नवीन लेखन...

जगन्नाथ अष्टकम्- मराठी अर्थासह

एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठ-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे कृष्ण-बलराम-सुभद्रा यांचे. आद्य शंकराचार्यांनी येथे भूमिगत असलेल्या जगन्नाथ मूर्तीची पुनः प्रतिष्ठापना व गोवर्धन मठाची स्थापना केली. ज्या वर्षी अधिक मास आषाढात येतो, त्या वर्षी ‘दारु’ वृक्षाच्या लाकडापासून बनविलेल्या या मूर्ती बदलण्यात येतात. हे मंदिर १२ व्या शतकात गांग वंशीय राजा अनंतवर्मन याने बांधले.

जगन्नाथाची रथयात्रा (रथोत्सव) हा १०-१२ दिवसांचा वार्षिक उत्सव असतो. या उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना नऊ दिवस जगन्नाथ मंदिरापासून ३ किमी अंतरावर असलेल्या गुंडिचा मंदिरात रथात ठेवण्यात येते. जगन्नाथ मंदिर ते गुंडिचा मंदिर हा प्रवास आषाढ शुद्ध द्वितीयेला, तर नऊ दिवसांच्या समाप्तीनंतर परतीचा प्रवास आषाढ शुद्ध दशमीला होतो. या प्रवासात तिन्ही रथ भाविकांकडून ओढले जातात.

एक आख्यायिकेनुसार ज्या इंद्रायुम्नाने हे मंदिर बांधले त्याची राणी गुंडिचा हिला भेटण्यासाठी देवता येथे येतात. दुसर्‍या एका आख्यायिकेनुसार महोत्सवाच्या चौथ्या दिवशी, भगवान जगन्नाथाची पत्नी लक्ष्मी, आपल्या पतीस भेटण्यासाठी गुंडिचा मंदिरात येते.

अत्यंत रसाळ व भावपूर्ण असे हे अष्टक शंकराचार्यांनी शिखरिणी वृत्तात रचले आहे.


कदाचित् कालिन्दीतटविपिनसङ्गीततरलो
मुदाभीरीनारीवदनकमलास्वादमधुपः ।
रमाशम्भुब्रह्मामरपतिगणेशार्चितपदो
जगन्नाथः स्वामी नयन_पथ_गामी भवतु मे ॥१॥

मराठी- कधी यमुनेच्या किनारी कुंजामध्ये संगीतावर झुलणारा, आनंदी गोपींच्या मुखकमला (तील मधा) चा आस्वाद घेणारा भुंगा, लक्ष्मी,शंकर,ब्रह्मा,इंद्र,गणपती यांच्याकडून ज्याची पावले पूजिली जातात असा स्वामी जगन्नाथ माझ्या नयनांसमोर राहो.

वनी वृंदेच्या जो अलगुजसुरांनी डुलतसा          (वृंदा-यमुना)
सुखी गोपीकांचे मुखकमळ चुंबी भ्रमरसा ।
पदा पूजी लक्ष्मी वरद शिव ब्रह्मा सुरपती
समोरी नेत्रांच्या सतत मम राहो जगपती ॥ १


भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखि_पिच्छं कटितटे
दुकूलं नेत्रान्ते सहचर_कटाक्षं च विदधत् ।
सदा श्रीमद्वृन्दावन_वसति_लीला_परिचयो
जगन्नाथः स्वामी नयन_पथ_गामी भवतु मे ॥२॥

मराठी- ज्याने डाव्या हातात बासरी धरली आहे, मस्तकावर मोरपीस खोवले आहे, कमरेला रेशमी वस्त्र नेसले आहे, जो डोळ्यांच्या कोप-यातून सवंगड्यांकडे कटाक्ष टाकत आहे, श्री वृन्दावन क्षेत्री रहात असताना केलेली क्रीडा हीच ज्याची ओळख आहे, असा स्वामी जगन्नाथ माझ्या नयनांसमोर राहो.

