नवीन लेखन...

जुन्या गोष्टींमधले नवे आणि नव्यातले काही जुने

तीस चाळीस वर्षांपूर्वी मी पाच सहा वर्षांचा असताना कोकणात गावी जायचो त्यावेळचे दिवस वेगळेच होते. त्यावेळी मुंबईतील चाकरमानी रातराणी एस टी ने गावी जायला प्राधान्य द्यायचे कारण दैवाची कामे करून संध्याकाळी गावाकडे निघायची संध्याकाळची वेळ सोयीची असायची आणि उन्हाळ्यात रात्रीचा प्रवास गर्मी चा त्रास होऊ नये म्हणून सोयीचा पडायचा. सायंकाळी ५-६ वाजता सुटलेली गाडी सकाळी सहा – सात वाजता गावात पोचायची.

एस टी स्टॅन्ड वर उतरून घराकडे चालत जायला लागायचे. पंधरा ते वीस मिनिटे लागायची. एस टी ची सतत घरघर ऐकून गावात उतरल्यावर जाणवणारी निरव शांतता मुंबई सारख्या शहरात कधीच अनुभवलेली नसायची त्यामुळे इथे ती अंगावर यायची. त्या शांततेमुळे कुठे तरी दूर आडगावी निवांत आणि शांत ठिकाणी आल्याची जाणीव व्हायची. आमचे गाव तसे त्याकाळी अस्सल खेडेगाव होते.त्याकाळी तेथे रिक्षा न्हवत्या, गाड्या कोणाकडे क्वचित होत्या. त्यामुळे बैलगाडी हेच एकमेव वाहतुकीचे साधन होते; आणि पायी चालत जाणे हे तर जीवनाचा अविभाज्य भाग होता.  तांबड्या पायवाटेने दव पडलेल्या सुक्या गवतावरून त्याचा ओला वास घेत पायी चालत जाता जाता पक्ष्याचे आवाज, ढोरांचे हंबरणे, शेणा मुताचा वास आणि मधून येणारा काटक्या जाळण्याचा वास घेत जाताना तसेच शेतात कामाला जाणारे काही आणि लोटा घेऊन माळावर जाणारे गाववाल्यांच्या चौकशाना सामोरे जात घर कधी यायचे ते कळायचे नाही.

पांदीतून जाताना घराचे दार समोर दिसायचे. आजी स्वागताला उत्सुकतेने उभीच असायची. आम्हा छोट्या नातवंडांना बघून ती धावत पुढे यायची आणि आम्हाला मिठीत घेत तिचा खरखरीत हात आमच्या तोंडावरून फिरवत राहायची आणि आम्हाला घरात घेऊन जायची. ती एकटीच घर सांभाळायची. आम्ही घरात आल्यावर तिची लगबग सुरु व्हायची.

मग आमची पण लगबग सुरु व्हायची. हातपाय धुवून दात घांसण्यासाठी. पण त्यावेळी मुंबईमध्ये वापरली जाणारी पेस्ट किंवा दंतमंजन आणलेले नसायचे. मग आमच्यासमोर कोणीतरी गावठी दंतमंजन बनवून द्यायचा. आमच्यासमोर खापरीवर कोळसे अथवा निखाऱ्यावर शेणी जाळली  जायची, त्याची राख केली जायची. ती राख बारीक चूर्णासारखी करून मग वस्त्रगाळ करून वाडग्यात घेतली जायची आणि त्यात चिमूटभर बारीक केलेले मीठ टाकले जायचे की झाले दंतमंजन तयार -जे आमच्या हातावर ठेवले जायचे. राख – कोळसा – मीठ असलेले ते काळपट – राखाडी दंतमंजन आम्हाला त्यात कोळसा, शेण (म्हणजे गुरांची शी ! ई ) आणि राख असल्यामुळे कसे कसेच वाटायचे – अजिबात आवडायचे नाही.  पण उपाय नसल्यामुळे झाक मारत ते वापरायला लागायचे. आमचे नखरे बघून आजी सांगायची – “अरे खुळ्यांनो, शेणाच्या ह्या गावच्या घरी बनवलेल्या राखुंडीत चांगले गुणधर्म असतात आणि मीठ टाकल्यामुळे ही जंतुनाशक झालेल्या ह्या  मशेरीसमोर तुमच्या शहरातल्या पावडरी झाक मारतील.” तरी आम्ही तोंड वेंगाडत राहात असू.   तोंड वेडेवाकडे करून आम्ही ते लावायचो आणि तालुक्याच्या  बाजारातून रतनज्योत किंवा कोलगेट पावडर आणून द्या म्हणून पालकांच्या मागे लागायचो. मग जेव्हा कोणी बाजाराला जाईल त्यावेळी ती पावडर आणली जायची तोपर्यंत गावठी कोळसा आणि राखुंडी व  मीठ असलेली गावठी दंतमंजन पावडर वापरायला लागायची. पुढे मुंबईवरून गावी येताना आम्ही बॅग भरताना आमची दात घासायची पावडर अथवा पेस्ट आमच्या बॅगेत न विसरता पॅक करायचो.

