नवीन लेखन...

कोकण विकासाची संधी

या विषयाला सुरुवात करण्याआधी कोकणाबाबत थोडं… कोकण

‘कोकण’ म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व तिला आधार देणारा दिवा.

‘कोकण’ म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.

‘कोकण’ म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा, त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या.

‘कोकण’ म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं जातं, आजीने सारवलेली चूल फुंकून ओलसर झालेला कारभारणीचा चेहरा.

‘कोकण’ म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ, सातमाी, सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, सागरेश्वर,

‘कोकण’ म्हणजे गर्द देवराई, त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ.

‘कोकण’ म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारं निशाण, त्याला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई.

‘कोकण’ म्हणजे देवाचार, त्याच्या चपलांचा आवाज. मनात असलेली भीत, वाडवडिलांची पुण्याई.

‘कोकण’ म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा. फणस आणि डोलणारी माडा-पोफळीची झाडं.

‘कोकण’ म्हणजे पतेरा, बकुळीचा धुंद वास, करवंदाची घनदाट जाळी आणि कण्हेरीची फुलं.

‘कोकण’ म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण.

‘कोकण’ म्हणजे चुलीवर भाजला  जात असलेला बांगडा, भाकरी आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा.

‘कोकण’ म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या आठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.

‘कोकण’ म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे आणि वाटप घातलेली उसळ.

‘कोकण’ म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली पिठी, सुकत असलेली आंब्याची साठं आणि मुरत असलेलं लोणचं.

‘कोकण’ म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर.

‘कोकण’ म्हणजे पेप्सी खात जाताना दिसणारी पोरं, डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.

‘कोकण’ म्हणजे महापुरुषाची पूजा, वडा, भात, उसळ आणि डबलबाज्या.

‘कोकण’ म्हणजे दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या आणि उंच निघून जात असलेले कंदिल.

‘कोकण’ म्हणजे होळी, गोडाचं जेवण, गाडलेला खांब, केली जाणारी किंवा केलेली शिकार आणि मारलेल्या बोंबा.

‘कोकण’ म्हणजे पाटीवर काढलेली सरस्वती, शाळेत नेलेल्या काकड्या, उदबत्त्या आणि पोरांचं भजन.

‘कोकण’ म्हणजे गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा, पूजा, शिरा, मुखवटे, फुगे आणि खाजं.

‘कोकण’ म्हणजे नांदी, तबल्यावर पडलेली थाप, धर्मराजाची एन्ट्री आणि दशावताराची समृद्ध कला.

‘कोकण’ म्हणजे समुद्रावरचं, देवळातलं, पिपळाखालचं मळ्यातलं क्रिकेट आणि ‘टुर्नामेंट’.

‘कोकण’ म्हणजे समुद्र, किनारा, नाठाळ वारा, ती गाज आणि दूरवर गेलेली गलबतं.

‘कोकण’ म्हणजे चकवणारे मासे, लागलेली रापण, ओढणारे तांडेल आणि बघ्यांचा हा गलका.

‘कोकण’ म्हणजे सर्जेकोटची जेटी, चमचमणाऱ्या माश्यांचा लिलाव, दमून परत आलेल्या होड्या.

‘कोकण’ म्हणजे संपलेली सुट्टी. परत जायची तयारी, जड झालेल्या चाकरमान्याचा पाय आणि सगळ्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी.

‘कोकण’ म्हणजे खूप काही सांगू पाहणारा पूर्ण न उलगडणारा, कसलाच अंत नसलेला असा काशीविश्वेश्वराचा एक डाव…

सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्यातील अरुंद पट्टीला कोकण या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याचा एक भाग असलेला आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उत्तरेकडील झाई खाडीपासून दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंत 720 किमीचा समुद्र किनारा लाभलेल्या कोकणावर निसर्गाने सृष्टी सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे.

