नवीन लेखन...

कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?

Kayashtha Community - A Loyal Community

बुद्धीचे किती युक्तीचे किती मानी अभिमानी ।
कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ।।
संख्येने जरी अल्पही असलो कर्तृत्वाचा वसा ।
इतिहासाला ठेऊनी साक्षी घडवू इतिहासा …… !

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली.

पुण्याची जहागिरी प्राप्त होताच शिवाजी राजांनी बारा मावळ प्रांत काबीज केले. बारा मावळातील देशमुख, दस्तकरुन जे पुंड आणि प्रजेला छळणारे होते त्यांना मारिले. देशमुख मराठा जातीचे होते आणि देशमुखीचा कारभार पाहणारे “देशपांडे” कायस्थ प्रभू होते. देशमुख व्यसनी, भांडखोर मानमरातब आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी मारामार्‍या, खून खराबा करणारे होते. मुसलमान सुभेदाराची मर्जी राखायची आणि वतन सांभाळून चैन करायची असा त्यांचा स्वभाव होता. ज्या देशमुखांनी शिवाजीराजांना प्रतिकार केला त्या देशमुखांना शिवाजीराजांनी अत्यंत चातुर्याने स्वत:कडे वळवून आणले. परंतु जे स्वराज्य स्थापनेच्या योजनेत सहभागी होत नव्हते. त्यांना कुठलीही नातीगोती आड येऊन न देता, दयामाया न दाखवता ठेचून मारले.

देशमुखांना स्वराज्याच्या कामी मिळवण्याच्या आधी शिवाजीराजांनी सर्वप्रथम मावळातील देशपांडे, जे कायस्थ प्रभू समाजाचे होते त्यांची सहानभूति मिळवली. स्वराज्याचा मनसुबा सर्वप्रथम पचनी पडला तो कायस्थ प्रभू देशपांड्यांना. पहिला कायस्थ प्रभू स्वराज्य स्थापनेच्या कामी रायरेश्वरासमोर बेलभंडार उचलून शपथपूर्वक सामिल झाला. त्या कायस्थप्रभूचे नाव होते दादजी नरस प्रभू गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते हे दादजी नरस प्रभूंचे वंशज आहेत. मराठी स्वराज्याच्या कार्यात कायस्थांचा जो प्रचंड सहभाग होता त्याचे उगमस्थान म्हणजेच दादजी नरस प्रभू गुप्ते (देशपांडे) हेच आहेत.

दांदजी नरस प्रभूला हाताशी धरुन शिवाजी मावळात गोंधळ घालीत असल्याचा बातम्या खोपडे आणि जेधे यांनी विजापुरास कळविल्या. वजिराने एक धमकीचा खलिता दादजी देशपांड्याला पाठवला. या खलित्यात रायरेश्वराची शपथ आणि पेशजी किल्ल्यावरील ठाणे काबीज करुन शिवाजीला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. शिवाजीला मदत केलीस तर विजापुरास नेऊन “गरदन मारु” अशी धमकी बादशहाच्या वजिराने दादजी प्रभूंना दिली होती.

शिवाजीराजांना या खलिताची बातमी येताच त्यांनी दादजींना धीर देणारे पत्र पाठवले. आपल्या भेटीला बोलावले. दादजींना स्वराज्य स्थापनेचे महत्व पटलेलेच होते. त्यांनी विजापुरच्या शहाच्या धमकीला भीक घातली नाही आणि हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत शिवरायांच्या मागे दादजी प्रभू (देशपांडे) गुप्ते हे ठामपणे उभे राहीले.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्या काळात दादजी प्रभूंची स्थिती हालाखीची झाली. शाहू आणि मातोश्री येसूबाई दिल्लीला बादशाही छावणीत सेवेला गेले. दादजींचा मुलगा कृष्णाजी शाहू महाराजांसोबत होता. या सर्व राजकारणाच्या धुमाळीत मुखत्यार नेमलेल्या शंकर नारायण सचिवाने दादजी प्रभूंचे वतन बळजबरीने खालसा केले. शिवाजी महाराजांचे लेखी वचन त्यांच्या मृत्यूनंतर साफ बुडवले. दादजीप्रभू राजाराम महाराजांची भेट घेण्यासाठी जिंजीला जात असतानाच रांगण्याच्या मुक्कामी दादजी प्रभू आणि राजाराम महाराजांची भेट झाली. दादजीने सर्व प्रकार राजाराम महाराजांच्या कानी घातला. महाराज संतापले. त्यांनी शंकर नारायण पंडीत सचिव यांना आज्ञापत्र पाठवले. परंतु शंकर नारायण यांनी राजाज्ञा जुमानली नाही.

