नवीन लेखन...

कोकणी माणसाचे इरसाल नमुने

इथल्या निसर्गाने इथल्या माणसाला कणखरपणा दिला, त्याच्या मनगटात कर्तृत्व गाजवण्याची ताकद दिली. इथल्या मातीतले अनेक नमुने आपापली छाप लोकांच्या मनावर कोरून गेले. पालघर पासून ते कुडाळ पर्यंत अनेक लोकांना भेटता आलं आणि एक गोष्ट जाणवली की इथला प्रत्येक माणूस ही एक स्वतंत्र संस्था आहे. प्रत्येकाच्या जगण्याच्या तर्‍हा निराळ्या, जगण्याचे संदर्भ निराळे, त्याच्या सुखाच्या कल्पना निराळ्या.


कोकण म्हटले की सहज समोर येतात नारळाच्या बागा, एका समांतर नसलेला भूभाग, तिथल्या हापूस आंब्याचा बागा आणि लगडलेले काजू. तिथला समुद्र आणि त्यात चाललेली मासेमारी, गुंठ्याच्या हिशोबाने चाललेली इथली भातशेती आणि ह्या सगळ्यात रमणारा कोकणी माणूस. त्याच्या बोलण्यातील तिरमिरीतपणा, पाय ठेवीन तिथे पाणी काढण्याची हिंमत, बोलण्या-चालण्यातला त्याचा रुबाब ह्या सगळ्या गोष्टी आपसूकच डोळ्यासमोर उभ्या ठाकतात. मुंबईच्या अरबी समुद्रापासून ते तेरेखोलच्या खाडीपर्यंत पसरलेली ही कोकणभूमी, ह्या सातशे वीस किलोमीटर्स समुद्रकिनाऱ्याच्या खाऱ्या पाण्याच्या बाजूने रहाणारी ही खडबडीत पण गोड माणसं ह्या भूमीच्या एकंदरीत सौदर्यात भर घालतात. ह्या सगळ्या माणसानी आपल्या विशिष्ट बोलीने ह्या भूमीचे वैशिष्ट्यपण जपले, पालघर-वसई पट्ट्यातील सामवेदी बोली, रायगड, अलिबाग मधली आगरी बोली, खाली उतरताना रत्नागिरी, संगमेश्वर येथील बाणकोटी, संगमेश्वरी बोली आणि दक्षिण कोकणातील मालवणी बोली ही एकंदरीत मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे आहेत.

इथल्या निसर्गाने इथल्या माणसाला कणखरपणा दिला, त्याच्या मनगटात कर्तृत्व गाजवण्याची ताकद दिली. इथल्या मातीतले अनेक नमुने आपापली छाप लोकांच्या मनावर कोरून गेले. पालघर पासून ते कुडाळ पर्यंत अनेक लोकांना भेटता आलं आणि एक गोष्ट जाणवली की इथला प्रत्येक माणूस ही एक स्वतंत्र संस्था आहे. प्रत्येकाच्या जगण्याच्या तर्‍हा निराळ्या, जगण्याचे संदर्भ निराळे, त्याच्या सुखाच्या कल्पना निराळ्या.पालघरच्या डहाणू भागातून येणारी सुनंदा ताई मला कॉलेजला जाताना रोज भेटायची. सुनंदाताई डोक्यावर खाऊच्या पानांचा आणि पाच सहाशे केळीच्या पानांचा गड्डा घेऊन दादरच्या फूल बाजारात सकाळी पाच वाजता हजर असायची. इथे पाच वाजता येण्यासाठी सकाळी तीनला तिने घर सोडलेलं असायचं. शटलच्या गर्दीत खाऊच्या पानाची पिशवी उशीला घेऊन रात्रीची उरलेली झोप पूर्ण करत दादरला आल्यावर मानेचा काटा मोडेल की काय असा कोणाला भास होईल एवढं वजन उचलून ती स्टेशनचे जिने चढून दादरच्या मार्केट मध्ये ठेलेवाल्यांना आपण सोबत आणलेला माल देऊन परत मागे फिरायची.वाटेत कोण ओळखीचा भेटला की, ‘कटे जातस रे दादा’ असं म्हणत पुन्हा शटल पकडायला धावायची. ही तिची धावपळ कोणासाठी होती?. घरात शिकणारी मुलं होती, त्यांच्या शिक्षणासाठी पैसा हवा म्हणून हा रेटा मोठ्या कष्टाने ढकलत होती. कोणी मला सांगितले की दहा वर्षाचा संसार केला आणि एका छोट्या आजारात तिचा नवरा गेला, पण ही बाई हिमतीने उभी राहिली. नवरा गेला तो दिवस सोडला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ती आपल्या वाडीत उभी राहिली. ह्या तीस वर्षाच्या बाईकडे ही धीरोदात्त वृत्ती कुठून आली, उत्तर कोकणातील माती ही अशीच आहे. ती माती एकदा पायाला लागली की माणसाच्या वृत्तीत आणि प्रकृती धर्मात हा बदल येतोच.

