नवीन लेखन...

खेड्यातले येडे

(मव्हा आज्या मलं एक गोष्ट नेहमी सांगायचा…..)

लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्‍या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं. शहरात लय मज्जा आन छानशोकी आसते.शहरात बाया पॅनट आन शर्ट घालतातं,आखुड आखुड केस ठेवत्यात,बाप्यायवाणी गाड्या पळवित्यातं…..आसं काय नं काय….सहाजिकच गण्यालंबी शहराची भुरळ पडु लागली.त्यालं बी नेहमीच वाटायच आपण बी शहरात जावं ,खुप पैसा कमवावा,छान छान पोर्‍ही पाहाव्यात….जमलं तं एखांदी आखुड केसायची आन शर्ट पँट घालणारी पोरगी पाहुन तिकडच लगन करावं….आसे लय ईचार त्याच्या मनात येत आसतं.

मांघ एकदा मारोती कढाण्याचा पिर्‍या गावाकडं आलता तव्हा त्यालं रिझट लागला कि शहरात कामालं येतो आस गण्या मनला व्हता. पिर्‍या दोन वरसापसुन शहरात कामालं व्हता.कोंत्यातरी कंपनीत काम करत व्हता .आंजुक एखांद्या सालानं ते त्या कंपनीत परमानंटबी व्हणार व्हता मनं.त्यान गाव सोडलं आन कातच टाकली व्हती.आत्ता पिर्‍या चांगला गोरागोमटा दिसतं व्हता.ईन फिन करून राह्याचं.चांगला हिप्पी कट ठुलेला व्हता.चारमिनारची शिकरेट पियाचा.कोणालबी त्याचा लयच हेवा वाटायचा.आख्या गल्लीत फक्त पिर्‍याच्या घरी टि.व्ही व्हता.गावात मोबाईलबी फक्त पिर्‍याजवळच व्हता.त्यानं मांघल्याच उन्हाळ्यात घरबी चिमटीचं बांधलं व्हतं.मंग त्याच हे वैभव पाहुन गण्यालबी लवकरच शहराकड जावा वाटायचं.कव्हा एकदा मॅट्रिक व्हतो आन शहरात जातो आसं त्यालं व्हयाचं.पिर्‍याच नाय तं शहरात गेलेले गावातले सगळेच पोरं पिर्‍यासारकेच ट्यांडर झालेले व्हते.शहरात गेलं की माणुस ट्यांडर व्हते आस गण्यालं वाटायचं.
मंग एकदाचा गण्या मॅट्रिकलं पास झाला.त्यानबी मंग त्याच्या दोस्तायलं सांगतलं कि ब्वा मलं शहरात काम पाहा मनुन.गण्याच्या बापान मांघच पिर्‍या गावाकडं आलता तव्हा त्यालं गण्यालं तुह्यासंगच शहरात ने मनुन सांगतलं व्हतं.गण्याबी शहरात जायालं शेसावेल व्हताच.

एकदाचा महुर्त निंघाला आन गण्या शहरात जायाल निंघाला.गण्यालं निंघतांनी त्याच्या मायनं रव्याचे लाडु,चिवडा,बोटुळे आण रस्त्यानं जेवायलं ताकातल्या दश्म्या देलत्या.गण्यान जिवघेण्या गर्दित आन एष्टीच्या आदळ आपटीत हाश हुश करत एकदाच शहर गाठलं.शहरात गेल्यावर तिथला भव्य दिव्य थाटमाट पाहून त्यालं लयच भारी वाटल.शहरातल्या या गडबड गोंधळात ते लय आरबळुन गेलता.त्यालं शहरात आशी गर्दी आसलं,आस वाटलच नवतं. शहरातल्या त्या गाड्या घोड्या, शहरातल्या लोकांचा रुबाबदारपणा आणि वेगवानपणा,तिथल्या उची उची हाटेली आण दुकानं…..हे पाहुन गण्यालं लय मजा वाटु लागली.त्यानं गावाकड मसु भोयाच झोपटातलं हाटेल आन तिरमखा आजाचं पत्र्याच्या शेडातलं किराणा दुकान सोडलं तं काय बी पाह्यलं नवतं.ईथं तं एका एका जिनसाचे दुकानं पाहुन त्याचे डोळे चमकु लागले.आभाळाला भिडणाऱ्या मोठ मोठ्या इमारती,आन गुळगुळीत रस्त्यावर पळणारे वाहनं पाहुन तं त्यालं लईच नवल वाटलं.त्यानं आल्या आल्या पिर्‍यालं फोन करून आपण आल्याची वर्दी देलती.पिर्‍याची डेशिप आसल्यानं त्यालं एखांदा घंटा तरी येळ लागणार व्हता.तव्हरोक काय कराव मनुन मंग गण्या उगाच पाय मोकळे करायलं रस्त्यान चालायल लागला.ते नवलाईन शहराचा देखावा पाहात व्हता.

