नवीन लेखन...

भारतीय जादूगार पी सी सरकार

जन्म. २३ फेबुवारी १९१३

पी. सी. सरकार यांचे पूर्ण नाव प्रतुलचंद्र सरकार. त्यांचा जन्म तत्कालीन बंगाल प्रांतातील (विद्यमान बांगला देश) तंगईल जिल्ह्यातील आशीकपूर या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. गावातीलच शिवनाथ हायस्कूलमध्ये शिकत असतानाच जादूबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि त्यांनी गणपती चक्रवर्ती यांच्याकडून जादूविदयेचे धडे घेण्यास प्रारंभ केला; तथापि शालेय अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही. त्यांनी गणित विषय घेऊन कलकत्ता विदयापीठाची पदवी विशेष श्रेणीत संपादन केली. यानंतर त्यांनी जादू हाच पूर्णवेळ व्यवसाय पत्करला.

सुरूवातीसच त्यांनी आपली कला १९३४ मधील परदेश दौऱ्यात अजमावून पाहिली. कार्यक्रमाच्या वेळी पी. सी. सरकार राजेशाही थाटाचे कपडे आणि पगडी असा भपकेबाज पेहराव करीत. अनेक चित्तथरारक खेळांसह ते कार्यक्रम सादर करीत. जिवंत मानवी शरीराचे रंगमंचावर धारदार शस्त्राने दोन तुकडे करून ते पुन्हा एकत्र जोडण्याचा त्यांचा प्रयोग विलक्षण लोकप्रिय झाला होता. ‘इंद्रजाल’ हाही त्यांचा प्रचंड प्रेक्षकप्रिय असा खेळ.एकदा सरकार यांनी बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री फजलूल हक यांना आपल्या अनोख्या जादूने खूप प्रभावित केले. सरकार यांनी एक कोरा कागद हक यांना दिला व त्यावर काहीही मजकूर लिहिण्यास सांगितले. त्यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर सरकार यांनी इतर मंत्र्यांना त्या कागदावर सह्या करण्यास सांगितले. त्यांनी त्या केल्या. थोडया वेळाने तो कागद हक यांना पाहण्यास सांगितले, तेव्हा ते कागदावरील मजकूर पाहून थक्कच झाले. मजकूर असा होता : ‘‘हक यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला असून बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून पी. सी. सरकार यांची नेमणूक करण्यात आली आहे.’’

पी. सी. सरकार यांनी सुमारे ७० देशांत जादूचे प्रयोग केले. त्यांतून त्यांना अपार धन आणि कीर्ती लाभली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम अनेकदा प्रसारित झाले. काहीशा हीन लेखल्या गेलेल्या आणि दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या जादूकलेला सरकार यांनी भारताबरोबरच जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे ‘भारतीय जादूकलेचे पितामह’ असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो.

१९६३ मध्ये सरकार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय जादू परिषदेने त्यांच्या छायाचित्र चरित्राचे प्रकाशन केले, तर एच्. एम्. व्ही. कंपनीने ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली. जगभरात सरकार हे ‘जादूसम्राट’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ सुरू असतानाच दुसरीकडे सरकार यांचे कार्यक्रम देश-विदेशांत मोठया प्रमाणावर होत होते; मात्र सरकार यांना कर्तव्याचा विसर पडला नाही. १९३७ मध्ये त्यांनी जपानचा दौरा केला. त्या दौऱ्यातील सर्व कार्यक्रमांतून जमा झालेली मिळकत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी देणगी म्हणून दिली.

फ्रांन्स, जर्मनी, बेल्जियम, जपान आणि इंग्लंड येथील जादूगार परिषदेचे ते सदस्य होते. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल रोटरी क्लबचे ते सदस्य, तर इंग्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीचे आजीव सदस्य होते.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आंतरराष्ट्रीय जादूगार परिषदेच्या कोलकाता शाखेला सरकार यांचे नाव देण्यात आले आहे. जादू विश्वातील ‘ऑस्कर’ समजला जाणारा ‘द स्पिंक्स’ हा अमेरिकेचा प्रतिष्ठित पुरस्कार सरकार यांना १९४६ आणि १९५४ असा दोन वेळा लाभला. १९५६ मध्ये जर्मनीचा ‘द गोल्डन लॉरेल’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. २६ जानेवारी १९६४ रोजी भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले. याशिवाय जर्मन मॅजिक सर्कलचा ‘द रॉयल मेडॅलियन’ पुरस्कारही त्यांना लाभला होता.

सरकार यांनी इंग्रजी, बंगाली आणि हिंदी या भाषांतून जादूविदयेवर विपुल लेखन केले. त्यांची  २० पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांत देशे देशे हिप्नॉटिझम, मजिकेर कौशल, इंद्रजाल, सरकार ऑन मॅजिक, हिंदू मॅजिक, हंड्नेड मॅजिक्स यू कॅन डू, मॅजिक फॉर यू, मोअर मॅजिक फॉर यू, छेलेदार मॅजिक, सहज मॅजिक आणि मोहनविदयायांचा समावेश होतो. यांशिवाय काही पाश्चात्त्य लेखकांनी त्यांच्या जीवनावर पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी सरकार : महाराजा ऑफ मॅजिक हे पुस्तक आजही वाचकप्रिय आहे. शास्त्रीय संगीत किंवा शेक्सपिअरच्या साहित्याप्रमाणेच जादू ही अभिजात कला असून, शाळा-महाविदयालयांत याविषयी पद्धतशीर अभ्यासकम असावा, असे त्यांचे मत होते. ‘ऑल इंडिया मॅजिक सर्कस’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली. तेथे देश-विदेशांतील हजारो विदयार्थ्यांना सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली जादूविदयेचे धडे शिकण्यास मिळाले.त्यांच्या नंतर त्यांची जादूकलेची परंपरा त्यांच्या दोन मुलांनी पुढे चालू ठेवली आहे.

‘पी. सी. सरकार ज्युनियर आणि पी. सी. सरकार यंग’ या नावांनी ते प्रसिद्ध असून तिसरे पुत्र माणिक सरकार हे दिग्दर्शक व ॲ‍निमेटर म्हणून ख्यातकीर्त आहेत.

पी.सी.सरकार यांचे ६ जानेवारी १९७१ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे पी.सी.सरकार यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..