नवीन लेखन...

मधमाश्या, कबुतरं आणि आइन्स्टाइन

ही गोष्ट आहे सात दशकांपूर्वीच्या एका छोट्याशा पत्राची. हे सुमारे नव्वद शब्दांचं छोटसं पत्र लक्षवेधी ठरलं आहे. याचं पहिलं कारण म्हणजे हे पत्र अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी लिहिलेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे या पत्रातून आइन्स्टाइन यांची वैज्ञानिक दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते! याच ऐतिहासिक पत्राची ही गोष्ट…

सन २०१९मध्ये, ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठातल्या आड्रियान डायर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा, मधमाश्यांच्या आकडेमोड करण्याच्या क्षमतेवरचा एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला. इंग्लडच्या बी.बी.सी.रेडिओवरील एका कार्यक्रमात या संशोधनाला प्रसिद्धी मिळाली. हा कार्यक्रम ऐकल्यानंतर ज्युडिथ डेव्हिस या वृद्ध महिलेनं, आड्रियान डायर यांचा पत्ता मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. ज्युडिथ डेव्हिस यांच्याकडे मधमाश्यांशी संबंधित विषयावरचं, ग्लिन डेव्हिस या त्यांच्या दिवंगत पतीला आइन्स्टाइन यांनी लिहिलेलं एक जुनं पत्र होतं. या पत्राची प्रत जुडिथ डेव्हिस यांनी आड्रियान डायर यांच्याकडे पाठवून दिली. हे पत्र वाचल्याबरोबर, आड्रियान डायर यांना या पत्राचं महत्त्व लगेचच लक्षात आलं. कारण या पत्रात आइन्स्टाइन यांनी, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांच्या भविष्यकाळात एकमेकांशी येणाऱ्या थेट संबंधाची शक्यता १९४९ सालीच वर्तवली होती. आड्रियान डायर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा, या पत्राचं विश्लेषण करणारा लेख गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाला आहे.

दिनांक १८ ऑक्टोबर १९४९ या तारखेचं आइन्स्टाइन यांचं हे पत्र म्हणजे ग्लिन डेव्हिस यांच्या पत्राला आइन्स्टाइन यांनी दिलेलं उत्तर आहे. डेव्हिस यांचं पहिलं पत्र आज उपलब्ध नाही. परंतु डेव्हिस यांनी त्या पहिल्या पत्रात काय लिहिलं असावं, याचा या उत्तरावरून तर्क करता येतो. त्यावेळी वयाच्या विशीत असणारे, ग्लिन डेव्हिस हे १९४२ ते १९४७ या काळात ब्रिटिश नौदलात अभियंत्याची नोकरी करीत होते. रडारवरील संशोधनात भाग घेतलेल्या डेव्हिस यांचं, कार्ल फॉन फ्रिश या सुप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञाच्या संशोधनाकडे लक्ष गेलं असावं. कारण फॉन फ्रिश यांचं संशोधन मधमाश्यांच्या एकमेकांशी साधल्या जाणाऱ्या संपर्काशी संबंधित होतं. फुलांचं स्थान एकमेकांना कळवण्यासाठी मधमाश्या सूर्यकिरणांच्या काही गुणधर्मांचा आणि विशिष्ट प्रकारच्या नृत्याचा वापर करीत असल्याचं फॉन फ्रिश यांनी दाखवून दिलं होतं. रडार हे संपर्कासाठी व दिशा कळण्यासाठी वापरलं जाणारं साधन असल्यानं, ग्लिन डेव्हिस यांनी आइन्स्टाइन यांच्याकडे या संशोधनाच्या उपयुक्ततेसंबंधी विचारणा केली असावी. त्याच विचारणेला आइन्स्टाइन यांनी हे उत्तर पाठवलं आहे. (उत्तराच्या पत्राची प्रत खाली दाखवली आहे.)

योगायागानं त्या अगोदर काही महिन्यांपूर्वीच कार्ल फॉन फ्रिश यांनी, आइन्स्टाइन ज्या प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधन करत होते, त्या प्रिन्स्टन विद्यापीठात व्याख्यान दिलं होतं. हे व्याख्यान संपल्यानंतर फॉन फ्रिश यांची आइन्स्टाइन यांच्याशी भेट आणि चर्चाही झाली होती. त्यामुळे ग्लिन डेव्हिसच्या पत्राला उत्तर देताना आइन्स्टाइन यांनी प्रथम फॉन फ्रिश यांचं संशोधन आपल्याला व्यवस्थित ठाऊक असल्याचं म्हटलं. मात्र त्याचबरोबर हे संशोधन संपर्कासाठी उपयुक्त ठरणार नसल्याचं मतही त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलं. विविध प्राणी-पक्षी-कीटक हे माणसाला अभिप्रेत असलेल्या, फक्त दृष्टी, ध्वनी, गंध यासारख्या संवेदनांचाच उपयोग करत असावेत, असा त्याकाळी समज होता. मात्र आइन्स्टाइन यांनी आपल्या पत्रातून, अशा दिशाज्ञानासाठी सजीवांकडून, या ज्ञात संवेदनांव्यतिरिक्त इतर कुठल्या तरी वेगळ्या संवेदनांचा वापर केला जात असल्याचं मत मांडलं. आइन्स्टाइन यांच्या मते, मधमाश्यांच्या बाबतीत जर अशा कुठल्या वेगळ्या संवेदनांचा शोध लागला तरच, या संशोधनाचा संपर्कासाठी उपयोग होऊ शकणार होता. किंबहुना, स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या किंवा टपालाची ने-आण करणाऱ्या कबुतरांच्या अभ्यासाद्वारे या संवेदनांचा शोध लागण्याची शक्यता त्यांनी या पत्रात व्यक्त केली.

आइन्स्टाइन यांचं म्हणणं आज अचूक ठरलं आहे. माणूस ज्या संवेदनांचा वापर करू शकतो, त्याशिवाय इतर प्रकारच्या संवेदना सजीवांकडे असल्याचं त्यानंतर काही काळातच सिद्ध झालं. या इतर संवेदना म्हणजे, पृथ्वीचं चुंबकत्व, विद्युतक्षेत्र, वगैरे, ओळखण्याची क्षमता. यातील काही प्रकारच्या संवेदनांचा वापर विविध सजीव हे दिशा शोधण्यासाठी करत असल्याचे पुरावे गेल्या शतकाच्या उत्तरार्धातच सापडले आहेत. उदाहरणार्थ, पक्षी हे स्थलांतर करताना, दिशाज्ञानासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करतात. विशेष म्हणजे या संवेदनांचा वापर मानवी उपयोगासाठी तयार केल्या जाणाऱ्या अनेक साधनांत आज केला जात आहे. आइन्स्टाइन यांना अशा वेगळ्या संवेदनाच अपेक्षित होत्या. आइन्स्टाइन यांच्या दूरदृष्टीची अशी प्रचिती अनेक वेळा आली आहे. भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांच्या मिलाफाची शक्यता वर्तवणारं हे उत्तर, आइन्स्टाइन यांच्या दूरदृष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे!

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: Jackie Ramirez – Pixabay, Dyer et al. 2021, J Comp Physiol A / The Hebrew University of Jerusalem

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..