नवीन लेखन...

इच्छापत्र (वा मृत्यूपत्र ) का व कसे?

रामभाऊंना तीन मुलगे होते. रामभाऊंचा स्वतःच्या मालकीचा एक फ्लॅट होता आणि बँकेत काही ठेवी होत्या. त्या तीनपैकी एक मुलगा वेगळा राहात असून देखील सर्वांना खूप त्रास द्यायचा. या सर्व मानसिक त्रासामुळे रामभाऊंचे निधन झाले पण त्यांनी मृत्यूपत्र केले नव्हते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी व दोन मुलांना त्या तिसर्‍या मुलाला रामभाऊंच्या इस्टेटीतील वाटा द्यायची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे तो तिसरा मुलगा कोर्टात गेला आणि त्याने कोर्टाकडून स्थावर व जंगम मालमत्तेतील त्याचा हिस्सा मिळवला व पुन्हा त्या फ्लॅटमध्ये तो येऊन राहू लागला. त्यानंतरही त्याने त्रास देणे सुरुच ठेवले, उलट जवळ आल्याने त्याची तीव्रता आणखीनच वाढली. शेवटी रामभाऊंची पत्नी एक दिवस वारली आणि इतर दोन्ही भाऊ कंटाळून घर सोडून निघून गेले. म्हणजेच ज्या मुलाने संपूर्ण घरादाराला त्रास दिला होता, त्याच्याकडेच वडलोपार्जित मिळकतीचा संपूर्ण ताबा आला.

तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील. कितीतरी ठिकाणी नाती तुटली असतील, सख्ख्या नातेवाईकांनी मारामारी केली असेल, कित्येकांनी त्यांच्या वाट्याला येणार्‍या पैशापेक्षा जास्त पैसे कोर्टकचेरीवर खर्च केले असतील. हे असं का घडतंय? हे टाळता येऊ शकेल का?

आपण प्रथम पहिल्या प्रश्नाचा विचार करु – हे का घडतंय? या प्रश्नाची कितीतरी उत्तरं शक्य आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे माणसाची हाव. माझं ते माझं आणि दुसर्‍याचं तेही माझं ही वृत्ती. कितीही असलं आणि मिळालं तरी समाधान नाही. आम्ही कॉलेजात असताना अर्थशास्त्रात आम्हाला एक सिध्दांत शिकवला जायचा – कमी कमी होत जाणारी उपयुक्तता. (Theory of Diminishing Utility) या सिध्दांताप्रमाणे एखादी गोष्ट माणसाला हवी असेल आणि ती जर त्याला मिळाली तर काही काळाने त्याच्या दृष्टीने त्या गोष्टीची उपयुक्तता कमी कमी होत जाते. उदा. एखाद्या माणसाला भूक लागली आणि तो अन्न खाऊ लागला तर जसजसे तो खात जाईल तसतशी त्याची भूक कमी होत जाईल. म्हणजेच जसे पोट भरत जाते तसतशी अन्नाची उपयुक्तता कमी कमी होत जाते आणि पोट भरल्यावर ती शून्य होते. पण आपल्या सर्वांच्या मते हा सिध्दांत पैशाला लागू होत नाही असे आपण मानतो. आपली पैशाची वा तत्सम गोष्टींची भूक हि वाढतच राहते. थोडक्यात अर्थशास्त्राचा सिध्दांत अर्थाला (पैशाला) लागू होत नाही!

दुसरी एक गोष्ट म्हणजे एकवेळ आपण आपल्या कर्तव्याबद्दल जागरुक नसतो पण आपल्या हक्कांचा प्रश्न आला की आपण सतर्क होतो. शेवटी हक्काचा प्रश्न आहे ना!