करी डाव्या पावा, मयुरपर माथा, वसन से
मृदू, मित्रां पाही नजर तिरकी टाकित असे ।
जयाची क्रीडा ही व्रजजनसवे ओळख खरी
जगन्नाथा माझी नजर नित राहो तुजवरी ॥ २


महाम्भोधेस्तीरे कनक_रुचिरे नील_शिखरे
वसन् प्रासादान्तः सहज_वलभद्रेण बलिना ।
सुभद्रा_मध्यस्थः सकल_सुर_सेवावसरदो
जगन्नाथः स्वामी नयन_पथ_गामी भवतु मे ॥३॥

मराठी- महासागराच्या सुंदर सोनेरी रंगाच्या किना-यावर नील शिखरावरील प्रासादात बलवंत बलराम आणि उभयतांच्या मध्ये असलेली बहीण सुभद्रा यांच्यासह रहाणारा आणि सर्व देवांना सेवेची संधी देणारा असा स्वामी जगन्नाथ माझ्या नयनांसमोर राहो.

बरा सोनेरी हा जलधितट या नील शिखरी
महाली वास्तव्या बळकट बळीरामहि करी ।
सुभद्रे संगे, दे अवसर सुरां पूजन प्रती
समोरी नेत्रांच्या सतत मम राहो जगपती ॥ ३


कृपापारावारः सजलजलदश्रेणिरुचिरो
रमावाणीरामः स्फुरदमलपंकेरुहमुखः ।
सुरेन्द्रैराराध्यः श्रुतिगणशिखागीतचरितो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥४॥

मराठी- जो दयेचा महासागर आहे, पाण्याने संपृक्त ढगांच्या झुंडीप्रमाणे जो देखणा आहे, लक्ष्मी आणि सरस्वती यांचेसाठी जो आनंददायक आहे, ज्याचे वदन शुभ्र कमळासारखे आहे, इंद्र (व इतर देव) ज्याची उपासना करतात, वेदोपनिषदे ज्याचे श्रेष्ठ चरित गायन करतात, असा स्वामी जगन्नाथ माझ्या नयनांसमोर राहो.

दयासिन्धू, काळा जणु ढग_थवा सुंदर दिसे
रमा_वाणी साठी सुखद, मुख जे पुण्डरिकसे ।
करी भक्ती जिष्णू, कवन श्रुति गाती बहु स्तुती         (जिष्णू- इंद्र),
समोरी नेत्रांच्या सतत मम राहो जगपती ॥ ४


रथारूढो गच्छन् पथि मिलितभूदेव पटलैः
स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः ।
दयासिन्धुर्बन्धुः सकलजगतां सिन्धुसुतया
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥५॥

मराठी- (रथयात्रे दरम्यान) रस्त्यावरून रथातून जात असतांना पावलोपावली भेटणा-या ब्राह्मणांच्या समूहांनी केलेली स्तुती ऐकून तो करुणामय, कृपेचा महासागर, सर्व जगताचा सखा, सागर कन्ये (लक्ष्मी) च्या सह असलेला स्वामी जगन्नाथ माझ्या नयनांसमोर राहो.

रथ_स्वारी मार्गी द्विज ठिकठिकाणी समुहसे
दयावंता कानी स्तुति वचन त्यांचे पडतसे ।
सखा सा-या विश्वा, कणव जलधी, संग अदिती       (अदिती- लक्ष्मी)
समोरी नेत्रांच्या सतत मम राहो जगपती ॥ ५


परंब्रह्मापीडः कुवलयदलोत्फुल्लनयनो
निवासी नीलाद्रौ निहितचरणोऽनन्तशिरसि ।
रसानन्दी राधासरसवपुरालिङ्गनसुखो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥६॥

मराठी- जो परम ब्रह्माच्या शिरावरील मुकुट आहे, फुललेल्या निळ्या कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत, जो नील पर्वतावर रहातो, ज्याची पावले शेषाच्या मस्तकावर ठेवलेली असतात, भावनोत्कट राधेच्या कायेला कवेत घेऊन ज्याला अत्यानंद होतो, असा स्वामी जगन्नाथ माझ्या नयनांसमोर राहो.