रस्त्यान चालता चालता त्यालं एक भली मोठी इमारत दिसते.प रवासानं थकुन गण्यालं भुक लागलेली आसते.गण्या त्या ईमारतीच्या आडुश्यालं सावलीत बसते आन दशम्या सोडते.मायनं देलेला रव्याचा लाडु आन दशम्या खायालं लागते.त्यालं आस जेवायलेल पाहुन तिथुन जवळच्याच हाटेलात आसलेला माणुस गण्याजवळ येते.ते गण्यापसुन थोडं दुर ऊभ राहुन गण्यालं खालून वरीपर्यंत निरखून पाहते.त्याच्या ध्यानातं येते की हे नेमकच शहरात आलेलं दिसतय मनुन.त्याच्या डोक्यात उलथापालथ चाललेली आसते.ते माणुस पेहरावानं आन चेहर्‍यावुनबी लय वांड वाटत व्हता.जेवन झाल्यावर गण्या पाणी पिऊन रस्त्यावर येते.ते सहजच वर्‍ही पाहते तं त्यालं ति बिल्डिंग उचीच्या उच्ची दिसते.ते वर पाहते तं वरी आभाळात ती बिल्डींग शिरलेली आसते.गण्याल तं हे पाहुन लयच नवल होते.त्याचे डोळे गरगरायल लागतात.मंग ते आपलं नवलाईनं त्या बिल्डिंगचे मजले मोजायल लागते.एक,दोन,तीन,चार…… अशी मजले मोजता मोजता नवलाने ते आपले बोटं तोंडात घालते. त्यालं असं नवलाईत हरपलेलं पाहून ते शहरातला बदमाश ठक माणूस त्याच्याजवळ येते.ते मानुस बदमाश तं व्हताच पण आट्टल गुन्हेगार वाटत व्हता. ते मंघापसुन गण्यावर पाळत ठुवुन व्हतं.त्यानं मंघापसुनच गण्याचा रंग रूप पाहून वळखून घेतलं व्हतं की हे आत्ताच खेड्यातून आलेलं हे आणि यालं शहराबद्दल काहीच माहीत नसावं आस त्या ठकाल वाटलं.मंग त्याल ठकवायसाठी शहरातला ते बिलंदर ठक गण्याजवळ येऊन ईचारते की,
“ काय रं तु ईथं उभ राहून काय करायला”
“काय नायं जी उगा हित उभं राह्यलो.वाईच जरा जेवायल बसलो व्हतो आडुश्यालं .जेवन झालं आन वर पाह्यलं तं हि बंबाड ईमारत….एवढी उच्ची ईमारत कव्हा पाह्यली नाही नं इयचष्यात…..मनुन मंग पाहु लागलो.” गण्या एका दमात मनाला
“फक्त ईमारतच पाहु लागला का हेरगिरी करू लागला व्हय रं ? आण ते हाताच्या कांड्यावर काय मोजत व्हतासं एवढं ध्यान देऊन,आं? मल काय कळत नाही का ,तु रेकी करायलास मनुन.आं,काय चोरी बिरी करायचा ईरादा हाय का रं सुक्काळीच्या.थांब तुल पोलीसांच्याच हवाली करतो” ते शहरी ठक मनाला.तसं गण्या गडबडला.त्यान कसणुस आंबट तोंड करून त्या सुटाबुटातल्या शहरी माणसाल मनलं की, “तसं नव्ह,ते आसं हय की म्या पह्यल्यांदाच हित शहरात आलुया….आमचा पाव्हणा बसस्टँडल घेयाल येणार व्हता.त्याची डेशीप आसल्यानं त्यालं घंटाक्सा उशीर व्हणार व्हता. घंटाक्सा टाईम व्हता मनुन मंग ईरंगुळा मनुन फिरायल आलो तं हि भली मोठी ईमारत दिसली.बापजलमी एवढी ईमारत कव्हा पाह्यली नवती.तं मंग मोजु लागलो मजले,नवलानं……..!”
“सगळे चोरटे आसच मंतात,तुलं” ते शहरी ठक गण्यालं दटावत मनु लागला.