आज मुंबई शहर उपनगर तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड किंवा सिंधुदुर्गचा कोकणात समावेश होत असला तरी चिनी प्रवासी युआन च्यांग याच्या वर्णनावरून वनवासी, बेळगाव, धारवाड इत्यादी घाटापलीकडील प्रदेशाचा कोकणात समावेश होता असे दिसते. मध्ययुगात कोकणचे तीन भाग मानले गेले होते. तापीपासून वसईपर्यंत ‘बर्बर’ बाणकोटपर्यंत ‘विराट’, देवगडपर्यंत ‘किरात’. पूर्वी हा सारा प्रदेश अपरान्त नावाने ओळखला जाई त्याचे नाव कोकण कसे झाले याबाबत मतभिन्नता आहे. कोकण ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. परशुरामाची माता कुंकणा यावरून कोकण हे नाव पडले असावे असा मतप्रवाह आहे. कोणकोण म्हणजे डोंगरमाथा! यावरूनही कोकण हा शब्द आला असावा.

डॉ. कृष्णास्वामी अय्यंगार यांच्या मते कोकण हा शब्द  तामिळ भाषेतून निर्माण झाला आहे. कोकण हे  रूप  कोळ व काणम या दोन शब्दांच्या संयोगातून झाले असावे. सातव्या शतकातील प्रपंच हृदय या ग्रंथात कुपक, केरळ, मूषक, आळूक, पशुकोकण, परकोकण ही नावे आहेत. ही सप्तकोकणे केरळपर्यंत पसरलेली आहेत. परदेशी प्रवासी टॉलेमी याने गुजरात व उत्तर कोकण यास ‘लारिका’ व दक्षिण कोकणास ‘आरिका’ म्हटले आहे. काही प्राचीन ग्रंथात कुंकण, कुकण असेही उल्लेख आहेत. परशुरामाने जिंकलेली भूमी ब्राह्मणांना दान दिल्यानंतर आपणास राहावयास जागा उरली नाही हे पाहून परशुरामाने समुद्र शंभर योजने मागे हटवून अपरान्ताची भूमी निर्माण केली अशी अख्यायिका आहे. तर कोकण हा प्रांत ज्वालामुखीच्या उत्पातात समुद्रतळापासून वर आलेला प्रदेश आहे असे भूगर्भ शास्त्रज्ञांचे मत आहे. रायगडचा इतिहास बघताना कोकणाची ओळख आवश्यक असते.

कोकण…! स्वर्गीय निसर्ग सौंदर्याची खाण असलेले कोकण..! अपरान्तभूमी म्हणून गौरविलेले कोकण…! प्राचीन इतिहासाचा, गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा सांगणारे कोकण…! बाजारूपणाचा स्पर्श न झालेले देवभूमी कोकण…!  आणि आता कोकण रेल्वे पाठोपाठ येथील एकमेव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वेगाने होत असलेल्या विकास कामामुळे, येऊ घातलेल्या नवनवीन प्रकल्पामुळे ‘कायमस्वरुपी निवासी वास्तव्य ठिकाण’ म्हणून, निवांतपणासाठी, व्यापारासाठीही ‘कोकण’ जगभरातील अनेकांच्या मुखी घट्ट बसलंय! याची प्रचिती कोकणात सुरू असलेले विविध कल्पक वास्तुप्रकल्प आणि पर्यटन प्रकल्प त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता सहज येऊ शकते. त्या विषयीचे हे विवेचन…!

आधुनिक काळात कोकणही बदलतंय. विविध नवनव्या सुधारणांचा स्वीकार करताना आपले जुने आणि सर्वांना भावणारे कोकणीपण विविध वास्तू प्रकल्पांमध्ये जपताना दिसते.  मोठाले वास्तू प्रकल्प, रोहाऊस, फार्महाऊस, सदनिका प्रकल्प यांना मिळणारा प्रतिसाद, त्यातील कोकणीपण अनेक ‘विकास’ जाणीवपूर्वक जपताना आढळत आहेत आणि यामागे येथे येऊ इच्छिणाऱ्यांची कोकणच्या प्रेमाने भारलेली मानसिकता आहे. या मानसिकतेचा उपयोग करून कोकणात अधिकची आर्थिक, व्यावसायिक समृद्धी आणणे सहज शक्य आहे. पण आता आधुनिक पद्धतीच्या पर्यटन व्यवसायात या कल्पनेला काही लोकांनी वेगळे स्वरूप दिले आहे.  आज कोकणात पर्यटनाला येणाऱ्यांचे हॉटेलात उतरण्यासह इतर ठिकाणी उतरण्याचे प्रमाण वाढते आहे. यासाठी सेकंड होम म्हणून खरेदी केल्या जाणाऱ्या वास्तू प्रकल्पांचा उपयोग करून घेणे शक्य आहे. याचा विचार करून कोकणात काही प्रकल्पांनी आपली आखणी केली आहे.

