नवीन लेखन...

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग २

 

८.  स्मृतं सद्यः स्वान्तं विरचयति शान्तं सकृदपि
प्रगीतं यत्पापं झटिति भवतापं च हरति ।
इदं तत् गङ्गेति श्रवणरमणीयं खलु पदं
मम प्राणप्रान्ते वदनकमलान्तर्विलसतु  ॥ ०८

मराठी- एकदाही स्मरण झाले तरी ज्यामुळे आपल्याला आंतरिक शांति मिळते, ज्याचे गायन आपल्या पापाचा व भवतापाचा नाश करते, असे ‘गंगा गंगा’ असे कानांना गोड वाटणारे शब्द खरोखरी माझ्या मृत्युसमयी माझ्या मुखी राहोत.

मिळे शांती चित्ता स्मरण क्षणमात्रे जरि करी
जया गाता पापा त्वरित भवतापाहि विखरी ।
अशी ‘गंगा गंगा’ मधुर वचने मोक्षप्रद जी
मुखी मृत्यूकाली गुणगुणत राहोत सहजी ॥ ०८

९.  यदन्तः खेलन्तो बहुलतरसंतोषभरिता
न काका नाकाधीश्वरनगरसाकाङ्क्षमनसः ।
निवासल्लोकानां जनिमरणशोकापहरणं
तदेतत्ते तीरं श्रमशमनधीरं भवतु नः ॥ ०९

मराठी- ज्या तुझ्या तीरी खेळणारे कावळे(सुद्धा) इतके आनंदाने फुलून जातात की, त्यांच्या मनाला इंद्राच्या नगरीला जाण्याची इच्छा होत नाही, आपल्या आस्तित्वाने जो जनांचे जन्ममृत्यूचे दुःख हरण करतो, तो हा तुझा काठ आमच्या कष्टांपासून मुक्ति देण्यास समर्थ होवो.

तुझ्या तीरी क्रीडा करिति बहु एकाक्ष सगळे
नको इंद्रप्रस्था म्हणति मनि आनंद उसळे ।
हरी आस्तित्वाने जनन-लय-पीडा जगतिचे
तटाका ये शक्ती शमन करण्या कष्ट अमुचे ॥ ०९

१०.  न यत्साक्षाद्वेदैरपि गलितभेदैरवसितं
न यस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः ।
निराकारं नित्यं निजमहिमनिर्वासिततमो
विशुद्धं यत्तत्वं सुरतटिनि तत्त्वं न विषयः ॥ १०

मराठी- हे स्वर्गातून वहाणा-या गंगे, तू, प्रत्यक्ष वेदांना आपापसातले मतभेद दूर सारूनही जे सापडले नाही, जेथे प्राणिमात्रांच्या वाणी व मनाला वावच उरत नाही, असे निराकार, नित्य, आपल्या तेजाने अंधकार नष्ट करणारे अत्यंत शुद्ध तत्व आहेस, (उपभोगाचे) साधन नव्हेस.

मिळेना वेदांना विसरति स्वभेदा जरि बळे  (कसणे- करकचून बांधणे)
मना वा वाणीला गति न, कसता मार्ग सगळे ।
स्वतेजाने नाशी तम, निखळ ते तत्त्व अससी
निराकारी, गंगे, विषय उपभोगार्थ नससी ॥ १०  

११.   महादानैर्ध्यानैर्बहुविधवितानैरपि च यत्न
लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि ।
अचिन्त्यं तद्विष्णोः पदमखिलसाधारणतया
ददाना केनासि त्वमिह तुलनीया कथय नः ॥११

मराठी– मोठमोठी दाने, ध्यान, अनेक प्रकारच्या आहुती, विक्राळ निष्कलंक तपाच्या राशी रचूनसुद्धा प्राप्त न होणारे, विचार करण्यापलिकडचे विष्णुपद आम्हा सर्वांना समानतेने मिळवून देणा-या तुझ्याशी तुलना करण्यासारखे काय आहे ? सांग.

व्रते, मोठी दाने, मनन करुनी, आहुति दिल्या
तपोराशी तेजोमय बहु बले भव्य रचिल्या ।
विचारांनी विष्णूपद नच मिळे, देसि सकला
सुखे, तोलू कोणासहित तुजसी सांग मजला ॥ ११

१२.  नृणामीक्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं
शिवायास्ते मूर्तेः क इह महिमानं निगदतु ? ।
अमर्षम्लानायाः परममनुरोधं गिरिभुवो
विहाय श्रीकण्ठः शिरसि नियतं धारयति याम् ॥ १२

मराठी– नुसत्या (एका) कटाक्षाने जी माणसांच्या सांसारिक भयांचा नाश करते, पार्वती रागावली असतानाही (तिची) समजूत काढावयाचे सोडून जिला श्रीशंकर आपल्या मस्तकी नित्य धारण करतो, त्या तुझ्या आनंददायक कृपाळू मूर्तीचा महिमा कोणी वर्णावा?