आजी नंतर आम्हाला चहा करून देते म्हणून चुलीवर पातेल्यामध्ये पाण्याचे आधण ठेवायची आणि चहा बनवायच्या तयारीला लागायची. तोपर्यंत आम्ही हात पाय धुवायच्या मागे व्यस्त होऊन कपडे बदलून यायचो आई स्वयंपाक घरात चहासाठी बसायचो. आजी मग चहाचे कप पुढे करायची. त्यातला काळा कुट्ट चहा पाहून आम्ही दोन पावले मागेच सरायचो. अशा चहा पिण्याची सवय नसल्यामुळे तो आम्हाला काढ्यासारखा लागायचा.  गुळाचा, दूध नसणारा काळा चहा मुंबईत कधी प्यायलेला नसल्यामुळे ही अवस्था व्हायची. मग आजी सांगायची “गावाकडे दूध नसल्यामुळे हा चहा काळा आहे आणि त्यात गूळ टाकलेला आहे; अरे हा काळा चहा प्रकृतीला चांगला. त्यात गूळ आहे त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. असा चहा रोज प्यायला तरी ठणठणीत राहाल – कसला तो पांढऱ्या साखरेचा चहा पिता रे तुम्ही?” आम्हा मुलांना काही ते पटायचे नाही. आम्ही चहा प्यायचो नाही. नातवंडे चहा पित नाही म्हटल्यावर आजी व्यथित व्हायचो. तो कोणाकडून तरी दुधाचा रतीब (आम्ही गावी असेपर्यंत) लावायची आणि गुळाचा दूध घातलेला चहा बनवायची. तो पण प्यायला आम्ही का- कू करू लागल्यावर मग ती माझ्या वडिलांना अथवा काकाला तालुक्याच्या बाजारातून साखर आणायला लावायची आणि आम्हाला मुंबई सारखा चहा मिळू लागायचा.पण गावात ज्यांच्या ज्यांच्या घरी जायचो त्या सर्वांकडे आम्हाला काळाकुट्ट गुळाचा चहाचा काढाच मिळायचा आणि मग साक्षात्कार व्हायचा की अशी चहा प्यायची इथली “लाइफस्टायल” आहे; त्यामुळे आम्ही गावी असेपर्यंत जर कधी दूध नसले वा साखर नसली अथवा दोन्ही नसले त्यावेळी घरी बनलेला गुळाचा बिन दुधाचा चहा आम्ही गोड मानून घ्यायचो.

