नवीन लेखन...

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ४

३१.  श्ववृत्तिव्यासंगो नियतमथ मिथ्याप्रलपनं

कुतर्केष्वभ्यासः सततपरपैशुन्यमननम् ।

अपि श्रावं श्रावं मम तु पुनरेवं गुणगणा-

नृते त्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम् ॥३१

मराठी– लाळघोटेपणाचे पालन (किंवा हलकीसलकी कामे करण्याची रीत), सततचा खोटारडेपणा, सदैव वितंडवादाची सवय, इतरांबद्दल नित्य वाईट विचार, अशा माझ्या गुणसमुच्चयाची ख्याती ऐकून ऐकून तू सोडून दुसरे कोणी क्षणभर तरी माझे तोंड पाहील काय?

सदा लाळे घोटे, वचन नित खोटेच वदनी

वितंडे सर्वांशी, हलकटपणाचीच करणी ।

अशा ऐकोनीया मम गुणसमूहास जननी

दुजा कोणी टाकी नजर मम तू सांग वदनी ? ॥  ३१

३२.  विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं

न् याभ्यामालीढा परमरमणीया तव तनुः ।

अहं हि न्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयो-

र्ययोर्नान्तर्यातस्तव लहरिलीलाकलकलः ॥ ३२

मराठी– तुझ्या अत्यंत सुंदर देहाचे ज्यांनी कधीच दर्शन घेतले नाही, ते डोळे मोठे मोठे असूनही काय उपयोगाचे ? ज्या मनुष्याच्या कानांमध्ये तुझ्या लाटांच्या खेळाचा खळखळाट कधी शिरलाच नाही, त्या कानांची उपेक्षा करावी हेच बरे !

जरी मोठे मोठे मुळि न उपयोगी नयन ते

जरी ना दृष्टीला  सुभग तव ते रूप दिसते ।

उपेक्षा कानांची जननि करणे योग्यच खरी

तुझ्या लाटांच्या जे खळखळ रवा ठेविति दुरी ॥ ३२

 

३३.  विमानैः स्वच्छन्दं सुरपुरमयन्ते सुकृतिनः

पतन्ति द्राक् पापा जननि नरकान्तः परवशाः ।

विभागोऽयं तस्मिन्नशुभमयमूर्तौ जनपदे

न यत्र त्वं लीलादलितमनुजाशेषकलुषा ॥ ३३

मराठी– पुण्यवान जनांनी विमानांनी मनसोक्त स्वर्गारोहण करायचे आणि पातकी लोकांनी त्वरित दबून नरकात पडावयाचे ही विभागणी तुझी सहजगत्या दीनदलित मानवांचे पातक नष्ट करणारी कल्याणकारी मूर्ती ज्या देशात नाही अशाच ठिकाणी केली जाते. (तू जेथे आहेस तेथे सर्वांना स्वर्गच मिळतो).

विमानाने स्वर्गा गमन सुजना आस धरिता

खलांना नर्की त्या खितपत पडावे न वदता ।

स्थिती ऐशा देशी जननि, तव कल्याणसुखदा

नसे मूर्ती जेथे, खचित अशुभा त्या जनपदा ॥ ३३   

३४.  अपि घ्नन्तो विप्रानविरतमुशन्तो गुरुसतीः

पिबन्तो मैरेयं पुनरपि हरन्तश्च कनकम् ।

विहाय त्वय्यन्ते तनुमतनुदानाध्वरजुषा-

मुपर्यम्ब क्रीडन्त्यखिलसुरसम्भावितपदाः ॥ ३४

मराठी – आई, ब्राह्मणांची हत्या करणारे, सतत गुरुपत्नीची अभिलाषा धरणारे, मद्यपान करणारे, तसेच (दुस-याचे) धन चोरणारे (असे सर्व त-हेचे पापी जन), (आयुष्याच्या) अखेरीस तुझ्या (प्रवाहा)त   आपले देह सोडून सर्व देवतांकडून सन्मानित पदे मिळवून मोठमोठी दाने तसेच धार्मिक कृत्ये   करणा-यांचे वर क्रीडा करतात. (त्याहून वर चे पद मिळवितात).

द्विजांची हत्या वा सतत गुरुपत्नीप्रति रती

अपेयासी प्यावे, परधन तसे फस्त करिती ।

महापापी ऐसे त्यजुनि निज देहा तव जली

उडी दानाधर्माहुनि सरस ती उंच ठरली ॥ ३४

३५.  अलभ्यं सौरभ्यं हरति नियतं यः सुमनसां
क्षणादेव प्राणानपि विरहशस्त्रक्षतहृदाम् ।
त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात्
पुनीते सोऽपि द्रागहह पवमानस्त्रिभुवनम् ॥ ३५

मराठी – जो फुलातील दुर्मिळ सुवास, तसेच वियोगरूपी शस्त्राने व्यथित झालेल्यांचे प्राणही निश्चितपणे क्षणाभरात हरण करतो, तो वायूसुद्धा तुझ्या शोभायमान लाटांच्या संपर्कात आल्यावर ताबडतोब तिन्ही लोकांना पावन करतो.