आता आपण दुसर्‍या प्रश्नाकडे वळू – हे टाळता येऊ शकेल का? माझ्या मते काही मर्यादेपर्यंत ते शक्य आहे. माणसाच्या हावरेपणाला जरी सीमा नसली आणि मानवी स्वभावाची गुंतागुंत जरी मान्य केली तरी भविष्यात वादंग उद्भवू नये याची काळजी घेणं आपल्या निश्चितच हातात आहे. आपण जर मृत्युपत्र केलं तर आपल्या मृत्युनंतर आपल्या मालमत्तेचं वाटप आपल्या इच्छेनुसार होऊ शकतं. वरील उदाहरणात जर रामभाऊंनी मृत्युपत्र केलं असतं आणि ज्या मुलाने कुटुंबातील सर्वांना त्रास दिला त्याला मालमत्तेतील वाटा दिला नसता तर त्याला ती मालमत्ता बळकावणे शक्य झाले नसते.

दुर्दैवाने मृत्युपत्राचा विषय काढल्याबरोबर बरेच लोक बेचैन होतात कारण त्याचा थेट संबंध आपल्या मरणाशी येतो. आता मरण अटळ आहे हे सर्वांनाच माहित आहे पण तरीसुध्दा अगदी सुशिक्षित लोकसुध्दा मृत्युपत्र करायला नाखूष असतात. खरे पाहता मृत्युपत्र करणे हे वारसदारांच्या सुध्दा हिताचे आहे कारण तुमच्या पश्चात मालमत्तेचे वाटप करण्याच्या त्रासातुन त्यांची सुटका होते. बर्‍याच लोकांना हेदेखील माहित नसते की मृत्युपत्र तुमच्या हयातीत तुम्ही कितिही वेळा बदलू शकता. पण या ठिकाणी जाता एक सल्ला द्यावासा वाटतो. मृत्यपत्र जरुर करा पण तुम्ही संन्यास घ्यायचे ठरवले नसेल तर तुमच्या संपूर्ण मालमत्तेचे बक्षीसपत्र मात्र करु नका! नटसम्राट नाटकात म्हटल्याप्रमाणे समोरचे जेवायचे ताट द्या पण बसायचा पाट मात्र देऊ नका. तुमची मालमत्ता ही तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने उपभोगण्यासाठी आहे, केवळ तुमच्या कुटुंबाने उपभोगण्यासाठी नाही.

या लेखात मी मृत्युपत्रासंबंधी काही व्यावहारिक माहिती सोप्या भाषेत जनसामान्यांच्या उपयोगासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे.

मृत्युपत्र (विल) म्हणजे काय?

कायदेशीर भाषेत विल म्हणजे विल करणार्‍या माणसाने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे काय करायचे यासंबंधी प्रदर्शीत केलेली इच्छा किंवा इच्छेची उद्घोषणा. थोडक्यात विल म्हणजे एखादया माणसाने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे वाटप कसे व्हावे यासंबंधीचा केलेला दस्तऐवज. हे वाटप करताना त्याच्या इच्छेबरोबरच त्याला आयुष्यात आलेले अनुभव, त्याचा दृष्टीकोन, त्याचे तत्वज्ञान या सार्‍या गोष्टींचा सामान्यतः प्रभाव पडतो आणि त्याप्रमाणे तो वाटप ठरवतो. ते करताना तो काही नातेवाईकांना वगळू शकतो, काहींना त्यांच्या कायदेशीर हक्कांपेक्षा कमी किंवा जास्त देऊ शकतो. त्याचप्रमाणे नातेवाईकांना कुणाला काहिही न देता तो सगळी मालमत्ता एखाद्या संस्थेला दान करु शकतो किंवा त्याचा ट्रस्ट बनवू शकतो. अगदी त्याच्या वारसांना त्यांच्या हक्काप्रमाणे जरी द्यायचे असले तरी विल केल्याने गैरसमजाला किंवा संदिग्धतेला वाव राहात नाही. इथे आपण फक्त सर्वसाधारण विलचाच विचार करत आहोत.

विल कोण करु शकतो?