कोकण रेल्वे सुरू झाली आणि एसटीच्या प्रवासाला नको म्हणणारा कोकणीमाणूस पुन्हा कोकणातील आपल्या गावी वरच्यावर जाऊ लागला. सकाळी पाच वाजता दिवा स्टेशनला सहज फेरी मारली की अनेक कोकणी नमुने पाहायला मिळतात. दिवा गाडी म्हणजे लेकुरवाळी. अगदी पन्नास- साठ रुपयात माणूस आपल्या गावात पोचतो. रोहा, महाड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी पर्यंत जवळजवळ संपूर्ण गाडी खाली होते पण ह्या गाडीत भेटलेला हरी सावर्डेकर मला  शंकासुर वाटतो. मनात अनेक शंका घेऊन जगणारा हा हरी जगण्याच्या कुठल्या बाजूने कलत जातो हे कसे कळेल?. एकदा मी दिवा गाडीने प्रवास करत होतो. हंगामाचे दिवस नव्हते तरी गाडीला बऱ्यापैकी गर्दी होती. चिपळूणला बहुतेक लोक उतरले. डब्यात पुढचा प्रवास करणारे खूप कमी प्रवासी उरले, मी खालच्या सीटवर आडवा झालो, बाजूच्या सीटवर एक माणूस बसला होता. त्याने मी काय करतो, कुठे राहतो याची चौकशी केली.

‘ट्रेनने गावी जायचं म्हणजे रीस्कीच हाय ना?’

मी म्हटलं, ‘कसली रिस्क?.’

त्यावर तो माणूस म्हणाला, ‘अव रिस्क नाय तर काय! एकादे वेली ही गाडी रुलावरून घसरली म्हंजे?….किती रिस्क ना?’

त्यावर मी देखील, ‘रिस्क कुठल्या गोष्टीत नाही. जेवताना ठसका लागला तरी ते रिस्की आहे वगैरे’ माझ्या पदरची वाक्ये मी त्या माणसाला ऐकवली. त्यावर ‘व्ह्य व्ह्य रिस्क सगल्याबाबतीत हाय’ अशी प्रतिउत्तरे देत होता. गाडी काही वेग घेत नव्हती. हळूहळू एक एक स्टेशन येत होतं. शेवटी वैतागून त्या माणसाने वरच्या बर्थवर आडवे होण्यासाठी मधला बर्थ काढला आणि त्याचे बंध व्यवस्थित लावून पुन्हा मधल्या बर्थवर दाब देऊन बंध व्यवस्थित लागले की नाही याची खात्री केली. सगळे सोपस्कार झाले आणि हा माणूस मधल्या बर्थवर झोपायला गेला. एखादे स्टेशन गेले आणि मला,

‘वो सायेब जरा बगा माझी सिट बरोबर लागली ना?’

मी त्याला ‘हो’ म्हणालो.

दर दहा मिनिटाने मला तोच प्रश्न विचारत राहिला तेवढ्यावेळ मी त्याला तेच उत्तर दिले. शेवटी मी वैतागलो आणि त्या गृहस्थाला ‘तुम्ही खाली या मी वर झोपतो’ असं म्हणून आम्ही आमच्या बर्थचा खांदेपालट केला आणि बर्थवर आडवे झालो.

हा माणूस तरी अस्वस्थ. खालच्या बर्थवर झोपला पण सारखा उठून सीटचे बंध नीट आहेत की नाही याची खात्री करत राहिला. मी त्याला विचारले नक्की काय झाले त्यावर हा महापुरुष मला म्हणतो,

‘आव, तुमी वर झोपलात पण एकादेवेली हा बंध तुटला तर तुमी खाली पडाल आणि माझा हाड मोडून जायल.’

