प्रतिभावंत हृदयशल्‍यविशारद डॉ. मायकेल डिबाकी

कुशाग्र बुद्धिमत्ता, अचूक निदान व अत्‍यंत कुशल शल्‍यचिकित्‍सा म्‍हणजे डॉ. मायकेल डिबाकी!

२००८मध्‍ये वयाची शंभरी पूर्ण करण्‍याच्‍या केवळ दोन महिने आधी निधन पावलेला प्रतिभावंत शल्‍यविशारद! हृदय-शल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात त्‍यांनी उत्तुंग कामगिरी केली. पण एवढेच नव्‍हे तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित धोरणे ठरविण्‍यातही ते अमेरिकन शासनास सहाय्य करीत. राष्‍ट्राध्‍यक्ष हूव्‍हर यांच्‍या कार्यकाळात डिबाकी वैद्यकीय सल्‍लागार समितीचे सदस्‍य होते. तर राष्‍ट्राध्‍यक्ष लिंडन जॉनसन यांच्‍या कार्यकाळात डिबाकी, हृदयविकार, कर्करोग व पक्षाघात यांच्‍यासाठीच्‍या, अध्‍यक्षांनी तयार केलेल्‍या समितीचे ते प्रमुख होते. या व्‍यतिरिक्‍त ‘राष्‍ट्रीय हृदयरोग सल्‍लागार समिती’ तसेच फुफ्फुस विकार यांसारख्‍या  इतरही असंख्‍य समित्यांसाठी त्‍यांनी काम केले. दुसर्‍या महायुद्धात ते लष्‍करात दाखल झाले. ‘मोबाईल आर्मी सर्जिकल हॉस्पिटल’ (मॅश)च्‍या (फिरता सैनिकी दवाखाना) उभारणीमागची प्रेरणा डिबाकी यांचीच. तत्‍पूर्वी युद्धात जखमी झालेल्‍या सैनिकांना आघाडीवरून मागे रुग्‍णालयात दाखल करण्‍यासाठी आणत असत. डिबाकी यांनी सैनिकांना शल्‍यचिकित्‍सकांकडे आणण्‍याऐवजी, शल्‍यचिकित्‍सक युद्धआघाडीवर तैनात करण्‍यास सुरुवात केली. त्‍यामुळे जखमी सैनिकांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्‍ध होऊ लागली व मोलाचा वेळ वाचून कित्‍येक सैनिकांचे प्राण वाचू लागले.

७ सप्‍टेंबर १९०८ रोजी अमेरिकेतील लुईझीआना प्रांतातील, लेक चार्ल्‍स या गावी डिबाकी यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे आई-वडील लेबेनॉन येथून अमेरिकेत आलेले स्‍थलांतरित होते. त्‍यांचे मूळ आडनाव ‘दाबाघी’ असे होते. ‘डिबाकी’ हे त्‍याचे आंग्‍लस्‍वरूप. तेच पुढे रूढ झाले.

टुलाने विद्यापिठातून त्‍यांनी बी.एस. व नंतर एम.डी. ची पदवी घेतली. त्‍यानंतर स्‍ट्रासबर्ग विद्यापीठात त्‍यांनी प्रा. रेने लेरिच यांच्‍याकडे व नंतर जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठात प्रा. मार्टिन किशेनर यांच्‍याकडे काम केले. टुलाने विद्यापीठात परत आल्‍यावर १९४८ पर्यंत शल्‍यचिकित्‍सेचे अध्‍यापनही केले. त्‍याच दरम्‍यान ते विद्यापीठातून रजा घेऊन लष्‍करी वैद्यकीय सेवेत दाखल झाले. या काळात त्‍यांनी ‘फिरता सैनिकी दवाखाना’ ही संकल्‍पना प्रत्‍यक्षात आणली. तसेच माजी सैनिकांना वैद्यकीय सेवा पुरविता यावी यासाठी माजी सैनिक रुग्‍णालयांची साखळी उभी केली. लष्‍करातर्फे ‘लिजन ऑफ मेरिट’ या सन्‍मानाने त्‍यांच्‍या कार्याचा यथोचित गौरव करण्‍यात आला.