जिचे मानसिक संतुलन व्यवस्थित आहे अशी कोणीही सज्ञान व्यक्ती तिच्या स्वतःच्या मालमत्तेसंबंधी विल करु शकते. लहान मूल किंवा जिचे मानसिक संतुलन ढळले आहे अशी व्यक्ती विल करु शकत नाही.

विल करणे आवश्यक आहे का?

कायद्याने विल करणे आवश्यक नाही, पण भविष्यात आपल्याच वारसदारांमध्ये भांडणे लागुन त्यांचे संबंध बिघडू नयेत म्हणून विल केलेले केव्हाही चांगले. अर्थात एकदा माणूस गेल्यावार त्याचे वारसदार कसे वागतील हे कुणाच्याही हातात नाही, पण कमीतकमी विल आहे म्हटल्यावर भांडणाची शक्यता कमी होऊ शकते.

माणूस आयुष्यभर अधिकाधिक संपत्ती मिळवण्याच्या मागे असतो, काही ठिकाणी तो नामांकनदेखील करतो, पण तेवढेच पुरेसे नसते. माणूस गेल्यावर त्याच्या संपत्तीची त्याच्या इच्छेप्रमाणे विभागणी आणि तीही कमी खर्चात करण्याचे काम विल करते. त्याचप्रमाणे ज्यांना त्या संपत्तीतील हिस्सा मिळणार असतो त्यांचेही काम सोपे होते तसेच कायदेशीर कामाला लागणारा वेळही वाचू शकतो.

बक्षीसपत्र आणि मृत्युपत्र यातील फरकः

बक्षीसपत्रात मालमत्तेचे वाटप हे व्यक्तीच्या हयातीत होते, मालमत्तेची मालकी तसेच ताबा याचे हस्तांतर लगेच होते तर विलमध्ये ते व्यक्तीच्या मृत्युनंतर होते. एकदा बक्षीसपत्र केल्यावर आणि मालकीचे हस्तांतरण झाल्यावर ते बक्षीसपत्र करणार्‍याच्या इच्छेने पुन्हा बदलता येत नाही. पण विल हे हयातीत केव्हाही बदलता येते किंवा त्याला पुरवणी जोडता येऊ शकते. आजकालची समाजातील बदलती नीतीमूल्ये लक्षात घेता थोड्या रकमेचे बक्षीस दिले तर चालण्यासारखे आहे पण संपूर्ण मालमत्तेचे बक्षीसपत्र न केलेले चांगले. तुम्ही जिवंत असताना तुमच्या संपत्तीचा योग्य तो उपभोग घेऊन तुमच्या मृत्युनंतर त्याची वाटणी विलद्वारे केलेली केव्हाही चांगली.त्याचप्रमाणे स्थावर मालमत्तेचे बक्षीसपत्र केल्यास त्यावर बाजारमुल्याने मुद्रांक शुल्क भरावे लागते व नोंदणी करावी लागते. पण विलद्वारे मिळालेल्या संपत्तीवर एवढा खर्च करावा लागत नाही.

विल तयार करण्यासंबंधी काही मुद्दे (टिप्स)ः

विलसाठी अमुक एक नमुना असा लागत नाही. विल करणार्‍याने कुठल्याही प्रकारे ते केले तरी चालते. त्यावर मुद्रांक शुल्क लागत नाही. पण तरीदेखील खालील मुद्दे ध्यानात ठेवावेत.

