नवीन लेखन...

काळाची जाणीव

आठ दिवसांपूर्वी, दोन तासांपूर्वी किंवा पाच मिनिटांपूर्वी घडलेल्या घटना, निरनिराळ्या काळी घडलेल्या आहेत याची आपल्याला पुरेपूर जाणीव असते. कुठेतरी ठेवलेली एखादी वस्तू आपल्याला सापडली नाही की, आपण कुटुंबियांना विचारतो, की, ती वस्तू दोन दिवसांपूर्वी अमक्या ठिकाणी ठेवली होती, ती गेली कुठे? तुमच्या जीवनातली एखादी घटना पाच वर्षांपूर्वी घडली हे तुम्ही बरोबर सांगू शकता आणि तीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचा काळही तुम्ही अचूक सांगू शकता. पुढल्या वर्षी या घटनांच्या काळात, एकेक वर्ष आपोआप मिळवले जाते. वास्तविक या सर्व घटनांची नोंद तुमच्या मेंदूच्या स्मृतिकेंद्रातच झालेली असते, तरीही कोणती घटना वीस वर्षांपूर्वी, कोणती घटना दोन वर्षांपूर्वी आणि कोणती घटना दोन तासांपूर्वी घडली यातील काळाच्या फरकाची कल्पना मेंदूला असते. हीच ती काळाची म्हणजे काळमितीची जाणीव.

ही झाली भूतकाळाची कथा. भविष्यकाळाच्या बाबतीतही असेच घडते. दोन दिवसानंतर घेतलेली डॉक्टरांची भेटीची वेळ, तीन महिन्यानंतर होणारे शेजार्‍याच्या मुलीचे लग्न आणि दोन वर्षानंतर स्वत:च्या विवाहाला पूर्ण होणारी 25 वर्षे वगैरे घटना वास्तवात घडलेल्याही नसतात, तरीही त्यांची नोंद स्मृतिकेंद्रात झालेली असते आणि त्यांच्या काळातील, म्हणजे काळमितीच्या अक्षावरील फरकाची जाणीवही आपल्याला असते.

या विश्वातील दोन घटकांमधील अंतर म्हणजे अवकाशमिती आणि दोन घटनांमधील अंतर म्हणजे काळमिती. तीन अवकाशमिती आणि चवथी काळमिती यांची जाणीव मानवी मेंदूला आहे. या चार मितींनी, विश्वातील घटनांचे ज्ञान होते आणि त्याची नोंदही ठेवता येते. सुप्रसिध्द भौतिक शास्त्रज्ञ मिशिओ काकुओ यांनी लिहीलेल्या हायपरस्पेस या पुस्तकात तर लिहीले आहे की विश्वाला 10 मिती आहेत. सामान्य माणसाला त्यापैकी फक्त चारच मितींची जाणीव होते.

भूत, वर्तमान आणि भविष्य म्हणजे काल, आज आणि उद्या या काळांतील फरकाची जाणीव आपल्याला आहे. काळ प्रत्यक्षात दिसत नसला तरी त्याचा अनुभव घेता येतो, इतकेच नव्हे तर त्याचे, सेकंद, मिनिटे, तास, दिवस, महिने, वर्षे वगैरेत मोजमापही करता येते. आधुनिक इलेक्ट्रॉनिकी उपकरणांच्या सहाय्याने तर मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद, किंवा त्यापेक्षाही कमी काळाचे अचूक मोजमाप करता येणे शक्य झाले आहे. या तीनही काळातील मिनिटे, तास, दिवस, एक वर्ष, दहा वर्षे, शंभर वर्षे वगैरे काळाच्या अंतराचीही जाण आपल्याला असते.