विधाता माथ्याचा मुकुट, फुलल्या नीलकमला
दला जेवी डोळे, पद भुजग-माथा, नग निळा ।
हा, मोदे राधा मुदित तनु आलिंगुन बरी
जगन्नाथा माझी नजर नित राहो तुजवरी ॥ ६


न वै याच्ञे राज्यं न च कनक_माणिक्य_विभवं
न याच्ञेऽहं रम्यां सकल_जन_काम्यां वरवधूम् ।
सदा काले काले प्रमथ_पतिना गीत_चरितो
जगन्नाथः स्वामी नयन_पथ_गामी भवतु मे ॥७॥

मराठी- मी राज्य वा सोने रत्ने युक्त समृद्धी यांची याचना करीत नाही, किंवा सगळ्या लोकांना हवी असते अशी सुरेख पत्नीही मागत नाही. सदाशिव सदा समुचित समयी ज्याच्या महिम्याचे गायन करतो, असा स्वामी जगन्नाथ माझ्या नयनांसमोर राहो (एवढीच माझी प्रार्थना आहे).

नको सत्ता मत्ता धन जडजवाहीर मजला
हवी जी सर्वांना तरुण नवरी ती न मजला ।
हवी, ज्याचे काळी उचित गुण गाई पशुपती
समोरी नेत्रांच्या सतत मम राहो जगपती ॥ ७


हर त्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते
हर त्वं पापानां विततिमपरां यादवपते ।
अहो दीनेऽनाथे निहितचरणो निश्चितमिदं
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥८॥

मराठी- हे सुरश्रेष्ठा, तू या कुचकामी संसाराचे लवकरात लवकर हरण कर. हे देवांच्या नायका, यदुनाथा, तू (माझ्या) पातकांचा हा अस्ताव्यस्त पसारा नष्ट कर. ज्याच्या पदी दुबळे अनाथ जन समर्पित होतात, असा स्वामी जगन्नाथ माझ्या नयनांसमोर राहो.

निकामी संसारा, त्वरित कर दूरा सुरवरा
पसारा पापांचा असिम, कर नाशा यदुवरा ।
जया पायी सारे अधन दुबळे ठाव करिती
समोरी नेत्रांच्या सतत मम राहो जगपती ॥ ८


जगन्नाथाष्टकं पुण्यं यः पठेत् प्रयतः शुचि ।
सर्वपाप_विशुद्धात्मा विष्णुलोकं स गच्छति ॥९॥

मराठी- असे हे जगन्नाथाचे आठ श्लोकी स्तोत्र जो पुण्यवान जाणीवपूर्वक पवित्रतेने म्हणेल, तो सर्व पातकांपासून शुद्ध (मुक्त) होऊन विष्णुलोकाला जातो.

स्तोत्र ऐसे आठ श्लोकी जाणुनी शुद्ध जो मनी
म्हणे, जाई विष्णुलोकी पातके नष्ट होउनी ॥ ९

॥ इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं जगन्नाथाष्टकं संपूर्णम् ॥

********************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

3 Comments on जगन्नाथ अष्टकम्- मराठी अर्थासह

  1. आपल्या सुंदर स्पष्टीकरणामुळे समजले की मूर्ती कोणाच्या आहेत मी समजत होते श्रीकृष्ण , बलराम व राधा
    राधेय , बलराम , सुभद्रा यांचे वर्णन व जगन्नाथपुरीची रथयात्रा व त्या मागची भूमिका काय आहे हे आपल्या अनुवादातून ज्ञानवृध्दी करणारे आहे खूप छान

  2. नेहमीप्रमाणेच बोरकर सरांनी खूप सुंदर भाषांतर केले आहे. प्रत्येक श्लोकांची मराठी काव्य करणेत तर बोरकर माहीर आहेत.
    विषय सुद्धा नवीन आहे. सरानी असेच लेखन करावे हि शुभेछया.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..