नवीन लेखन...

भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर

भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर यांचा जन्म ३१ जुलै १९४६ रोजी कोलकत्ता येथे झाला.

पी. सी. सरकार हे कुटुंब गेल्या नऊ पिढ्या पूर्णवेळ जादूवर उपजीविका करतं. पी. सी. सरकार ज्युनियर हे उच्चविद्याभूषित आहेत. त्यांनी मानसशास्त्र, विज्ञान या विषयांत पदव्या मिळवल्या आहेत. एवढंच नव्हे, पीएच.डी. केली आहे. इंद्रजाल और उसका मायाजाल या खेळाने प्रसिद्ध असलेले प्रदीपचंद्र सरकार आज पंच्याहतरीत आहेत. तरीही त्यांच्या वावरण्यातली लगबग, बोलण्यातली मिष्किलता तशीच आहे. त्यांची संवादाची ढब ही पहिल्यासारखी बरीचशी नाटकी आहे. पी. सी. सरकार ज्युनियर यांचे वडिल प्रतुलचंद्र अर्थात पहिले सरकार हे मोठे जादूगार होते. त्यांना भारत सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरवलं होते. जपानच्या दौऱ्यात ते जादूचे प्रयोग करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि प्रयोग संपताच त्यांनी प्राण सोडले. त्यानंतरच्या खेळात खंड पडू न देता त्यांच्या जागी पी. सी. सरकार ज्युनियर उभे राहिले. व आपली कला लोकांच्या पुढे सादर करत राहिले. पी. सी. सरकार ज्युनियर यांनी भारतात तसेच परदेशात जादूचे प्रयोग सादर केले आहेत, ‘बंगाल का जादू’ या विशेषणाने सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जगभरात ‘मॅजिक ऑफ इंडिया’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांना ‘मर्लिन अवॉर्ड’ मिळाला आहे. मनेका सरकार या पी. सी. सरकार ज्युनियर यांच्या कन्या आहेत. हे कुटुंब गेल्या नऊ पिढ्या पूर्णवेळ जादूवर उपजीविका करतं. मनेका सरकार ही नववी पिढी. आतापर्यंत सरकार कुटुंबात पुरुष मंडळीच जादूचे प्रयोग करीत. पण मनेका सरकार या अमेरिकेतून एमबीएची पदवी घेऊन आलेल्या आपल्या वडिलांचा, आजोबांचा, पणजोबांचा व्यवसाय पुढे नेत आहेत आणि पूर्णवेळ हा जादूचा व्यवसाय करत आहेत.

पी. सी. सरकार ज्युनियर यांना तीन मुली असल्यामुळे त्यांचा वारसदार म्हणून नवा पी.सी.सरकार कोण म्हणून प्रश्न होता पण मनेका सरकार त्यांच्याच प्रयोगात सफाईने उभ्या राहिल्या आहेत.आपले पिता पी. सी. सरकार ज्युनियर यांच्या बरोबर त्या जादूचे प्रयोग सादर करत असतात. त्यांच्या इतर दोन कन्या मोउबानी व मुमताज या पण काही प्रमाणात जादू शिकल्या असून त्यांना थिएटर व नृत्याची आवड आहे. पीसी सरकार ज्युनियर व मनेका सरकार आपलं इंद्रजाल बालबच्च्यांपासून त्यांच्या आई-वडिल आणि आाजोबा आज्यांपर्यंत सर्वांवर पसरून त्यांना चकित करून सोडतात.

पीसी सरकार ज्युनियर यांच्या पत्नी जयश्री सरकार या त्यांच्या शो मध्ये कोरियोग्राफी करतात.

पीसी सरकार हे राजेशाही ड्रेस वापरत असतात. हा राजासारखा ड्रेस जादूगारांनी घालण्याची परंपरा केव्हा सुरू झाली? त्यावर मनेका सरकार यांनी जे उत्तर दिले ते मोठे रंजक आहे.
जोधपूरचे राजपुत्र हरबंत सिंग हे तिच्या आजोबांचे म्हणजे पी. सी. सरकार सीनियर यांचे खास मित्र होते. राजपुत्र हरबंत सिंग हे कलासक्त होते. अतिशय देखणे, उंचपुरे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कला, चित्रकला, संगीत अशा विविध गोष्टींमध्ये रस होता.त्यांना जादूचे प्रयोग करण्याची विशेष आवड होती. लंडनला गेले की, ते राजपुत्र तिकडून जादूच्या प्रयोगांचे विविध साहित्य घेऊन येत व ते शिकवण्यासाठी ते पी. सी. सरकार सीनियर यांना बोलावत. त्यातून दोघांची मैत्री झाली. एक दिवस राजपुत्र हरबंत सिंग यांनी फक्त आपल्या राजघराण्यातीलच लोकांना जादूचे प्रयोग दाखविण्याचे ठरविले. सहकारी म्हणून त्यांनी पी. सी. सरकार सीनियर यांना बोलावले होते. पण राजपुत्र हरबंत सिंग यांनी फक्त पंधरा-वीस मिनिटेच जादूचे प्रयोग दाखवले.

पुढचे प्रयोग पी. सी. सरकार सीनियर यांनी दाखवावेत असे राजपुत्र हरबंत सिंग यांनी सांगितले. पण शर्ट-पॅण्ट या साध्या कपड्यातील पी. सी. सरकार सीनियर यांना स्वीकारायला राजघराण्यातील लोक तयार होईनात. म्हणून हरबंत सिंग यांनी पी. सी. सरकार सीनियर यांना एका रूममध्ये नेऊन आपला राजाचा ड्रेस दिला. राजेशाही पगडी दिली आणि त्या राजेशाही वेशात पी.सी. सरकार सीनियर यांनी जोधपूर राजघराण्यातील व्यक्तींना जादूचे प्रयोग दाखवून थक्क केले. पी.सी. सरकार यांच्या शाही पगडीवर जो तुरा दिसतो, तो जोधपूर राजघराण्याने दिलेला आहे. तो त्यांच्या पुढच्या पिढीने आजही जपून ठेवला आहे. त्याच वेळी पी.सी. सरकार यांचे व्यंगचित्रकार मित्र कुका त्यांना भेटले व म्हणाले, ‘तुम्ही महाराजांच्या वेशात जादूचे प्रयोग चालू केलेत त्यावेळी मी चित्रकार असल्यामुळे मीही एक जादूचे प्रयोग झाल्यावर प्रेक्षकांना लवून दाद देणारा तुमच्यासारखा महाराजा रेखाटला आहे, तुमच्यासारखाच मिशीवाला!’ हाच तो एअर इंडियाचा जगप्रसिद्ध महाराजा. मनेका सरकारने आणखी एक रंजक गोष्ट सांगितली. मनेका सरकारच्या आजोबांचे प्रयोग जपानला खूप गाजले. त्यांना जपानला जाण्याची प्रेरणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. फक्त एवढेच सांगितले की, जपानच्या दौर्या तला फायद्याचा काही हिस्सा रासबिहारी बोस यांना देशसेवेसाठी द्या.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2994 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..