 • विल करणार्‍या माणसाला जी भाषा येत असेल, त्याच भाषेत ते करावे. त्यात तुम्ही ते स्वेच्छेने करीत आहात आणि तुमच्यावर कुठलाही दबाव नाही याचा उल्लेख असावा.
 • शक्यतो वारसदारांना त्यात काय लिहिले आहे याची माहिती देऊ नये कारण तुमच्या हयातीत ते भांडणाचे कारण ठरु शकते.
 • विलची नोंदणी कायद्याने आवश्यक नाही पण केलेली चांगली कारण तुमच्याकडची प्रत गहाळ झाल्यास सरकारी कार्यालयातून खरी प्रत मिळू शकते.
 • विल करणार्‍याने दोन साक्षीदारांसमोर सही करावी तसेच साक्षीदारांनीदेखील तेव्हाच सही करावी.
 • तुमच्या फॅमिली डॉक्टरचे तुम्ही मानसिकदृट्या फिट असल्याचे सर्टिफिकेट विलचा भाग बनवणे चांगले.
 • नोंदणी करायची नसल्यास शक्यतो विल नोटराइज करून घ्यावे.
 • नवीन दुसरे विल बनवताना पुर्वी केलेली सर्व विल रद्द केल्याचा उल्लेख करावा.
 • विलच्या व्यवस्थापनासाठी आपल्यापेक्षा वयाने लहान आणि विश्वासू माणसाची नेमणूक करावी.
 • विलची भाषा सुस्पष्ट असावी.
 • ट्रस्ट करायचा असल्यास ट्रस्टींची नेमणुक व लाभार्थीँची नावे नमूद करावीत.
 • गरज वाटल्यास विशेषज्ञाची मदत घ्यावी.
 • काही काळानंतर विलचे पुनर्विलोकन अवश्य करावे आणि गरज वाटल्यास पुरवणी किंवा नवीन विल तयार करावे.

लक्षात ठेवा विल तयार करणे हा तुमच्या संपत्ती नियोजनाचा एक महत्वाचा भाग आहे.

— कालिदास वांजपे

Avatar
About कालिदास वांजपे 11 Articles
कालिदास वांजपे हे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी असून ते वित्तपुरवठा, कायदेशीर कागदपत्रांचे ड्राफ्टिंग आणि कंपनी लॉ या विषयात सल्ला सेवा देतात.

6 Comments on इच्छापत्र (वा मृत्यूपत्र ) का व कसे?

 1. आपण दिलेली माहिती योग्य आहे पण मला बक्षितपत्र आणि मृत्यूपत्र यात फरक आहे असे ऐकीव होते मात्र कल्पना नाही असेल तर कृपया सांगावे हे यातून मला समजले नाही ( क्षमा असावी ) . आणि असेल तर फरक काय ते सांगावे असेल तर त्याची फी असते का हे कृपया सांगावे

  • माफ करा आपल्याला पुन्हा तसदी देत आहे वास्तविक आपण सगळेच मुद्दे सांगितले आहेत पण माज्या हयातीत सध्या मी एक मुलगी वय चालू २२ दत्तक घेतली आहे तिच्या नावे काही तर काही वेगळे असे मला माझ्या इच्छापत्र / मृत्यपत्र मध्ये सामाविस्ट करायचे आहे आणि माझी प्रकृती सद्या मी एपिलेप्सी ( अपस्मार्ट – फिट ) चा आजारी आहे मात्र तुलनेने ड्रा प्रमाणेच ठीक आहे सदर आजारासाठी गोळ्या चालू आहेत पण रस्त्र्यात कुठे पडेन असे नाही तरी डॉक्टर चे सर्टिफिकेट आणि अन्य काय जोडणे अपेक्षित आहे . कृपया मार्गदर्शन करावे हि अपेक्षा आहे .

 2. इच्छापत्र आणि मृत्यपत्र हे दोन्ही प्रकार सारखेच असतात का माझे वडील तसे वकील आहेत पण ते व्यवसाय असा तो करत नाहीत. आणि मला पुढे ( आज माझे वय ४३ ) आहे तेव्हा मला पुढील बाबी साठी काही स्व करणे इच्छापत्र करायचे आहे कृपया फरक असेल तर तो काय आणि काही अन्य बाबी असतील तर सांगणे हि विनंती . मी वडिलांना हे सगळे विचारू शकत नाही त्याचे वय आज ८५ आहे मला माज्या मुलीच्या बाबतीत हे मृत्यपत्र करावयाचे आहे . तरी मला आधी पूर्ण माहिती द्यावी .

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..