कटाक्षाने एका हरण भवतापाहि विषमा
कृपाळू मूर्तीचा कथन करु मी काय महिमा ।
शिरी शंभू ठेवी तुजसि नच मानी मनि तमा
सपत्नीभावाने जळफळत भारी जरि उमा ॥ १२   (सपत्नीभाव- सवतीमत्सर)

१३.  विनिन्द्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितैर्-
अवाच्यानि व्रात्यैः सपुलकमपास्यानि पिशुनैः ।
हरन्ती लोकानामनवरतमेनांसि कियतां
कदाप्यश्रान्ता त्वं जगति पुनरेका विजयसे ॥ १३

मराठी– उन्मत्तांकडूनही ज्यांची निंदा केली जाते, तसेच पापी लोकांकडूनही जी टाळली जातात, अधमांच्या मुखातून जी बोलली जात नाहीत, विकृत लोकांकडूनही जी अंगावर काटा आल्याने सोडून दिली जातात, अशी कित्येकांची पापे अविरतपणॆ नष्ट  करतानाही तू दमत नाहीस ! या जगात तूच एक खरोखर विजयी आहेस.

जयाची निंदा हो खविसमुखि, पापी न उघडी
मुखा, मागे जाई खलही, भयरोमे बहु कुडी ।
फुले विकॄतांची, त्यजिति असली दुष्ट दुरिते
तया मोक्षा नेता अथक खरि जेताच सरिते ॥ १३

१४.  स्खलन्ती स्वर्लोकादवनितलशोकापहृतये
जटाजूटग्रन्थौ यदसि विनिबद्धा पुरभिदा ।
अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां
गुणानामेवायं तव जननि दोषः परिणतः ॥ १४

मराठी– हे माते, या पृथ्वीवरील दुःखाचे हरण करण्यासाठी तू स्वर्गातून उडी घेतलीस, तेव्हा शंकराने तुला आपल्या जटांच्या गाठीत घट्ट बांधून ठेवले. निर्लोभी व्यक्तीच्या मनातही मोह निर्माण करणा-या तुझ्या गुणांपासूनच हा दोष निर्माण झाला आहे (हेच खरे !).

उडी घेसी स्वर्गातुनि शमविण्या दुःख जगती
जटामाजी शंभू अडकवि तुला केशकिरिटी ।
निरिच्छाच्या सुद्धा हृदयि जरि इच्छा निपजली
गुणांच्या माथी या जननि तव निंदा चिकटली ॥ १४ 

१५.  जडानन्धान्पङ्गून्प्रकृतिबधिरानुक्तिविकलान्
ग्रहग्रस्तानस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् ।
निलिम्पैर्निर्मुक्तानपि च निरयान्तर्निपततो
नरानम्ब त्रातुं त्वमिह परमं भेषजमसि ॥१५

मराठी– हे माते, चैतन्यहीन, आंधळे, पांगळे, जन्मापासूनचे बहिरे, मुके, नवग्रहांच्या दशेमुळे क्लेश होत असलेले, पापातून सुटकेचा रस्ताच बंद झालेले, तसेच देवांनी सोडून दिलेले (व त्यामुळे) नरकात खितपत पडलेले अशा सर्व मनुष्यांचे तारण करणारी तू एक श्रेष्ठ औषधी आहेस.

नसे ज्या चैतन्य, बधिर, बहिरे, पंगु असती
नसे दृष्टी वाचा नवग्रहदशा नर्कवसती ।
सुटाया ना रस्ता, खितपत, जया देव निरसी  (निरसणे- झिडकारणे, नाकारणे)
नरा ऐशा माते, भिषज जगती खास अससी ॥ १५       (भिषज- औषध)  

१६.  स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणामयमपाम्-
अपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति ।
मुदा यं गायन्ति द्युतलमनवद्यद्युतिभृतः
समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः ॥ १६

मराठी– हे माते, निसर्गतःच स्वच्छ आणि थंडगार अशा तुझ्या पाण्याचा अवर्णनीय महिमा जगात गाजत आहे. (या जलामुळेच) सगरपुत्रांना (प्राचीनकाळी) राजबिंडे देह व स्वर्गाची प्राप्ती झाली. (पण अजूनही ते) हा महिमा रोमांचित होऊन आनंदाने गात आहेत.