याच दादजी प्रभूच्या वंशात रंगो बापूजी गुप्ते यांचा जन्म झाला. रंगो बापूजी गुप्ते यांच्या चरित्रावर भाष्य करणारे पुणेरी इतिहास संशोधक मात्र रंगोबापूजी आपल्या वाडवडीलांच्या वतनासाठी लढले असे चक्क खोटे लिहून रंगोबापूजींना मतलबी ठरवण्याचा डाव टाकीत होते. पुण्यातल्या पेशव्यांनी पेशवे पद मिळताच मराठी राज्याच्या धन्याची गळचेपी सुरु केली होती. पेशवाईचा अंत होईपर्यंत मराठेशाहीच्या छत्रपतींना कोंडीत पकडून स्वत: राज्याचा कारभार पाहण्याचा आणि नामधारी छत्रपतींना नामोहरम करण्याचे राजकारण पेशवे आणि पेशव्यांच्या हस्तकांनी केले. पेशव्यांचे “भाट” पुढे पेशव्यांचे सरदार झाले आणि छत्रपतींकडे दुर्लक्ष करुन पेशव्यांना मुजरे करु लागले. राजाशी नमक हरामी करुन पेशव्यांची मर्जी सांभाळणारे एकूण एक संस्थानिक छत्रपती शिवरायांच्या बेलभंडार्‍याच्या शपथेशी हरामखोरी करणारे निपजले. इतिहासातीले राजद्रोहाचे सत्य अनेक कादंबरीकार, नाटककारांनी बेमालूमपणे दडवले आणि स्वार्थी लोकांचा जयजयकार मराठी वाचकांनी आणि बु्दधीवंतांनी केला. याच बुद्धीवान नाटककारांनी मराठेशाहीचे खरे स्वामी जे छत्रपती त्यांना “नादान” ठरवून पेशवाईचा उदो उदो केला.

छत्रपती शिवरायांच्या काळात रंगो बापूजींच्या पूर्वजांना दिलेले टिचभर वतन हिराऊन घेऊन पुणेरी लाल पगड्यांनी स्वामी निष्ठा वांझोटी करण्याचा प्रयत्न केला. परंतू वतन गेले तरी रंगो बापूजी गुप्ते हे मराठ्यांच्या छत्रपतींच्या गादीशी एकनिष्ठ राहीले. शेवटचे छत्रपती सातारचे प्रतापसिंह महाराज यांचे राज्य खालसा होऊ नये यासाठी रंगो बापूजी इंग्रजांशी लढले. पेशवाईच्या अंता नंतर एकीकडे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद विकोपाला गेला असताना रंगो बापूजी मात्र मराठेशाहीच्या शेवटच्या छत्रपतींची गादी वाचविण्याच्या विवंचनेत होते. उतारवयात केवळ स्वामीनिष्ठेसाठी इंग्लंडच्या थंड हवेत हिंदूस्थानी पोशाख, रिवाज आणि धर्म पाळून रंगो बापूजी या कायस्थाने छत्रपतींची वकीली केली. इंग्लंडमध्ये मराठ्यांवरील होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सभा घेतल्या. अनेक इंग्रज लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. राणीकडे विनंती अर्ज केले. ६० हजार सह्यांचे १०० अर्ज ब्रिटीश पार्लमेंटच्या दप्तरात दाखल केले. याच सुमारास त्यांनी ब्रिटनच्या न्यायव्यवस्थेचा अणि लोकशाहीचा अभ्यास केला. इंग्रजांच्या दडपशाहीच्या विरोधात इंग्रजांची मते बदलण्याचे काम रंगोबापूजींनी केले. या सुमारास पुण्याचे ब्राह्मण काय करीत होते ते पहाणे सुद्धा गरजेचे आहे.

पेशवाईत कायस्थांवर धार्मिक अन्याय मोठ्या प्रमाणात झाले. ब्राह्मण कायस्थांना अत्यंत तुच्छतेने वागवत असत. कायस्थांनी आपल्या मुलांची मुंज करु नये असा फतवा नारायणराव पेशव्यांच्या काळात काढला होता. सर्व ब्राह्मणांनी ही गोष्ट उचलून धरली. पुण्यातील सरदार आंबेगावकरांनी हा पेशव्यांचा फतवा जाहीर रित्या फाडला आणि जाळून टाकला. ॐ कारेश्वराच्या प्रांगणात घडलेली ही घटना पेशव्यांच्या कानावर गेली. पेशव्यांनी आंबेगावकरांना पकडण्याची आज्ञा दिली. आंबेगावकर बडोद्याला आश्रयास गेले परंतू पुण्यात मात्र पेशव्यांनी त्यांच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवला.

