप टोळीयुध्दात गर्क होता. ‘त्या’ काळात, भारतामध्ये हा स्तंभ ‘बांधला’ गेला होता, एवढ्या जुन्या काळात कच्च्या लोखंडावर एवढी प्रगत रासायनिक प्रक्रिया करण्याइतकी वैज्ञानिक प्रगती भारताने केलेली असू शकेल ही कल्पनाच कनिंगहॅमसारख्या ब्रिटीश इतिहास लेखकाला आवडणारी नव्हती. त्यामुळे त्याने हा स्तंभ ब्राँझचा ठरवून टाकला. बुद्धी गहाण टाकलेल्या डाव्या इतिहासकारांनी सुद्धा तीच री पुढे ओढली. धर्म निरपेक्षतेचा गजर करणारे काँग्रेसी राज्यकर्ते आणि वाममार्गी बुध्दीवंत सत्य दडवण्यासाठी कोणत्या थराला जातात आणि काय काय युक्त्या-प्रयुक्त्या लढवतात ते इथे बघायला मिळते. २७ हिंदू व जैन मंदिरे पाडून त्यांच्या सामानातून उभा केलेला मनोरा ‘कुतुब मिनार’ म्हणून नोंदवला जातो, त्याच्या निर्मितीचे श्रेय कोणा कुतुब उद्दीन ऐबक नामक लुटारू आक्रमकाला कौतुकाने दिले जाते, ‘इस्लामी’ स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमूना म्हणून त्याचा उदो उदो केला जातो!! पण किमान १७०० वर्षापूर्वी ज्याची निर्मिती सम्राट चंद्रगुप्ताने (मग तो पहिला असो वा दुसरा !) केली असे ज्याच्यावर स्पष्टपणे नोंदवलेले आहे व ती नोंद वाममार्गी आणि काँग्रेसी सरकारच्या इतिहास कारांनाही मान्य आहे; त्या स्तंभाची नोंद आणि उल्लेख मात्र ‘मेहरौली’ किंवा ‘दिल्ली’ स्तंभ म्हणून केला जातो. कां? तर सम्राट चंद्रगुप्ताचे नाव त्या स्तंभाशी जोडले तर तो स्तंभ भारतीय – हिंदू संस्कृतीचा निर्देश करेल आणि मग भारताच्या पुरातन संस्कृतीची, प्रगतीची ओळख दडपता येणार नाही म्हणून! कुतुब उद्दीन ऐबकने दरोडा घालून लुटलेला माल हे त्याच्या ‘विजयाचे

गौरवशाली स्मारक’ आणि चंद्रगुप्ताने अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरून उभारलेला स्तंभ मात्र एका किरकोळ खेड्यातील तेवढाच किरकोळ; काहीही महत्त्व नसलेला खांब !! हे आपल्या देशामध्ये गेल्या शतक भरात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेल्या धर्मनिरपेक्षतेचे आणि उदारमतवादी बुद्धी प्रामाण्याचे स्वरूप आहे.

असे असले तरी हा मनोरा आणि लोहस्तंभ ह्या दोघांबद्दल वेगळ्या पद्धतीने व दृष्टीने संशोधन करण्याचे प्रयत्न देखील अनेकांनी केले आहेत. कै. पु. ना. ओक यांचा उल्लेख मी सुरुवातीलाच केला आहे. प्रा. एम. एस. भटनागर नामक दिल्लीमधील एका प्राध्यापकांनी सन १९६१ पासून जवळपास १५ वर्षे या मनोऱ्याचा व परिसरातील इतर इमारतींचा अभ्यास केला. त्या संशोधनाच्या आधारे त्यांनी असा दावा केला होता की, दिल्ली जवळचा मेहरौली या नावाने ओळखला जाणारा परिसर म्हणजे सम्राट विक्रमादित्याच्या राजधानीचे ठिकाण होते. वराहमिहीर हा सुप्रसिद्ध गणितज्ञ, ज्योतीर्विद्याविद विक्रमादित्याच्या दरबारी होता. वराहमिहिराच्या अवकाश निरीक्षणत्याच्या अभ्यासासाठी त्या परिसरात सम्राट विक्रमादित्याच्या काळात एक भव्य वेधशाळा उभारली गेली होती. वराहमिहीरावरून ‘मिहीरावली मेहरौली’ हे नाव पडले असा दावाही भटनागर यांनी केला आहे. आजचा मनोरा त्या वेधशाळेचा भाग असून तो अवकाश निरीक्षणासाठी बांधला होता. त्याला ‘विष्णू स्तंभ किंवा ध्रुव स्तंभ’ म्हणत असत असेही प्रा. भटनागर यांचे म्हणणे आहे. त्यांनी १९७५च्या सुमारास एक खाजगी विमान वापरून त्या परिसराचे व मनोऱ्याचे हवाई छायाचित्रण केले. त्याची एक पुस्तिका त्यांनी १९७७ मध्ये प्रसिद्ध केली. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की हा स्तंभ कमलाकार आहे. त्याच्या माथ्यावर २४ पाकळ्यांचे कमळ स्पष्ट दिसते व एकूण रचनेवरून त्या कमळावर ब्रह्मदेवाची मूर्ती बसवलेली असावी व स्तंभाच्या म्हणजे मनोऱ्याच्या पायाशी शेषशायी भगवान विष्णूची भव्य मूर्ती असावी; ती मूर्ती नंतरच्या आक्रमणात व विध्वंसात नष्ट झाली असावी; असाही त्यांचा तर्क आहे.

ह्या परिसरातील लोहस्तंभाला प्रा. भटनागर ‘गरुडध्वज’ म्हणतात. प्रा. भटनागर म्हणतात त्या प्रमाणे त्या स्तंभावर असलेल्या ब्राह्मी लिपीतील लेखानुसार असे स्पष्ट दिसते की सम्राट चंद्र याने आपल्या विजयाचे स्मारक म्हणून हा स्तंभ उभारला. हा स्तंभ ज्या जागेवर उभा आहे त्याला ‘विष्णुपद गिरी’ म्हणत असत असेही त्या लेखावरून दिसते. ‘विष्णू पदगिरी’ नामक कोणत्या तरी अन्य ठिकाणी दुसऱ्याच कोणीतरी उभारलेला हा स्तंभ चंद्रगुप्ताने इथे आणून उभा केला असा दावाही काही इतिहासकार करतात. ह्या लोह स्तंभाच्या माथ्यावर सुद्धा एखादी मूर्ती – बहुधा गरुडाची – बसवलेली असावी असे एकंदर रचनेवरून वाटते. प्रा. भटनागर यांनी देखील तसा दावा केला आहे. मात्र मनोरा आणि लोहस्तंभ या दोहोंबद्दल ही सगळी मांडणी करताना त्यांनी ठोस पुरावे कुठेच दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांची सगळी मांडणी म्हणजे केवळ तर्क शक्तीचा खेळ वाटतो.

– माधव भांडारी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..