भविष्यात या संपूर्ण व्यवसायात ही वाढती संधी आहे. कोकणातील तीर्थक्षेत्रदर्शन सांस्कृतिक पर्यटन, कोकणी संस्कृतीची ओळख यांचीही संधी येथे मिळते आणि याच आकर्षणापोटी मानवी समूह आज कोकणाकडे वळतो आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण शांत, निवांतपणे, आनंदात काही काळ जगता येईल अशी जागा शोधत असतात, अशा शोधकर्त्यांच्यासाठी कोकण सर्वोत्तम पर्याय म्हणून उभे राहिले आहे. आज कोकणातील अनेक वास्तूप्रकल्प केवळ विविध पर्यटनस्थळांच्या नजिक उभे राहत आहेत. त्यांना चांगले ग्राहक उपलब्ध होत आहेत. कामाचा आठवड्याभराचा ताणतणाव दूर करण्यासाठी गावात किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला प्रत्येकालाच आवडते. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, निरनिराळे पक्षी आणि खळाळणारा धबधबा, पाण्याचा आवाज असे मनमोहक रूप कोकणचे विशेष असले तरी  आज ही अनुभूती वास्तू प्रकल्पांतही घेता येते आहे. ज्यामुळे दिवसभराचा मानवी थकवा गायब होऊन मिळणाऱ्या समाधानामुळे अनेक पाऊले  कोकणात गुंतवणुकीसाठी आकृष्ट होताना दिसत आहेत. त्यांना कोकणीपणा जपणारे पर्याय उपलब्ध करून देणारे ‘विकासक’ हमखास यात यशस्वी होत आहेत, होणार आहेत यात शंका नाही.

पाणी, पर्यटन, प्रगत शेती, फलोद्यान, प्रक्रिया, वनशेती व वनौषधी आणि मत्स्य उद्योग ही कोकणच्या शाश्वत विकासाची सप्त सुत्री आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय आणि नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यात कृषी पर्यटन धोरण राबविण्यात आले आहे. या निर्णयाचा कोकणातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास, शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध, कृषी पूरक व्यवसायांना प्रोत्साहन, गावातील महिला तरुणींना रोजगाराची संधी देणे, लोककला आणि परंपरांचे दर्शन  घडविणे. पर्यटकांना प्रत्यक्ष शेतीतील कामाचा अनुभव देणे, प्रदूषणमुक्त व निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव देणे, असा या धोरणाचा उद्देश आहे. यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी  सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, कृृषी विद्यापीठे, शेतकऱ्यांच्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या मिळून कृषी पर्यटन केंद्र उभारू शकतात. या पर्यटन केंद्रांना पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल, म्हणजे त्यांना बँकेकडून कर्ज मिळू शकेल. वस्तू व सेवा कर तसेच विद्युत शुल्क सवलत इत्यादीचा लाभ घेता येईल. दोन एकर ते पाच एकरपर्यंत शेतीचे क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी राहण्याची सोय असलेल्या खोल्या असल्या तर या ठिकाणी भोजन व्यवस्था व स्वयंपाक घर असणे आवश्यक आहे. यामुळे कृषी पर्यटन वाढीस  लागेल आणि कोकणात यामुळे विकासाच्या संधी निर्माण होऊ शकतात.

लहानमोठ्या दऱ्या, समुद्राला जोडणाऱ्या खाड्या, समुद्रकिनारा यामुळे मत्स्यव्यवसाय हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. मत्स्यव्यवसायाचे प्रामुख्याने तीन विभाग पडतात. सागरी  मत्स्यव्यवसाय, निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय आणि भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय. मासेमारीबरोबर मत्स्यसंवर्धन ही संकल्पना अलीकडे दृढ होत चालली आहे. कोकणात सागरी मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. ठाणे व रायगड जिल्ह्यात तळी तलावांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने या  जिल्ह्यांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायही करण्यात येतो. कोकणातील खाजण जमीन क्षेत्र कोळंबी संवर्धनासाठी उपयोगात आणण्यात येते. कोकणात मासेमारी  या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची संख्या फार मोठी आहे.

