नवीन लेखन...

कर्मभूमी ते पुण्यभूमी..

भारतभूमी

माझ्या नृत्य वर्गात ऊर्जेचा सर्वात मोठा झरा असतात त्या माझ्या छोट्या विद्यार्थिनी. शिकायला नव्याने सुरुवात केल्यामुळे उत्साह तर त्यांच्यात असतोच. त्याचबरोबर नवीन काय शिकतोय या बद्दल प्रचंड कुतूहल सुद्धा असतं.

सध्या वार्षिक कार्यक्रमाची तयारी क्लास मधे सुरु आहे. अशावेळी लहान विद्यार्थिनींना समजेल, आवडेल आणि सादर करतानाही आनंद मिळेल असा आशय असलेलं काव्य त्यांच्यासाठी विचारपूर्वक निवडावं लागतं.

आपल्या भारत देशाचं गुणगान गाणारं ‘वंदे मातरम’ हे असंच एक परिपूर्ण काव्य या वर्षी मी निवडलं.

मुलींना विचारलं , “याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? त्यांना जमेल तसं सोप्या भाषेत त्या सांगू लागल्या. वनस्पती, फळं, फुलं, नद्या, पर्वत रांगा, वारे सगळ्यांनी समृद्ध असा आपला देश आहे.

 मात्र ही चर्चा एवढ्यावर थांबली नाही. विषय रंगत गेला आणि अचानक एकीने प्रश्न केला. ताई, कंट्री (देश) सुद्धा देवाघरी जाते का? आणि आपल्या सारखंच, कंट्री बॉर्न सुद्धा होते का (जन्म सुद्धा घेते का) वय वर्ष 7 असलेल्या या माझ्या विद्यार्थ्यांकडून हा प्रश्न येणं तसं अनपेक्षित होतं. दोन्ही प्रश्नांची उत्तरं विचार पूर्वक द्यायला हवी होती हे खरं.

मी म्हटलं when was our batch born ? आपल्या बॅच ने कधी जन्म घेतला ? जेव्हा तुम्ही सगळ्यांनी ठरवलं कि आठवड्यातून दोन दिवस आम्ही इथे डान्स शिकायला नित्य नियमाने येणार, सातत्याने प्रयत्न करणार, नवीन गोष्टी करून बघणार, आणि मध्येच शिक्षण बंद करणार नाही तेव्हा आपल्या बॅच ने जन्म घेतला. असंच काहीसं मी देशाबद्दल त्यांना समजवायचा प्रयत्न केला.

एकाच विचाराने झपाटलेली लोकं एखाद्या प्रांतात राहून तिथे कार्यरत राहायचं ठरवतात, तिथे नवीन संधी निर्माण करतात, आणि महत्वाचं म्हणजे त्या प्रांतात स्थिरावतात. हे सगळं एकत्र येतं आणि वर्षानुवर्ष सातत्याने घडतं तेव्हा देश जन्माला येतो.

यामध्ये मानवाइतकाच महत्वाचा वाटा तिथले पशु पक्षी, वनस्पती , कीटक , पर्वत रांगा, वारे, समुद्र, नद्या सगळ्यांचा आहे बरं का? निसर्ग आपल्या जन्म स्थानाशी घट्ट रोवलेला असतो, वाटेल ते होवो, पूर येवो, भूकंप येवो. या उलट आपल्या परीने सर्वात जास्त योगदान देशाला निसर्गच देतो. हे सगळं , इथे लिहीलंय त्या पेक्षाही सोप्या भाषेत त्यांना मी समजावून सांगितलं..हे ऐकत असताना मुलींच्या चेहऱ्यावर आनंद होता.

आता होता मुलींचा दुसरा प्रश्न. देश देवाघरी जातो का? त्यावरही विचार करून उत्तर द्यायचा प्रयत्न केला.

त्यांना म्हटलं, ” तुम्ही सगळ्यांनी जर एक एक करून डांस करायचा कंटाळा केला , प्रॅक्टिस करणं बंद केलं, मी जे शिकवायचा प्रयत्न करते त्याकडे लक्ष दिलं नाही, त्यात रस घेतला नाही आणि एक दिवस क्लास ला येणं बंद केलं तर आपली बॅच बंद होईल. म्हणजेच तुम्ही विचारताय तसं देवाघरी जाईल. हे ऐकून, “नाही टीचर, आम्ही असं कधीच करणार नाही असं सगळ्या एकत्र म्हणाल्या..

देश तयार होतो तो तिथे राहणाऱ्या जीवांमुळे, त्यात आपण आलो, प्राणी पक्षी आले , झाडं आली. ज्यावर काहीही जिवंत दिसत नाही ती जमीन ओसाड म्हणून ओळखली जाते.

खरंतर ओसाड जमिनीवरंच पांडवांनी भगवंताच्या आशीर्वादाने इंद्रप्रस्थ उभं केलं होतं. याचा अर्थ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ओसाड जमीनीतूनही राज्य निर्माण करता येऊ शकतं हा मोठा संदेश यातून मिळतो. मग देश, तिथली जमीन आपल्या भारतासारखी सर्वार्थाने सुपीक असेल तर कसली चिंताच नाही. मात्र महत्वाचं आहे ते सातत्य, प्रयत्न. हा आपला देश, ही आपली जन्मभूमी- कर्मभूमी मोठं करणयाचा सातत्याने प्रयत्न करणे. तरंच जन्म घेतलेला देश चिरंजीव होऊ शकतो..

मुलींच्या प्रश्नांच्या निमित्ताने यावर माझा विचारविनिमय झाला. पुढे जाऊन मुलींना स्वतःची उत्तरंही मिळतील या बद्दल विश्वास वाटतो.

मात्र हा विचार आज आपण सर्वांनी करायची गरज आहे. आपला देश आपल्याला टिकवायचा आहे का? आणि टिकवायचा असेल तर आपण त्या करता काय प्रयत्न करतोय.

जन्मभूमी ते कर्मभूमी आणि कर्मभूमी ते पुण्यभूमी करण्याचं सामर्थ्य दाखवायचं, का डाव अर्ध्यावर सोडायचा, हे अर्थातच आपण ठरवायचं आहे..

जय हिंद जय भारत !

— गौरी सचिन पावगी

Image source: google

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..