१९४८ सालापासून डिबाकी, ह्यूस्‍टन येथील बेयलर विद्यापीठात शल्‍यचिकित्‍सा विभागाचे अध्‍यक्ष म्‍हणून काम पाहू लागले ते थेट १९९३ सालापर्यंत त्‍यांच्‍या वयाच्‍या त्र्याऐंशी वर्षांपर्यंत. १९७९ ते १९९६ या कालावधीत डिबाकी, बेयलर विद्यापीठाचे कुलगुरूही होते. १९९६ साली ते कुलगुरू म्‍हणून निवृत्त झाले पण तरीही ‘मानद कुलगुरू’ म्‍हणून त्‍यांनी काम करणे चालूच ठेवले.

शल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात त्‍यांनी प्रचंड काम केले. ते जेव्‍हा शल्‍यचिकित्‍सक झाले तेव्‍हा हृदयशल्‍यक्रिया असा स्‍वतंत्र विभाग नव्‍हता. तेव्‍हा वयाच्‍या अवघ्‍या २३व्‍या वर्षी डिबाकी यांनी एक ‘रोलर पंप’ विकसित केला. त्‍यानंतर २० वर्षांनी ‘हार्ट लंग मशीन’मध्‍ये हा पंप एक अत्‍यावश्‍यक घटक बनला. हृदय-शस्‍त्रक्रियेदरम्‍यान अविरत रक्‍ताभिसरणासाठी या पंपाचा उपयोग होतो. ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया साध्‍य होण्‍यासाठी ‘रोलर पंप’ कारणीभूत झाला असेच म्‍हणावे लागेल.

डिबाकी यांनी सतत काळाच्‍या पुढे जाणारा विचार केला व त्‍या अनुषंगाने तंत्रज्ञान विकसित करण्‍यावर भर दिला. विद्यार्थीदशेत असतांना ते सॅक्‍सोफोन वाजवावयास शिकले. त्‍यांच्‍या आईने त्‍यांना शिवण देखील शिकविले. शल्‍यचिकित्‍सक झाल्‍यावर या कलेचा त्‍यांना प्रचंड उपयोग झाला. रक्‍तवाहिन्‍या शिवून दुरुस्‍त करण्‍यासाठी ‘डॅक्रॉन ग्राफ्ट’चा त्‍यांनी प्रथम उपयोग केला. डिबाकी यांना नायलॉनचे कापड हवे होते. परंतु दुकानात ते उपलब्‍ध नव्‍हते म्‍हणून नायलॉन ऐवजी डिबाकी डॅक्रॉनचे कापड घेऊन घरी आले. त्‍यांनी घरी शिवणयंत्रावर स्‍वतः शिवून त्‍याची एक नळी तयार केली व त्या नळीचा  वापर केला. १९५३ साली त्‍यांनी प्रथम मानेतील रोहिणीतून ‘ब्‍लॉक’ दूर करणारी शस्‍त्रक्रिया केली. तर १९५६ साली त्‍यांनी पहिली ‘पॅच-ग्राफ्ट अॅन्जिओप्‍लास्‍टी’ केली. यात रोहिणीला पाडलेले छिद्र (एन्‍डोआर्टरेक्‍टोमी करताना रोहिणीतील ब्‍लॉक दूर करण्‍यासाठी पाडलेले छिद्र ) डॅक्रॉन ग्राफ्ट वापरून शिवून टाकले. ‘द डॅक्रॉन ग्राफ्ट’ आज जगभरात रक्‍तवाहिन्‍यांवरील शस्‍त्रक्रियेत वापरला जातो.

डिबाकी यांनी कायमच तंत्रज्ञानाचा सुयोग्‍य व समर्पक वापर केला. शस्‍त्रक्रियांची चित्रफीत तयार करण्‍यास त्‍यांनी सुरुवात केली. शल्‍यविशारदाच्‍या नजरेतून शस्‍त्रक्रिया जशी दिसते त्‍याच दृष्टिकोनातून सदर चित्रफिती चित्रित करण्‍यात आल्‍या.

डॉ. मायकेल डिबाकी, डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड व डॉ. कॅंट्रोव्हीट्झ यांच्यासह

इतकेच नव्‍हे तर १९६३ साली डिबाकी यांनी प्रथम ‘इंटरअॅक्‍टीव्‍ह टेलिमेडिसीन’ यास सुरुवात केली. यामध्‍ये एका शहरातील शल्‍यचिकित्‍सक दूरवरच्‍या दुसर्‍या शहरात चालू असलेल्‍या शस्‍त्रक्रियेमध्‍ये सहभागी होऊ शकतात. कृत्रीम हृदयाचा प्रथम वापरही डिबाकींनी करून पाहिला. अगदी अलीकडे काही वर्षे ते नासातील अभियंत्‍यांबरोबर काम करीत होते. त्‍यांच्‍या सहकार्याने डिबाकी यांनी ज्‍यांचे हृदय जवळजवळ मृत्‍युपंथाला लागले आहे अशा रुग्‍णांसाठी एक ‘पंप’ विकसित केला.