एका डोळ्याने समोरचे दृष्य बघितले तर जवळच्या आणि दूरच्या वस्तूंच्या अंतरातील फरक जाणवत नाही. परंतू दोन्ही डोळ्यांनी तेच दृष्य पाहिले तर त्याच्यातील अंतराच्या फरकाची जाणीव होते. कोणत्या वस्तू जवळ आहेत आणि कोणत्या वस्तू दूर आहेत याची जाण येते. दोन दूरच्या वस्तूपैकी देखील कोणती सापेक्षाने अलिकडे आहे आणि कोणती पलीकडे आहे हे जाणवते. समोरच्या दृष्याच्या, दोन डोळ्यांत दोन उलट्या प्रतिमा निर्माण होतात, त्यांच्यात निर्माण झालेले संदेश दोन अलग अलग मार्गांनी, मेंदूतील दृष्टीकेन्द्रात पोचविले जातात, त्यांच्यावर मेंदूत कोणती प्रक्रिया होते कोण जाणे, पण समोरचे दृष्य वास्तविक स्वरूपात, सरळ अवस्थेत दिसते आणि दोनदोन प्रतिमा न दिसता, त्यातील घटकांतील अंतरांची जाणीवही होते. सर्वच सजीवांच्या डोळ्यात ही किमया घडण्याची देणगी निसर्गाने दिली आहे. दोन डोळ्यांच्या दोन प्रतिमा एकावर एक पडल्या की त्रिमिती परिणाम sterio effect निर्माण होतो.

कानांच्या बाबतीतही हाच प्रकार घडतो. एकच आवाज दोन्ही कानांनी ऐकला तर त्या आवाजाची दिशा कळते. टेपरेकॉर्डरमधील स्टिरीयो टेप, दोन स्पीकर्समधून ऐकला तर निरनिराळे आवाज वेगवेगळ्या दिशांनी आल्यासारखे वाटतात आणि त्रिमिती परिणाम साधला जातो.

काळाच्या बाबतीतही, मेंदूत, त्रिमिती परिणाम साधला जातो. एकाच घटनेची नोंद, मेंदूतील स्मृतिकेन्द्राच्या, दोन वेगवेगळ्या पेशीत ठेवली जाते आणि त्या घटनेची आठवण झाली की दोन्ही पेशी एकाच वेळी जागृत होऊन, त्या घटनेच्या काळाची जाणीव होते. म्हणूनच पाच मिनिटांपूर्वी, दोन दिवसांपूर्वी, सहा महिन्यांपूर्वी आणि तीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांतील काळाच्या अंतरातील फरक आपल्याला जाणवतो.

मेंदूत दोन प्रकारची घड्याळे असतात असे आढळले आहे. एकाचे नाव आहे इंटर्व्हल टायमर आणि दुसर्‍याचे नाव आहे, सिर्काडियन क्लॉक (circadian clock). समोरच्या घटनेचे, मेंदूतील सब्स्टॅन्शिया नायग्रा भागात, डोपामाईनचे दोन संदेश निर्माण केले जातात आणि त्यामुळे घटनांतील काळाच्या अंतराची जाणीव होते. सिर्काडियन क्लॉकमुळे तुमच्या शरीरातील 24 तासांचे कालचा निश्चित केले जाते. ठराविक काळानंतर झोप येणे, जाग येणे, भूक लागणे, मलमूत्र विसर्जनाची संवेदना होणे वगैरे. सकाळी चार वाजताचा गजर लावून रात्री दहा वाजता झोपल्यास, बरेच वेळा असा अनुभव येतो की, चार वाजण्यापूर्वीच आपोआप जाग येते. या 24 तासात प्रकाशाच्या कमीजास्त होण्यावर शरीराच्या बर्‍याच क्रिया अवलंबून असतात. उदा. प्रकाश कमी झाला की झोप येणे आणि प्रकाशाचे प्रमाण वाढले की जाग येणे वगैरे. जेट विमानाने दूरचा प्रवास केला की, एकदोन दिवस हे जैविक घड्याळ बिघडते आणि जेटलॅग निर्माण होतो. त्यामुळे ज्या देशातून तुम्ही आला असता त्या देशात जर दिवस असेल तर नवीन देशात, रात्र असली तरी, झोप येत नाही.