कोकणच्या किनाऱ्यावर 1966-67 सालापासून नौकांचे यांत्रिकीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मस्त्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगीण प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), अलिबाग (रायगड), रत्नागिरी व मालवण (सिंधुदुर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय नौकायान, सागरी मासेमारी पद्धती, नौका इंजिनाची देखभाल व परीरक्षण इत्यादीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.

महाराष्टाची संपूर्ण किनारपट्टी नैसर्गिक साधनांनी संपन्न आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असणारे मत्स्यव्यवसाय क्षेत्र राज्याला कोट्यवधी रुपयाचे परकीय चलन मिळवून देते. मत्स्यव्यवसाय क्षेत्र रोजगार निर्मितीला पूरक आहे. उपलब्ध मत्स्य साठ्याचे योग्य रितीने व्यवस्थपन करून मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ मच्छिमार बांधवांनी घेतल्यास येणारा काळ  या व्यवसायासाठी फलदायी ठरेल. कोकणातील विकासाला मासेमारी व्यवसाय चालना देणारा ठरेल.

स्वयं सहाय्यता महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असून जवळच असलेल्या कारखानदारांनी महिला बचत गटांकडे कच्चा माल पुरवठा होण्याच्या दृष्टीने मागणी केल्यास अधिक सक्षम होतील. आज महिलांनी अनेक  उद्योग व्यवसाय, बचत गटाच्या माध्यमातून उभारले आहेत. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी म्हणून शासनही प्रयत्नशील  आहे. गावागावातील बचत गट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. रोजगार आणि आत्मसन्मान या दोन्ही चांगल्या गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून एखादी स्त्री कमावू शकते. संघभावनाही यातून जोपासली जाते. बचत गटामुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण झाली. या यशातून प्रेरणा घेऊन भारतानेही बचत गटांच्या माध्यमातून लघुत्तम उद्योगांना चालना देण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोकणाचा विकासही होत आहे.

आपल्या राज्यातील विशिष्ट भागांच्या विकासाची आणि अन्य भागांच्या मागासलेपणाची वारंवार चर्चा होते. वास्तविक स्थानिक जनतेने आपली प्रागतिक, कृतिशील मानसिकता पुढे आणणे, काही करण्याची क्षमता असलेल्यांनी आपल्या भागाचे पालकत्व स्वतःहून स्वीकारणे आणि राजकीय सत्तेवर दबाव आणून त्यांना या प्रक्रियेचे उत्प्रेरक होण्यास भाग पाडणे, हाच मागास भागांच्या विकासाचा मार्ग असू शकतो. मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देशासारख्या प्रदेशांतील जनतेने केवळ सरकार आणि नोकरशाहीवर अवलंबून न राहता प्रगतीच्या या त्रिसूत्रीच्या आधारे पुढची वाटचाल करायला हवी.

आज भारतात सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसायाला ‘रिअल इस्टेट’ क्षेत्र तसेच हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या उद्योगात खूपच सकारात्मकता आहे. यास्तव शासकीय स्तरावर या व्यवसायाच्या विकासासाठी पूरक वातावरण तयार व्हावे म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतात. कोकणात तर पर्यटन विकास, निसर्ग संवर्धनासाठीचे प्रयत्न, पायाभूूत सुविधा विकास या साऱ्या व्यवसायाला अधिक बळ देत असतात. आणि म्हणूनच या क्षेत्रात कोकणही आघाडीवर आहे. या व्यवसायाला थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाणही गेल्या काही काळापासून वाढू लागले असून याचा कोकणालाही उपयोग करून घेता येईल. आज जगातील अनेक देशांची गुंतवणूक या व्यवसायात भारतात होते आहे. व्यवसाय म्हणून कोकण क्षेत्र नक्कीच फायदेशीर आहे. त्यामुळे कोकणात ही गुंतवणूक वाढल्यास कोकणचे अर्थकारणही काही प्रमाणात बदलू शकते. अधिकाधिक आर्थिक उपलब्धी झाल्यास होणाऱ्या विकासाचा आनंद गुंतवणूकदारांना सुद्धा मिळणार आहे. ज्यातून गुंतवणूक वाढून संपूर्ण प्रगतीस वाव मिळू शकतो.

नवी संधी नवी आशा।
विकासाची नवी दिशा॥

प्रतिक्षा गुरव

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..