“तुल मायीत हे कि ईथं या ईमारतीचा एक मजला मोजला तं विस रूपै पडतातं…ईमारतीचे मजले मोजायची फिस पडते हिथं…..मी आत्ता त्या ईमारतीच्या मालकालच जाऊन सांगतो.थांब तु ईथच.मांघार्‍या मजले मोजतुस का….? थांबच आत्ता….!” आसं मनुन ते मानुस ईमारतीच्या गेटाकडं चालला व्हता.जातांनी ते तिन तिनदा गण्याकडं वळुन पाहात व्हता.
तसं गण्या घायबरला….आण मंग हडबडला.घायबरून त्यानं त्या माणसालं आवाज देला आन त्यालं मनाला….“ओ मामा,आवं हि बिल्डींग तं धा मजल्याची हे पण म्या मातर तिनच मजले मोजलेत हो…आसं करू नका राव…मलं मायीत आसतं तं म्या मजले मोजलेच नसते हो…..” आण मंग गण्या रडायलं लागला.
तसं ते शहरी ठक मनला , “ खरं सांग,किती मजले मोजलेस तु…?” आत्ता ते गण्यालं आंजुकच दटावु लागला.
“तिन” गण्या पुन्हा एकदा चाचरत चाचरत मनाला.

गण्यानं खोट खोटच सांगतलं व्हतं.ईकड ते शहरी बेनंबी गण्याकडं पाहुन,‘ चांगलच बकरं भेटलय.आत्ता यालं गंडवुन संध्याकाळची व्यवस्था होईल’ या आशेन मनातल्या मनातच खुश झालतं. त्या ठकान गण्याकडं पाह्यलं आन,“चल तुलं ईमारतीच्या मालकाकडं नेतो” आसं मनलं.तसं गण्या गडबडा लोळत “ओ दादा आस करू नका हो, मायच्यान……! पुन्ह्यांदा नाय म्या मजले मोजत वो….मल माहितच नवतं हो की,ईथं मजले मोजायलं बी पैक पडतेत मनुन…..” आसं म्हणत गयावया करत गण्या त्या माणसाचे पाय धरू लागला. तसं ते शहरी माणुस मनाला की,“ तु, पह्यल्यांदा आलेला दिसतुस,पुन्हा आसं करायचं नाय.मी सोडतो तुलं पण तुलंबी मलं एका मजल्याचे दहा रुपये देवाव लागतीलं.मंजुर आसलं तं मंग म्या सांगत नाय त्या ईमारतीच्या मालकालं …..हुं”
गण्यानं त्या शहरी ठकालं लय गयावया केली पण ते ठक काय बधेना.मंग नाविलाजानं त्यानं तिस रूपये त्या हिप्पीवाल्या ठकालं देले.ठक गण्यालं लुटुन खुष झालता.संध्याकाळची सोय झाल्यानं ते ठक शिट्टी वाजवत वाजवत केसायतुन हात फिरवतं फिरवत गर्दीतुन गायब झाला व्हता.गण्याबी मंग बसस्टँडलं आला.त्याचा दोस्त ‘पिर्‍या’ त्यालं घेयालं आलता. त्याच्या चेहर्‍यावर कायबी भाव दिसत नवते.गण्यालं पिर्‍यालं पाहुन लय आनंद झालता पण पिर्‍यालं मात्र काहीच वाटत नवतं.तो मख्ख उभा व्हता.ख्याली खुशाली नाही का गावाकडली ईचारपुस नाही.ओलावा आटलेल्या नदिसारखं पिर्‍याच काळीज झाल्यासारख गण्यालं वाटत व्हतं. त्यालं पाह्यल्या पाह्यल्या गण्या हर्षोल्हासानं पळतच सुटला.लय खुश झाला.