आज आम्ही मल्टिनॅशनल कंपन्यांची जाहिरात बघतो ज्यात त्यातली सुंदर बाई विचारते “तुमच्या दंतमंजनामध्ये मीठ आहे काय? त्यात कोळसा आहे काय?” अरे चाळीस वर्षांपूर्वी आमचे आजे-पणजे आम्हाला कोळसा आणि मीठ असलेले दंतमंजन ताजे बनून देत होते त्यावेळी कोळसा – राख दातांना वाईट, इनॅमल ची वाट लागते असे ह्या कंपन्या सांगत होत्या आणि आम्हाला भ्रमित करून आपले प्रोडक्ट्स प्रमोट करत होते. आज ह्या कंपन्यांना अचानक राखुंडी –  कोळसा – मीठ दातांच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचा जावई शोध लागलाय काय? त्यांच्या टूथ पेस्ट मध्ये शरीराला अपाय करणारे फ्लोराईड आणि लौरीयल सल्फेट असल्याचे रिपोर्ट्स बाहेर येऊ लागलेत. मग आमची ती निसर्गाशी तादाम्य पावणारी दंतमंजन बनवायची प्राकृतिक पद्धत काय वाईट होती?

आज डीप डीप चहाचे फ्याड आले आहे. हर्बल आणि ग्रीन टी आरोग्याला कसा चांगला हे आपण एकमेकाला सांगत असतो. बिन दुधाचा चहा आरोग्याला चांगला म्हणून तो तसा (आणि बिन साखरेचा पण) प्यायची फॅशन अली आहे. साखर आरोग्याला घटक असल्याचे किती तरी रिपोर्ट्स आपण वाचले आहेत. साखरे ऐवजी गूळ चांगला असे पाश्चात्त्य लोक आता सांगू लागले आहेत. काळा गूळ आहारात असावा असे पण आहार तज्ञ् सांगत आहेत. रक्तातील साखर वाढू नये म्हणून, तसेच वजन वाढू नये म्हणून साखर आहारातून वागला, गूळ वापरा, ग्रीन टी प्या असे आज जे सांगत आहेत त्यांना ओरडून सांगावेसे वाटते की आपले पूर्वज, माझी आजी बिन साखरेचा गुळाचा काळा चहा देताना वेगळे काय सांगत होती?  ज्या पाश्चात्त्यांच्या औदयोगिक क्रान्तिला भुलून, त्यांच्या संशोधनाला प्रमाण मानून आपण बऱ्याच चांगल्या परंपरागत गोष्टींचा त्याग केला तेच पाश्चात्त्य आता आपल्या प्रथा, खाण्याच्या पद्धती, आयुर्वेद उपचार अंगिकारात आहेत.

आज गावे सुधारली आहेत. जग जवळ आले आहे. मुंबईत मिळणाऱ्या साऱ्या वस्तू आज गावाकडे सहजा सहजी उपलब्ध आहेत. आज चुलीची जागा गॅस ने घेतली आहे. कोलगेट ने मार्केटिंग करून गावोगावी पेस्ट आणि ब्रश उपलब्ध करून दिले आहेत. बऱ्याच घरांमध्ये आज साखरेचा चहा बनतो आणि हो दुधाचा पण – कारण पॅक केलेले दूध आज गावाकडे सर्वत्र मिळते. अशा पॅक केलेल्या दुधात पण भेसळ केली जाते. आज गावाकडे खापरीवर शेणी जाळून मशेरी करून देणारा कोणी राहिला नाही. तेवढा कोणाला वेळी नाही. आज गावाकडे काळा चहा मिळेल पण साखरेचा मिळेल, गूळ फार कमी लोक वापरतात. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कोकणातल्या आमच्या गावाकडच्या खेड्यात असलेली जीवन -पद्धती आरोग्याच्या हितासाठी किती योग्य होती ही दृष्टी थोडी उशिरा म्हणजे आज मोठे झाल्यावर, जग पाहिल्यावर, शिकले सावरल्यावर मिळाली. सगळंच जुनं वाईट नसतं आणि टाकून देण्यासारखे नसते ही जाणीव जुन्या आठवणी कुरतडत राहाते आणि काहीतरी हरवल्याच्या भावनेने जीव कासावीस होत राहातो.

— प्रकाश दिगंबर सावंत

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..