नवीन लेखन...

काहीतरी आगळे वेगळे

उतार वयात ‘काहीतरी आगळे वेगळे’ करण्याचे धाडस करणे म्हणजे एकप्रकारचा मूर्खपणाच असे अनेकांचे मत असते. माझे वय 70 रनींग तर माझ्या सौभाग्यवती अपर्णाचे वय रनींग 64. हे वय खरे म्हणजे आराम करण्याचे, तब्येतीची काळजी घेण्याचे, हरि हरि म्हणत स्वस्थ बसण्याचे. अशा वेळी थायलंडमध्ये बॉंकॉक येथे जाऊन 3 आठवड्यांचा ‘इंग्रजी कसे शिकवायचे’ या सारखा एक कोर्स अटेन्ड करणे म्हणजे येडपटपणाच! ‘वयाच्या 70 व्या वर्षी तुला मास्तरची नोकरी कोण देणार?’ माझ्या एका मित्राने कुचेष्टेने विचारले. ‘तीन आठवडे आणि ते सुद्धा बॉंकॉकला! ते सुद्धा ज्याचा काही उपयोग नाही असा कोर्स करण्यासाठी? भारतामध्ये सुद्धा के कोर्सेस होत असताना थायलंडला कशाला जायचे? ही तर पैशांची उधळपट्टी आहे. तुला जर पैसे जास्त झाले असतील तर दानधर्म कर!’ माझ्या एका मित्राची संतप्त प्रतिक्रीया. पण ‘ऐकावे जनाचे व करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे आम्ही दोघांनी हा कोर्स बँकॉकला जाऊनच करायचे ठरवले व त्याबद्धल आम्हाला अजीबात ‘रिग्रेट’ होत नाही.

15 जानेवारीपासून, म्हणजे मकर संक्रांतीच्या शुभमुहुर्तावर याची सुरवात झाली. आधी आम्हाला या कोर्सला प्रवेश मिळेल की नाही ठाऊक नव्हते. पण या कोर्सला वयाचे, शिक्षणाचे व अनुभवाचे कसलेही बंधन नाही त्यामूळे ऍडमीशन मिळाली. बँकॉकच्या एका उत्तम हॉटेलात तीन आठवडे रहाण्याची सोय, ब्रेकफास्ट व लंचची सोय हे आकर्षण होते. पण तीन आठवडे बँकॉकला रहाणे जमेल की नाही, तेथील ‘फूड’ सोसवेल की नाही असे काही प्रश्न होतेच. तरी सुद्धा आम्ही हे धाडस करायचे ठरवले व एका सुरेख अनुभवाचा आनंद घेऊन परत आलो.

अमेरिकन टेसॉल इन्स्टीट्युट (ATI)तर्फे ‘टेसॉल’ (TESOL-Teaching English to the speakers of other languages) व ‘टीएफएल’ (TFL- Teaching English as Foreign Language) असा 3 आठवड्यांचा 120 तासांचा कोर्स घेण्यात येतो. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी आमचे बँकॉकला आगम झाले. जेएल बँकॉक या हॉटेलमध्ये आमची रहायची सोय करण्यात आली होती. प्रथमदर्शनी हे हॉटेल तसे सामान्यच वाटले पण तेथे रहायला सुरवात केल्यावर ते एक उत्कृष्ट हॉटेल असल्याचे लक्षात आले. तेथील रेस्टॉरन्टमध्ये ब्रेकफास्ट व लंचमध्ये अनेक उत्तम उत्तम पदार्थ खायला मिळाले. भरपूर पडथाई चापली. असो.

दिनांक 8 फेब्रुवारीला आम्ही सर्व हा कोर्स अटेन्ड करणारे पहिल्यांदा भेटलो व ‘हे विश्वची माझे घर’ असल्याचा प्रत्यय आला. आम्ही एकुण 9 जण होतो. त्यामध्ये 4 जण भारतातले (आम्ही दोघे व हॅरी पुण्याचे तर सीमा बंगलोरची), पिटर स्वीझर्लंडचा, अनुम पाकिस्तानची, नाओमी जपानची, केनेथ टर्कीमध्ये सेटल झालेला पण मूळचा अमेरिकेतला, विन्सम मुळची दक्षीण आफ्रेकेतली पण आता चीनमध्ये काम करत असलेली असे निरनिराळ्या देशातले व निरनिराळ्या वयोगटातले होतो. हॅरी सर्वात तरूण म्हणजे 23 वर्षांचा तर मी वयाने सर्वात जास्त 70 वर्षांचा! पण या 21 दिवसांच्या सहवासाने आम्ही सर्व जण जणुकाही उकरूप होऊन गेलो. वयाची व तसेच स्त्री-पुरुष अशी बंधने आपोआप गळून पडली व आम्ही सर्व उकमेकांचे घनिष्ट मित्र झालो. नंतर आम्हाला बेल्जियम मधला फिलिप पण येऊन मिळाला. सर्वजण मला ‘उल्हास’ या एकेरी नावाने बोलवत होते त्यामूळे बरे वाटत होते. (नाहीतर आपल्याकडे ‘उल्हासराव, अपर्णाताई’ व जोशीचे ‘जोशीबुवा’! या ठिकाणी नो राव, नो ताइ, नो बुवा). धमाल मस्तीबरोबरच शिक्षण पण चालुच होते. आमच्यासारख्या वयस्कांना हे तरूण कसे सामावून घेतात याची धास्ती होती पण ती दूर झाली व सर्वांचे छान सहकार्य मिळाले. शिक्षण क्षेत्रात किती आधुनीक बदल होत आहेत याची जाणीव झाली.