निसर्गाच्या योगे विमल जल हो शीतल बरे
जलाची या सा-या जगति महती फार पसरे ।
तयायोगे लाभे सगरतनयां दिव्य तनु ती
बहू मोदे स्वर्गी अजुन महती गात असती ॥ १६

१७.  कृतक्षुद्रैनस्कानथ झटिति सन्तप्तमनसः
समुद्धर्तुं सन्ति त्रिभुवनतले तीर्थनिवहाः ।
अपि प्रायश्चित्तप्रसरणपथातीतचरितान्
नरानूरीकर्तुं त्वमिव जननि त्वं विजयसे ॥ १७

मराठी– हातून घडलेल्या छोट्याश्या कुकर्मानेसुद्धा ज्यांच्या मनाला खेद होतो, अशांचा उद्धार करण्यासाठी या तिन्ही लोकात ढिगांनी तीर्थक्षेत्रे पडलेली आहेत. तथापि प्रायश्चित्त घेऊन(ही) सुटकेचा मार्ग असण्यापलिकडे ज्यांची वर्तणूक आहे अशा लोकाना उराशी घेणारी (आणि उद्धार करणारी) तू आणि तूच एकटी विजयी होतेस.

कुकर्मॆ छोटीशी रुखरुख जया फार सलती
तयांच्या उद्धारा जगति बहु तीर्थेहि असती ।
न हो प्रायश्चित्ते परिहि सुटका पातक असे
तया पोटाशी घे जननि जगती कोण विलसे ॥ १७

१८.  निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां
प्रधानं तीर्थानाममलपरिधानं त्रिजगतः ।
समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां
श्रियामाधानं नः परिहरतु तापं तव वपुः ॥१८

मराठी– धर्माचे वसतिस्थान, नवनवीन अवर्णनीय आनंद देणारी, तिही लोकातील तीर्थांना आपल्या शुभ्र (प्रवाहरूपी) वस्त्राने वेढून टाकणारी, बुद्धीला समाधान देणारी, अधार्मिकतेवर पांघरूण घालणारी व भाग्याचे (कोष)स्थान अशी तुझी तनु आमचे दुखः हरण करो.

सुधर्माचा ठेवा, अतुलनिय दे मोद सकला
तिहीं लोकी तीर्था वसन जंव वेढीत विमला ।
मतीचे चातुर्य, जडमतिस झाकी, कवच जे
असे ऐश्वर्याचे, तनु तव हरो क्लेश अमुचे ॥ १८

१९.  पुरो धावं धावं द्रविणमदिरा घूर्णितदृशां
महीपानां नानातरुणतरखेदस्य नियतम् ।
ममैवायं मन्तुः स्वहितशतहन्तुर्जडधियो
वियोगस्ते मातर्यदिह करुणातः क्षणमपि ॥१९

मराठी– धनरूपी मदिरेने ज्यांचे डोळे गरागरा फिरत आहेत अशा राजांच्यासमोर सतत (पैशासाठी) धावून धावून मी अत्यंत उद्विग्न होत आलो आहे. पण माझ्या बधिर बुद्धीने आपल्या हिताचे आपणच शत्रू झाल्याने तुझा हा वियोग घडला. तेव्हां हे आई, तू माझ्यावर क्षणभर तरी दया कर.

नशेने द्रव्याच्या नजर फिरवी जे गरगरा
समोरी राजांच्या सतत शिणलो धावुन खरा ।
असे झालो माझा बधिर मतिने मीच रिपु जो
वियोगी दावी तू क्षणभर दया माय मजसी ॥ १९

२०.  मरुल्लीलालोलल्लहरिलुलिताम्भोजपटली-
स्खलत्पांसुव्रातच्छुरणविसरत्कौंकुमरुचि ।
सुरस्त्रीवक्षोजक्षरदगरुजम्बालजटिलं
जलं ते जम्बालं मम जननजालं जरयतु ॥ २०

मराठी– वा-याच्या झुळुकांनी पाण्यात उठलेल्या लाटांवर डोलणा-या कमळातील परागकण पाण्यावर तरंगत असल्याने ज्या तुझ्या पाण्याला कुंकवाचा रंग आला आहे, (स्नान करणा-या) देवतांच्या वक्षावरून ओघळलेले धूप व दारुहळद यांच्या योगाने दाट झालेले तुझे पाणी माझ्या जन्माचे जाळे जीर्ण करो.

सुटे वारा, लाटा उठत, कमळे डोलत सवे
परागांची होता उधळण जली लाल पसरे ।
उटीचा जो साका प्रकृति उरिचे चंदन बरे   (प्रकृति- देवता)
जिण्याचे या जाळे अलगद करो जीर्ण सगळे ॥ २०

— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 46 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग २

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..