खुशी खुशीत पळतच गण्या पिर्‍याच्या गळ्यातच पडत मोठमोठ्यानं बोलाया लागला.तसं पिर्‍याल गण्याच्या मिठीत दमकोंडी झाल्यासारखं वाटु लागलं.पिर्‍यानं गण्यालं झिडकारतच आपल्यापसुन दुर लोटलं. “आसा आंगचटीला येऊ नकोस,आन जरा हळुहळु बोलं.मी बहिरा नाहीये.हे गाव नाहीये.ईथे खेडवळावाणी वागु नकोस” शहरी पिर्‍यानं आस मनताच खेडुत गण्याचा चेहराच पडला.त्यालं तं वाटलं की,ब्वा आपल्यालं पाहुन पिर्‍या आपल्या गळ्यातच पडल आन गावाकडची ख्यालीखुशाली ईचारल.गावातलं वातावरण आन लोकायबद्दल बोलल…पण कशाच काय पिर्‍या उलट गण्यावरच डाफरला व्हता..ते एकदम उकिड वाटत व्हता… कृत्रिम आन सपक….गण्यालं लय आपराध्यासारकं वाटलं.“हे कुठ सपादतच नाही “ आस लहानपणी त्याची माय मनायची हे त्यालं आठवलं.मंग त्यो मुकाच बसला.शहरी दोस्त पिर्‍या आपले कपडे झटकुन टापटीप करत मनाला ,“ईथे निट राह्याचं… आपण आत्ता शहरात आहोत….गावात नाही…..समजलं का, आं? आन ईथे मोठ्यान बोलायच नाही,हसायच नाही.कुणालाही बिनाकामाचे बोलायचे नाही.आपण भले आणि आपले काम भले.समजल का?”
त्याच्या शहरी दोस्ताच्या वागण्या बोलण्यात एकप्रकारचा कृत्रिम भाव व्हता.नाविलाजान त्यालं ते नेयालं आलता.बोलता बोलता ते त्या बिल्डींगपुढुन चालले व्हते तसा गण्या पिर्‍यालं मनाला,“व्हय रं पिर्‍या,तुमच्या शहरात ईमल्यायचे मजलेबी मोजायचे पैसे घेतात व्हय..ते बी मोजाया जमत नाहीत का?.”

पिर्‍या मनुन हाक मारल्यानं खरं तं त्या शहरी मित्रालं ते खटकलं व्हतं.शहरात त्यालं सगळे ‘पॅरी’ मनायचे.
“आरं तु यायच्या आंधी मलं एक हिप्पीवाला माणुस भेटला व्हता.मलं काय माहीत कि बाप्पा तुमच्या शहरात मजले मोजायलं पैसे लागतात म्हणुन…..! मी आपला सहजच मजले मोजत व्हतो….तं आला नं ते हिप्पीवाला माणुस….लय चांगला व्हता ते…..अगदी देवमाणुसच मनाव लागलं…आंधी तं पोलीसातच देतो मनी….पण म्या आत्ताच खेड्यातुन आलोय मलं तुमचे रिवाज माहीत नाहीत मनलं….मंग त्यान नरमाईन वागत ईमारतीच्या मालकालं न सांगता तिस रूपयावर परकरन मिटवलं.तरीबिक त्याल म्या कमीच मजले सांगले.मोजले दहा आन सांगले तीन.शंभर रूपयाची ब्याद म्या मंग तीस रूपायातच कटवली. तं….आले मोठे शहरातले दिडशाहने….कसं यंडं बनवलं त्यालं.”
तसं त्या शहरी पॅरीनं डोक्यालं हानुन घेतलं.आन मनलं,

“मायझं,मनुनच खेड्यातले येडे मंतात …..!”
©गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली.

9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..