येथील प्रत्येक दिवस हा नवीन असायचा. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळायचे. वेळ तर इतका बिझी जायचा की श्वास घ्यायला फुरसत नसायची. उतार वयात नवीन गोष्टी शिकणे काहीसे अवघड असते पण अशक्य मात्र नसते याचा प्रत्यय आला. कुहुरिमा बसू ही आमची ट्रेनर होती. उत्तम ट्रेनर कसा असावा याची ती एक आदर्श उदाहरण आहे. अत्यंत शांतपणे, संयमीतपणे, शिस्तबद्ध पद्धतीने व अचूक निरिक्षण या पद्धतीने तिचे ट्रेनींग चालायचे. दुसरी अलौकीक व्यक्ती भेटली म्हणजे पाक ही थाई तरुणी. ती लोकल कोऑर्डीनेटर आहे. पाक म्हणजे उत्साहाचा झराच. सदैव हसणारी म्हणून आम्ही तिचे नांव ‘स्माइलींग पाक’ असेच ठेवले होते. अत्यंत कार्यक्षम व सदैव मदतीला तयार. तिचा 3 वर्षांचा गोड मुलगा बॉम्बे याच्याशी पण आमची दोस्ती झाली.

आम्हाला एकुण 3 शनीवार व 3 रवीवार सुट्टीचे मिळाले. पहिल्या शनीवारी आमची ‘आयुथ्या’ या ठिकाणी ट्रिप काढण्यात आली. ती अविस्मरणीय ठरली. तर दुसर्याच रवीवारी बँकॉकमधील चॅटु चॅट या आशिया खंडातील, 8000 दुकाने असलेल्या, सर्वात मोठ्या मार्केटला भेट दिली.

थाई शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शिकवणे हा एक रोमांचकारी अनुभव होता. वयाच्या 70 व्या वर्षी मी आयुष्यात पहिल्यांदाच मुलांपुढे ‘मास्तर’ म्हणून उभा राहीलो होतो व ती सुद्धा अशी मुले की त्यांची भाषा मला समजत नाही की माझी भाषा त्यांना कळत नाही. पहिल्यांदा 3 री ते 6 विच्या मुलांसाठी दोन लेसन्स घेतले व नंतर एका ज्युनीअर कॉलेजमध्ये 17 वर्षांच्या ‘टिन एजर्स’ साठी दोन लेसन्स घेण्याची संधी मिळाली. आधी खूप दडपण आले होते. पण ‘गुड मॉर्निंग टिचर’ या मुलांच्या उस्पुर्त स्वागताने सगळे दडपण पळून गेले. यावेळी माझे 1ली ते 4 थी पर्यंतचे शिक्षण ज्या शाळेत झाले-पुण्याचे बाल शिक्षण मंदीर- या शाळेची व या शाळेतील चिंचोरे गुरुजी, पेंडसे गुरुजी, जोशी गुरुजी (सुप्रसिद्ध गायक यशवंतबुवा जोशी), खारकर बाई यांची प्रकर्षाने आठवण झाली. या थाई मुलांचा प्रतिसाद अभुतपूर्व असा होता. मी शिकवलेले त्यांना किती कळले ठाऊक नाही पण त्यांचा प्रतिसाद उत्तम होता. ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे परमपुज्य साने गुरुजींनी म्हणून ठेवले आहे ते किती बरोबर आहे हे कळले. मला वाटते की उतारवयाचे किंवा निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात घालवायचे असेल तर खुशाल एखाद्या शाळेत जाऊन मुलांना शिकवावे किंवा गोष्टी सांगाव्यात. या सारखा दुसरा आनंद नाही.

शेवटचा दिवस होता ग्रॅज्युएशन सेरेमनी म्हणजेच सर्टिफिकेट देण्याचा समारंभ. या ठिकाणी धमाल मस्तीबरोबर काही भावूक क्षण पण होते. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते.

अशा प्रकारच्या अनेक सुखद आठवणींचा खजीना घेऊन आम्ही परत आलो आहोत. आता आमच्यातील मरगळ संपुष्टात आली आहे. एक नवीन उर्जा निर्माण झाली आहे. एक नवीन दृष्टी मिळाली आहे. इंग्रजी शिकवण्याचे जे नवील कौशल्य आम्ही प्राप्त केले आहे याचा उपयोग करायची संधी मिळेल की नाही सांगता येत नाही. पण ग्रामीण भागातील मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी याचा उपयोग व्हावा अशी इच्छा आहे.

बघुया पुढे काय घडते ते!

तुम्हाला काय वाटते?

(ही पोस्ट म्हणजे ATI-TESOL ची पब्लिसिटी किंवा प्रमोशन करण्यासाठी लिहीली आहे असा गैरसमज कृपया कोणी करून घेऊ नये. कारण हा मुळ उद्देश नाही व ATI त्याची गरज पण नाही. ही पोस्ट फक्त आलेला अनुभव शेअर करण्यापुरतीच मर्यादीत आहे व वाचकांनी ती ‘प्रॉपर स्पिरिट’ मध्ये घ्यावी ही नम्र विनंती आहे.)

— उल्हास हरी जोशी

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..