मला हसावे की रडावे ते कळेना. कोकणातला माणूस अशा घटनाना विशेष महत्त्व न देणारा, पण त्याच्या मनात एक शंका नेहमी असते तो म्हणजे समोरचा माणूस खूप गोड बोलू लागला की आपल्या घबाडाकडे याचे लक्ष आहे याची त्याला सूक्ष्म शंका येतेच. आपल्या जमीनजाग्याबद्दल हा माणूस भलताच जागरुक. आपली दहा-पंधरा गुंठे जमीन असेल पण त्या जमिनीवर आपल्या सगळ्या वारसदारांचे नाव यायला हवे याबद्दल इथला माणूस तसा भलताच जागरूक. आपल्या जमिनीवर ह्या माणसाचे खूप प्रेम, प्रसंगी त्यासाठी कोर्टात दिवाणी दावे टाकले असतील पण जेव्हा कोकण रेल्वे आली, मुंबई-गोवा रस्त्याचे चौपरीकरण हे प्रकल्प राबवले गेले तेव्हा पिढ्यान्पिढ्या जपलेल्या आपल्या जमिनी इथल्या माणसाने हसत हसत दिल्या.

इथला माणूस तसा गोष्टीवेल्हाळ. ह्या गोष्टीवेल्हाळ माणसाच्या आत काही जळत असते. गौरी गणपतीला आजूबाजूच्या घरात मुंबई-पुण्याहून त्या त्या घरातल्या लेकी सुना, पोरं बाळे आली पण खारेपाटणच्या सुनंदामामीकडे कोणी येत नाही. ती आतून अस्वस्थ होते पण कोणापुढे दुःखाचे कड काढत बसत नाही पण बोलण्यात ह्या बाईंचा हात कोणी धरू शकणार नाही. पदोपदी एखाद्याला कोड टाकत बोलणारी ही बाई तशी महाखमकी. तिला कोणी विचारले की,

‘गे आवशी, सदा कोकणेचे घर कुठे?’

त्यावर ‘कोकाणेचा घर खाली आसा पण सदा काय कोण तो माका ठावक नाय. त्याच्या बापाशीन माका त्याच्या बारशाचे घुगरे खावक काय माका बोलावूक नाय.’ ह्या बाईला ह्या सदा कोकणेचे घर खाली आहे हे सरळ सांगता आले असते पण इथली बोली इथल्या कोकणी रस्त्यासारखी नागमोडी!

आमच्या बाबी पेडणेकराला शिरी कुवळेकराचे घर कुठे आहे असं विचारले की, बाबी मागचा पुढचा कसलाही विचार न करता ‘शिरीचा घर व्ह्यत्या खालच्या पाणंदीन गेलास की दोन घरा सोडून त्याचा घर’ असं उत्तर देतो मग पुढे त्याला जास्त लांब नाही ना असा प्रश्न केला की, ‘लाम्ब खयचा त्याच्या घराक आग लागली की माझ्या मांडवात्सुन गमता’ अशी उत्तरे ऐकताना विचारणारादेखील गार पडतो. इथल्या आंब्या फणसाचे सगळे गुण इथल्या माणसाच्या रक्तात उतरले आहेत.

कोकणची माणसे साधी भोळी असा गीतात उल्लेख असला तरी इथल्या समुद्राने इथल्या माणसाला त्याची गाथा गायला शिकवली. कोकणी माणूस आता परंपरेला धरून नाही पण आधुनिकतेला आपलेसे करतो आहे. अनेक नमुने ह्या मातीत मिसळले. त्यांच्या जगण्याला एक विशिष्ट आयाम आहे. दुपारी भात आणि माशाचे सार जेवून झोपी जाणारा कोकणी माणूस अंतर्यामी कुठेतरी जागा आहे. इथल्या माणसाचा फटकळपणा ठाई ठाई दिसून येतो. त्याची बोली शिवराळ आहे. अगदी प्रथमदर्शनी समोरच्या माणसाचा गैरसमज होईल इतका हा माणूस फटकळ. एखाद्या अनोळखी माणसालादेखील ‘काय रे मायझया कोणाचो रे तू?’ असं विचारायला इथला माणूस कचरत नाही. असे अनेक नमुने इथल्या मातीत आहेत, ज्यांचा उल्लेख कुठल्या पुस्तकात नाही, कुठल्या यशस्वी लोकांच्या यादीत नाही पण बोलणारा चालणारा प्रत्येक माणूस ह्यांची आठवण नक्की काढतो कारण माणुसकीचा एक निरंतन झरा ह्या माणसांच्या हृदयातून वाहत असतो.

–वैभव साटम

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..