डोळ्यांच्या रेटिनात गँगलियन नावाच्या पेशी असतात. त्यातील काही पेशीत मेलॅनॉप्सिन नावाचे रंगद्रव्य असते आणि त्यामुळे प्रकाशाची तीव्रता ओळखली जाते आणि ते संदेश मेंदूच्या सुप्राशियास्मॅटिक न्यूक्लीअस (SCN) या भागात पाठविले जातात. हा भाग नंतर, सिर्काडियन क्लॉकचे नियंत्रण करणार्‍या मेंदूच्या आणि शरीराच्या संबंधित भागांना आज्ञा पाठवितो. प्रकाशाची तीव्रता कमी झाली की पिनीयल ग्रंथीतून मेलॅटोनीन हे हार्मोन स्त्रवते आणि आपल्याला झोप येऊ लागते. आता निद्रानाशाच्या रोगावर, मेलॅटोनीनच्या गोळ्याही मिळतात.

मानवाचा मेंदू प्रगत झाला आणि पृथ्वीवरील मानवसमूह शेती करू लागले तेव्हा काळाच्या जाणीवेतूनच त्याने, कालमापन आणि कालगणन पध्दती शोधून काढायला सुरूवात केली. त्यामुळे शेतीतंत्रात बर्‍याच सुधारणा करता आल्या. घड्याळे आणि दिनदर्शिका अस्तित्वात आल्या.

पृथ्वीच्या स्वत:भोवती, पूर्ण होणार्‍या परिभ्रमणाचा एक दिवसाचा काळ, चंद्रकलांची सुमारे तीस दिवसांची आवर्तने आणि पृथ्वीच्या, सूर्याभोवती पूर्ण होणार्‍या प्रदक्षिणेचा एक वर्षाचा काळ, ह्या तीन नैसर्गिक आणि वास्तव एकेकांचा त्याने अतीशय बुध्दीचातुर्याने वापर केला. त्यातच पृथ्वीवरील ऋतू आणि आकाशतील खगोल आणि नक्षत्रे ह्यांच्या दीर्घकालीन केलेल्या काळजीपूर्वक निरीक्षणांच्या आधारे सुधारणा केल्या. एका दिवसाचे सोयीनुसार तास, मिनिटे आणि सेकंद असे भाग पाडून, कालमापनाच्या साधनाची म्हणजे घड्याळाची निर्मिती केली.

हे विश्व निर्माण होऊन 13.5 अब्ज वर्षे झाली आहेत. त्याआधी काळ नव्हता, तो महास्फोटापासूनच निर्माण होतो आहे. काळाला अंत आहे का? काळ एकदिशा असलेले वास्तव आहे. काळाची दिशा बदलविता येईल का ? काही शास्त्रज्ञांनी ‘काळा’ चा स्पेशॅलिस्ट डॉ. स्टिफन हॉकिंगला काळाची संकल्पना समजावून सांगण्याची विनंती केली. हॉकिंग म्हणाले …काळ दोन दिशांनी दाखविता येतो डावीकडून उजवीकडे जातो तो वास्तव काळ आणि वरून खाली जातो तो काल्पनिक काळ… शास्त्रज्ञांनी विचारले, काल्पनिक काळाची कल्पना वास्तवात कशी करायची?

हॉकिंग म्हणाले ”आता हे बघा, पृथ्वी सपाट आहे असे काही शतकांपूर्वी सगळीच माणसे मानीत असत पण आता तसा एकही माणूस शिल्लक नाही. तसेच, काही वर्षांनी काल्पनिक काळाची वास्तव कल्पना सगळ्यांनाच असेल.”.. डॉ. हॉकिंगची ही विचारसरणी प्रत्यक्षात खरी झाली तर विश्वाचे बाबतीत कुणी? कसे? कशातून? कुठून? केव्हढे? केव्हापासून? कधीपर्यंत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कशासाठी? निर्माण केले किंवा झाले, या प्रश्नांची बिनचूक उत्तरे माहीत असलेली माणसे या पृथ्वीवर आढळतील अशी आशा बाळगू या. अशी माणसे अस्तित्त्वात यायला किती वर्षे लागतील? हजार, लाख की कोटी? मानवी मेंदूच्या मर्यादा इतक्या दूर विस्तारतील?

— गजानन वामनाचार्य,
180/4931 पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबआी 400 075
022-25012897, 98 1934 1841
रविवार, 23 जानेवारी 2011.

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..