ब्राह्मणांनी कायस्थांवर घातलेल्या निर्बंधाचा विरोध बळवंतराव मल्हार या हुशार कायस्थाने केला. कायस्थांचे उपनयन, विवाह, श्राद्ध वगैरे विधींवर ब्राह्मणांनी बंदी घातली होती. पुणे, सातारा, कर्‍हाड, सांगली भागात या बंदीमुळे कायस्थांची कार्ये खोळंबली होती. आम्हाला आमची वैदिक कार्ये करण्यासाठी ब्राह्मणांची गरज नाही हे बळवंतरावांनी ज्ञातीबांधवांना सांगितले. स्वत: अग्नीहोत्राची दीक्षा घेतली. कायस्थांच्या खोळंबलेल्या असंख्य लग्न-मुंजी कायस्थ समाजाच्या आचार्यांनी स्वत: लावल्या. या प्रकारामुळे ब्राह्मण खवळले. पुणेरी ब्राह्मणांनी प्रतापसिंग महाराजांकडे कायस्थांच्या विरोधात तक्रारी केल्या. महाराजांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली.

१९२८ साली मुंबईचा गव्हर्नर जॉन माल्कम हा छत्रपतींच्या भेटीसाठी सातार्‍याला आला होता. बाळाजीपंत नातू या मराठेशाहीचा झेंडा उतरवण्यास इंग्रजांना मदत करण्यार्‍या भटाने तातडीने सतारा, सांगली, कर्‍हाड, वाई, कोल्हापूर याठिकाणी पत्रे पाठवली, कायस्थ शुद्र आहेत त्यांना अग्नीहोत्र घेण्यापासून परावृत्त करावे या मागणीसाठी १० हजार ब्राह्मणांनी कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडी गावात असलेल्या जॉन माल्कमच्या तंबूला वेढा घातला. माल्कमच्या छावणीसमोर कायस्थांच्या विरोधात हे ब्राह्मण घोषणा देत होते. चिंतामणराव सांगलीकर जमावाचे नेतृत्व करीत होते. माल्कमच्या हुजर्‍यांनी ब्राह्मणांच्या ४ ते ५ प्रतिनिधींना आंत बोलावून घेतले. थत्ते, भडकमकर, आबा जोशी, चिमणराव पटवर्धन आत गेले. त्यांनी कायस्थांच्या विरोधात कागाळ्या केल्या. कायस्थांनी धर्म बुडवला असा कांगावा केला. तावातावाने भांडले. जॉन माल्कमनी मात्र आम्ही तुमच्या धर्माच्या बाबतीत निर्णय देणार नाही असे सांगून ब्राह्मणांना हाकलले.

रंगो बापूजी गुप्ते यांचा जन्म आणि मृत्यू या बाबत इतिहासात अधिकृत नोंदी सापडत नाहीत. परंतू मराठेशाही वाचवण्यासाठी रंगो बापूजींनी दिलेला लढा मात्र सर्वांच्या सदैव स्मरणांत राहील. इंग्लंड मधून भारतात परत आल्यावर इंग्रजांनी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अतोनात हाल केले होते. रंगो बापूजी अनेक वर्षे भूमिगत होते. ठाण्याच्या कडवागल्लीत त्यांनी वास्तव्य केले होते. इंग्रज अधिकारी त्यांना पकडण्यासाठी आले असता सोवळ्या विधवा बाईच्या वेषात इंग्रजांना गुंगारा दिला.

ठाण्यातील जांभळी नाक्याला महानगर पालिकेने ठराव संमत करुन “रंगो बापूजी गुप्ते चौक” हे नाव दिले. मध्यंतरीच्या काळात या चौकाला चिंतामणी चौक हे नाव पडले. श्री. सुधाकर वैद्य, शशी गुप्ते, दिनकर बक्षी या समाजधुरीणांना पुन्हा नव्याने या चौकास रंगो बापूजी गुप्ते हे नाव देण्यासाठी पाठपुरावा केला आणि श्री. दत्ता ताम्हणे व सतीश प्रधान यांच्या उपस्थितीत ९ जून २००७ या दिवशी पुन्हा या चौकाचे “श्री रंगो बापूजी गुप्ते चौक” असे नामकरण करण्यात आले. बाळाजी आवजी, बाजी प्रभू, दादजी प्रभू, रंगो बापूजींच्या स्मृतीस अत्यंत कृतज्ञतेने अभिवादन करीत आहोत.

—  चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..