नवीन लेखन...

जादूच्या दिव्यातला राक्षस

 

एकदा मी लहानपणी वाचलेल्या पुस्तकांची नावे आठवत होतो. तेव्हा असे लक्षात आले की, पुस्तकाच्या नावात ‘जादू’ असा शब्द वा त्याचा प्रत्यय असलेले पुस्तक वाचण्याची ओढ जास्त होती. हाच प्रकार काही पुस्तकांच्या नावातील वैशिष्ठ्यामुळे होत होता. पुढे एखाद्या कथामालिकेची, बालकांसाठीच्या मासिकांची वा लेखकाची भुरळ पडल्याने त्या पुस्तकांना पसंती दिली जात होती. शाळेत फिरणारे ‘पेटीतील वाचनालय’ जादूने भारलेले होते. वर्गाची क्रमिक पुस्तके विषयांचे ज्ञान वाढवीत असताना, आवांतर वाचनाची गोडी ज्ञानसाठ्यात मोलाची भर घालत असतात. उदाहरणार्थ, ‘जादूचा दिवा’ सारखे पुस्तक कल्पनेच्या उंच भरार्‍या मारायला शिकवितात. दिवा घासल्यावर त्यातून प्रकट होणारा राक्षस ‘अल्लाउद्दिन’ साठी कोणतेही काम करण्यास तयार असतो. सतत कामाची मागणी करणारा हा राक्षस, ‘रिकामा’ न ठेवण्याची अट घालतो. त्याला बिझी ठेवण्यासाठी युक्त्यांचा शोध घेणारा अल्लाउद्दिन व अचाट क्षमतेचा राक्षस यांच्या ओढाताणीच्या गमतीदार गोष्टी घडत जातात. मन गुंतवून ठेवणे व मनाला विरंगुळा देणे ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. त्यावेळी जसे घडत होते तसेच आजही लहान मुले जेव्हा गोष्टी ऐकतात व वाचतात तेव्हा मनात सुखाची भावना ‘डोपामाईन’मुळे निर्माण होते. मग हे प्रास्ताविक कशासाठी? कारण नवा राक्षस अवतरला आहे. मुलांना वाचनापासून दूर नेणारा.

मूल जसे मोठे होत जाते तसे त्या-त्या वयाचे विषय हाताळणारी पुस्तके आहेत, पण मुलांचे वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. वाचनाची आवड लुप्त होणे वा त्यासाठी वेळ न मिळणे यापैकी काहीतरी कारण यामागे असल्याचे दिसते.

 वाचनाची आवड लुप्त होणे – नवा छंद वा नवीन खेळ यांमुळे हे होऊ शकते. एकच खेळ वा एकच छंद सर्वांना सारखा अनुभव देईल असं नाही. प्रत्येकाची आवड निराळी असू शकते. याचा अर्थ आनंद वेगवेगळ्या प्रकारे मिळवता येतो. एक वेगळा प्रकार सध्या ‘गेम्स’च्या रूपात दिसू लागला आहे. संगणक व मोबाईल यावर खेळल्या जाणार्‍या गेम्सच्या बाबतीत बर्‍याच मुलांची आवड सारखी असल्याचे दिसते. ‘गेम खेळणे’ हे आनंद मिळविण्याचे नवे साधन बनले आहे. सुरुवातीला थोडा वेळ, मग जास्त वेळ व अंती मिळेल तेवढा वेळ यातच रमणे ही पायरी गाठली जाते. आनंद मिळविण्यासाठी गेम खेळण्याशिवाय पर्याय नाही असे वाटू लागते. म्हणून वाचनाची आवड असणार्‍यांच्या अग्रक्रमात वाचन खाली सरकते व वाचनाची आवड नसणार्‍यांच्या अग्रक्रमात वाचनाला स्थान मिळण्याची शक्यता नसते.

 वाचनासाठी वेळ न मिळणे – शाळा व शाळेच्या पूरक शिक्षणासाठी शिकवण्या यांना वेळ देणे आवश्यक आहे. राहिलेला वेळ एखादा छंद व गेम खेळण्यात जातो.

कुटुंबात नव्या सोयीसुविधा आल्या तशीच करमणुकीची नवीन साधनेसुध्दा आली. ज्ञानार्जनास उपयुक्त अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळू लागली. व्हिडिओद्वारे गॅजेट्स वापरण्यास मार्गदर्शन होऊ लागले. काही सुविधांमुळे शारिरिक श्रम कमी होऊ लागले. तांत्रिक प्रगतीचा हा झंझावात शरीरास विश्रांती व मेंदूस विरंगुळा देता देता, शरीरास आळशी व मेंदूस व्यसनी केव्हा बनवू लागला हे कळले नाही. परीक्षेतील यशासाठी तात्पुरती स्मरणशक्ती पुरते म्हटल्यावर दीर्घकालीन ज्ञान कशासाठी पाहिजे, असे प्रश्न पडू लागले. ते केव्हा व कसे साठविणार? प्रगती होत असताना सामाजिक व कौटुंबिक मूल्यांमध्ये बदल होत असतात. नव्या मूल्यांचे परीक्षण करून त्यांची योग्यायोग्यता तपासून पहावी लागते. यासाठी वेळ लागतो. मूल्ये जर वेगाने बदलत असतील तर ‘परीक्षण’ करण्यास वेळ पुरत नाही. तोपर्यंत वापरणारांवर त्या बदलाचे परिणाम दिसू लागतात. चांगले बदल स्वागतार्ह असतात, पण घातक बदलांवर नियंत्रण करणे जमत नाही. दुष्परिणाम आपला प्रभाव दाखवतात. विरंगुळा व्यसनात रूपांतरित होतो.