सुवासाची चोरी पवन करि तो दुर्लभ जरी

वियोगाच्या शस्त्रे विकल असता प्राणहि हरी ।

मनोवेधी लाटांसह पवन जेवी विहरतो

तिही लोकांचे पातक झडकरी नष्ट करितो ॥ ३५

३६.  क्रियन्तः सन्त्येके नियतमिहलोकार्थ घटकाः

परे पूतात्मानः कति च परलोकप्रणयिनः ।

सुखं शेते मातस्तव खलु कृपातः पुनरयं

जगन्नाथः शश्वत्त्वयि निहितलोकद्वयभरः ॥ ३६  (श्लेष)

मराठी- हे आई, या जगातील कित्येक जण आपले या लोकात सार्थक व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात, आणि काही जण भविष्यातील परलोकाची आवड असणारे तपस्वी विरागी असतात. (परंतु) दोन्ही लोकांचा भार तुझ्यावर सोपवून मी हा जगन्नाथ (जगाचा स्वामी) खरोखर तुझ्या(च) कृपेने कायमचा आरामात निद्रावश झालो आहे.

मिळावे लोकी या सुख म्हणुनि कित्येक झटती

परत्राच्या आशे किति तरि विरागास धरिती ।

परी दोन्ही लोका जननि तुजसी सोपवुनिया

कृपे निद्रा घेई खचितच जगन्नाथ तुझिया ॥ ३६

३७.  भवत्या हि व्रात्याधमपतितपाखण्डपरिषत्

परित्राणस्नेहः श्लथयितुमशक्यः खलु यथा ।

ममाप्येवं प्रेमा दुरितनिवहिष्वम्ब जगति

स्वभावोऽयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः ॥ ३७

मराठी- माते, नीच, अधम, पतित, पाखंडी समूहांचा उद्धार करण्याचे तुझे प्रेम कमी करणे जसे (तुला) शक्य नाही, तसेच माझेही पापराशींबद्दलचे आकर्षण (कमी होणार नाही). खरोखर, या जगात हा स्वभाव लपवणे अवघड आहे.

असंस्कारी, पापी, अधम सकला दांभिक जना 

तुझा उद्धाराचा पडत न फिका प्रेमळपणा ।

तशी पापप्रीती मनिचि मम हो ना कधि कमी

स्वभावा झाकावे अवघड किती सांगु तुज मी ॥ ३७

३८.  प्रदोषान्तर्नृत्यत्पुरमथनलीलोद्भृतजटा

तटाभोगप्रेङ्खल्लहरिभुजसन्तानविधुतिः ।

बिलक्रोडक्रीडज्जलडमरुट्ङ्कारसुभग-

स्तिरोधत्तां तापं त्रिदशतटिनीताण्डवविधिः ॥ ३८

मराठी- संध्याकाळच्या वेळी नृत्य करताना शंकराने आपल्या जटा डौलदारपणे उंचावल्याने जिचा झुलता प्रवाह (धारा) (नर्तकीच्या) हातांप्रमाणे आंदोलित होत आहे, काठावरील कपारींमध्ये खळाळणा-या पाण्याचा डमरूसारख्या घुमणा-या आवाजामुळे सुखद वाटणारे ते स्वर्गंगेचे तांडव नृत्य आमचा ताप हरण करो.

करी संध्यानृत्या पशुपति, जटा पूर्ण खुलती

प्रवाहीच्या धारा झुलत भुज जेवी विलसती ।

कपारी लाटांनी दुमदुमत ती जेवि डमरू

प्रवाहो माते, हो सतत अमुचा पातक हरू ॥ ३८

३९.  सदैवं त्वय्येवार्पितकुशलचिन्ताभरमिमं

यदि त्वं मामम्ब त्यजसि समयेऽस्मिन्सुविषमे ।

तदा विश्वासोऽयं त्रिभुवनतलादस्तमयते

निराधारा चेयं भवति खलु निर्व्याजकरुणा ॥ ३९

मराठी-  आई, माझ्या कल्याणाची सर्व काळजी नित्य तुझ्यावरच सोपविणा-या मला या कठीण समयी जर सोडून देशील, तर (तुझ्यावरचा) हा विश्वास त्रिलोकातून नाहीसा होईल आणि तुझी निखळ अनुकंपा(ही) निराधार होईल.

असे पूर्णत्वाने तुजसि अवलंबून नित मी

जरी सोडूनीया जननि मज देशील विषमी ।

तुझ्या नावा बट्टा खचित जगती लागत गुणा

निराधारा होई अकपट जरी आज करुणा ॥ ३९

४०.  कपर्दादुल्लस्य प्रणयमिलदर्धाङ्गयुवतेः

पुरारेः प्रेङ्खत्यो मृदुलतरसीमन्तसरणौ ।

भवान्या सापत्न्यस्फुरितनयनं कोमलरुचा

करेणाक्षिप्तास्ते जननि विजयन्तां लहरयः ॥ ४०

मराठी- हे माते, (शंकराच्या) जटांमधून उडी मारून बाहेर पडताना, त्याच्या मांडीवर बसलेल्या प्रणयरत पार्वतीच्या केसांच्या भांगाच्या कोमल रेषेतून खेळणा-या (आणि) सवती मत्सरभावाने क्षुब्ध नजरेने, हाताने झटकून निपटून टाकलेल्या तुझ्या लहरींचा विजय असो.

जटातूनी लाटा उसळुनि वरी घेत उसळी             

हराच्या अर्धांगी प्रणयरत रुद्राणि बसली ।

किनारी केसांच्या अवखळ निखारी तव जला

सपत्नीक्रोधाने नजरहि, मिळो विजय तुजला ॥  ४०

******************

— धनंजय बोरकर
९८३३०७७०९१

 

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..