लहान असतांना डिबाकी यांचे आई-वडील त्‍यांना दर आठवड्याला सार्वजनिक वाचनालयात घेऊन जात असत. तेथे असलेले विश्वकोशाचे (एनसायक्‍लोपिडिआ ब्रिटानिका) खंड हे त्‍यांच्‍यासाठीचे प्रमुख आकर्षण होते. त्‍यामुळे ते भारावून गेले होते. त्‍यांच्‍या वडिलांनी त्‍यांची ज्ञानतृष्‍णा पाहून विश्वकोशाचे सर्व खंड विकत घेऊन डिबाकींना बक्षीस दिले. सार्वजनिक वाचनालये व ज्ञान यांचे अतूट नाते डिबाकी यांच्‍या मनात घर करून राहिले. पुढे मोठेपणी त्‍यांनी  महत्त्वाच्‍या अशा ज्‍या सर्व विषयांचा पुरस्‍कार केला त्‍यात एक मोलाची गोष्‍ट होती ती म्‍हणजे ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन’ (राष्‍ट्रीय वैद्यकीय ग्रंथालय) ची स्‍थापना. आज या ग्रंथालयातील सर्व प्रकाशने महाजालावर उपलब्‍ध आहेत. यात स्‍वतः डिबाकी यांचे ४८८ शोधनिबंध उपलब्‍ध आहेत. या व्‍यतिरिक्‍त त्‍यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेवर तीन पुस्‍तके लिहिली. तसेच हृदयाचे आरोग्‍य व आहार यावर सामान्‍य लोकांसाठीही पुस्‍तके लिहिली. डिबाकी यांनी हृदयशस्‍त्रक्रियांसाठी कित्‍येक उपकरणे (क्‍लॅम्‍प्स, फोरसेप्‍स) विकसित केली. धूम्रपान व कर्करोगाचा प्रत्‍यक्ष संबंध आहे हे त्‍यांनी १९३९ सालीच सोदाहरण दाखवून दिले.

डिबाकी कायमच प्रसिद्धीच्‍या झोतात राहिले. त्‍यांच्‍या ७० वर्षांच्‍या अत्‍यंत यशस्‍वी वैद्यकीय कारकीर्दीत साठ हजारांपेक्षा जास्‍त हृदय-शस्‍त्रक्रिया डिबाकी व त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी डिबाकींच्‍या अध्‍यक्षेतखाली यशस्‍वी केल्‍या. यामध्‍ये अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्‍सन, रिचर्ड निक्‍सन, ड्यूक ऑफ विंडसर, जॉर्डनचे राजे हुसेन, रशियाचे अध्‍यक्ष बोरिस येल्त्सिन, इराणचे शहा तसेच मार्लिन डिट्रिच यांच्‍यासारखे हॉलिवूड मधील तारे, तारका यांच्यावरील हृदय-शस्‍त्रक्रियांचा समावेश होता.

शाळा, रुग्‍णालय, विद्यापीठातील विभाग इत्‍यादींना डिबाकी यांच्‍या सन्‍मानार्थ त्‍यांचे नाव देण्‍यात आले. अगणित सन्‍मान व पुरस्‍कारांनी त्‍यांना गौरविण्‍यात आले. आयुष्‍यभर ज्ञानलालसेने ते झपाटले होते. वैद्यकीय क्षेत्रात, विशेषतः हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या प्रांतात डिबाकी यांचे नाव घेतल्‍याशिवाय पुढे पाऊल टाकता येऊ नये इतक्‍या कक्षांना त्‍यांनी स्‍पर्श केला आहे. आधुनिक हृदयशल्‍यचिकित्‍सा त्‍यांची ऋणी आहे व त्‍या कृतज्ञतेतच त्‍यांच्‍या कामाची पावती आहे.

— डॉ हेमंत पाठारे,  डॉ अनुराधा मालशे

 Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…