मोबाइलवर खेळले जाणारे गेम्स खेळणाराला वरच्या व अधीक वरच्या पायरीवर जाण्याचे आमिष दाखवत असतात. त्याच वेळी खेळणारा, गेमच्या क्रेझची (व्यसनाकडे नेणारी) एक पायरी वर चढलेला असतो. कारण सुखाची भावना निर्माण करणारे डोपामईन हे रसायन (Neurotransmitter) गेमशी जुळविले जाते. सुख मिळविण्याचा सोपा मार्ग सापडतो. आनंद मिळविण्याचे इतर पर्यायही आहेत याचा पडताळा घेण्यास प्रेरणा वा फुरसत मिळत नाही. गेमचे व्यसन वयाच्या सर्व थरात पसरलेले आढळते. त्याचे प्रमाणही जास्त आहे. मुलांचे बाबतीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन ‘अन्य पर्याय’ चाचपून पाहण्यास महत्वाचे ठरू शकते. समुपदेशक हे काम करीत असतात. पाल्याचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालेल्या कुटुंबात हे काम यशस्वीपणे केले जाते. कुटुंबातील पालकवर्ग एका वर्तुळात वावरत असतो. त्या वर्तुळात अन्य पालकांच्या घरातील रीतिरिवाज, धारणा, साध्ये यांची देवाणघेवाण होत असते. त्यांच्यात पाल्याशी संबंधित, म्हणजे पाल्याची शिक्षणसंस्था व गुणप्राप्ती हे निकष जास्त चर्चेत असतात. मुलांच्या वर्तुळात गॅजेट्स हाताळण्याची क्षमता, वाहन चालविण्याचे स्वतंत्र्य, गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड असणे हे आघाडीचे निकष असतात. वरीलपैकी एखाद्या घटकाचा अभाव आपल्यास कंपूतून बाहेर फेकू शकतो हा एककल्ली समज (की गैरसमज?) मुलांमध्ये रुजतो. असा समज रुजू न देण्याचे काम पालकांचे आहे. हे काम जमले तर वरील निकषांचे तथाकथित ‘महत्व’ कमी होऊन पाल्याचे ‘सूज्ञत्व’ वरच्या पातळीवर गेल्याचे दिसेल. यासाठी एका गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यास पाल्यास तसेच पालकांस शिकावे लागेल. ती गोष्ट म्हणजे, ‘इतर लोक काय म्हणतील?’ याकडे दुर्लक्ष करणे. यासाठी ‘दर्जा’ (Status) बाबतच्या आपल्या कल्पना बदलाव्या लागतील. प्रयत्न आणि प्रयत्न करणे हेच सूत्र येथे उपयोगी पडेल. जादूची कांडी वा जादूच्या दिव्यातील राक्षस हे काम करणार नाही. कारण मुठीत मावणार्‍या उपकरणातून आलेला नवा राक्षस, हा काम करणारा नक्कीच आहे, पण आपल्याला बिघडवणारा जास्त आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. आपल्या स्वतःच्या जीविताबद्दल आपल्याला बेफिकीर ठेवणारा हा राक्षस आपण निर्माण केला आहे, तो दिव्यातून आलेला नाही. म्हणून ही धोक्याची घंटा दुर्लक्षित करण्याजोगी नाही. शस्त्रास्त्र वापरून जीव घेण्यास शिकविणारे गेम्स राक्षस नाहीत तर कोण आहेत? अंगी अनाठायी आक्रमकता बाणविणारे गेम्स राक्षसी नाहीत तर काय आहेत? भुरळ पाडून कुटुंबियांपासून दूर ओढणारे हे गेम्स राक्षसी वृत्तीचे नाहीत का? जसे युध्दात एकाने सोडलेल्या अस्त्राचे पारिपत्य करणारे अस्त्र दुसर्‍यास वापरावे लागते, तसे नवनव्या रूपात समोर ठाकणार्‍या अशा राक्षसांच्या पारिपत्यासाठी आपल्याला सज्ज राहिले पाहिजे.

मग काय, ‘चला हाती पुस्तक घ्या (वा ई-बुक) व बोलवा आपल्या जुन्या राक्षस मित्राला’. तो तुमची करमणुक करेल, तुम्हाला राक्षस बनविणार नाही.

– रवि गांगल

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 32 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..